Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

4500 वर्षांपूर्वी 40 हजार लोकांसह 'हे' शहर झालं अचानकपणे गायब, इथे असं काय झालं?

Webdunia
गुरूवार, 24 ऑगस्ट 2023 (10:03 IST)
समांथा शिआ
पाकिस्तानच्या दक्षिणेकडील सिंध प्रांतात जगातील सर्वात जुनी संस्कृती अस्तित्वात होती. या संस्कृतीचे अवशेष आजही इथल्या धुळीच्या मैदानात शाबूत आहेत.
 
ही संस्कृती आणि इथल्या शहराबद्दल बहुतेक लोकांनी फारसं ऐकलेलं नाही.
 
माझ्या सभोवताली पसरलेल्या प्राचीन शहराकडे एक कटाक्ष जरी टाकला तरी शहराची रचना अगदी आखीव आणि योजनाबद्ध असल्याचं दिसतं.
 
संपूर्ण परिसरात लाखो विटांनी बनवलेले रस्ते अस्तित्वात होते. काळाच्या ओघात जीर्ण झालेल्या रस्त्यावर एक प्राचीन बौद्ध स्तूप उभा होता. रुंद जिना असलेला एक मोठा पूल होता.
 
माझ्यासारखे काही लोक या ठिकाणी भेट द्यायला आले होते.
 
मी दक्षिण पाकिस्तानातील सिंधू संस्कृतीचे सुप्रसिद्ध स्थळ असलेल्या लार्कान जिल्ह्यातील मोहेंजोदडो या ठिकाणाला भेट दिली होती. आज त्याचे फक्त अवशेष शिल्लक आहेत.
 
4,500 वर्षांपूर्वी वसलेलं आणि अत्याधुनिक पायाभूत सुविधांनी समृद्ध असं हे शहर जगातील सर्वात जुन्या शहरांपैकी एक आहे.
 
1980 मध्ये मिळाला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा
मोहेंजोदडो या शब्दाचा सिंधी भाषेतील अर्थ आहे मृतांची टेकाडे. हे शहर एकेकाळी भरभराट होत असलेल्या सिंधू संस्कृती मधील (हडप्पा संस्कृती म्हणूनही ओळखली जाणारी) सर्वात मोठं शहर होतं. ही संस्कृती कांस्ययुगात ईशान्य अफगाणिस्तानपासून उत्तर-पश्चिम भारतापर्यंत पसरली होती. मोहेंजोदडो येथे किमान 40,000 लोक राहत होते. इ. स. पूर्व 2500 ते 1700 दरम्यान या संस्कृतीची भरभराट झाली असं मानलं जातं.
 
तिथले स्थानिक गाईड इर्शाद अली सोलंकी यांनी माहिती देताना सांगितलं की, "हे मेसोपोटेमिया आणि इजिप्तशी सांस्कृतिक, आर्थिक आणि धार्मिक संबंध असलेलं शहरी केंद्र होतं."
 
इर्शाद अली सोलंकी यांच्या आधीच्या तीन पिढ्या देखील मोहेंजोदडो येथे माहिती देण्याचं काम करत होत्या.
 
पण एकाच वेळी भरभराट झालेल्या इजिप्त आणि मेसोपोटेमियामधील प्राचीन शहरांच्या तुलनेत मोहेंजोदडो बद्दल फार कमी लोकांनी ऐकलं आहे. इ. स. पूर्व 1700 मध्ये मोहेंजोदडो येथील संस्कृतीचा विनाश झाला. तो कसा झाला? इथले लोक कुठे गेले याबद्दल मात्र आजही निश्चितपणे सांगता येत नाही.
 
एका उत्खननात विटांच्या कामांचा शोध लागल्यावर प्रथमच इथल्या प्राचीन शहराच्या अस्तित्वाची माहिती मिळाली. 1911 मध्ये पुरातत्वशास्त्रज्ञांनी या भागात भेट दिली. मात्र भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (एएसआय) विभागाने या विटा प्राचीन असल्याचा दावा फेटाळून लावला.
 
एएसआय अधिकारी आरडी बॅनर्जी यांनी 1922 मध्ये सांगितलं होतं की, इथे एक बौद्ध स्तूप आणि एक गोलाकार रचना आहे जिथे बौद्ध लोक ध्यान करीत असत. त्याच ठिकाणी त्यांना दफन करण्यात आलं होतं.
 
आर डी बॅनर्जी यांच्या या खुलाशामुळे या जागेकडे जगाचं लक्ष वेधलं.
 
