Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राम शेवाळकर: ज्यांच्या वक्तृत्वावर भाळून तरुणीने त्यांच्यासाठी अविवाहित राहायचं ठरवलं होतं..

Webdunia
गुरूवार, 2 मार्च 2023 (08:59 IST)
रोहन नामजोशी
Role,बीबीसी प्रतिनिधी
facebook
नागपूरच्या उत्तर अंबाझरी मार्गावर अनेक तरुण तरुणी बागडत असतात. शाळा, कॉलेजेस, क्लासेस असल्यामुळे तिथे कायम वर्दळ असते. त्याच गजबजलेल्या रस्त्यावर एक बंगला आहे. राम शेवाळकरांचा.
 
प्राचार्य राम शेवाळकर, नानासाहेब अशा अनेक नावांनी ते अवघ्या महाराष्ट्राला परिचित आहे. सध्याच्या डिजिटल काळात एक व्हीडिओ अपलोड करून अनेक वक्ते जन्माला येत असताना राम शेवाळकर हे खरोखर वक्ता दशसहस्त्रेषू नावाला जागणारे होते.
 
त्यांच्या अमोघ वाणीने त्यांनी महाराष्ट्राला, देशाला आणि देशाबाहेरही अनेकांना समृद्ध केलं. लिखाणाचे सर्व प्रकार हाताळले. लिखाणापेक्षा वक्ता म्हणून ते जास्त ओळखले जातात. आज त्यांची जयंती. त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटनांचा आणि विचारांचा घेतलेला हा आढावा.
 
अमरावती जिल्ह्यातील अचलपूर जिल्ह्यात 2 मार्च 1931 ला राम शेवाळकर यांचा जन्म झाला. त्यांचं मूळ आडनाव धर्माधिकारी होतं. त्यांना अचलपूर गावाबद्दल एक आस्था होती. त्या गावात मला लहान होता येतं असं हे एकमेव गाव आहे, तिथे मला कोणी हसत नाही आणि कुणी मला टोकत नाही असं ते म्हणत असत.
 
त्यांची आई लहानपणीच गेली. त्यानंतर ते आजीच्या सहवासात राहिले. त्यांचे वडील अमरावतीला असायचे. राम शेवाळकर सांगतात, “आमचे वडील तेव्हा अमरावतीला होते. ते अचलपूरला येणार म्हटल्यावर आम्हाला खूप आनंद व्हायचा. ते आल्याची खूण म्हणून घरातल्या चिमणीऐवजी कंदील लावायचो. कंदील लावला की भाऊसाहेब आले आहेत हे सगळ्या गावाला कळायचं.
 
त्यांचे वडील विदर्भात कीर्तनकेसरी वडिलांचं अनुकरण करून त्यांनीही लहान वयात कीर्तनं करायला सुरवात केली. अमरावतीतून त्यांनी बीए, नागपूर विद्यापीठातून संस्कृत मधून एम ए अशा पदव्या त्यांनी प्राप्त केल्या.
 
वाशिम येथील शाळेत तेथे शिक्षक होते. नंतर त्यांनी निरनिराळ्या महाविद्यालयात काम केलं आणि वणी येथील लोकमान्य महाविद्यालयात त्यांनी प्राचार्य म्हणून काम केलं आणि प्राचार्य ही बिरुदावली त्यांच्या नावाला कायमची चिकटली.
 
वक्ता होण्याची प्रेरणा कुटुंबातूनच मिळाली असं ते नेहमी म्हणायचे.
 
“माझे वडील कीर्तनकार होते. त्यांच्या कीर्तनाची नक्कल मी करायचो. हे माझ्या वडिलांनी पाहिलं आणि मग मला ते कीर्तन लिहून द्यायला लागले. पुढे मग मी विद्यार्थी काँग्रेसचा प्रतिनिधी होतो. त्यामुळे मला बोलावं लागायचं. कीर्तनात कीर्तनकाराबरोबर विशिष्ट पात्रांमध्ये शिरायला होतं. तीच पद्धत मी माझ्या व्याख्यानांमध्ये वापरली. त्यामुळे ती रसाळ व्हायची असं श्रोते म्हणायचे.”
 
ज्ञानेश्वरीचा अभ्यास
बीए ला असताना ज्ञानेश्वरीचा एक अध्याय शेवाळकरांना अभ्यासाला होता. एम.ए ला असताना नववा अध्याय होता. शेवाळकरांनी दोन्हीचा अभ्यास केला. मात्र संपूर्ण ज्ञानेश्वरीचा अभ्यास करण्यासाठी एक निमित्त झालं.
 
ते वणीला प्राचार्य असताना संस्थाचालकांशी त्यांचे मतभेद झाले. ते उद्विग्न होऊन दीर्घ रजेवर. त्यावेळी त्यांनी एकांतवासात ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत आणि दासबोध पूर्ण वाचून काढले. त्या काळात त्यांनी कुणाशीही संपर्क ठेवला नाही.
 
नंतर त्यांनी अनेकदा व्याख्यानाच्या निमित्ताने त्यांनी ज्ञानेश्वरी वाचून काढली. तरीसुद्धा ज्ञानेश्वर कळले असं त्यांना वाटत नाही.
 
