Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

टाळेबंदीसंदर्भात ३ मे नंतर सतर्कता बाळगून मोकळीक देण्याचा प्रयत्न अतिशय सावधतेने पावले टाकणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Webdunia
शनिवार, 2 मे 2020 (08:09 IST)
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोन अंतर्गत जिल्ह्यांची विभागणी करण्यात आली असून टाळेबंदीसंदर्भात 3 मे नंतर काय करायचे याचा निर्णय परिस्थिती पाहून अतिशय सावधतेने, सतर्कता बाळगून करावा लागणार आहे. रेड झोन मध्ये आता मोकळीक देणे राज्याच्या हिताचे नाही. रेड झोन मधील नियम अधिक कडकपणे पाळावे लागतील परंतु ऑरेंज झोन मध्ये बाधित क्षेत्र सोडून इतर ठिकाणचे तसेच ग्रीन झोनमधील निर्बंध टप्प्याटप्प्याने शिथील करण्याचा प्रयत्न असल्याचे संकेत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.
 
मुख्यमंत्र्यांनी फेसबुक लाईव्हद्वारे राज्यातील जनतेला महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्यावेळी ते बोलत होते.
 
शब्दातीत भावना
मुंबई ही हुतात्म्यांच्या बलिदानातून आपल्याला मिळाली असून आज त्या सर्व हुताम्यांचे स्मरण होते, मी त्यांना विनम्र अभिवादन करतो असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, हा महाराष्ट्र लढवैय्या महाराष्ट्र आहे. महाराष्ट्राच्या पराक्रमाची गाथा कित्येक शतकांची आहे. अनेक राज्यकर्ते, क्रांतीकारक, समाज सुधारकांचा महाराष्ट्र आहे. रुढी, परंपरा मोडून आधुनिकतेकडे जाणारा हा महाराष्ट्र आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, जोतिबा फुले, शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे. अशा पराक्रमी राज्याचा मुख्यमंत्री होण्याचे भाग्य आपल्याला लाभले याचा आनंद आहे. ही भावना आपण शब्दात व्यक्त करू शकत नाही. आज महाराष्ट्राचा 60 वा वर्धापन दिन आहे, त्यानिमित्ताने हुतात्म्यांना मुख्यमंत्री म्हणून वंदन करताना, त्यांना अभिवादन करताना अंगावर रोमांच उभे राहिल्याचेही मुख्यमंत्र्यांनी  सांगितले.
 
मुख्यमंत्र्यांनी दिला आठवणींना उजाळा
महाराष्ट्र राज्य स्थापनेचा हीरक महोत्सव धूमधडाक्यात साजरा करावयाचा होता परंतु आजच्या परिस्थितीत ते शक्य नसल्याचे सांगताना मुख्यमंत्र्यांनी अनेक आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले की, आजोबा प्रबोधनकार ठाकरे, वडील बाळासाहेब ठाकरे,  काका यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात सहभाग घेतला होता. आज त्यांची, सेनापती बापट, शाहीर अमर शेख यांची आठवण होते, आज मला माझ्या आईची ‘माँ’ ची देखील आठवण येते.
 
ज्या गिरणी कामगारांनी पराक्रमाची शर्थ करून मुंबई मिळवली त्या सर्व ज्ञान-अज्ञात कामगारांना आपण मानाचा मुजरा करतो. महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 50 व्या वर्धापनदिनी वांद्रा कुर्ला संकुलातील कार्यक्रमाला लता मंगेशकर यांनी गायिलेल्या  “बहु असोत सुंदर संपन्न की महा, प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा! या गाण्याची आज आठवण येते, मी लतादीदींना नमस्कार करून आशीर्वाद मागतो असे म्हणताना आज याच वांद्रा-कुर्ला संकुलात कोविड रुग्णांसाठी रुग्णालय सुरु होत असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.
 
