Webdunia - Bharat's app for daily news and videos
Install App
✕
महाराष्ट्र माझा
धर्म संग्रह
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक
ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
फेंगशुई
राशिभविष्य
जन्मदिवस आणि ज्योतिष
श्रीराम शलाका
टॅरो भविष्य
चौघड़िया
मासिक जुळत आहे
आजचा वाढदिवस
लाईफस्टाईल
प्रणय
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
इतर खेळ
स्कोअरकार्ड
वेळापत्रक
आयसीसी रँकिंग
क्रीडा जग
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
Marathi
हिन्दी
English
தமிழ்
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
महाराष्ट्र माझा
धर्म संग्रह
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक
ज्योतिष
लाईफस्टाईल
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
श्री गजानन विजय ग्रंथ – अध्याय १४
Webdunia
गुरूवार, 10 डिसेंबर 2020 (04:40 IST)
॥ श्रीगणेशाय नमः ॥
हे कौसल्यात्मज रामराया । हे रघुकुलभूषणा करुणालया ।
सीतापते करा दया । आतां या लेंकरासी ॥१॥
ताटिका त्वां उध्दरली । अहिल्या शिळा सजीव केली ।
शबरीची पुरवली । इच्छा तूं दशरथे ॥२॥
भक्तरक्षणा कारण । सोडिलें नृपसिंहासन ।
वानर केलेसे बलवान् । केवळ आपल्या कृपेनें ॥३॥
शिळा तरल्या सागरीम । तुझ्या नामें रावणारी ।
बसविलास गादीवरी । भक्त आपला बिभीषण ॥४॥
जो जो आला शरण पदा । तुझ्या कीं हे आनंदकंदा ।
दैन्य, दुःख, आपदा । त्याच्या त्वां वारिल्यास ॥५॥
हें मनीं आणावें । दासगणूस सांभाळावें ।
बालकानें धांवावें । जननिविण कोणाकडे ? ॥६॥
तूं जननी जनिता सद्गुरु । तूं भक्तांना कल्पतरु ।
भवनदीचें भव्य तारूं । तूंच कीं रे रामराया ! ॥७॥
एक खेडेगांवचा । रहिवासी मेहकर तालुक्याचा ।
बंडूतात्या नांवाचा । ब्राह्मण होता विबुध हो ॥८॥
हा बंडूतात्या ब्राह्मण । सदाचारसंपन्न ।
उदार होतें ज्याचें मन । गृहस्थाश्रम चालवी ॥९॥
श्रोते या प्रपंचांत । संकटें येती अतोनात ।
परी नाहीं पहा सुटत । लोभ त्याचा मानवा ॥१०॥
या बंडूतात्या घरीं । पाहुणे येती वरच्यावरी ।
तो अवघ्यांची साच करी । सरबराई निजांगें ॥११॥
ऐसा क्रम चालला । संचय अवघा संपला ।
आली पाळी बिचार्याला । कर्ज काढणें साहूचें ॥१२॥
घरदार पडलें गहाण । अगणित झालें तया ऋण ।
लोकांप्रती दावण्या वदन । लाज वाटूं लागली ॥१३॥
विकावया न कांहीं उरलें । सदन अवघें साफ झालें ।
भांडेंकुंडें तेंही गेलें । काय विपत्ती वर्णावी ? ॥१४॥
तगादे करिती सावकार । शिपाई धाडून वरच्यावर ।
भागवण्यासी दोन प्रहर । अडचण पडूं लागली ॥१५॥
कांता बोले टाकून । मुलें करिती अपमान ।
पत गेली उडून । उसनें न कोणी देती हो ॥१६॥
ऐशा तापें तापला । जीव द्याया तयार झाला ।
