2019च्या निवडणुकांमध्ये कोण जिंकणार, हे ठरवण्यात महिलांचा पुरुषांपेक्षाही मोठा वाटा असणार आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत महिला मतदानाचा टक्का 65 टक्के इतका होता. यंदाच्या निवडणुकीत हे प्रमाण पुरुषांपेक्षाही अधिक असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पण महिला स्वत:चं मत स्वत: ठरवतात का?
निवडणूक आयोगाच्या 'Election Commission of India' या यूट्यूब चॅनेलवर Women Voters या नावानं एक व्हीडिओ आहे. 'मतदान हर महिला का अधिकार, वो हर जगह बराबर की हकदार,' असं म्हणत या व्हीडिओत महिलांना मतदान करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. पण प्रत्यक्षात महिला स्वत:चं मत स्वत: ठरवतात का? मतदानाच्या निर्णयप्रक्रियेत त्यांचं काय स्थान असतं? त्यांच्या मतदानावर नेमका कशाचा प्रभाव असतो? हे समजून घेण्यासाठी आम्ही बीड जिल्ह्यातील 3 गावांमधील काही महिलांशी चर्चा केली.
सर्वप्रथम आम्ही बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यातील वायगाव गाठलं. सकाळी साडेआठला आम्ही वायगावात पोहोचलो, तेव्हा गावातली पुरुष मंडळी पारावर, टपरीवर गप्पांचा फड रंगवताना दिसून येत होती. गावातल्या शेवटच्या गल्लीतून शेवटच्या घरी आम्ही पोहोचलो. अनिता माने यांचं ते घर. मतदान आणि महिला असा विषय घेऊन आम्ही चर्चेला सुरुवात केली. मंगल सुरवसे यांनी सगळ्यांत अगोदर बोलायला सुरुवात केली.
पती, मुलगा, वडील, दीराचं ऐकून मतदान
पहिल्या मतदानाबद्दलचा अनुभव सांगताना त्या म्हणाल्या, "पहिल्यांदा मत कधी दिलं ते वर्ष आठवत नाही, पण लग्नानंतरच मी पहिल्यांदा मत दिलं. आमच्या मालकांनी जसं सांगितलं, तसं मी केलं." मंगल ताईंच्या पतीनं ६ वर्षांपूर्वी आत्महत्या केली. त्यांना ३ मुली आणि १ मुलगा आहे. पतीच्या निधनानंतर मंगलताईंनी २०१४च्या निवडणुकीत मतदान केलं. "२०१४ला मी मतदान केलं. तेव्हा आमचे मालक नव्हते. तेव्हा पोरानं सांगितलं कोणतं बटन दाबायचं. मग तेच बटन दाबलं."
तुमच्या गावात प्रचाराचं वातावरण दिसत नाही, असं म्हटल्याम्हटल्या नफीसा शेख यांनी बोलायला सुरुवात केली. "१८ एप्रिलला मतदान आहे आमच्याकडं. निवडणुकीचा प्रचार अजून रंगात आला नाही. ग्रामपंचायतीची निवडणूक असल्यावर वातावरण चांगलंच रंगतं," नफीसा ताईंच्या वाक्यानं सगळेच हसायला लागले.
मत कुणाला द्यायचं हे कसं ठरवता, असं विचारल्यावर त्या म्हणाल्या, "माझं वय ४० वर्षं असेल. लग्नानंतरच मी पहिलं मत दिलं. आतापर्यंत १३-१४ वेळा मतदान केलं असेल. मतदानाच्या दिवशी सकाळी आमचे वडील घरी मीटिंग घेतात. ईदसारखं वातावरण असतं घरी. आमचे सगळे भाऊ आणि घरातल्या सगळ्या बाया आलेल्या असतात. मग आमचे वडील मत कुणाला द्यायचं हे सांगतात.
