Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Indias Anju arrives in Pakistan भारतातील अंजू साखरपुड्यासाठी पाकिस्तानात पोहोचली, नसरुल्लाहच्या गावात जोरदार स्वागत

Webdunia
सोमवार, 24 जुलै 2023 (22:44 IST)
मोहम्मद जुबैर खान
Indias Anju arrives in Pakistan  “अंजू आणि माझा येत्या काही दिवसांत औपचारिकपणे साखरपुडा होईल. त्यानंतर दहा-बारा दिवसांनी अंजू भारतात परतेल. त्यानंतर लग्नासाठी पुन्हा पाकिस्तानात येईल. हे माझे आणि अंजूचं वैयक्तिक आयुष्य आहे. त्यात कोणीही हस्तक्षेप करू नये, असे आम्हाला वाटतं. आम्ही माध्यमांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करत आहोत.”
 
पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा राज्यातील दीर बाला जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या 29 वर्षीय नसरुल्लाहचे हे म्हणणे आहे. नसरुल्लाह काही वर्षांपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून भारतातील उत्तर प्रदेशमधील अंजू या महिलेच्या संपर्कात आला. कालांतराने दोघांच्या ओळखीचं प्रेमात रूपांतर झालं.
 
हे नातं इतकं घट्ट झालं की, नसरुल्लाहला आयुष्याचा जोडीदार बनवण्यासाठी अंजूनं पाकिस्तान गाठलं.
 
सध्या अंजू पाकिस्तानातील दीर बाला येथील नसरुल्लाच्या घरी पोहोचलीय. दीर बालाचे जिल्हा पोलीस अधिकारी (डीपीओ) मोहम्मद मुश्ताक यांनी बीबीसीशी बोलताना अंजू पाकिस्तानात असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला.
 
हे प्रकरणं पाकिस्तानातील सीमा हैदर आणि नोएडास्थित सचिन मीणा यांच्या प्रेमकथेसारखंच आहे. सीमा आणि सचिन यांचं हे प्रकरण सध्या भारत आणि पाकिस्तानात गाजतंय.
 
अंजू व्हिसा घेऊन कायदेशीररित्या पाकिस्तानात आली असली तरी दोघांना व्हिसासाठी दोन वर्षे वाट पाहावी लागली होती.
 
पाकिस्तानी नागरिक सीमा हैदर गेल्या आठवड्यात चार मुलांसह अवैधरित्या भारतात पोहोचली. PUBG मोबाईल गेम खेळत असताना सीमा हैदरची सचिन मीणाशी ओळख झाली. ही ओळख प्रेमात रुपांतरित झाली.
 
सीमा हैदरनं बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “सचिनवर मी प्रेम करते आणि त्याच्यासाठी मी माझा देश सोडून इथे आलीय.”
 
पाकिस्तान आणि भारतातील नागरिकांमधील अशा प्रेमकथा नवीन नाहीत, परंतु दोन्ही देशांमधील ताणलेल्या संबंधांमुळे आता दोन्ही देश एकमेकांच्या नागरिकांना किमान व्हिसा देतात.
 
अंजूला पाकिस्तानचा व्हिसा मिळणं सोपं नव्हतं. विशेषत: दीर बाला हा पाकिस्तानातील दुर्गम जिल्हा आहे. या जिल्ह्याची सीमा अफगाणिस्तानला मिळते.
 
साधारणपणे दोन्ही देश एकमेकांच्या नागरिकांना व्हिसा देताना फार कमी शहरांना भेट देण्याची परवानगी देतात. मग अंजू आणि नसरुल्लाहची ही प्रेमकहाणी कशी सुरू झाली आणि अंजूला पाकिस्तानचा व्हिसा आणि दीर बाला जिल्ह्यात जाण्याची परवानगी कशी मिळाली?
 
व्हिसा मिळवण्यासाठी लागले दोन वर्षे
नसरुल्लाहने बीबीसीला सांगितलं की, काही वर्षांपूर्वी फेसबुकच्या माध्यमातून मी अंजूच्या संपर्कात आलो.
 
मूळची उत्तर प्रदेशची असलेली अंजू एका खासगी कंपनीत काम करते.
 