पैसा संपतां प्रपंचाला । कांहीं नसे किंमत ॥१७॥
जें सुखाचें वाटे स्थान । तेंच दुःखाचें निकेतन ।
संपून गेल्यावरी धन । सहज होतें न्याय हा ॥१८॥
बंडूतात्या विचार करी । जीव कोठें देऊं तरी ।
अफू खाऊन मरूं जरी । तरी ती घ्याया पैसा नसे ॥१९॥
जरी जाऊन विहिरीवरी । जीव हा मी देऊं तरी ।
तितुक्यांत कोणी येऊन वरी । जरी मला काढल्यास ॥२०॥
जीवही ना जाईल । उलटी फजीती होईल ।
सरकार शिक्षा देईल । आत्महत्यारा म्हणून मला ॥२१॥
यापेक्षां हिमालया । जावे वाटे जीव द्याया ।
आत्महत्येचा ते ठायां । दोषही ना लागेल ॥२२॥
ऐसा करूनि विचार । पडला घराच्या बाहेर ।
अखेरचा तो नमस्कार । केला त्यानें प्रपंचाला ॥२३॥
एक लंगोटी घातली । राख अंगा लाविली ।
तयानें ही युक्ति केली । ओळख आपुली बुजवावया ॥२४॥
श्रोते अब्रुदारासी । जननिंदेचें मानसीं ।
भय वाटे अहर्निशीं । हें सकळांसी ठाऊक ॥२५॥
बंडूतात्या म्हणे मनीं । हे दीनदयाळा चक्रपाणी ।
अवकृपा मजलागोनी । कां रे ऐसी केलीस ? ॥२६॥
तुझ्यावरी विश्वास माझा । पूर्ण होता अधोक्षजा ।
तूं रंकाचा करिसी राजा । ऐसें ऐकिलें पुराणीं ॥२७॥
तें सर्व खोटें झालें । प्रत्ययासी माझ्या आलें ।
व्यर्थ कवींनी रंगविलें । चरित्र तुझें नारायणा ॥२८॥
आतां जीव देतों परी । तुझ्यावरी मी श्रीहरी ।
याचा विचार कांहीं करी । हत्या नको घेऊं मम ॥२९॥
ऐसें मनीं बोलला । तिकिट घ्याया लागला ।
तों एक भेटला । विप्र त्यासी स्टेशनांत ॥३०॥
आतांच हरिद्वाराचें । तिकीट नको घेऊं साचें ।
घेऊन दर्शन संतांचें । मग जावें हरिद्वारा ॥३१॥
आपल्या वर्हाड प्रातांत । श्रीगजानन महासंत ।
आहेत अवतरले सांप्रत । त्यांच्या दर्शना जाय तूं ॥३२॥
संतदर्शन आजवरी । वायां न गेलें भूमीवरी ।
उगीच त्रासून अंतरीं । भलतें कांहीं करूं नको ॥३३॥
ऐसें बोलतां ब्राह्मण । तात्या गेला गोंधळून ।
म्हणे हा मनुष्य कोण ? । अवचित मसी भेटला ॥३४॥
किंवा यानें ओळखिलें । मी बंडूतात्या म्हणून भलें ।
कांहीं न माझा तर्क चाले । पुसुं तरी याते कसा ? ॥३५॥
कांहीं असो शेगांवासी । जाऊन वंदूं समर्थांसी ।
ऐसें बोलून मानसीं । शेगांवासी पातला ॥३६॥
दर्शना गेला ब्राह्मण । तों महाराज वदले हांसून ।
कां रे देशी जाऊन प्राण । हिमालयासी बंडूतात्या ॥३७॥
अरे आत्महत्या करूं नये । हताश कदापि होऊं नये ।
प्रयत्न करण्या चुकूं नये । साध्य वस्तु साधण्यास ॥३८॥
आतां जरी दिलास प्राण । प्रपंचाशीं त्रासून ।
तरी येशील घेऊन । जन्म पुन्हां ते भोगावया ॥३९॥
नको जाऊं हिमालया । गंगेमाजी प्राण द्याया ।
परत आपुल्या घरीं जाया । वेळ वेड्या करूं नको ॥४०॥
तिकीट घेतां जो भेटला । स्टेशनावरी ब्राह्मण तुला ।
ओळखिलें का सांग त्याला ? । तो कोण होता हें कांहीं ॥४१॥
जा आतां घरीं परत । राहूं नको लवही येथ ।