यानंतर, इथे मोठ्या प्रमाणावर उत्खनन सुरू झालं. 1927 सालापर्यंत ब्रिटिश पुरातत्वशास्त्रज्ञ सर जॉन मार्शल यांनी इथे उत्खनन केलं. शेवटी 1980 मध्ये, मोहेंजोदडोला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाचा दर्जा देण्यात आला.
 
इथे सापडलेल्या अवशेषांमध्ये इतिहासात यापूर्वी कुठेही न पाहिलेल्या शहरीकरणाचे स्तर होते.
 
सिंधू खोऱ्यातील "सर्वोत्तम संरक्षित" अवशेषांपैकी एक म्हणून युनेस्कोने मोंहे-जो-दडोचं कौतुक केलं होतं.
 
हे ऐतिहासिक स्थळ आज स्थानिक उद्यानात बदललंय
 
शहराचा सर्वात आश्चर्यकारक पैलू म्हणजे इथली स्वच्छता व्यवस्था.
 
या शहरातील लोक त्यांच्या समकालीनांपेक्षा खूप प्रगत होते. इजिप्त आणि मेसोपोटेमियामध्येही गटारे आणि शौचालये आढळली, मात्र ही श्रीमंत लोकांसाठी असलेली व्यवस्था होती.
 
पण मोहेंजोदडोमध्ये ठिकठिकाणी शौचालये आणि नाले होते. उत्खनन सुरू झाल्यानंतर इथे 700 हून अधिक विहिरी, खाजगी आणि सार्वजनिक स्नानगृह सापडली.
 
अनेक खाजगी घरांमध्ये शौचालये देखील आढळून आली. जलनिःसारणाची व्यवस्था शास्त्रशुद्ध होती. गटारे उत्कृष्ट बांधणीची असून ती मुख्य गटाराला जोडलेली होती.
 
पुरातत्वशास्त्रज्ञ आणि ब्रुकलिनच्या प्रॅट इन्स्टिट्यूटमधील सहयोगी प्राध्यापक उज्मा रिझवी यांनी 2011 साली 'मोहें-जो-दाडो: द बॉडी अँड डोमेस्टीकेशन ऑफ वेस्ट' हा शोधनिबंध सादर केला होता.
 
त्या सांगतात की, "मोहेंजोदडो येथील रहिवाशांना त्यांच्या आजूबाजूचा परिसराची चांगली समज होती. हे शहर सिंधू नदीच्या पश्चिमेला वसलेलं असल्याने दरवर्षी येणाऱ्या पुरापासून संरक्षण करण्यासाठी त्यांच्याकडे जलनिस्सारण व्यवस्था होती. मध्य आशियापासून मध्य पूर्वेपर्यंत पसरलेल्या सागरी व्यापारात त्यांची महत्वाची भूमिका होती. त्यांनी तयार केलेली मातीची भांडी, दागिने, मूर्ती आणि इतर साहित्य जगात अनेक ठिकाणी सापडल्या आहेत."
 
पण आज हे ऐतिहासिक ठिकाण पिकनिक स्पॉट ठरतंय. पाकिस्तानच्या इतर भागातले पर्यटक तर क्वचितच या ठिकाणी भेट देतात. शिवाय परदेशी पर्यटक देखील इकडे जास्त फिरकत नाहीत.
 
काटकोनात छेदणाऱ्या रस्त्यावर आम्ही एकत्र आलो. तिथले नाले झाकलेले होते, रस्त्यावरून चालणाऱ्या व्यक्तीला सावली देणार्‍या उंच भिंतीही दिसल्या. हे सर्व काही हजार वर्षांपूर्वी बांधलं असल्याचं जाणून मला आश्चर्य वाटलं.
 
केवळ स्वच्छता आणि कचऱ्याची विल्हेवाट लावण्याच्या शास्त्रशुद्ध पद्धतीमुळे मोहेंजोदडो इतर संस्कृतींपेक्षा उजवं ठरत नाही.
 
त्याकाळी अद्ययावत तंत्रज्ञान नसताना देखील दर्जेदार बांधकाम साहित्याचा वापर केल्याचं पुरातत्वशास्त्रज्ञ सांगतात.
 
उज्मा रिझवी सांगतात की, "भले ही विटांचा आकार एकसारखा नसेल पण त्यांचं गुणोत्तर 4:2:1 असं आहे. शिवाय सर्व विटा एकाच स्वरूपाच्या आहेत. त्यामुळे शहर एकसारखं दिसतं. थोडक्यात सर्व गोष्टी एक सारख्या प्रमाणात केल्या गेल्या तर सर्वांमध्ये सुसंवाद राखला जातो."
 
