Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कोरोना - 'प्लाझ्मा थेरपी' मुळे व्हायरसचे म्युटंट तयार होण्याची भीती आहे का?

Corona - Is plasma therapy a threat to the mutation of the virus?
Webdunia
सोमवार, 3 मे 2021 (17:50 IST)
मयांक भागवत
कोरोना संसर्गाची त्सुनामी भारतात झपाट्याने पसरू लागली आहे. कोव्हिड-19 संसर्गावर नियंत्रणासाठी दिल्लीसह अनेक राज्यात लॉकडाऊन लागू करावा लागला आहे.
 
भारतात संसर्ग क्षमता तीव्र असलेला 'डबल म्युटंट' आढळून आलाय. या म्युटेशनला रोगप्रतिकारशक्ती ओळखत नाही. त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढलीये.
 
इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्चचे (ICMR) संचालक डॉ. बलराम भार्गव म्हणतात, "रोगप्रतिकारशक्तीचा व्हायरसवर प्रचंड दबाव असल्याने व्हायरस म्टुटेट होतात. वातावरण आणि उपचारपद्धत ही म्युटेशनची दोन प्रमुख कारणं आहेत."
कोरोना रुग्णांवर उपचारात 'प्लाझ्मा थेरपी' कायम चर्चेत राहिलीये. यामुळे जीव वाचत नाही, असं केंद्राने स्पष्ट केलंय. तर, 'प्लाझ्मा' म्युटेशनसाठी कारणीभूत आहे, असं काही तज्ज्ञांचं मत आहे.
 
'प्लाझ्मा' मुळे व्हायरसमध्ये म्युटेशन होतं?
भारतात रुग्णसंख्या वाढण्यासोबतच जीव वाचवण्यासाठी 'प्लाझ्मा' ला प्रचंड मागणी आहे. 'प्लाझ्मा' शोधण्यासाठी नातेवाईकांची धावपळ सुरू झालीये.
 
महाराष्ट्र सरकारच्या कोव्हिड टास्कफोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी सांगतात, "आपल्याला माहित आहे, प्लाझ्मा म्युटंट तयार होण्यासाठी कारणीभूत आहे. पण, आपण अजूनही प्लाझ्मा वापरतोय."
महाराष्ट्रात कोव्हिड टास्कफोर्सने, एप्रिल महिन्यात 'प्लाझ्मा थेरपी' उपचारपद्धतीमधून वगळण्याच्या सूचना जारी केल्या आहेत.
 
"मध्यम आणि तीव्र स्वरूपाच्या संसर्गात प्लाझ्माचा फायदा नाही. आजार सौम्य असेल तरच, संशोधनासाठी आणि सहानुभूतीच्या तत्वावर प्लाझ्माचा वापर करू शकतो, " असं डॉ. जोशी पुढे सांगतात.
 
तज्ज्ञ म्हणतात, अनेक रुग्णालयात प्लाझ्मावर अनावश्यक भर दिला जातोय. काहीवेळा, नातेवाईकांच्या आग्रहाखारतही प्लाझ्मा द्यावा लागतो असं कोरोना रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर सांगतात.
डॉ. जोशी पुढे म्हणतात, "काही उपचारपद्धतीवर निर्बंध घालावे लागतील. नाहीतर जास्त म्युटंट तयार होतील आणि येणाऱ्या काळात नुकसान सोसावं लागेल."
 
सुक्ष्मजीवशास्त्रज्ञ काय म्हणतात?
तज्ज्ञांच्या माहितीनुसार, प्रत्येक व्हायरस आपलं रूप बदलत असतो. यालाच सोप्या शब्दात आपण म्युटेशन असं म्हणतो.
 
पुण्याच्या सरकारी रुग्णालयातील सुक्ष्मजीवशास्त्रज्ञ नाव न घेण्याच्या अटीवर सांगतात, "प्लाझ्मा थेरपीमुळे व्हायरसमध्ये म्युटेशन होणं शक्य आहे."
 
"प्लाझ्मामधील अन्टीबॉडीज (रोगप्रतिकारशक्ती) रुग्णाच्या शरीरातील व्हायरसवर हल्ला करून त्यांना मारण्याचा प्रयत्न करतात. व्हायरसही स्वत:चा बचाव करण्याचा प्रयत्न करतो. अन्टीबॉडीजने व्हायरसला मारलं नाही तर तो आपलं रूप बदलतो आणि सटकतो. याला एस्केप म्युटेशन म्हणतात," असं ते पुढे सांगतात.
 
भारतात आढळून आलेलं E484Q आणि L452R ही दोन्ही एस्केप म्युटेशन म्हणून ओळखली जातात. या म्युटेशनला रोगप्रतिकारशक्ती ओळखत नसल्याने, संसर्ग पसरतो असं तज्ज्ञ सांगतात.
तर, डॉ. रवी वानखेडकर सांगतात, "प्लाझ्मादान केलेल्या व्यक्तीच्या शरीरातील प्लाझ्मा कमकुवत असेल किंवा यात चांगल्या अन्टीबॉडी नसतील तर, रुग्णाच्या शरीरातील व्हायरस पूर्ण मरणार नाही. अशावेळी व्हायरसमध्ये म्युटेशन होण्याची दाट शक्यता असते."
 