बापा तुझ्या मळ्यांत । आहे एक म्हसोबा ॥४२॥
त्या म्हसोबाच्या पूर्वेसी । बाभुळीच्या झाडापासी ।
खोदून पहा मेदिनीसी । दोन प्रहर रात्रीला ॥४३॥
काम जमीन खोदण्याचें । तूंच एकटा करी साचें ।
खालीं तीन फुटांचें । द्रव्य तुजला सांपडेल ॥४४॥
त्यांतून थोडें कर्जदारां । देऊनी ऋणमुक्त होई खरा ।
नको सोडूंस बायकापोरां । उसनें वैराग्य वाहूं नको ॥४५॥
ऐसे बोलतां गजानन । आनंदला तो ब्राह्मण ।
आला खर्ड्यास परतून । राख पुसून अंगाची ॥४६॥
रात्रीचिया वेळेला । मळ्यांत म्हसोबापासी आला ।
बाभूळीखालीं लागला । जमीन खोदाया कारण ॥४७॥
तों तीन फुटांवर । लागली श्रोते घागर ।
एक तांब्याची साचार । वेळणी होती जिच्या मुखा ॥४८॥
त्या तांब्याच्या घागरींत । मोहरा सोन्याच्या चार शत ।
पडल्या त्याच्या दृष्टीप्रत । मग काय विचारितां ? ॥४९॥
करीं घागर घेऊनिया । लागला तेथेंच नाचावया ।
जय जय गजानन गुरुराया । ऐसें मुखें बोलून ॥५०॥
त्याच द्रव्यें करून । फेडिलें त्यानें अवघें ऋण ।
मळा होता पडला गहाण । तोही आणिला सोडवोनी ॥५१॥
घडी बसली प्रपंचाची । ही गजाननकृपेनें साची ।
वृत्ति बंडूतात्याची । गेली अती आनंदून ॥५२॥
जेवीं मृत्यूची घटकां भरतां । अमृतकलश यावा हातां ।
वा सागरामाजीं बुडतां । तारूं दृष्टीस पडावें ॥५३॥
बंडूतात्यास तैसें झालें । दुःखाचे ते दिवस सरले ।
मग त्यानें पुढें केलें । येणें पहा शेगांवा ॥५४॥
दानधर्म तेथें केला । मोठ्या प्रमाणामाजीं भला ।
गजाननाच्या पदीं झाला । लीन अनन्यभावानें ॥५५॥
तई महाराज वदले त्यासी । आम्हांस कां रे वंदिसी ? ।
ज्यानें दिला आहे तुसी । द्रव्यघट तो वंदी तया ॥५६॥
आतां तरी येथून । खर्च करावा सांभाळून ।
उगे न करी उधळेंपण । त्यांत नसे सार कांहीं ॥५७॥
जन सुखाचे सोबती । निर्वाणीचा श्रीपती ।
त्याची सदैव करी भक्ती । तो न उपेक्षी कदा तुला ॥५८॥
ऐसा उपदेश ऐकिला । समर्थांसी वंदून भला ।
बंडूतात्या गांवास गेला । आपुल्या अती आनंदें ॥५९॥
एकेकालीं सोमवती । पर्व आले निश्चिती ।
जी कां अमावस्या येती । सोमवारीं ती सोमवती हो ॥६०॥
या सोमवतीचें महिमान । पुराणांत केलें कथन ।
या दिवशीं नर्मदास्नान । अवश्य म्हणती करावें ॥६१॥
म्हणून शेगांवची मंडळी । नर्मदेस जाया तयार झाली ।
तयारी त्यांनीं अवघी केली । पडशा वगैरे भरून ॥६२॥
मार्तंड पाटील बंकटलाल । मारुती चंद्रभान बजरंगलाल ।
यांनीं केला एक मेळ । ओंकारेश्वरीं जाण्याचा ॥६३॥
बंकटलाल म्हणे अवघ्यांसी । आपण जातों नर्मदेसी ।
घेऊं सांगातें महाराजांसी । स्नान कराया नर्मदेचें ॥६४॥
चौघे मठामाजीं आले । समर्थां विनवूं लागले ।
ओंकारेश्वरीं गुरुमाऊले । चला आमुच्या समवेत ॥६५॥
तुम्ही असल्याबरोबर । काळाचाही नाहीं दर ।
घाला आम्हांस पायांवर । त्या ओंकारेश्वराच्या ॥६६॥
