Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

संत निवृत्तीनाथांचे अभंग 191 ते 200

Webdunia
बुधवार, 15 जून 2022 (16:30 IST)
हरिविण न दिसे जनवन आम्हा । नित्य तें पूर्णिमा सोळाकळी ॥ १ ॥
चन्द्रसूर्यरश्मी न देंखों तारांगणें । अवघा हरि होणें हेंचि घेवो ॥ २ ॥
न देखो हे पृथ्वी आकाश पोकळीं । भरलासे गोपाळीं दुमदुमीत ॥ ३ ॥
निवृत्ति निष्काम सर्व आत्माराम । गयनीचा धाम गूजगम्य ॥ ४ ॥
 
स्वरूप साजणी निद्रिस्त निजलें । भलें चेतविलें गुरुरायें ॥ १ ॥
सावध सावध स्मरेरे गोविंद । अवघा परमानंद दुमदुमि ॥ २ ॥
निद्रेचिया भुलीं स्वरूपविसरू । प्रकाशला थोरु आत्मारम ॥ ३ ॥
निवृतिदेवो आनंद झालया । लवति बाहिया स्वस्वरूपीं ॥ ४ ॥
 
मनाची वासना मनेंचि नेमावी । सर्वत्र धरावी विठ्ठल सोय ॥ १ ॥
आपेंआप निवेल आपेंआप होईल । विठ्ठलचि दिसेल सर्वरूपी ॥ २ ॥
साधितां मार्ग गुढ वासना अवघड । गुरुमार्गी सुघड उपरती ॥ ३ ॥
निवृत्ति वासना उपरति नयना । चराचर खुणा हरि नांदे ॥ ४ ॥
 
एक देव आहे हा भाव पैं सोपा । द्वैतरूप बापा पडसी नरकीं ॥ १ ॥
द्वैत सांडी अद्वैत धरी । एक घरोघरी हरी नांदे ॥ २ ॥
सबाह्य कोंदलें परिपूर्ण विश्वीं । तोचि अर्जुनासि दुष्ट जाला ॥ ३ ॥
गयनि प्रसादें निवृत्ति बोधु । अवघाचि गोविंदु अवध्य रूपीं ॥ ४ ॥
 
दिननिशीं नाहीं अवघा दीपक । एक रूपें त्रैलोक्य बिंबलेसे ॥ १ ॥
तें रूप सांगतां नये पैं भावितां । गुरुगम्य हाता एक तत्त्वें ॥ २ ॥
सांडावे पैं कोहं धरावें पै सोहं । अनेकत्व बहु एकतत्त्वी ॥ ३ ॥
निवृत्ति साचार वैकुंठीचे घर । देह हें मंदीर आत्मयाचें ॥ ४ ॥
 
द्वैताचीये प्रभे नसोन उरला । निराकार संचला एकरूपें ॥ १ ॥
तें हें सांवळें स्वरूप डोळस । बाळरूप मीस घेतलेंसे ॥ २ ॥
तिहीं लोकीं दुर्लभ न कळे जीवशिवीं । तो आपणचि लाघवी मावरूपें ॥ ३ ॥
निवृत्तीचें सार जीवशिवबिढार। गुरूनें निर्धार सांगितला ॥ ४ ॥
 
निजतेज बीज नाठवे हा देह । हरपला मोह संदेहेसी ॥ १ ॥
काय करूं कैसें कोठे गेला हरि । देहीं देहमापारीं हरि जाला ॥ २ ॥
विदेह पैं गंगा पारुषली चित्तीं । चिद्रूपीं पैं वृत्ति बुडोनि ठेली ॥ ३ ॥
गुरुलागिम भेटी निवृत्ति तटाक । देखिलें सम्यक्‍ समरसें ॥ ४ ॥
चित्तवृत्ति धृति यज्ञ दान कळा । समाधि सोहळा विष्णुरूप ॥ ५ ॥
ज्ञानगाये हरिनामामृत । निवृत्ति त्वरित घरभरी ॥ ६ ॥
 
श्यामाची श्याम सेजवरी करी परवस्तुसी भेटी । ऐसा तोचि तो सद्‌गुरुरे ॥ १ ॥
सद्‌गुरुवीण मूढासि दरुशन कैचें । ऐसा तोचि तो चमत्कारगे बाईये ॥ २ ॥
एकमंत्र एक उपदेशिती गुरु । ते जाणावें भूमीभारु ॥ ३ ॥
निवृत्ति म्हणे तत्त्व साक्षत्वें दावी । ऐसा तोचि चमत्कारु गे बाईये ॥ ४ ॥
 
नेणो पैं द्वैत अवघेंचि अद्वैत । एकरूप मात करूं आम्हीं ॥ १ ॥
अवघाचि श्रीहरि नांदे घरोघरीं । दिसे चराचरीं ऐसे करा ॥ २ ॥
सेवावे चरण गुरुमूर्ति ध्यान । गयनि संपन्न ब्रह्मरसे ॥ ३ ॥
निवृत्ति चोखडा ब्रह्मरसु उघडा । गुरुकृपें निवाडा निवडिला ॥ ४ ॥
 
म्हणवितो नंदाचा बाळ यशोदेचा । आपण चौवाचातीत कृष्ण ॥ १ ॥
शब्दासि नातुडे बुद्धिसि सांकडें । तो सप्रेमें आतुडे स्मरतां नाम ॥ २ ॥
उपचाराच्या कोटी न पाहे परवडी । तों प्रेमळाची घोडी धोई अंगें ॥ ३ ॥
निवृत्तिचें तप फळलें अमुप । गयनिराजें दीप उजळिला ॥ ४ ॥

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

काल भैरव आरती Kaal Bhairav Aarti

कालभैरवाने काळ्या कुत्र्याला वाहन म्हणून का निवडले?

आरती शनिवारची

Kartik Amavasya 2024 कार्तिक अमावस्या कधी ? तारीख आणि पूजा विधी जाणून घ्या

कालभैरवाष्टकम् Kalabhairava Ashtakam

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

पुढील लेख
Show comments