Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

IND vs Aus : वर्ल्ड कप फायनल, क्रिकेटमधली आशा, निराशा नि आयुष्याचा खेळ

Webdunia
सोमवार, 20 नोव्हेंबर 2023 (15:10 IST)
क्रिकेटचा खेळ जितका गंमतीदार आहे, तितकाच तो क्रूर आणि निष्ठूर आहे - अगदी आयुष्यासारखाच. इथे काहीच गृहित धरता येत नाही.इथे तुम्ही आधी काय केलंत नि किती जिंकला, याला काही अर्थ नसतो आणि एखादा आनंदाचा सोहळा क्षणात दुःखात बदलू शकतो.
 
टीम इंडियाला आणि भारतीय क्रिकेट चाहत्यांना पुन्हा एकदा हा धडा मिळाला आहे.
 
अहमदाबादमध्ये सामना होण्याआधीच जल्लोषाची तयारी झाली होती. सामना संपेपर्यंत सगळीकडे एक प्रकारची निराश शांतता पसरली.
 
एक पत्रकार म्हणून मला ऑस्ट्रेलिया ज्या प्रकारचं क्रिकेट खेळलाय, विशेषतः कमिन्सनं जसं नेतृत्व केलंय, त्याचं कौतुक वाटतंय. पण एक भारतीय म्हणून काहीसं दुःखही जाणवतंय.
 
खरं वन डे वर्ल्ड कप फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला, तरी स्पर्धेत टीम इंडियानं बरंच काही कमावलं आहे.
 
तरीही हा पराभव पचवणं अनेकांना कठीण जात आहे, पण तो पचवण्याशिवाय पर्यायही नाही, हे स्वीकारावंही लागतंय.
 
अहमदाबादमध्ये रविवारी फायनलचा सामना सुरू असतानाच काहींनी ते वास्तव स्वीकारायला सुरुवातही केली होती.
 
आनंदाचा सोहळा नि निराशा
ज्या स्टेडियमबाहेर आधी हजारोंची गर्दी जमली होती, तिकिट मिळालं नसलं तरी चाहते एकत्र जमून सामना पाहणार होते, तिथे मध्यंतरालाच शुकशुकाट होता.
 
स्टेडियमबाहेर टीशर्ट, झेंडे विकाणारे खांदे पाडून उभे होते. सामना संपण्याआधीच कित्येकजण बाहेर पडू लागले होते.
 
जिथे आधी ‘चक दे इंडिया’, ‘वंदे मातरम’, ‘लहरा दो, लहरा दो’ अशी गाणी वाजत होती, तिथे आता सन्नाटा होता.
 
डोंबाऱ्याचा खेळ करणारं एक कुटुंब अशाच गाण्यांवर खेळ सादर करत होतं, सामना संपल्यावर तेही शेरशाहमधल्या ‘मन भराया’चे दुःखी स्वर आळवत होती.
 
 
सामन्याआधीचा सूर्यकीरण विमानांचा एयरशो लोकांनी ज्या विस्मयतेनं पाहिला, तेवढं कौतुक सामन्यानंतरच्या ड्रोन लाईट शोचं राहिलं नव्हतं.
 
बाहेर पडणाऱ्या फॅन्सशी आम्ही बोललो.
 
भारतीय टीमसाठी निराशा, दुःख, विस्मय तर ऑस्ट्रेलियाविषयी काहीसं कौतुक आणि तिरस्कार आणि राग. अशा वेगवेगळ्या भावना तिथे वाहात होत्या.
 
पण एखाद दुसरा अपवाद वगळता कुणाचा राग उतू जात नव्हता, याचा विशेष उल्लेख करायला हवा.
 
ऑस्ट्रेलियात स्थायिक झालेल्या आणि या सामन्यासाठी अहमदाबादमध्ये आलेल्या लोकांच्या मनात तर मिश्र भावना दिसत होत्या. एक लहान मुलगा ऑस्ट्रेलियासाची जर्सी घालून आला होता आणि वडील भारतीय जर्सीमध्ये.
 
भारत का हरला नि ऑस्ट्रेलिया का जिंकली, यावर ते चर्चा करत होते.
 