हा अधिकार मातेविना । नाहीं पाहा इतरांना ।
आमुची विनंती हीच चरणा । न्यावें आम्हा नर्मदेसी ॥६७॥
तुम्ही आल्यांवांचून । आम्ही न हालूं येथून ।
बालहट्टालागून । जननी तीच पुरवीतसे ॥६८॥
महाराज म्हणाले तयासी । आहे नर्मदा माझ्यापाशीं ।
उगीच त्रास द्यायासी । जाऊं कशाला तिला मग ? ॥६९॥
मी या मठांत बैसुन । करीन नर्मदेचें स्नान ।
तुम्ही या सारे जाऊन । श्रीओंकारेश्वराला ॥७०॥
तेथें राजा पूर्वकालीं । मान्धाता भाग्यशाली ।
होऊन गेला महाबली । दिगंत ज्याची कीर्ति असे ॥७१॥
श्रीशंकराचार्य गुरुवर । यांनीं कराया जगदोध्दार ।
तेथेंच दीक्षा साचार । परमहंसाची घेतली ॥७२॥
जा जा तुम्ही तया स्थला । भेटा माझ्या नर्मदेला ।
मात्र नेऊं नका मला । उगाच आग्रह करून ॥७३॥
आतां पर्वाचें प्रयोजन । नाहीं राहिलें मजलागून ।
ऐसें ऐकतां चवघेजण । घट्ट धरिती पायांला ॥७४॥
कांही असो तेथवरी । चला आमुच्या बरोबरी ।
लगेच येऊं माघारी । स्नान करूनी नर्मदेचें ॥७५॥
महाराज म्हणाले ठिक ठिक । तुम्हीं दिसतां दांभिक ।
नर्मदेचें आहे उदक । या आपुल्या विहिरीमध्यें ॥७६॥
तिला टाकून आपण । तेथें कराया गेलों स्नान ।
तरी राग येईल दारुण । माझ्या त्या नर्मदेला ॥७७॥
म्हणून सांगतों तुम्हींच जावें । मला न आग्रहा करावें ।
माझें वचन मानावें । यांत तुमचें कल्याण ॥७८॥
मग मारुती चंद्रभान । करूं लागला भाषण ।
आम्ही घेतल्यावांचुन । आपणां न जाऊं कीं ॥७९॥
समर्थ म्हणाले मी तेथ । आल्य होईल विपरीत ।
मग तुम्ही दोष मात्र । देऊं नये आम्हांला ॥८०॥
ऐसें मठांत बोलणें झालें । अवघें ओंकारेश्वरा आले ।
पर्वासाठीं मिळाले । लोक तेथें अपार ॥८१॥
नर्मदेचे अवघे घाट । स्त्रीपुरुषांनी भरले दाट ।
मुंगीलाही नसे वाट । जाया हराच्या मंदिरीं ॥८२॥
कोणी स्नानास उतरले । कोणी संकल्प ऐकूं लागले ।
कोणी घेऊन बेलफुलें । जाऊं लागले मंदिरांत ॥८३॥
कोणी बर्फी पेढे खवा । बसून खाऊं लागले मेवा ।
थव्यामागें लागला थवा । तेथें भजनकर्यांचा ॥८४॥
पर्व संपेपर्यंत । अभिषेकाची मंदिरांत ।
गर्दी झाली अत्यंत । शब्द कोणाचा कोणा न कळे ॥८५॥
रम्यशा त्या ओंकारीं । समर्थाची बैसली स्वारी ।
पद्मासन घालूनी कांठावरी । त्या महानदीच्या नर्मदेच्या ॥८६॥
चौघे दर्शन घेऊन आले । समर्था विनवूं लागले ।
आतां पाहिजे सोडिलें । जाणें सडकेनें आपणा ॥८७॥
कां कीं भीड झाली फार । गाड्या मोडती वरचेवर ।
बैल गाडीचे बुजार । आहेत आपुल्या त्यांतूनी ॥८८॥
खेडीघाट स्टेशनाला । जाण्यायेण्याचा करार केला ।
गाडीवाल्यानें तो भला । न सांगतां गुण बैलांचे ॥८९॥
ते बसतां आले कळून । आपण होतां म्हणून ।
पोंचलों येथे येऊन । बैल द्वाड गाडीचे ॥९०॥
परत बसून गाडींत । जाणें न निर्भय वाटत ।
म्हणून या नावेंत । बसून जाऊं स्टेशनाला ॥९१॥