परराज्यातील लोकांना पाठवण्याची शिस्तबद्ध योजना, गर्दी नको
परराज्यातील जे नागरिक महाराष्ट्रात अडकले त्यांना त्यांच्या राज्यात सुखरूपपणे पाठवण्यासाठी शासनामार्फत  शिस्तबद्ध व्यवस्था केली जात आहे. संबंधित राज्यांच्या प्रशासनाशी, मुख्यमंत्र्यांशी चर्चा सुरु आहे. राज्या-राज्यांमधील समन्वयातून या सर्व बांधवांना त्यांच्या राज्यात पाठवले जाईल व त्याच पद्धतीने इतर राज्यात अडकलेल्या महाराष्ट्रातील लोकांनाही महाराष्ट्रात परत आणले जाईल, परंतु त्यासाठी गर्दी करू नका, झुंडीने  जमा होऊ नका हेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
 
राज्यांतर्गत अडकलेल्या लोकांनाही जिल्हाधिकाऱ्यांना सांगून त्यांचीही त्यांच्या गावी जाण्याची व्यवस्था केली जाईल असेही मुख्यमंत्री म्हणाले.
 
शेतीचे काम आणि शेतमाल वाहतूक सुरुच. बियाण्यांची कमी नाही
 
शेती आणि शेतीसंबंधीचे व्यवहार, कृषी माल वाहतूक, जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक यावर कोणतेही बंधन नाही, शेतकऱ्यांना बि-बियाण्यांची कमी पडणार नाही. हळूहळू यावरची बंधने आपण उठवली आहेत पण झुंबड झाली तर बंधने टाकावी लागतील असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला.
 
जनता हीच राज्य आणि राष्ट्राची खरी संपत्ती
महाराष्ट्राच्या  पराक्रमाची गाथा कित्येक शतकांची आहे.  महाराष्ट्रात कुठेच कमी नाही, आजही महाराष्ट्र कोरोनाशी लढतो आणि महाराष्ट्रच यात जिंकणार आहे. या विषाणूमुळे राज्य संकटात आले आहे, आर्थिक चाक रुतले आहे, रोजगार कमी झाला आहे, अडचणी वाढल्या आहेत, हे काही प्रमाणात खरे असले तरी प्रत्येक राज्य आणि राष्ट्राची खरी संपत्ती ही त्या राज्याची आणि राष्ट्राची जनताच असते.  ही जनता, हे सैनिक वाचले तर त्यांच्या सहकार्याने या अडचणीवर आपण नक्कीच मात करू शकतो आणि करू असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
 
लक्षणे दिसताच उपचार करून घ्या
लॉकडाऊनमुळे कोराना विषाणूचा गुणाकार रोखण्यात नक्कीच यश आल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, अलीकडच्या काळात काही भागात कोरोना रुग्णांचे आकडे वाढलेले दिसत आहेत. परंतु पहिल्या रुग्णाशी संपर्कात आलेले, त्यांचे निकटवर्तीय यांची देखील आपण तपासणी करत आहोत. त्यामुळे हे आकडे वाढलेले दिसत आहेत. कोरोना झाला की सगळे संपले, व्हेंटिलेटर लागले की संपले असे अजिबात नाही. सहा महिन्याच्या बाळापासून 85 वर्षांच्या आजीपर्यंत सगळ्यांनी कोरोनाला हरवले आहे. त्यामुळे कोरानाच्या दहशतीतून मोकळे व्हा. वेळेत योग्य उपचार घेतला तर रुग्ण बरा होऊन सुखरूप घरी जातो हे दिसून आले आहे त्यामुळे कोरोनाची लक्षणे दिसताच घरच्या घरी उपाय करू नका. तात्काळ फिव्हर रुग्णालयात जाऊन उपचार करून घ्या असे आवाहनही त्यांनी केले.
 