बीबीसीने अंजूशी बोलण्याचा प्रयत्न केला, तेव्हा नसरुल्लाह यांनी बीबीसीला सांगितलं की, अंजू सध्या माध्यमांशी बोलू इच्छित नाही.
 
नसरुल्लाह सांगतो की, “या संपर्काचे रूपांतर आधी मैत्रीत आणि नंतर प्रेमात झालं. त्यानंतर आम्ही दोघांनी एकत्र आयुष्य घालवण्याचा निर्णय घेतला.”
 
नसरुल्लाह यांच्या म्हणण्यानुसार, या निर्णयात त्यांचे कुटुंबीय त्यांच्यासोबत आहेत.
 
“दोघांमध्ये असं ठरलंय की, अंजू पाकिस्तानात येईल, इथे येऊन माझ्या कुटुंबीयांना भेटेल आणि आम्ही पाकिस्तानात साखरपुडा करू. त्यानंतर काही काळानं आम्ही लग्न करू,” अशी माहिती नसरुल्लाहनं दिली.
 
पण अंजूला पाकिस्तानात पोहोचणं तितकं सोपं नव्हतं. नसरुल्लाह अफगाणिस्तानच्या सीमेवरील जिल्ह्यातील असल्याची अडचण होतीच, त्याचसोबत भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमधील गेल्या काही वर्षांतील तणवापूर्ण संबंध ही सुद्धा अडचण होती.
 
नसरुल्लाह सांगतो की, “अंजूला पाकिस्तानचा व्हिसा मिळणं खूप अवघड होतं. पण आमचा हेतू स्पष्ट होता. त्यामुळे आम्ही दोघांनीही हिंमत गमावली नाही.”
 
एकीकडे अंजू दिल्लीतील पाकिस्तानी दूतावासात फिरत राहिली, तर नसरुल्लाह पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमधील परराष्ट्र मंत्रालय आणि इतर कार्यालयांमध्ये फिरत राहिला.
 
नसरुल्लाह सांगतो, “अंजू तिथल्या अधिकाऱ्यांना समजावत राहिली आणि मी इथल्या अधिकाऱ्यांना विनंती करत राहिलो की, व्हिसाचा अंजूचा अधिकार आहे आणि आम्हाला भेटायचे असेल तर आम्हाला भेटू द्यावे.”
 
शेवटी दोघांच्याही प्रयत्नांना यश आलं. पण अधिकाऱ्यांची समजूत काढण्यासाठी त्यांना दोन वर्षे लागली. त्यानंतर अंजूला पाकिस्तानचा व्हिसा मिळाला आणि तिला दीर बाला येथे जाण्याची परवानगी मिळाली.
 
नसरुल्लाह सांगतो की, पाकिस्तान आणि नंतर दीर बाला येथे पोहोचण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्या आहेत.
 
तो पुढे सांगतो की, “अंजू आणि मी व्हिसा मिळवण्यासाठी हजारो रुपये खर्च केले आहेत. आता व्हिसा लागू झाला आहे, आशा आहे की पुढे कोणतीही अडचण येणार नाही.”
 
‘पुढचा विचार लग्नानंतर करू’
नसरुल्लाह सांगतो की, अंजू भारतातील तिच्या कंपनीतून सुट्टी घेऊन पाकिस्तानात आलीय. ती भारतात परत जाऊन नोकरी सुरू ठेवेल.
 
त्यानं पुढे सांगितलं की, “अंजू सध्या माझ्या घरी राहतेय. इथे ती पूर्णपणे शांततेत आणि आरामात राहतेय. पण ही बातमी समोर आल्यानंतर माध्यमं येऊ लागलीत आणि त्यामुळे तिला वाईट वाटतंय.
 
“इथे मोठ्या संख्येने प्रसारमाध्यमं आणि लोक जमले आहेत. मी सर्वांना सांगतो की, गरज भासल्यास मी स्वतः प्रसारमाध्यमांना सांगेन की, मला आमच्या नात्याला समस्या म्हणून पाहायचं नाहीय, आमच्या नात्यात धर्माचा समावेश नाही. अंजू धर्मांतर करते की नाही हा तिचा निर्णय आहे आणि मी तिच्या निर्णयाचा आदर करेन, जसा ती माझा आदर करते.”
 