तिकडे मैदानात भारतीय टीम पराभवानंतर एकमेकांचं सांत्वन करत होती, अश्रू मागे सारण्याचा प्रयत्न करत होती. लबुशेन, मॅक्सवेल, हेझलवूड विराटची गळाभेट घेताना दिसले. सामना संपला, की वैर संपतं.
 
क्रिकेट कसं खेळावं आणि पराभवानंतर सन्मानानं कसं राहावं, या गोष्टी दोन्ही टीम्सनी दाखवून दिल्या आहेत.
 
चॅम्पियन टीम
हे आता मान्यच करूयात- ऑस्ट्रेलिया खरोखर वर्ल्ड चॅम्पियन आहे. वन डे वर्ल्ड कपच नाही, तर त्याआधी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपही त्यांनीच जिंकली होती.
 
जिंकायचं कसं, याचा वस्तुपाठच त्यांनी पुन्हा एकदा घालून दिला. स्पर्धेच्या सुरुवातीला त्यांना दुखापतींनी ग्रासलं होतं. वर्ल्ड कप आधी भारतातच भारताकडून त्यांना वन डे मालिकेत पराभव स्वीकारावा लागला होता.
 
साखळी फेरीच्या पहिल्या सामन्यातही भारतानं त्यांना हरवलं होतं. पण वर मी म्हटलं तसं, मागे काय घडलं होतं याला क्रिकेटमध्ये फारसा अर्थ नाही. पुढे तुम्ही काय करणार हे महत्त्वाचं असतं.
 
आणि पुढे आपण काय करणार हे ऑस्ट्रेलियाला, विशेषतः त्यांचा कर्णधार पॅट कमिन्सला नेमकं ठाऊक होतं.
 
पॅट कमिन्सभोवती स्टीव्ह वॉसारखं वलय नाही ना रिकी पाँटिंगसारखा त्याचा दबदबा आहे. पण वर्ल्ड कपची ट्रॉफी त्याच्या हातात विसावली आहे.
 
याची अनेक कारणं आहेत. पण कमिन्सचं शांत, संयमी नेतृत्व हे त्यात कदाचित सर्वांत महत्त्वाचं कारण आहे.
 
खऱ्या नेतृत्त्वाचा हा एक मोठा गुणधर्मच आहे. त्यांचं नाव कुठे सतत झळकत नाही, पण ते तुम्हाला जिंकण्याचा मार्ग दाखवतात.
 
सामन्याच्या आदल्या दिवशीच कमिन्सनं मांडलेल्या दोन गोष्टी माझ्या कायम लक्षात राहतील.
 
एक म्हणजे मोहम्मद शमी ऑस्ट्रेलियासाठी धोकादायक ठरू शकतो, म्हणून ते त्याला सांभाळून खेळतील असं कमिन्स म्हणाला होता.
 
विराट, रोहित, राहुलला रोखण्यासाठी काही योजना आहेत, असंही तो मोघम बोलला होता.
 
आपल्या त्या गेमप्लॅनवर ते कायम राहिले. भारतीय टीमकडे मात्र कुठला गेमप्लॅन उरला होता का, असा प्रश्न पडला.
 
दुसरी गोष्ट म्हणजे अहमदाबादच्या मोदी स्टेडियममध्ये 1 लाख 32 हजार चाहते. एवढ्या मोठ्या गर्दीत सन्नाटा निर्माण करण्याइतकं समाधान देणारं काही नाही, असं सूचक विधान कमिन्सनं केलं होतं. त्यांनी खरंच शेवटी गर्दीला थक्क केलं.
 
इतके लोक तुमच्या विरोधात असताना एखाद्या टीमवर दबाव कसा येतो, हे या स्पर्धेत पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात दिसलं होतं.
 
पण ऑस्ट्रेलिया काही पाकिस्तान नाही, त्यांना उलट लोक विरोधात असले की आणखी स्फुरण चढतं. परिस्थिती विरोधात असली की ते चेकाळून उठतात. ही वृत्ती काहीशी नोवाक जोकोविचची आठवण करू देते.
 
मुंबईत वानखेडे स्टेडियमवर अफगाणिस्तानविरुद्‌धच्या सामन्यातही याची झलक पाहायला मिळाली होती. त्यावेळी सात विकेट्स पडल्यावरही मिळालेल्या जीवदानाचा फायदा उठवत मॅक्सवेलनं नाबाद द्विशतक झळकावलं होतं.
 