मुंबईत घरोघरी जाऊन 2 लाखाहून अधिक तपासण्या
आजही 75 ते 80 टक्के रुग्णांमध्ये कोरोनाची सौम्य, अतिसौम्य लक्षणे आहेत किंवा लक्षणेच दिसत नाहीत. असे असले तरी आपण या सर्वांना विलगीकरण कक्षात दाखल करत आहोत. मुंबई महापालिका  ऑक्सिमीटरच्या सहाय्याने घरोघरी जाऊन तपासण्या करत आहे. आतापर्यंत २ लाखाहून अधिक तपासण्या झाल्या, ज्यात 272 लोकांमध्ये ऑक्सिजनची कमी आणि इतर विकार असलेले रुग्ण सापडले. महापालिका आता त्यांच्यावर उपचार करत आहे. कोरोनासंदर्भात जे जे काही नवीन चांगलं घडत आहे ते करण्यास महाराष्ट्र कुठेही कमी पडत नाही अशी ग्वाही त्यांनी दिली.
 
10 हजार जणांना प्रशिक्षण
कोविड योद्धा होऊन शासनासोबत काम करण्याचे आवाहन केल्यानंतर राज्यातून त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. जवळपास 20 हजार लोकांनी इच्छा व्यक्त केली तर 10 हजार लोकांनी प्रत्यक्षात तयारी दाखवली, त्यांना आपण आता प्रशिक्षण देत असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.
 
राज्यात यंत्रणा अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतेय
मुंबई महानगरपालिकेच्या महापौर तसेच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या महापौरांचा मुख्यमंत्र्यांनी विशेषत्वाने उल्लेख केला. या दोघी परिचारिका असून त्या या आपत्कालीन परिस्थितीत सेवा देण्यास पुढे आल्याचे ते म्हणाले. याप्रमाणेच खासगी डॉक्टर्सनेही पुढे यावे असे आवाहनही त्यांनी केले.   आयुष मंत्रालयाची, होमियोपॅथीची मदत घेत असल्याचे सांगून मुख्यमंत्र्यांनी टास्क फोर्समधील डॉक्टर्स इतर डॉक्टरांना मार्गदर्शन करत आहेत, त्यातून उपचाराची दिशा निश्चित होत आहे, संपूर्ण राज्यात यंत्रणा अतिशय चांगल्यापद्धतीने काम करत आहे अशी माहितीही त्यांनी दिली. डॉक्टर, नर्सेस, पोलीस हे आपल्यासाठी देव आहेत, त्यांच्यावरचा ताण न वाढवता त्यांना आतापर्यंत दिले तसेच पुढेही सहकार्य करा असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

सूर्यनमस्काराने शरीर मजबूत होते, जाणून घ्या योग्य पद्धत

वर्षानुवर्षे आतड्यांमध्ये साचलेली घाण साफ होईल, सकाळी उठल्याबरोबर हे पाणी प्या

28 डिसेंबर रोजी कुंभ राशीत शुक्र आणि शनीचा संयोग 2025 मध्ये चमत्कार घडवेल, 5 राशी धनवान होतील

साप्ताहिक राशीफल 23 डिसेंबर ते 29 डिसेंबर 2024

Kanya Lal Kitab Rashifal 2025: लाल किताबनुसार कन्या राशी भविष्य 2025 आणि उपाय

सर्व पहा

नवीन

तुमचे सिम बंद झाले आहे… कॉल आला, OTP सांगितला आणि साडेचार लाख गमावले

महाराष्ट्रात प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत केंद्र सरकारने यावर्षी साडेसहा लाख घरांना मंजुरी दिली, मुख्यमंत्र्यांनी आभार मानले

LIVE: राजकीय कारणासाठी, द्वेष निर्माण करण्यासाठी परभणीला राहुल यांची भेट -देवेंद्र फडणवीस

राजकीय कारणासाठी, द्वेष निर्माण करण्यासाठी परभणीला राहुल यांची भेट -देवेंद्र फडणवीस

विनोद कांबळी यांची प्रकृती ढासळली, रुग्णालयात दाखल

पुढील लेख
Show comments