गर्दी झाली रस्त्यांनी । नदींतून जाऊ शांतपणीं ।
ऐसेंच केलें कित्येंकांनीं । त्या पाहा नावा चालल्यात ॥९२॥
तुम्हांस वाटेल तेंच करा । आम्हां न कांहीं विचारा ।
मी वचनांत गुंतलों खरा । तुम्ही बसाल तेथें येऊं ॥९३॥
ऐसें समर्थ बोलले । त्यांच्यासवें नावेंत बैसलें ।
गर्दीतून जाऊं लागले । खेडीघाट स्टेशनाला ॥९४॥
तों नदींत मध्यंतरीं । नाव आदळली खडकावरी ।
फळी फुटून गेली सारी । तिच्या बुडाची एक हो ॥९५॥
छिद्र पडलें आरपार । येऊं लागलें आंत नीर ।
नावाड्यानें सत्वर । नदींत उड्या टाकिल्या ॥९६॥
परी महाराज निर्धास्त होते । ' गिनगिन गणांत बोते ' ।
ऐसें भजन मुखातें । चाललें होतें अखंड ॥९७॥
मार्तंड बजरंग मारुती । घाबरून गेले अती ।
उडूं लागली धडधडा छाती । बंकटलालाची विबुध हो ॥९८॥
चवघे समर्थां बोलले । आम्ही अपराधी आहों भले ।
आम्हीं न तुमचें ऐकिलें । शेगांवांत दयाळा ॥९९॥
त्याचें दिलें आम्हां फळ । तुम्ही आज तात्काळ ।
नर्मदाच झाली काळ । आम्हांलागीं बुडवावया ॥१००॥
गुरुराया आपुली वाणी । वेदतुल्य मानूं येथूनी ।
वांचवा या संकटातूनीं । शेगांव दृष्टी पडूं द्या ॥१॥
ऐसें जों ते बोलतात । तों निंम्यावरी पाण्यांत ।
नाव बुडाली लोटत लोटत । एक फर्लांग गेली हो ॥२॥
कांहीं लोक बोलती ऐसें । मेली हीं पांच माणसें ।
आतां यांचा भरवंसा नसे । अथांग पाणी नर्मदेला ॥३॥
तई म्हणाले गजानन । नका होऊं हैराण ।
तुमच्या जीवालागून । धक्का न लावी नर्मदा ॥४॥
ऐसें म्हणून स्तवन केलें । नर्मदेचें त्यांनी भलें ।
हे चवघे बैसले । हात जोडून नावेंत ॥५॥
श्लोक ( अनुष्टुप छंद )
नर्मदे मंगले देवी । रेवे अशुभनाशिनी ।
मंतु क्षमा करी यांचा । दयाळू होऊनी मनीं ॥
ऐसें स्तवन चाललें । तों आंतील पाणी निघून गेलें ।
नर्मदेनें लाविलें । आपुल्या करास त्या छिद्रा ॥६॥
नाव श्रोते पहिल्यापरी । आली जलाचिया वरी ।
त्या नावेच्या बरोबरी । होती प्रत्यक्ष नर्मदा ॥७॥
कोळणीचा धरला वेष । मस्तकावरी कुरळ केश ।
भिजविलें जियेच्या वस्त्रास । कंबरेपर्यंत जलानें ॥८॥
नौका कांठास लागली । अवघ्यांनी ती पाहिली ।
आश्चर्यचकित मुद्रा केली । पाहून तळीच्या छिद्राला ॥९॥
ही बाई होती म्हणून । आमुचे हे वांचले प्राण ।
बाई आपण कोठील कोण ? । हें कांहीं सांगा हो ॥११०॥
सोडा वस्त्र बिजलेलें । आम्ही नवें देतों भलें ।
तईं नर्मदेनें पहा केलें । ऐशा रीतीनें भाषण ॥११॥
मी ओंकार कोळ्याची कन्यका । माझें नांव नर्मदा ऐका ।
आम्हां परिपाठ आहे देखा । ओलें वस्त्र नेसण्याचा ॥१२॥
मी ओलीच राहतें निरंतर । माझेंच रूप आहे नीर ।
ऐसें बोलून नमस्कार । करून गेली गजानना ॥१३॥
क्षणामाजीं नाहींसी । झाली ती नर्मदेसी ।
वीज चमकून आकाशीं । घनीं जैसी लीन होते ॥१४॥