"प्रचारासाठी जेव्हा ते लोक घरी येतात, तेव्हा त्यांनी पॅम्प्लेट दिलेलं असतं. पॅम्प्लेटवर निवडणुकीला उभे राहिलेल्या माणसांची नावं आणि चिन्हं दिलेली असतात. मग ते पॅम्प्लेट दाखवून वडील ज्याला मतदान करायचं, त्या माणसाचं नाव आणि चिन्ह दाखवून देतात. मग आम्ही सगळ्या बाया त्याच माणसाला मत देतो." मत मागायला सगळेच येतात. पण एकदा निवडणूक झाली की, कुणी आमच्याकडे फिरकत नाही, अशी त्यांची तक्रार आहे.
पण मग वडिलांनी सांगितलेल्या माणसाला तुम्ही मत देता, तो माणूस काम करत नाही, असंही म्हणता, मग कुणाला मत द्यायचं हे स्वत: का ठरवत नाही, यावर नफीसा सांगतात, "आमच्या घरात वडिलांचंच सगळं चालतं. ते मोठे असल्यामुळे त्यांच्या पुढे कुणाचं काही चालत नाही. त्यांच्याच घरात राहावं लागतं ना, त्यांचंच जर नाही ऐकलं, तर..." असं म्हणून नफीसा यांनी बोलणं थांबवलं.
आमची चर्चा सुरू असतानाच अनिताताईंच्या घरासमोर दोन मोटारसायकल येऊन उभ्या राहिल्या. मोटारसायकलवरील पुरुषांनी आत घरात काय चाललं याचा कानोसा घेतला आणि काही वेळानंतर ते तिथून निघून गेले. मतदान आहे हे तुम्हाला कसं आणि केव्हा कळतं, असा प्रश्न विचारल्यावर वैशाली यादव यांनी बोलायला सुरुवात केली.
"मतदानाच्या दिवशीपर्यंत निवडणुकीला कोण उभं आहे, हे आम्हाला माहिती नसतं. सगळ्या गोष्टींच्या बैठका गावातल्या पारावर घेतल्या जातात, बायांना काही पारावर जाता येत नाही, त्यामुळे मग कोण उभं आहे, घराबाहेर काय सुरू आहे, हे कळतच नाही." वैशालीताईंचं वय ३० वर्षं आहे. त्यांना २ मुलं आहेत. वैशाली ताई त्यांच्या मोठ्या दिराचं ऐकून मतदान करतात.
मतदान कुणाला करायचं हे स्वत: का ठरवत नाही, असं विचारल्यावर त्या म्हणाल्या, "आमचे भाया (मोठा दीर) सांगतील त्या माणसाला आम्ही मत देतो. घरातली कामं बाई करू शकते. पण वावरात पाळी हाणायला, रात्री पाणी द्यायला गडी माणूस कुठून आणणार? मतदान एका दिवसाचं असतं, पण आम्हाला अख्खं आयुष्य त्यांच्याजवळ काढायचं असतं. त्यांचं नाही ऐकणार तर कुणाचं ऐकणार? त्यांची साधी गोष्ट जरी नाही ऐकली, तरी माझं गाऱ्हाणं गावात ५ ठिकाणी जातं. विधवा महिलेला भाया, सासू-सासरे, नातेवाईक, बाहेरची माणसं,असे लय मालक असतात भाऊ!" वैशालीताईंकडे २ एकर शेती आहे. शेती करून त्या मुलांना शिकवत आहेत.
यानंतर दुपारी साडेअकराच्या सुमारास आम्ही पाडळशिंगी गावामध्ये पोहोचलो. गावातील चंद्रभागा शिंदे यांच्या घरी आम्ही शेणानं सारवलेल्या अंगणात बसलो होतो. आम्ही ज्या भिंतीजवळ बसलो होतो, त्याच भिंतीवर बाबासाहेब आंबेडकरांचा मोठा फोटो लावलेला होता. चंद्रभागाताईंनी गावातल्या १५ ते २० महिलांना आमच्याशी चर्चा करायला बोलायला होतं. सध्या निवडणूक कशाची आहे आणि निवडणुकीला कोण उभं आहे, या प्रश्नाचं मात्र एकीलाही उत्तर देता आलं नाही.
