Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कोरोनाचा नवा ‘भयंकर’ अवतार अफ्रिकेत सापडला, जग धास्तावलं

Webdunia
शुक्रवार, 26 नोव्हेंबर 2021 (10:31 IST)
जेम्स गॅलाघर
पुन्हा एकदा काहीशी ओळखीच्याच पण नकोशा अशा विषयावर चर्चा सुरू झाली आहे. कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिएंटबाबत पुन्हा काळजी वाढायला लागली आहे.
कोरोनाचा एक नवा आणि आतापर्यंतचा सर्वाधिक बदल किंवा उत्परिवर्तन (म्युटेशन) झालेला विषाणू आढळला आहे. या विषाणूमध्ये झालेल्या म्युटेशनची यादी एवढी मोठी आहे की, एका शास्त्रज्ञांनी त्याचं वर्णय "भयावह" विषाणू असं केलं आहे. तर दुसऱ्या एका शास्त्रज्ञांनी आतापर्यंतचा कोरोना विषाणूचा हा सर्वांत वाईट प्रकार असल्याचं म्हटलं आहे.
केंद्रीय आरोग्य सचिवांनी याबाबत सर्व राज्यांना एक पत्र जारी केलं आहे. तर राज्य कोरोना टास्क फोर्ससुद्धा याबाबत सतर्क झाली आहे.
या विषाणूची प्रकरणं आढळण्याची नुकतीच सुरुवात झाली असून, याची लागण झालेले रुग्ण हे दक्षिण आफ्रिकेतील एकाच प्रांतामध्ये आहेत. मात्र याचा संसर्ग इतरही ठिकाणी झाला असल्याचे संकेतही मिळत आहे.
याबाबतचे सर्वांत महत्त्वाचे मुद्दे म्हणजे, हा नवा विषाणू किती वेगानं पसरतो? त्याची क्षमता आणि लसीपासून मिळालेल्या संरक्षणाला बायपास करण्याची त्याची क्षमता किती आहे? आणि यावर तातडीने काय उपाय करावे? असे प्रश्न लगेचच समोर येतात.
याबाबत अनेक अंदाज व्यक्त केले जात आहेत, पण त्याबाबत अत्यंत मोजकी अशी स्पष्ट माहिती आहे.
 