तज्ज्ञ सांगतात, काहीवेळा रुग्णाचे नातेवाईक शेवटचा प्रयत्न म्हणून प्लाझ्मा थेरपीचा आग्रह धरतात.
 
इन्स्टिट्युट ऑफ जिनोमिक-इंटीग्रेटेड बायोलॉजीचे संचालक डॉ. अनुराग अग्रवाल सांगतात, "प्लाझ्या थेरपीमुळे व्हायरसमध्ये म्युटेशन होणं शक्य आहे. पण, यामुळे व्हायरसमध्ये नक्की म्युटेशन होतंय याचा काही ठोस पुरावा अजूनही पुढे आलेला नाही."
 
प्लाझ्मा थेरपी बाबत केंद्राची भूमिका काय?
भारतात आणि जगभरात कोव्हिड-19 ग्रस्त रुग्णांवर उपचारात प्लाझ्मा फायदेशीर आहे का, हे शोधण्यासाठी चाचण्या करण्यात आल्या. ज्यात, कोरोनाग्रस्तांचा मृत्यू रोखण्यासाठी प्लाझ्मा फायदेशीर नाही, असं स्पष्ट झालं.
इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्चने देशभरातील 39 रुग्णालयात प्लाझ्माची ट्रायल केली होती. ICMR च्या संशोधनातील निरीक्षण,
 
तीव्र स्वरूपाचा आजार होण्यापासून रोखण्यासाठी प्लाझ्माचा फायदा होत नाही
प्लाझ्मा दिल्याने मृत्यू रोखले जाऊ शकत नाहीत
जगभरातील चाचण्यात प्लाझ्माचा कोरोना रुग्णांना फायदा होत नाही हे स्पष्ट झालंय
ICMR चे संचालक डॉ. बलराम भार्गव म्हणतात, "मध्यम आणि तीव्र स्वरूपाचा संसर्ग असलेल्या कोरोना रुग्णांचे मृत्यू रोखण्यात प्लाझ्माचा फायदा होत नाही."
 
प्लाझ्माच्या सरसकट वापरामुळे धोका?
केंद्र सरकारने स्पष्ट करूनही देशात प्लाझ्माचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात येत आहे. ICMR च्या माहितीप्रमाणे, प्लाझ्माचा सरसकट वापर करणं योग्य ठरणार नाही.
माहितीनुसार, अमेरिका, यूके आणि इटलीमधील ट्रायलदरम्यान सरसकट प्लाझ्माचा वापर केल्यामुळे, व्हायरसमध्ये बदल होऊन, एस्केप म्युटेशन तयार होत असल्याचं स्पष्ट झालं.
संशोधनानुसार, ज्या व्यक्तीची रोगप्रतिकारशक्ती कमी असते. त्यांच्यावर प्लाझ्मा थेरपीने दिल्यास म्युटंट तयार होतात. केंब्रिज विद्यापिठाचे संशोधक डॉ. रविंद्र गुप्ता यांच्या संशोधनानुसार, प्लाझ्या थेरपी दिलेल्या रुग्णामध्ये तीव्र म्युटंट आढळून आला.
बीबीसी फ्युचरशी बोलताना ते म्हणाले, "आम्हाला व्हायरसमध्ये म्युटेशन आढळून आले. प्लाझ्मा थेरपीत दिलेल्या अन्टीबॉडीज हा नवीन व्हायरस चुकवण्याचा प्रयत्न करत होता, असं दिसून आलं. पहिल्यांदा असं होताना आम्ही पाहिलं."

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chaitra Navratri 2025 भारतातील दहा प्रमुख श्रीराम मंदिर

Gudi Padwa 2025 Rangoli Designs गुढीपुढे काढण्यासाठी रांगोळी डिझाईन

हिंदू नववर्षापूर्वी घरातून बाहेर काढून टाका या ७ वस्तू, जीवनात सुख-समृद्धी येईल

फाटलेले ओठ गुलाबी करण्यासाठी नारळाच्या तेलात हे मिसळून लावा

नारळ पाणी कोणी पिऊ नये पिण्यापूर्वी त्याचे तोटे जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

कोण आहे हा संजय राऊत...? भाजपमध्ये ७५ नंतर निवृत्तीचा नियम नाही म्हणाले बावनकुळे

IPL 2025: लखनौला पत्करावा लागला पराभव, पंजाब किंग्जने एकतर्फी विजय मिळवला

महाराष्ट्रात लवकरच 'श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना' लागू होणार, मुलींना मिळणार 10 हजार रुपये

वक्फ संशोधन विधेयक आज लोकसभेत सादर होणार, चर्चेसाठी ८ तासांचा वेळ निश्चित

LIVE: बुलढाणा जिल्ह्यात बस आणि एसयूव्हीच्या धडकेत पाच जणांचा मृत्यू

पुढील लेख