बीड लोकसभा मतदारसंघात भाजपनं विद्यमान खासदार प्रीतम मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं बजरंग सोनवणे यांना उमेदवारी दिली आहे. चर्चा पुढे नेत बीडचे सध्याचे खासदार कोण आहेत, असं मी विचारलं. यानंतर सगळ्या जणी एकमेकींकडे पाहायला लागल्या. प्रीतम मुंडे,असं उत्तर मधोमध बसलेल्या एका ताईंनी दिलं. मुक्ता मुळे त्यांचं नाव.
'घरातून बाहेर पडले आणि मताचं महत्त्व कळालं'
मतदानाविषयी विचारल्यावर मुक्ता यांनी सांगितलं, "२००७ पर्यंत आमचे मालक ज्यांना सांगतील, त्यांनाच मी मतदान करायचे. पण त्यांचं २००७मध्ये अपघतात निधन झालं. त्यानंतर मग घरची, बाहेरची सगळी जबाबदारी माझ्या एकटीवर येऊन पडली. त्यामुळे मग मी घरातून बाहेर पडले. सगळी कामं स्वत:हून करायला लागले. स्वत: निर्णय घ्यायला लागले. बरं-वाईट काय हे यातून समजायला लागलं. यामुळे मग आता कुणाला मत द्यायचं, हे माझं मी स्वत: ठरवते."
३५ वर्षीय मुक्तांकडे अडीच एकर शेती आहे. त्या स्वत: शेती करतात. पहिले लोकांचे ऐकून मतदान करायचे, आता पुढारी प्रचाराला बोलावतात, असं घोडका राजुरी इथल्या संजीवनी पवार यांनी आम्हाला सांगितलं.
'आता पुढारी प्रचाराला बोलावतात'
"पहिले गावातले लोक ज्याला सांगायचे त्यालाच मी मतदान करायचे. पण १५-२० वर्षांपासून मात्र कुणाला मतदान करायचं हे मी स्वत:च ठरवते. आताही सांगतात लोक याला मत द्या म्हणून. मी सगळ्यांचं ऐकून घेते. पण जो काहीतरी करेल त्यालाच मत द्यायचं, " ५० वर्षांच्या संजीवनी सांगत होत्या.
तुमच्या मतदानाविषयीच्या निर्णय प्रक्रियेत हा बदल कसा झाला, याविषयी त्या सांगतात, "१५ ते २० वर्षं झाले आम्ही विधवा महिलांचा बचतगट स्थापन केला. तेव्हापासून आम्ही घराच्या बाहेर निघायला लागलो. पहिले आम्ही बीडला यायचं म्हटलं तरी लोक म्हणायचे, कुठं चालल्या? बचत गटाच्या माध्यमातून मग आम्ही बीडला यायला लागलो.
"आम्हाला सरकारी योजनांची माहिती व्हायला लागली. तेव्हाच आमच्यात ताकद आली. आम्ही स्वत:हून काहीतरी करू शकतो, असं वाटायला लागलं. काय करायचं, काय नाही हे स्वत: ठरवायला लागलो. आता तर सरपंच लोक येऊन म्हणतात, तुम्ही आमच्याकडून निवडणूक लढवा," संजीवनी पुढे सांगतात.
वायगाव, पाडळशिंगी आणि घोडका राजुरीमध्ये 50हून अधिक महिलांशी चर्चा केल्यानंतर, मत कुणाला द्यायचं हे स्वत: ठरवणाऱ्या महिलांची संख्या खूप कमी असल्याचं लक्षात आलं.
महिलांच्या मतदानावर इतरांचा प्रभाव का?
महिलांवरील संस्कारांमुळे त्यांच्या मतदानावर इतरांचा एवढा प्रभाव असतो, असं बीडमधील सामाजिक कार्यकर्त्या मनीषा तोकले यांनी सांगितलं.