उन्हात वाळवलेल्या आणि भट्टीतून काढलेल्या विटा आज कित्येक वर्षांनंतरही शाबूत आहेत.
 
मोहेंजोदडो सारख्या शहरात महाल, मंदिरे किंवा भव्य अशा वास्तू आढळत नाहीत. याचा अर्थ असा नाही की इथे भव्य वास्तुकला अस्तित्वात नव्हती.
 
यावर उज्मा रिझवी स्पष्ट करतात की "इथली भव्यता ही संरचनात्मक व्यवस्थेची भव्यता होती."
 
तेथील रहिवासी सिंधू लिपी वापरत
 
आता आम्ही विटांच्या पायऱ्यांवरून चालत चालत शहराच्या खालच्या भागात पोहोचलो.
 
300 हेक्टरवर पसरलेलं हे क्षेत्र या शहराचा मुख्य भाग आहे. हा भाग गजबजाटीचा होता.
 
इथे सर्व गोष्टी नियोजनबद्ध पद्धतीने साकारल्याचं दिसतं. अरुंद गल्ल्या एकेठिकाणी येऊन मुख्य रस्त्याला मिळत होत्या. आजच्या घरांमध्ये किंवा इमारतींमध्ये जसे दारांमध्ये उंबरठे दिसतात तसेच उंबरठे या शहरातील स्नानगृह तसेच घराच्या दरवाजांमध्ये बसवल्याचं दिसतात.
 
उज्मा रिझवी सांगतात की, "जेव्हा तुम्ही उंबरठा पाहता तेव्हा तुम्हाला समजतं की हा घराच्या आतला आणि बाहेरचा भाग आहे."
 
इथल्याच गवताळ मैदानात मोहेंजोदडो संग्रहालय नावाची एक छोटी इमारत बांधली आहे. मी तिथे भेट दिल्यावर मला इथल्या रहिवाशांची अधिक माहिती मिळाली.
 
येथे सापडलेल्या मुद्रा विविध प्रकारच्या असून त्यांवर हरतऱ्हेचे विचित्र प्राणी व गेंड्यासदृश दलदलीच्या प्रदेशांत राहणारी जनावरे चित्रित केलेली आहेत. तसेच पुतळे, दागिने, साधने, खेळणी आणि मातीची भांडी यांचे तुकडेही संग्रहालयात जतन केले आहेत.
 
यातल्या दोन शिल्पांनी माझं लक्ष वेधून घेतलं. केसात आभूषणं घातलेली स्त्री आणि दुसरं शिल्प होतं उंची वस्त्र परिधान केलेल्या पुरुषाचं.
 
उज्मा रिझवी सांगतात, "हा पुतळा राजाचा आहे की पुजाऱ्याचा याविषयी निश्चित काही सांगता येत नाही. पण त्याकाळी पुरुष देखील स्वतःच्या सौंदर्याची विशेष काळजी घ्यायचे असं दिसतं."
 
"रहिवासी त्यांच्या दिसण्याबद्दल, त्यांच्या शरीराबद्दल किती जागरूक होते हे यातून दिसतं. त्यांच्यात गुणवत्ता आणि पोषाखाला महत्वं दिलं जात होतं."
 
"पण सिंधू संस्कृती मधील लोकांचं जीवन कसं होतं याविषयीचे महत्त्वाचे तपशील अजूनही मिळालेले नाहीत. प्राचीन साहित्यामधून एखाद्या संस्कृतीचा उलगडा होतो. पण सिंधू संस्कृती याला अपवाद आहे."
 
इर्शाद अली सोलंकी सांगतात, "येथील रहिवासी सिंधू खोऱ्यातील लिपी वापरत होते. या लिपीत 400 हून अधिक चिन्ह आहेत. त्यामुळे ही भाषा अजूनही वाचता आलेली नाही."
 
मोहेंजोदडोमध्ये काय घडलं याचं गूढ
शहर सोडून गेल्याच्या मुद्द्यावर संशोधकांमध्ये एकमत दिसत नाही. उज्मा रिझवीच्या म्हणण्यानुसार, मोहेंजोदडो एका रात्रीत गायब झालेलं नाही.
 
त्या सांगतात, "हे शहर अचानक ओस पडलं नाही. इ.स.पूर्व 1900 च्या सुमारास इथे काही बदल झाले. काही नोंदींमध्ये इथे राहणाऱ्या लोकांचे थोडेफार ट्रेस सापडतात. सर्वजण एकाच वेळी निघून गेले असं नाही. पण काही लोकांनी याची सुरुवात केली. नंतरच्या काळात शहराची लोकसंख्या पूर्वीसारखी राहिली नाही. पण शहर सोडून जाणाऱ्या लोकांचा ओघ मंदावला होता."
 