तों पहातां प्रकार । चवघे आनंदले फार ।
कळला स्वामींचा अधिकार । नर्मदा आली दर्शना ॥१५॥
बंकट विचारी खोदून । समर्था ही स्त्री कोण ? ।
तें सांगावें फोडून । गुप्त कांहीं ठेवूं नका ॥१६॥
तईं महाराज वदले तत्त्वतां । तुम्हीं जे कां विचारितां ।
तो कथिला आहे गाथा । नर्मदेनें तुम्हांस ॥१७॥
कोळी जो का ओंकार । तोच हा ओंकारेश्वर ।
माझेंच रूप आहे नीर । ऐसें नर्मदा वदलीना ? ॥१८॥
अरे ती प्रत्यक्ष नर्मदा । संशय तेथें न घ्यावा कदा ।
संकटामाजीं देतें सदा । हात ती आपुल्या भक्तातें ॥१९॥
म्हणून तिचा जयजयकार । करा मोठ्यानें एक वार ।
जय जय नर्मदे निरंतर । ऐसेंच रक्षण अंबे करी ॥१२०॥
ऐसें ऐकतां वचन । बंकटलालादि चवघे जण ।
समर्थांचे दिव्य चरण । वंदूं लागलें क्षणक्षणां ॥२१॥
परत आले शेगांवांत । ज्यांना त्यांना हीच मात ।
होऊनिया हर्षभरित । सांगूं लागले विबुध हो ॥२२॥
सदाशिव रंगनाथ वानवळे । एक्या गृहस्थासमवेत भले ।
शेगांवांत येते झाले । महाराजांच्या दर्शना ॥२३॥
या सदाशिवाकारण । टोपण नांव तात्या जाण ।
हे माधवनाथाचे छात्रगण । चित्रकूटच्या होते हो ॥२४॥
या माधवनाथाप्रत । योगांगे होतीं अवगत ।
ज्यांचा शिष्यगण माळव्यांत । आहे मोठ्या प्रमाणीं ॥२५॥
सदाशिव आले शेगांवाला । जेव्हां श्रीच्या दर्शनाला ।
तेव्हां महाराज भोजनाला । बसले होते मठांत ॥२६॥
सदाशिवासी पाहून । माधवाची झाली आठवण ।
गजाननाकारण । संत संता जाणती ॥२७॥
वानवळे येतांक्षणीं । महाराज बोलले मोठ्यांनीं ।
अरे नाथाच्या शिष्यालागुनी । बसवा आणून माझ्यापुढें ॥२८॥
त्यांचे गुरु माधवनाथ । गेले जेवून इतक्यांत ।
मठीं माझ्या समवेत । तों हे दोघे पातले ॥२९॥
थोडा वेळ आधीं जरी । हे आले असते तरी ।
भेट त्यांच्या गुरूची खरी । यांना येथें मठांत ॥१३०॥
आतां हे मागून आले । गुरु त्यांचे निघून गेले ।
विडा न घेतां भले । त्याची करूं पुर्तता ॥३१॥
वानवळ्यासी आलिंगन । देते झाले दयाघन ।
पोरें बंधूंचीं म्हणून । ऐसा तो संतप्रेमा ॥३२॥
रीतिप्रमाणें सत्कार केला । वानवळ्याचा शेगांवाला ।
जातांना त्या निरोप दिला । समर्थांनीं येणे रीतिं ॥३३॥
तुम्ही माधवनाथाला । असेच जा भेटण्याला ।
त्यांचा येथें राहिला । विडा तो त्या द्यायास ॥३४॥
मी म्हणतों तेंच सांगा । पदरचें न घाला बघा ।
आमच्या वाक्यामाजीं उगा । फरक तुम्ही करूं नये ॥३५॥
म्हणा " साथे भोजन हुवा । विडा तुम्हारा याही रहा ।
तो आम्ही आणिला पाहा । नाथां तुम्हां द्यावयास " ॥३६॥
हें सारें बोलणें । ऐकलें त्या वानवळ्यानें ।
घेऊन विड्याचीं दोन पानें । गमन करितां जाहला ॥३७॥
माधवनाथा हकीकत । त्यानें कथिली इत्थंभूत ।
महाराज आपण शेगांवांत । आला होता कां ते दिनीं ? ॥३८॥
गजानन जें बोललें । तैसेंच आहे जाहलें ।
भोजनसमयीं त्यांनीं केलें । स्मरण माझें तीच भेट ॥३९॥