संत साहित्य, त्याबोबरच शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर, महात्मा गांधी, साने गुरुजी यांचे विचार त्यांनी श्रोत्यापर्यंत पोहोचवले.
 
आचार्यकुलाशी ओळख
शेवाळकर शिक्षक कसे झाले, त्याबद्दल बोलताना ते म्हणतात, “मी जेव्हा संस्कृतचा शिक्षक होण्याचं ठरवलं तेव्हा लोकांनी मला मुर्खात काढलं. परीक्षेला उपयोगी भाग विद्यार्थ्यांना शिकवणं इतकंच शिक्षकाचं काम आहे असं मला वाटायचं. विनोबांनी माझी ही दृष्टी बदलण्याचं काम केलं.
 
त्यांच्या मते शिक्षक फक्त पाठ्यपुस्तकातून शिकवणारा नसतो. तर तो आचार्य असतो, त्यानं आचार्य व्हावं. कारण त्यात आचार अंतर्भूत असतो. शिक्षकांनी असे विद्यार्थी घडवावे जे उद्या जाऊन देशाकडे पाहतील असं विनोबांचं मत होतं. त्यावरून माझी दृष्टी बदलली.”
 
वक्ता दशसहस्त्रेषु
दहा हजार लोकांमध्ये शोधूनही सापडणार नाही असा वक्ता म्हणजे वक्ता दशसहस्त्रेषु. राम शेवाळकरांकडे पाहिलं की या उक्तीला साजेसे असल्याचं लक्षात येतं. गोल चेहरा, डोईवरचे उडालेले केस, वैदर्भीय तोंडवळा आणि मधूर वाणी ही त्यांची ओळख उभ्या महाराष्ट्राला आहे.
 
त्यांच्या व्याख्यानाचे अगणित किस्से आहेत. एकदा नांदेडला साहित्य संमेलन भरलं होतं. आभार प्रदर्शन करायला शेवाळकर उभे राहिले.
 
तब्बल दीड तास त्यांनी व्याख्यान केलं आणि इतर भाषणांपेक्षा सगळ्यात जास्त भाषण तेच रंगलं. आचार्य अत्रे, पु.ल. देशपांडे आणि कुरुंदकरांसारखी दिग्गज माणसं असताना त्यांनी ही किमया साधली होती.
 
ज्येष्ठ लेखक आणि संपादक सुरेश द्वादशीवार यांनी साधना मासिकात लिहिलेल्या एका लेखात शेवाळकर यांच्या वक्तृत्वाबद्दल लिहिलं आहे.
 
ते लिहितात, “गवयाच्या गळ्यातून येणाऱ्या देखण्या तानांना रसिकांची दाद जावी तशी त्यांच्या व्याख्यानातील पल्लेदार वाक्यांना श्रोत्याची दाद उठताना मी पाहिली आहे. त्यांच्या वक्तृत्वावर लुब्ध झालेल्या एका तरुणीने त्यांच्यासाठी अविवाहित राहण्याचा केलेला संकल्पही मला ठाऊक आहे.
 
"नानासाहेबांची खूप व्याख्याने मी ऐकली आणि दरवेळी त्यांच्यातल्या कलावंतांने मला हरखून टाकलं. श्रोत्यांचा वर्ग परिचित असो वा अपरिचित आपण त्यांंना सहजपणाने आपले करू असा जबर आत्मविश्वास त्यांच्याकडे होता.”
 
ते पुढे लिहितात, “एकदा सगळ्या रामायणाविरोधी श्रोत्यांच्या संतप्त सभेत त्यांनी रामायणाची महती सांगितली. आधीचे सगळे वक्ते विरोधाचा सूर लावून गेले होते. त्याच सुरांचा परिणाम टिकवण्याची संयोजकांची जिद्द होती आणि नानासाहेब उभे राहिले. ‘रामायणावर श्रद्धा असणाऱ्यांपेक्षा त्यावर टीका करणाऱ्यांनीच त्याचा चांगला अभ्यास केलेला दिसतो.” या पहिल्या वाक्यानेच त्यांनी सभागृह ताब्यात घेतलं. संयोजकांनी लाऊडस्पीकर बंद पाडला.
 
शेवाळकर म्हणाले, “माझा आवाज लाऊडस्पीकरशिवायही लोकांना ऐकू जाईल.”
 
संयोजकांनी दिवे बंद केले. शेवाळकर म्हणाले, “मला पहायाला तुम्ही आलेला नाहीत. महाकाव्याचा महिमा ऐकायला आला आहात.”
 
सगळे व्याख्यान लाऊडस्पीकरवाचून गडद अंधारात आटोपले. पुढे पू्र्ण वेळ सभागृहात दोन आवाज उमटत राहिले. एक नानासाहेबांचा चढा आणि दुसरा त्यावर कडाडून उठणाऱ्या श्रोत्यांच्या टाळ्यांचा.
 
