Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कोरोना मुंबई: अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर ही उपनगरं का झालीत कोरोनाचे हॉटस्पॉट?

Webdunia
शनिवार, 4 जुलै 2020 (15:36 IST)

संकेत सबनीस

 "बदलापूरहून आईला मुंबईला नेण्यात आख्खा दिवस गेला. बदलापूरला उपचार मिळाले नाहीत. अखेर मुंबईत सायन हॉस्पिटलमध्ये आईला नेलं, तिकडे ती दोन दिवसांत गेली. तिचा रिपोर्ट तेव्हा आला तो कोरोना पॉझिटिव्ह होता."
हे शब्द बदलापूरचे गणेश ताजने यांचे आहेत. वेळेवर उपचार न मिळाल्याने त्यांच्या आईचा मृत्यू झाल्याचं त्यांचं म्हणणं आहे. गणेश यांच्यावर ओढावलेली ही वेळ बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगरमधल्या अनेकांवर येऊन गेली आहे.

बदलापूर, अंबरनाथ आणि उल्हासनगर या उपनगरांमध्ये सध्या कोरोना उद्रेकाचे तीव्र पडसाद दिसून येत आहेत. 2 जुलैपर्यंत या तिन्ही उपनगरांत कोरोनाचे एकूण 4 हजार 945 रुग्ण आढळले असून त्यातले 2989 रुग्ण बरे झाले आहेत. तर, 117 रुग्णांचा मृत्यू झालाय. हे आकडे दररोज अंदाजे दीडशे ते दोनशेने वाढत आहेत.
"अंबरनाथ-बदलापूरच्या नगरपालिकांकडे स्वतःची आरोग्य यंत्रणाच नाही. आम्ही कोव्हिड केअर सेंटरपासून सगळं उभं केलं. मात्र, ते सांभाळायला डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी इथल्या नगरपालिकांमध्ये उपलब्धच नाहीत. बाहेरची उसनी आरोग्य यंत्रणा आणून सध्या काम सुरू आहे. राज्याच्या आरोग्य विभागाचे लोक इथे नाहीत," असं अंबरनाथ आणि बदलापूर नगरपालिकांचे प्रशासकीय अधिकारी जगतसिंग गिरासे सांगतात.
कोरोनाला बळी पडलेल्या या मुंबईच्या दोन्ही पूर्व उपनगरांमध्ये आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा कसा उडालाय यांचं उत्तर या वाक्यांमध्ये सापडतं.

ठाणे आणि कल्याण - डोंबिवलीची हीच परिस्थिती असल्याने संपूर्ण ठाणे जिल्ह्यात 11 जुलैपर्यंत पुन्हा लॉकडाऊन घोषित करण्यात आलंय. या उपनगरांमध्ये आता केवळ अत्यावश्यक सेवा सुरू आहेत. अगदी दोन आठवड्यांपूर्वीच कोरोनाचा योग्य सामना न केल्यानेच जिल्ह्यातल्या आयुक्त आणि नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांच्या बदल्याही करण्यात आल्या.
संपूर्ण ठाणे जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांचं प्रमाण वाढल्यानंतर या उपनगरांबद्दल चर्चा सुरू झाली. कारण, मुंबईत सरकारी नोकरीनिमित्त जाणारे अनेक कर्मचारी ठाणे ते बदलापूर पट्ट्यात राहतात. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील ठाण्यात रुग्णांचं प्रमाण वाढत असल्याबद्दल चिंता व्यक्त करणारं पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दोन आठवड्यांपूर्वी पाठवलं होतं.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी यानंतर लगेचच ठाणे जिल्ह्यातील सगळ्या अधिकाऱ्यांची बैठक घेत रुग्णांचं ट्रेसिंग वाढवण्यावर भर देण्याचे निर्देश प्रशासनाला दिले होते.

मात्र, सध्याच्या या आरोग्याच्या परिस्थितीचा परिणाम या उपनगरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांवर होतोय. बदलापूर इथे राहणारे गणेश ताजने यांच्याशी आम्ही बातचीत केली. गणेश यांच्या आई मंगल ताजने यांचा कोव्हिड-19 आजारामुळे मृत्यू झाला. तर, त्यांच्या घरात या व्यतिरिक्त चार जणांना कोव्हिड-19 ची बाधा झाली होती.