त्यांच्या मते, "राजकारणासंदर्भात बायांनी विचार करायचा नसतो, अशा पद्धतीचं ट्रेनिंग बायांना दिलेलं असतं. राजकारणात बायांनी पडू नये, कारण राजकारण ही चांगली गोष्ट नाही, असं समजलं जातं. या सगळ्या परिस्थितीमध्ये कोणतीही गोष्ट करताना नवऱ्याला, मुलाला किंवा घरातल्या मोठ्या माणसाला विचारून करायची ही सवय बायकांना लागलेली आहे."
मतदानाच्या निर्णयप्रक्रियेतील महिलांचं स्थान वाढवण्यासाठी काय करायला हवं, यावर त्या सांगतात,
"बाईनं स्वत:चे निर्णय स्वत: घेण्याची जी प्रक्रिया आहे तिची सवय लहानपणापासून तिला लावायला हवी. तिला जेव्हा कळायला लागतं तेव्हा तिनं ठरवायला पाहिजे की, आपण मतदान करतो, तर का करतो? कशासाठी करतो? त्याचा उद्देश काय असतो? मताचा अधिकार म्हणजे काय?
"महिलांच्या या सगळ्या जाणीवा जागृत होणं खूप आवश्यक आहे. तसंच सतत या विषयावर महिलांशी बोलणं गरजेचं आहे. त्यांना तसे कार्यक्रम देणं, प्रत्येक निवडणुकीमध्ये तसं वातावरण बनवणं, प्रत्येक निवडणूक ट्रेनिंगसारखी घेणं आणि ते एक्स्पोजर या बायकांना देणं ही सरकारची जबाबदारी आहे."
महिलांच्या मतदानाचा पॅटर्न कसा असतो?
महिलांच्या मतदानाचा पॅटर्न कसा असतो, याविषयी महिला राजसत्ता आंदोलनाचे प्रवक्ते भीम रासकर यांनी सांगितलं की, "स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मतदान कुणाला करायचं हे महिलांनी स्वत: ठरवण्याचं प्रमाण वाढलं आहे. महिला मंडळ, बचत गट आणि 50 टक्के आरक्षणामुळे महिला बाहेर पडू लागल्या आहेत.
"पण, लोकसभा, विधानसभा अशा वरच्या पातळीवरच्या निवडणुकांमधील मतदानाचा विचार केल्यास याबाबत महिला तेवढा विचार करताना दिसत नाहीत. अजूनही सगळ्या महिला मतदानाबाबत स्वत: निर्णय घेतात, असं म्हणता येणार नाही."
महिला राजसत्ता आंदोलन सध्या 'तुमचं मत, तुम्हीच ठरवा,' अशी मोहीम राबवत आहे.
निर्णय प्रक्रियेत महिलांचं स्थान महत्त्वाचं का?
निवडणुकीत अधिकाधिक मतदान व्हावं यासाठी निवडणूक आयोग आणि सरकार वेगवेगळ्या पद्धतीनं मतदानाच्या महत्त्वाविषयी प्रचार आणि प्रसार करतं.
गेल्या लोकसभा निवडणुकीत महिला मतदानाचा टक्का 65 टक्के इतका होता. यंदाच्या निवडणुकीत हे प्रमाण पुरुषांपेक्षाही अधिक असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पण आपलं मत कुणाला द्यायचं हे महिला स्वत:हून जोपर्यंत ठरवत नाहीत, तोपर्यंत त्या मतदानाच्या अधिकाराचा काय उपयोग, असा प्रश्न सामाजिक कार्यकर्त्या मनीषा तोकले विचारतात.
त्या विचारतात, "मत कुणाला द्यायचं या निर्णय प्रक्रियेत महिलांना स्थान नसेल, तर मतदानाच्या अधिकाराचा काय उपयोग? स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या महिलांच्या ५० टक्के आरक्षणाचा काय फायदा?"