ऐशा रीतिं एकमेकां । आम्हीं भेटतों सदैव देखा ।
येथें शंका घेऊं नका । स्मरण तीच भेट होय ॥१४०॥
त्यांचा माझा एक प्राण । शरीरे हीं मात्र भिन्न भिन्न ।
हें आहे खोल ज्ञान । तें न इतक्यांत कळे तुम्हां ॥४१॥
बरें झालें आणिला । आमुचा विडा तुम्हीं भला ।
जो होता राहिला । शेगांवीं शिष्य हो ॥४२॥
पानें देतां वानवळ्यांनीं । तीं भक्षिलीं नाथांनीं ।
खलबत्त्यांत कुटुनीं । थोडा प्रसाद दिला त्याला ॥४३॥
संतभेटी होती कैसी । हें चांगदेवपासष्टीसी ।
सांगते झाले ज्ञानराशीं । श्रीज्ञानेश्वर महाराज ॥४४॥
ती पासष्टी मनीं आणा । म्हणजे ह्या कळतील खुणा ।
स्वानुभवाच्या ठायीं जाणा । वाव न तर्काकारणें ॥४५॥
योगी वाटेल तेथोनी । भेटे एकमेकांलागूनी ।
भेट ठायीच बैसोनी । होतें त्याचें कौतुक हें ॥४६॥
शेख महंमद श्रीगोंद्यांत । तुकाराम होते देहूंत ।
आग लागतां मंडपाप्रत । देहूमाजीं कीर्तनाच्या ॥४७॥
ती श्रीशेख महंमदांनीं । विझविली श्रीगोंद्यांत बैसुनी ।
हें महिपतीनें लिहूनी । ठेविलें भक्तिविजयांत ॥४८॥
जाऊन हळी खेड्यांत । विहिरींत बुडतां पाटीलसुत ।
वांचविलें देऊन हात । महाराज माणिकप्रभूंनीं ॥४९॥
खरा योगी असल्याविना । ऐसें कौतुक होईना ।
हें न साधे दांभिकांना । त्यांनीं गप्पाच माराव्या ॥१५०॥
योग अवघ्यांत बलवत्तर । त्याची न ये कोणां सर ।
करणें असल्या राष्ट्रोध्दार । त्याचा अवलंब करा हो ॥५१॥
श्रीदासगणूविरचित । हा गजाननविजय नामें ग्रंथ ।
ऐकोत सदा प्रेमळ भक्त । निष्ठा ठेवून ग्रंथावरी ॥१५२॥
शुभं भवतु ॥ श्रीहरिहरार्पणमस्तु ॥
॥ इति चतुर्दशोध्यायः समाप्तः ॥
श्रीगजाननविजयग्रंथअध्याय१५
वेबदुनिया वर वाचा
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
संबंधित माहिती
श्री गजानन विजय ग्रंथ – अध्याय १३
श्री गजानन विजय ग्रंथ – अध्याय १२
श्री गजानन विजय ग्रंथ – अध्याय ११
श्री गजानन विजय ग्रंथ – अध्याय १०
श्री गजानन विजय ग्रंथ – अध्याय ९
सर्व पहा
नवीन
दत्त जयंती विशेष रेसिपी : केशरी भात
श्री गुरुदेव दत्तपीठ देवगड
Srikshetra Gangapur Yatra दत्त भक्तांची पंढरी, श्रीक्षेत्र गाणगापूर
।। श्री दत्तगुरूंची आरती ।।
श्रीदत्त क्षेत्र औदुंबर Shri Datta Kshetra Audumbar
सर्व पहा
नक्की वाचा
Margashirsha Purnima 2024: मार्गशीर्ष पौर्णिमेला लक्ष्मी देवीची कृपा मिळविण्यासाठी कोणते उपाय करावेत?
Annapurna Jayanti 2024: अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघरात किती दिवे लावावेत?
वृश्चिक राशीत बुधाचा उदय या राशींसाठी खूप शुभ राहील
बाळासाठी भगवान दत्तात्रेयाच्या नावावरुन सुंदर नावे
दत्त जयंती विशेष रेसिपी : सुंठवडा
पुढील लेख
श्री गजानन विजय ग्रंथ – अध्याय १३
Show comments