'अँब्युलन्सवाल्याने 17 हजार रुपये घेतले...'

गणेश सांगतात की, "माझ्या आईची कोरोनाची टेस्ट झालेली नव्हती. तिला गंभीर लक्षणंच थेट दिसायला लागल्यानंतर आम्ही शहरातल्या खासगी डॉक्टरांकडे गेलो. तिला श्वास घ्यायला त्रास होत होता. त्यांनी उपचार करण्यासाठी नकार दिला. मग, बदलापूरहून उल्हासनगर, कळवा, ठाणे आणि शेवटी मुंबईत आम्ही आईला घेऊन गेलो. मुंबईत पोहचेपर्यंत उशिर झाला होता. मुंबईत सायन हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांना विनंती केल्यानंतर त्यांनी तपासणी केली. तिला कोव्हिड वॉर्डमध्ये भरतीही करण्यात आलं. मात्र, भरती केल्याच्या दुसऱ्याच दिवशी आईचा मृत्यू झाला."
गणेश पुढे सांगतात, "या काळात आईला बदलापूरहून मुंबईला नेण्यासाठी कार्डीअॅक अँब्युलन्सवाल्याने 17 हजार रुपये घेतले. एरव्ही हा खर्च फक्त तीन ते चार हजार रुपये येतो. या सगळ्यात लाखभर रुपये खर्च झाले पण काही उपयोग झाला नाही. बदलापूरचा पेशंट म्हटला की खासगी डॉक्टर थेट नाही म्हणतात. बदलापुरातच उपचार करा म्हणतात. बदलापुरात आधीच धड सोयी नाहीत. पेशंटचा कोव्हिडचा रिपोर्ट नसेल पण लक्षणं तीच असतील तर उपचार करायला हरकत काय? पेशंट मरण्याची का वाट पाहतात?"

गणेश यांच्यासारखी परिस्थिती गेल्या तीन महिन्यात बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगरमध्ये अनेकांवर येऊन गेली आहे. उपचारांसाठी रुग्णाला रस्त्याच्या प्रवासाने दोन तास दूर असलेल्या मुंबईकडे घेऊन जाण्यावाचून नातेवाईकांकडे पर्याय शिल्लक राहत नाही. कारण, या उपनगरांमध्ये गंभीर रुग्णांवर उपचार करण्याची कोणतीच सरकारी व्यवस्था नाही.
अँब्युलन्स चालकांच्या या कारभाराबद्दल बोलताना आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी बदलापूरात सांगितलं की, सगळ्या अँब्युलन्स ताब्यात घेऊन कोरोनाग्रस्तांना किंवा संशयितांना त्यांची मोफत सेवा द्या.

बदलापूरचीआरोग्य क्षमता
'तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता'
अंबरनाथ आणि बदलापूर परिसराचं वार्तांकन करणारे लोकमत वृत्तपत्राचे वरिष्ठ उपसंपादक पंकज पाटील यांच्याशी आम्ही याबद्दल 2 जुलैला बोललो. पंकज स्वतः सध्या कोव्हिड-19 आजाराने ग्रस्त आहेत. अंबरनाथमध्ये त्यांच्या सासूबाईंना कोरोनाची बाधा झाली होती. त्यांना हरतऱ्हेचे उपचार मिळावेत यासाठी पंकज यांनी प्रयत्न केले.
मात्र, त्यांच्या सासूबाईंचा या आजारामुळे मृत्यू झाला. त्यानंतर पंकज यांची कोरोना चाचणी 28 जूनला पॉझिटिव्ह आली. सध्या ते गृह विलगीकरणात आहेत.
 

