Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

संत निवृत्तीनाथांचे अभंग 171 ते 180

nivruttinath maharaj
Webdunia
बुधवार, 15 जून 2022 (15:55 IST)
चेतवि चेतवि सावधान जिवीं । प्रकृति मांडवी लग्न वोजा ॥ १ ॥
मातृका मायानिवेदन हरि । प्रपंचबोहरि रामनामें ॥ २ ॥
निवृत्तिदेवीं अद्वैत परणिली शक्ति । निरंतर मुक्ति हरि नामें ॥ ३ ॥
 
हरि आत्मा होय परात्पर आलें । नाम हें क्षरलें वेदमतें ॥ १ ॥
वेदांतसिद्धांत नाहीं आनुहेत । सर्वभूतीं हेत हरि आहे ॥ २ ॥
हरिवि न दिसे गुरु सांगतसे । हरि हा प्रकाशे सर्व रुपीं ॥ ३ ॥
निवृत्तिनें कोंदले सद्‌गुरूंनीं दिधलें । हरिधन भलें आम्हां माजी ॥ ४ ॥
 
सुमनाची लता वृक्षीं उपजली । ते कोणे घातली भोगावया ॥ १ ॥
तैसा हा पसारा जगडंबर खरा । माजि येरझारा शून्यखेपा ॥ २ ॥
नाहीं त्यासि छाया नाहीं त्यासी माया । हा वृक्ष छेदावया विंदान करी ॥ ३ ॥
निवृत्तिराज म्हणे गुरुविण न तुटे । प्रपंच सपाटे ब्रह्मीं नेम ॥ ४ ॥
 
छेदियेला वृक्ष तुटलें तें मूळ । प्रपंच समूळ उडोनि गेला ॥ १ ॥
गेलें तें सुमन गेला फुलहेतु । अखंडित रतु गोपाळीं रया ॥ २ ॥
सांडिला आकारु धरिला विकारु । सर्व हरिहरु एकरूपें ॥ ३ ॥
निवृत्ति निधान वोळले गयनी । अमृताची धणी आम्हां भक्ता ॥ ४ ॥
 
परम समाधान परमवर्धन । नाम जनार्दन क्षरलें असे ॥ १ ॥
अक्षर अनंत क्षर हा संकेत । मागुतें भरत आपण्यामाजी ॥ २ ॥
आपण क्षरला आपण उरला । वैकुंठी वसिन्नला चतुर्भुज ॥ ३ ॥
निवृत्तिगुरुगयनी सांगितलें हरि । नाम चराचरीं विस्तारलें ॥ ४ ॥
 
विस्तार हरिचा चराचर जालें । त्या माजी सानुलें गुरु दैवत ॥ १ ॥
गुरुविण व्यर्थ विज्ञान न संपडे । ज्ञान हेतुकडे हिंडनें व्यर्थ ॥ २ ॥
गुरु परब्रह्म गुरु मात पिता । गुरूविण दैवत नाहीं दुजें ॥ ३ ॥
निवृत्ति म्हणे मज गुरु बोध दिठी । भक्ति नाम पेटी उघडिली ॥ ४ ॥
 
तुटलें पडळ भेटलें केवळ । सर्व हा गोपाळ गुरुमुखें ॥ १ ॥
न देखों बंधन सर्व जनार्दन । व्यासदिकीं खूण सांगितली ॥ २ ॥
ब्रह्मांडविवरण हरिचा हा खेळ । त्यांतील हा वेळ तोडियेला ॥ ३ ॥
निवृत्ति बोधला गुरुखुणा बोध । मनाचा उद्बोध हरिचरणीं ॥ ४ ॥
 
मारुनि कल्पना निवडिलें सार । टाकीलें असार फलकट ॥ १ ॥
धरिला वो हरि गोविलेंसे सर्व । विषयाची माव सांडीयेली ॥ २ ॥
पहाते दुभतें कासवी भरितें । नेत्रानें करितें तृप्त सदा ॥ ३ ॥
निवृत्ति अमृत गुरुकृपातुषार । सर्व ही विचार हरि केला ॥ ४ ॥
 
आमचा साचार आमचा विचार । सर्व हरिहर एकरूप ॥ १ ॥
धन्य माझा भाव गुरूचा उपदेश । सर्व ह्रषीकेश दावियेला ॥ २ ॥
हरिवीण दुजे नेणें तो सहजे । तया गुरुराजें अर्पियेलें ॥ ३ ॥
हरि हेंचि व्रत हरि हेंचि कथा । हरिचिया पंथा मनोभाव ॥ ४ ॥
देहभाव हरि सर्वत्र स्वरूप । एक्या जन्में खेप हरिली माझी ॥ ५ ॥
निवृत्ति हरी प्रपंच बोहरी । आपुला शरीरीं हरि केला ॥ ६ ॥
 
सर्वांघटी वसे तो आम्हां प्रकाशे । प्रत्यक्ष आम्हां दिसे गुरुकृपा ॥ १ ॥
विरालें ते ध्येय ध्यान गेलें मनीं । मनाची उन्मनि एक जाली ॥ २ ॥
ठेला अहंभाव सर्व दिसे देव । निःसंदेह भाव नाहीं आम्हां ॥ ३ ॥
निवृत्ति साधन गयनिप्रसादें । सर्व हा गोविन्द सांगतुसे ॥ ४ ॥

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Mahalaxmi Pujan on Friday महालक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी शुक्रवारी करा हे 4 उपाय

आरती शुक्रवारची

Mahatara Jayanti 2025 राम नवमीला महातारा जयंती, देवी पूजेचा शुभ मुहूर्त जाणून घ्या

Ramnavami Special Panjiri Recipe : रामनवमीच्या नैवेद्यासाठी पंजीरी बनवा

महाकाली यात्रेला आजपासून सुरुवात, चंद्रपूर महानगरपालिका प्रशासनाने केली तयारी पूर्ण

सर्व पहा

नक्की वाचा

Ram Navami 2025 Recipe घरीच तयार करा आम्रखंड

प्रभू श्रीराम यांच्या जन्माचे ५ खरे पुरावे

बेडरूममधील या 3 चुकांमळे तुमचे वैवाहिक जीवन बिघडेल

कांदा खाल्ल्यानंतर तोंडाला दुर्गंधी येत असेल तर हे 10 सोपे उपाय करून पहा

बटाटे वाफवतांना कुकर काळे पडते? या सोप्या ट्रिक अवलंबवा

पुढील लेख
Show comments