आता हजारो वर्षांनंतर म्हणजेच ऑगस्ट 2022 मध्ये, पाकिस्तानात आलेल्या विनाशकारी पुरामुळे या शहराचं अस्तित्व पुन्हा धोक्यात आलं आहे.
 
पुरातत्वशास्त्रज्ञ आणि संग्रहालयाच्या क्युरेटर डॉ. अस्मा इब्राहिम यांनी सांगितलं की, पुरामुळे मोहेंजोदडोचं नुकसान झालं आहे, परंतु पुरातत्वशास्त्रज्ञांना भीती वाटली होती त्यापेक्षा हे नुकसान खूपच कमी होतं.
 
भविष्यात कोणत्या प्रकारच्या उपाययोजना करता येतील, या प्रश्नाला उत्तर देताना डॉ. अस्मा इब्राहिम सांगतात, या भागातील अतिरिक्त पाणी काढून टाकण्यासाठी पंप वापर करण्याची शिफारस केली आहे आणि इथे दीर्घकालीन धोरणाची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं.
 
परिसरासाठी कायमस्वरूपी आराखडा तयार केल्यास पुरातत्व विभागालाच फायदा होणार नाही, तर इर्शाद अली सोलंकी यांच्यासारख्या आसपासच्या परिसरात राहणाऱ्या लोकांनाही फायदा होईल. सोलंकीच्या दांड गावातून इथला बौद्ध स्तूप स्पष्टपणे दिसतो.
 
"माझ्यासाठी ही संस्कृती एक प्राचीन सांस्कृतिक ठेव आहे. आपण भावी पिढ्यांसाठी त्याचं संरक्षण केलं पाहिजे."
 
मी पायऱ्या चढत असताना, सोलंकी बोलत होते.
 
ते म्हणाले, "इथे दिसणारी स्वच्छता व्यवस्था आजच्या आधुनिक पाकिस्तानमध्येही आढळत नाही."
 
इर्शाद अली सोलंकी यांनी म्हटल्याप्रमाणे "सरकारी संपत्ती लोककल्याणासाठी खर्च केली गेली."
 
किमान काही काळासाठी या गुंतवणुकीची भरपाई झाली. मोंहे-जो-दडो समृद्ध झालं आणि त्यामुळे इथल्या लोकांना खूप चांगलं जीवन अनुभवता आलं.
 
काही तासांनंतर मी एका जुन्या ऑटोरिक्षाने लार्कानला परतले.
 
हजारो वर्षांपासून धूळ आणि वाळूमध्ये गाडलेलं हे शहर आजही सिंधच्या मैदानात हरवल्याचं दिसतं.
 
तरीही इर्शाद अली सोलंकी सारखे गाईड आणि पुरातत्वशास्त्रज्ञांच्या अथक परिश्रमांमुळे आपल्याला हे सर्वात प्राचीन आणि प्रगत शहर अनुभवता येतं. बाकी काही नाही तरी सध्या इथे स्वच्छता आणि पाण्याचा निचरा होईल अशा रस्त्यांची गरज आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

15 व्या दिवशी देखील अल्लू अर्जुनच्या पुष्पा 2 ने केला 1500 कोटींचा टप्पा पार

Year Ender 2024 कमी बजेटमध्ये बनवलेले 5 चित्रपट, ज्यांनी यावर्षी चांगलीच धमाल केली

ऋचा चढ्ढाला पत्रकार व्हायचं होतं, पण अभिनेत्री झाली

यशराज फिल्म्स आणि पोशम पा पिक्चर्सच्या पहिल्या मोठ्या चित्रपटात आयुष्मान खुराना मुख्य भूमिकेत, समीर सक्सेना करणार दिग्दर्शन!

गुम है किसी के प्यार में' शोमध्ये शीझान खानची धमाकेदार एन्ट्री, महत्त्वाची भूमिका साकारणार

सर्व पहा

नवीन

दिग्दर्शक आणि आर्ट डिझायनर सुमित मिश्रा यांचे निधन

अक्षय कुमार स्टारर वेलकमला17 वर्षे पूर्ण झाली, अनिल कपूरने जुने दिवस आठवत पोस्ट केली

पुष्पा 3 बाबत अल्लू अर्जुनने घेतला मोठा निर्णय

ख्रिसमस सेलिब्रेशनसाठी प्रसिद्ध प्राचीन जुने कॅथोलिक चर्च भोपाळ

मलायका अरोराच्या नवीन रेस्टॉरंटमध्ये पोहोचले अरबाज खान

पुढील लेख
Show comments