पंकज सांगतात, "मी सध्या स्वतः कोव्हिड-19 चा रुग्ण आहे. अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये सध्याच्या काळात गरीबांना आरोग्य सुविधा मिळणं अवघड झालं आहे. समूह संसर्ग अंबरनाथमध्ये लवकर झाल्याने इथल्या रुग्णांची संख्या वाढली. सुरुवातीच्या काळात अंबरनाथमध्ये आढळलेल्या रुग्णांना मुंबईत कस्तुरबा किंवा ठाण्याकडे उपचारांकडे पाठवलं जायचं. मात्र, आता इथेच हॉस्पिटल उभारल्याने मदत मिळते आहे. मात्र, इथे आरोग्य कर्मचारी आणि तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता आहे. सध्या शासनाने याकडे लक्ष द्यायला हवं."
पंकज पुढे सांगतात, "टेस्टचा रिपोर्ट येण्यासाठी किमान तीन दिवस लागतात. या काळात त्या रुग्णाची परिस्थिती गंभीर होते किंवा तो दगावतो. यासाठी आयसोलेशन सेंटर्स वाढवण्याची आवश्यकता आहे. खाजगी हॉस्पिटल्समध्ये 30 ते 70 हजारांची इंजेक्शन वापरली जातात. तसंच, इतर वेगळं शुल्क आकारलं जातं. हे सगळं गरीबांना परवडणारं नाही. "
अंबरनाथची आरोग्य क्षमता
'15 लाख लोकसंख्येसाठी फक्त 1 हॉस्पिटल'
अंबरनाथ - बदलापूरची कोरोनामुळे झालेली ही गंभीर स्थिती पाहता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी 2 जुलैला बदलापूरला जिल्हाधिकाऱ्यांसह भेट देत आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला. यावेळी त्यांनीही अपुऱ्या कामांबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. कोरोनासाठी केल्या जाणाऱ्या टेस्ट्सचा निकाल यायला उशीर होत असल्याबद्दल त्यांनी बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगरमध्ये दहा दिवसांत कोरोनासाठी तपासणी केंद्र सुरू करण्याचे आदेश दिले.

अंबरनाथ, बदलापूर आणि उल्हासनगरची 2011 च्या जनगणनेनुसार, लोकसंख्या ही 10 लाख 31 हजार 316 आहे. गेल्या दहा वर्षांत किफायतशीर दरात गृहविक्री या भागात झाल्याने ही लोकसंख्या 5 ते 6 लाखांनी वाढल्याचा अंदाज इथल्या नगरविकास तज्ज्ञांनी व्यक्त केलाय. या 15 लाख लोकसंख्येसाठी उल्हासनगर इथे एक मोठं सरकारी सेंट्रल हॉस्पिटल आहे.
बदलापूरात नगरपालिकेचं एक दुबे रुग्णालय आणि दुसरं छोटं जिल्हा ग्रामीण रुग्णालय आहे. तर, अंबरनाथमध्ये छाया हॉस्पिटल हे उपजिल्हा रुग्णालय असून गेल्या एका वर्षांत तिथल्या एकाही कर्मचाऱ्याचा पगार झालेला नाही. या व्यतिरिक्त अंबरनाथ नगरपालिकेकडे स्वतःची कोणतीच आरोग्य व्यवस्था आजतागायत नाही.
आरोग्याच्या या स्थितीबद्दल जाणून घेण्यासाठी उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर या उपनगरांचे प्रांताधिकारी आणि अंबरनाथ, बदलापूर नगरपालिकांचे प्रशासक जगतसिंग गिरासे यांच्याशी बीबीसी मराठीने बातचीत केली. बदलापूर आणि अंबरनाथच्या नगरपालिकांची मुदत मे महिन्यात संपली आहे. मात्र, कोरोनामुळे या पालिकांची पंचवार्षिक निवडणूक रखडली आहे. त्यामुळे सगळा कारभार प्रशासकांकडे आहे.
प्रशासक गिरासे सांगतात, "या उपनगरांमध्ये आम्ही सध्या बेड्स, ऑक्सिजनची व्यवस्था त्यासाठी लागणारी जागा हे उपलब्ध करून दिलं आहे. औषधंही पुरवली आहेत. अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये सध्या नव्या सोयींसह हॉस्पिटल खाजगी जागांमध्ये उभारली आहेत. तिथेच रूग्णांवर उपचार करतो आहोत. कोणतेही रिपोर्ट आमच्याकडे दोन दिवसांत मिळतात. त्यापेक्षा जास्त दिवस लागत नाहीत. इथल्या पालिकांकडे स्वतःची आरोग्य व्यवस्था नाही."
'नियमांचे उल्लंघन केल्यामुळे ही परिस्थिती'
बदलापूर, अंबरनाथ आणि उल्हासनगरच्या या परिस्थितीवर आम्ही या तिन्ही उपनगरांचं वार्तांकन करणारे लोकसत्ताचे प्रतिनिधी सागर नरेकर यांच्याशी बोललो.