आपल्याकडे नेमकी काय माहिती आहे?
कोरोनाच्या या नव्या विषाणूला B.1.1.529 असं नाव देण्यात आलं आहे. ते ग्रीक कोड नावासारखं (अल्फा आणि डेल्टा व्हेरिएंटप्रमाणं) असून शुक्रवारी जागतिक आरोग्य संघटनेनं हे नाव दिलं.
या विषाणूमध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणावर बदल झालेला आहे. विषाणूच्या बदलामध्ये अत्यंत असामान्य असे काही घटक आढळून आले आहेत. त्यामुळं इतर व्हेरीएंटच्या तुलनेत हा प्रकार अत्यंत वेगळा आहे, असं दक्षिण आफ्रिकेतील सेंटर फॉर एपिडेमिक रिस्पॉन्स अँड इनोव्हेशनचे संचालक तुलिओ डि ऑलिव्हिरा यांनी म्हटलं.
"या नव्या प्रकारच्या विषाणूनं आम्हाला आश्चर्यचकित केलं. बदलांचा विचार करता यानं मोठी उडी घेतली आहे. आम्हाला अपेक्षा होती, त्यापेक्षा अधिक म्युटेशन झालं आहे," असं ते म्हणाले.
याबाबत माध्यमांना माहिती देताना ऑलिव्हिरा यांनी म्हटलंय, या नव्या विषाणूत एकूण 50 म्युटेशन आढळलेत. त्यापैकी 30 पेक्षा अधिक स्पाईक प्रोटीनवर आढळलेत. बहुतांश लसींद्वारे या स्पाईक प्रोटिनला लक्ष्य करण्यात आलं आहे. कोरोनाचा विषाणू याच्या माध्यमातून शरिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत असतो.
यात अधिक खोलवर अभ्यास करून रिसेप्ट बाईंडिंग डोमेनचा (आपल्या शरिरातील पेशींच्या या भागाशी विषाणूचा सर्वप्रथम संपर्क येतो) अभ्यास केला असता यात 10 म्युटेशन आढळले. संपूर्ण जगाला हादरा देणाऱ्या डेल्टा व्हेरिएंटमध्ये या भागात केवळ 2 म्युटेशन झालेले होते.
कोरोनाच्या विषाणूवर मात करण्यात अपयशी ठरलेल्या एकाच रुग्णाच्या शरिरात एवढे म्युटेशन झालेले असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
अनेक म्युटेशन हे वाईटच असतात असंही नाही. पण त्याचे परिणाम नेमके काय होतात, हे महत्त्वाचं असतं.
पण आता समोर आलेली चिंतेची बाब म्हणजे हा नवा विषाणू वुहान आणि चीनमध्ये आढळलेल्या मूळ विषाणूच्या तुलनेत प्रचंड वेगळा आहे. म्हणजे, या विषाणूच्या स्ट्रेनचा वापर करून तयार करण्यात आलेल्या लशी फारशा प्रभावी ठरू शकणार नाहीत.
काही म्युटेशन हे आधीच्या इतर काही प्रकारच्या विषाणूंमध्ये आढळलेले आहेत. त्यावरून या विषाणूतील त्यांच्या नेमक्या भूमिकेबाबत माहिती मिळते.
उदाहरण सांगायचं झाल्यास, N501Y यामुळं कोरोना विषाणूचा प्रसार हा आणखी सहजपणे होताना दिसतो. यापैकी काही विषाणूमुळं शरिरातील अँटिबॉडीला नेमका विषाणू ओळखणं कठिण ठरत असल्यानं त्यांचा प्रभाव कमी होतो. पण इतर काही पूर्णपणे नवीनही आहेत.
"या विषाणूच्या संसर्गाची क्षमता वाढण्याची शक्यता असल्यानं, काळजीचं कारण असू शकतं. यात एका व्यक्तीकडून दुसऱ्याला संसर्ग होण्याची क्षमताही वाढलेली असू शकते. त्याचबरोबर रोगप्रतिकार शक्तीशी संबंधित यंत्रणेतही त्याची वाढ झालेली असू शकते," अशी शक्यता दक्षिण आफ्रिकेतील क्वाझुलू नटाल विद्यापीठातील प्राध्यापक रिचर्ड लेसेल्स यांनी व्यक्त केली आहे.
अनेक अशीही उदाहरणं आहेत जी कागदावर अत्यंत धोकादायक वाटतात मात्र, प्रत्यक्षात त्याचा परिणाम कमी असतो. बीटा व्हेरिएंटबाबत प्रचंड चिंता आणि भिती होती, कारण रोग प्रतिकार शक्तीच्या तावडीतून तो सुटू शकत होता. पण त्याऐवजी डेल्टा व्हेरिएंटचाच वेगानं प्रसार झाला आणि त्याचे रुग्ण वाढले.
"बीटा व्हेरिएंटचा विषाणू केवळ रोग प्रतिकार यंत्रणेच्या तावडीतून सुटणारा होता, तर डेल्टा व्हेरिएंट मात्र या क्षमतेबरोबरच अधिक प्रभावीदेखील होता. त्यामुळं त्यांच्या संसर्गाचं प्रमाण उच्च पातळीवर असल्याचं पाहायला मिळालं," असं केम्ब्रिज विद्यापीठातील प्राध्यापक रवी गुप्ता म्हणाले.
शास्त्रज्ञांनी सखोल अभ्यास केल्यानंतर याबाबतचं चित्र अधिक स्पष्ट होईलच. मात्र, प्रत्यक्षात जास्तीत जास्त प्रमाणात निगराणी ठेवल्यास अधिक लवकर उत्तरं समोर येऊ शकतात.
याबाबत एवढ्यात एखाद्या निष्कर्षावर पोहोचणंही घाईचं ठरेल, मात्र चिंता करण्यासारख्या काही गोष्टी समोर आलेल्या आहेत.
दक्षिण आफ्रिकेच्या गौतेंग प्रांतामध्ये या नव्या विषाणूची लागण झाल्याची 77 प्रकरणं समोर आली आहे. त्याशिवाय बोस्तवानामध्ये चार आणि हाँग काँगमध्ये एक (सर्वांची दक्षिण आफ्रिकेतील प्रवासाची नोंद) रुग्ण आढळला आहे.
 