पायात गोळे आलेले असतानाही मॅक्सवेल संघर्ष करत राहिला आणि आपल्या टीमला त्यानं जिंकून दिलं.
 
ऑस्ट्रेलियासाठी या स्पर्धेतला तो महत्त्वाचा टर्निंग पॉइंट ठरला. त्यांची देहबोलीच त्यानंतर बदलल्यासारखी वाटली. दक्षिण आफ्रिकेला हरवताना ती दिसून आली.
 
आत्मविश्वास आणि स्वतःच्या क्षमतांविषयी पूर्ण जाणीव असल्याशिवाय अशा दबावाखाली खेळणं शक्य होत नाही. ऑस्ट्रेलियन खेळाडूंना तो विश्वास बालपणापासूनच मिळतो की काय, असं वाटून जातं.
 
त्यांच्या देशातली खेळावर प्रेम करणारी संस्कृतीच त्यासाठी कारणीभूत आहे. भारतात अजून ती संस्कृती तेवढी रुजलेली नाही.
 
पुढे काय?
गेल्या दोन दशकांत भारतीय क्रिकेट बरंच बदललं आहे. भारतातलं खेळांचं विश्वच बदललं आहे.
 
जिंकायचं कसं हा मंत्र भारतीयांना सापडला आहे. आपणही कुठे कमी नाही आणि उत्तम तयारी केली तर पदकं, ट्रॉफी मिळवू शकतो हा आत्मविश्वास मिळाला आहे.
 
रोहित शर्माची टीम त्याच नव्या पिढीचं प्रतिनिधित्व करते. त्यांना आणखी थोडा वेळ द्यायला हवा.
 
भारतीय टीमनं स्पर्धेत उत्तम कामगिरी बजावली हे लक्षात ठेवायला हवं. टीम इंडियाच्या त्या कामगिरीनं वन डे क्रिकेटमध्येही नवी जान ओतली आहे, हे विसरता येणार नाही.
 
अर्थात आधीच्या दहा सामन्यांत काय केलं याला आता फारसा अर्थ उरलेला नाही. म्हणूनच क्रिकेट हा निष्ठूर खेळ वाटतो.
 
जी टीम अख्ख्या स्पर्धेत जिंकत गेली, त्यांची गाडी अखेरच्या क्षणी कुठे अडकली? कुणाचं चुकलं? भारत कमी पडला की ऑस्ट्रेलियाच उत्तम खेळली? अशी या पराभवाची चिकित्सा पुढचे काही दिवस होत राहील.
 
पण भारतीय टीमला मात्र हा पराभव विसरून लगेच पुन्हा ऑस्ट्रेलियाचा सामना करायचा आहे. पुढच्या वन डे वर्ल्ड कपची तयारी आता सुरू झाली आहे.
 
शेवटी पराभव, निराशा पचवून पुढे जात राहणं, हेच महत्त्वाचं असतं. क्रिकेटमध्येही आणि आयुष्यातही.
 




















Published By- Priya Dixit 
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

सुकमा येथे सुरक्षा दलाच्या ट्रकवर IED स्फोटात दोन जवान शहीद

टॅक्सी आणि रिक्षाचालकां जीवन विमा संरक्षण मिळणार मुख्यमंत्री शिंदे यांनी घोषणा केली

अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियावर मिळवलेला विजय आश्चर्यकारक नाही, कारण...

Pune Bus Accident:पुण्यात प्रवाशांनी भरलेली बस झाडावर आदळून अपघात, 22 प्रवासी जखमी

NEET पेपर लीक प्रकरणात महाराष्ट्रातील दोन शिक्षकांना अटक

सर्व पहा

नवीन

अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियावर मिळवलेला विजय आश्चर्यकारक नाही, कारण...

अफगाणिस्तानने सुपर 8 मध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव केला

IND vs BAN : भारताने बांगलादेशचा 50 धावांनी पराभव केला,उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित

IND vs BAN: T20 विश्वचषकाच्या पुढील सामन्यात टीम इंडियाचा सामना बांगलादेशशी होणार

ENG vs SA : दक्षिण आफ्रिकेची इंग्लंडला पराभूत करून विजयी मालिका सुरू

पुढील लेख
Show comments