"व्याख्यान हे व्रत मानणाऱ्या नानासाहेबांचा श्रोत्यांना होणारा एक अनुषांगिक फायदा असा की त्यांची व्याख्यानं श्रोत्यांच्या पदरात फुकट पडणारी होती. कुरुंदकर काय किंवा ते काय मानधन, प्रवासखर्च या गोष्टी आधीच ठरवून व्याख्यानाला जाणं त्यांच्या अध्यात्मात बसणारं नव्हतं. परिणामी त्यांच्या अनेक व्याख्यानमाला अनेक संस्थांच्या दरबारात फुकट संपन्न झाल्या," अशी नोंदही द्वादशीवार करतात.
 
‘असा बाप कोणाला देऊ नये’
राम शेवाळकर यांचा मुलगा आशुतोष शेवाळकर हेही साहित्याच्या क्षेत्रात आहे. व्यवसायाने बिल्डर असले तरी वडिलांचा साहित्याचा वारसाही त्यांनी जपला आहे. आशुतोष यांचं त्यांच्या वडिलांवर निरतिशय प्रेम होतं. त्यांच्या अनेक गोष्टी पटायच्या नाहीत तरी त्यांचे किस्से त्यांनी लिहिले आहेत.
 
राम शेवाळकर हे अत्यंत हळव्या मनाचे होते असं ते सांगतात, लहानपणीच आईचं छत्र हरपल्याने असं झालं असावं असा आशुतोष यांचा कयास. डोळ्यात पाणी येण्यासाठी त्यांना कोणताही प्रसंग पुरायचा असं ते सांगतात.
 
जेव्हा आशुतोष यांनी पहिल्यांदा कार घेतली तेव्हा त्यांना अतिशय आनंद झाला. आता घरात कार आली त्यामुळे आता फिरायला आणखी चांगलं साधन मिळालं आहे असं त्यांना वाटायचं. आता ते कितीही गावात फिरून व्याख्यान देऊ शकतील याची त्यांना खात्रीच पटली अशी आठवण ते सांगतात.
 
आशुतोष यांना उमेदीच्या काळात बराच संघर्ष करावा लागला तरी राम शेवाळकरांनी त्यांचं वजन वापरून काहीही केलं नाही याची खंत त्यांना आहे. मात्र त्यांनी अंगी बाळगलेल्या मूल्यांचं महत्त्व त्यांना नंतर कळलं.
 
राम शेवाळकरांना उतारवयात हृदयाचं दुखणं उद्भवलं. त्यांची बायपास सर्जरीही झाली. या ऑपरेशनला जाण्याच्या काही दिवस आधी त्यांनी एका चिठ्ठी लिहून ठेवली होती. ‘घराण्याला वंशज मिळावा आणि सांस्कृतिक संकुल बांधून पूर्ण व्हावं’ अशा दोन इच्छा त्यात व्यक्त केल्या होत्या. ही चिठ्ठी आशुतोष यांनी वडिलांचं ऑपरेशन झाल्यानंतरच वाचली.
 
ती वाचल्यानंतर प्रेमळ उद्वेगाने आशुतोष शेवाळकर लिहितात, “ईश्वराने असा बाप कुणाला, अगदी वैऱ्यालासुद्धा देऊ नये. दिलाच तर त्याला म्हातारा करू नये. पोरावरही बापाला खांद्यावरून नेण्याचं दुर्भाग्य येऊ नये. दोघांनाही एकदम न्यावं.”
 
महाराष्ट्र टाइम्सच्या नागपूर आवृत्तीचे संपादक श्रीपाद अपराजित यांच्या मते राम शेवाळकर अतिशय क्षमाशील वृत्तीचे होते. हे स्वत: शेवाळकरही मान्य करायचे.
 
त्यांच्या घरी येणाऱ्या कोणत्याही दर्जाच्या साहित्यिकाला प्रवेश असायचा. कोणत्याही कवीला ते प्रस्तावना लिहून द्यायचे.
 
कवी सुरेश भट यांच्याशी त्यांचा सांस्कृतिक संकुलाच्या मुद्द्यावरून टोकाचा वाद निर्माण झाला होता. तरीही त्यांच्याबद्दल कटुता मनात ठेवली नाही.
 
एवढं असुनसुद्धा मी माझ्या स्वत:च्या लेखनाबद्दल बरेचदा लिहून ठेवलं आहे. माझ्या लेखनावर मी संतुष्ट नाही. रोज काही ना काही तरी लिहिण्याची मला सवय लागली आहे.
 
त्यामुळे विपुल लेखन माझ्या हातून घडलं. ते लोकांनी लक्षात घेतलं किंवा नाही घेतलं तरी मला त्याचंं काही विशेष वाटत नाही. असं राम शेवाळकर म्हणायचे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

LIVE: विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीत मोठा घोटाळा, नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले

विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीत मोठा घोटाळा, नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले

धरणात बुडून आई आणि मुलीचा वेदनादायक मृत्यू

सांगली जिल्ह्यात कार कृष्णा नदीत पडून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने पराभव टाळला,लक्ष्यही उपांत्यपूर्व फेरीत

पुढील लेख
Show comments