विषाणूचा हा प्रकार अधिक वेगानं प्रसरत असल्याचेही काही संकेत आहेत.
या विषाणूच्या चाचण्यांवरून काही विचित्र बाबीही (एस-जीन ड्रॉपआऊट सारख्या) समोर आल्यात. त्यावरून विषाणूच्या या व्हेरिएंटचं पूर्ण अनुवांशिक विश्लेषण न करताही त्यावरून त्याची माहिती घेता येऊ शकते.
त्यावरून गौतेंग प्रांतात असलेली 90% टक्के प्रकरणं या विषाणूची असू शकतात आणि दक्षिण आफ्रिकेच्या इतरही अनेक प्रांतात सध्या त्याचं अस्तित्व असू शकतं.
पण याचा संसर्ग डेल्टा व्हेरिएंटच्या विषाणूपेक्षा अधिक वेगानं होतो का? किंवा हा किती घातक आहे? आणि लशींद्वारे मिळणारं संरक्षण यात किती फायदेशीर ठरू शकतं, हे यावरून स्पष्ट होत नाही.
दक्षिण आफ्रिकेत मोठ्या प्रमाणावर नागरिकांना कोव्हिडचा संसर्ग झाला होता. याठिकाणी पूर्ण लसीकरण झालेल्यांचं प्रमाण 24 टक्के आहे. यापेक्षा अधिक लसीकरणाचं प्रमाण असलेल्या देशांमध्ये या व्हेरिएंटचा संसर्ग कसा पसरेल हेही यावरून स्पष्ट होत नाही.
त्यामुळं आपल्याकडे सध्या अशा नव्या व्हेरिएंटचा प्रवेश झाला आहे ज्यामुळं मोठ्या प्रमाणावर चिंता वाढल्या आहेत, पण त्याबाबतची पुरेशी माहिती मात्र उपलब्ध नाही. त्यावर बारकाईनं लक्ष ठेवून केव्हा आणि काय करायला हवं याचा विचार करावा लागणार आहे. या साथीतून मिळालेला सर्वांत महत्त्वाचा धडाच हा आहे की, तुम्ही सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळण्याची वाट पाहू शकत नाही.
 
महाराष्ट्राला किती धोका?
कोरोनाच्या या नव्या व्हेरियंटचा महाराष्ट्राला किती धोका आहे, याविषयी आम्ही अधिक जाणून घ्यायचा प्रयत्न केला.
महाराष्ट्र कोव्हिड टास्कफोर्सचे डॉ. शशांक जोशी यांनी सांगितलं, "सद्यस्थितीत घाबरून जाण्याची गरज नाही. पण सतर्क रहायाला हवं. आधीच्या व्हेरियंटमध्ये कमी म्युटेशन होते. पण याची परसण्याची क्षमता जास्त आहे. रोगप्रतिकारशक्ती आणि मोनोक्लोनल अँटीबॅाडीजला चकवा देण्याची क्षमता यामध्ये आहे.
"या व्हेरियंटच्या केसेस कमी आहेत. जागतिक आरोग्य संघटनेची या नवीन व्हेरियंटबाबत बैठक होणार आहे."
दरम्यान केंद्रीत आरोग्य सचिवांनी या नव्या व्हेरिएंटबाबत सर्व राज्यांना पत्र लिहिलं आहे. तसंच भारतात निर्बंध शिथिल केल्यामुळे आपण सतर्क रहायला हवं, असं त्यांनी सांगितलं आहे.
तर केंद्र सरकारच्या इंन्स्टिट्युट ऑफ जिनोमिक एंड इंटिग्रेटिव्ह बायोलॅाजीचे संशोधक विनोद स्कारिया ट्विटरवर लिहीतात, "या व्हेरियंटमध्ये स्पाईक प्रोटीनमधे 32 प्रकारचे म्युटेशन आढळून आलेत. यातील काही म्युटंट रोगप्रतिकारशक्तीला चकवा देणारे आहेत. ज्यामुळे त्यांची संसर्ग क्षमता जास्त आहे." "आपण सतर्क रहायला हवं आणि वेळीच योग्य उपाययोजना केल्या पाहिजेत."
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

सूर्यनमस्काराने शरीर मजबूत होते, जाणून घ्या योग्य पद्धत

वर्षानुवर्षे आतड्यांमध्ये साचलेली घाण साफ होईल, सकाळी उठल्याबरोबर हे पाणी प्या

28 डिसेंबर रोजी कुंभ राशीत शुक्र आणि शनीचा संयोग 2025 मध्ये चमत्कार घडवेल, 5 राशी धनवान होतील

साप्ताहिक राशीफल 23 डिसेंबर ते 29 डिसेंबर 2024

Kanya Lal Kitab Rashifal 2025: लाल किताबनुसार कन्या राशी भविष्य 2025 आणि उपाय

सर्व पहा

नवीन

राहुल गांधी यांच्या परभणी दौऱ्यावर भाजप नेते प्रवीण दरेकर यांचा काँग्रेसवर हल्लाबोल

महाराष्ट्रातील मतदार यादीतील अनियमिततेच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने दिले उत्तर

LIVE: पालघरमध्ये वनविभागाच्या अधिकाऱ्यावर लाच मागितल्याचा आरोप,गुन्हा दाखल

पालघरमध्ये वनविभागाच्या अधिकाऱ्यावर लाच मागितल्याचा आरोप,गुन्हा दाखल

मेंढरमध्ये लष्कराचे वाहन कोसळले पाच जवानांचा मृत्यू,अनेक जवान जखमी

पुढील लेख