सागर सांगतात, "या तिन्ही उपनगरांमध्ये बऱ्याच प्रमाणात नियमाचं उल्लंघन झालं आहे. उल्हासनगरमध्ये सम्राट अशोकनगर या झोपडपट्टी परिसरात मोठ्या प्रमाणात रुग्ण आहेत. इथे पहिला संसर्ग मृतदेहामुळे झाला. दोन ठिकाणी असाच मृतदेहांमुळे संसर्ग झाला आणि तो वाढत गेला. इथे होम आयसोलेशनचे नियम पाळले जात नाहीत.
"मृतदेह हाताळणीत हलगर्जीपणा केला जातो. रुग्णांना त्यांचे नातेवाईकच सगळीकडे घेऊन फिरतात. लॉकडाऊनच्या नियमांची पायमल्ली करणं हे अंबरनाथकरांसाठी कोरोना फैलाव होण्याचं प्रमुख कारण ठरलं. बदलापूरात अनेकांच्या संसर्गाची कारणं माहित नसून इथे ट्रेसिंग कमी पडतंय. तसंच, चाचण्याही कमी होत आहेत. अंबरनाथ आणि उल्हासनगरमध्ये टेस्टचा रिपोर्ट येण्याचा कालावधी हा पाच ते सात दिवसांचा आहे. या काळात रुग्णाची तब्येत बिघडते."
उल्हासनगरची आरोग्य क्षमता
'आरोग्य मंत्र्यांकडून खरडपट्टी'
आरोग्य व्यवस्थेची ही नाजूक अवस्था पाहत यावर तात्काळ पावलं उचलणार असल्याचं आश्वासन राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दोन जुलैला बदलापूर इथे घेतलेल्या बैठकीत दिलं. या बैठकीला ठाण्याचे जिल्हाधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, राज्याचे आरोग्य उपसंचालक, प्रशासक जगतसिंग गिरासे, पोलीस उपायुक्त प्रमोद शेवाळे उपस्थित होते. यावेळी टोपे यांनी माध्यमांसमोरच या अधिकाऱ्यांची चांगली खरडपट्टी काढली.

अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगरसाठी येत्या 10 दिवसांत कोरोना तपासणी केंद्र सुरू केले जाणार आहे. तसेच, या तिन्ही उपनगरांमध्ये कोव्हिड केअर सेंटर्समधल्या बेड्सची संख्या वाढवण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत. यासाठी शहरातली कॉलेजेस ताब्यात घेण्याचे आदेश त्यांनी दिलेत.

राज्यात एका रूग्णाच्या मागे 15 संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्याचा नियम असताना बदलापूर, अंबरनाथ शहरात अवघ्या 6 व्यक्तींना विलगीकरणात ठेवले जात असल्याची बाब गंभीर असल्याचे टोपे यांनी सांगितले. त्यामुळे एका रूग्णामागे किमान 15 व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरणात ठेवल्यास संक्रमणाची साखळी तुटेल असेही त्यांनी सांगितले.

 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

22 डिसेंबर रोजी कालाष्टमी व्रत, या दिवशी 4 शुभ योग तयार होत आहेत, तिप्पट फळ मिळणार

जुन्या कपड्यांचा पोछा वापरल्याने दुर्दैव येते का?

चांगल्या झोपेसाठी या गोष्टी करा, तुमचे आरोग्यही चांगले राहील

Christmas special : या रेसिपी नक्की बनवा

रावणाचा भाऊ कुंभकरण खरोखरच इंजिनिअर होता का?

सर्व पहा

नवीन

भाजपच्या विजयानंतर मराठ्यांवर हल्ले वाढले संजय राऊतांचा दावा

LIVE: भाजपच्या विजयानंतर मराठी भाषिकांवर हल्ले वाढले संजय राऊत

भारत जोडो यात्रेबाबत फडणवीसांचे आरोप केंद्र सरकारचे अपयश दर्शवणारे आहे आदित्य ठाकरे यांचे विधान

विराट कोहली आणि अनुष्का देश सोडणार!

IND W vs WI W: भारताने निर्णायक सामन्यात 60 धावांनी विजय मिळवला

पुढील लेख