नसरुल्लाह म्हणतो की, अंजूच्या कुटुंबालाही त्यांच्या नात्याबाबत कोणतीही अडचण नाही. म्हणूनच मी म्हणतो की आमच्या खासगीपणाचा आदर केला पाहिजे. आमच्या नात्याचा तमाशा बनू नये, आम्हाला ते अजिबात नको आहे.”
 
‘अंजू आमच्या येथील पाहुणी’
खैबर पख्तुनख्वामध्ये एका भारतीय महिलेच्या आगमनाने तेथील लोकही आनंदी आहेत. परंतु हवामान आणि सध्याची परिस्थिती तिच्या स्वागताच्या तयारीच्या मार्गात अडथळा बनलीय.
 
नसरुल्लाह राहत असलेल्या भागातील राजकीय आणि सामाजिक व्यक्ती असलेल्या फरिदुल्ला यांनी बीबीसीशी बोलताना म्हटलं की, “अंजू शुक्रवारी सकाळी इथे पोहोचली, तेव्हा मुसळधार पाऊस होता. या भागातील लोक तिची आतुरतेनं वाट पाहत होते. शनिवारी आपण भव्य स्वागत समारंभ आयोजित करू असे आम्हाला वाटले होते. पण दुर्दैवाने एका व्यक्तीचा मृत्यू झाला. आता हे स्वागत आम्ही नंतर आयोजित करू.”
 
फरीदुल्ला म्हणाले, “अंजू पख्तूनची पाहुणी आहे आणि सूनही आहे. तिला पाहिजे तोपर्यंत ती इथे राहू शकते. तिला कोणतीही अडचण येणार नाही. तिला आमच्याकडून कोणतीही अडचण येऊ नये आणि तिला सर्व सुविधा मिळतील याची आम्ही काळजी घेऊ."
 
ते पुढे म्हणाले की, “आमच्या परिसरात आनंदाचे वातावरण आहे. आमच्या घरातील महिला सतत अंजूला भेटायला जात आहेत, तिला भेटवस्तू देत आहेत. स्त्रियाही तिला कसलीही काळजी करू नका, असे आश्वासन देत आहेत.”
 
पाकिस्तानातील दीर बाला जिल्ह्याचे डीपीओ मोहम्मद मुश्ताक यांच्या म्हणण्यानुसार, इथे पोहोचलेल्या अंजूच्या व्हिसाची कागदपत्रे पोलिसांनी तपासली आहेत आणि ती व्यवस्थित असल्याचे आढळले आहे. अंजूला एक महिन्याचा व्हिसा देण्यात आला आहे आणि यादरम्यान तिला दीर बालामध्ये राहण्याची परवानगी देखील देण्यात आली आहे.
 
त्यांनी पुढे सांगितलं की, पोलिसांनी नसरुल्लाह आणि अंजू यांना रविवारी संध्याकाळी औपचारिक चौकशीसाठी स्थानिक पोलिस ठाण्यात बोलावलं होतं.
 
मोहम्मद मुश्ताक म्हणाले, “हे औपचारिक बातचित सर्व परदेशी लोकांशी होते. त्यांच्याशी बोलून आणि मुलाखती घेतल्यानंतर त्यांनाही परतण्याची परवानगी दिली जाईल.”
 
ते म्हणाले, “पोलीस अंजूला पूर्ण सुरक्षा देतील आणि त्यासोबतच तिच्या खासगीपणाची पूर्ण काळजी घेईल.”
 
पाकिस्तानातून अंजूनं व्हीडिओ संदेश जारी केलाय
भारतातून पाकिस्तानात पोहोचल्यानंतर सातत्यानं चर्चेच्या केंद्रस्थानी असलेल्या अंजूनं बीबीसीला एका व्हीडिओ संदेश पाठवला.
 
अंजू म्हणाली की, “मी सगळ्यांना हे सांगू इच्छिते की, मी इथं कायदेशीर मार्गानं आलीय. नियोजनबद्धपणे इथे पोहोचलीय. अचानक इथे आली नाहीय.”
 
नसरुल्लाह यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, अंजू साखरपुडा करण्यासाठी पाकिस्तानात आलीय. मात्र, अंजून तिच्या व्हीडिओ संदेशात याबाबत काहीच उल्लेख केला नाही.
 
अंजून म्हटलं की, “मी इते सुरक्षित आहे. मला काहीच अडचण नाही. जशी मी इथे आली, तशीच मी परत जाईन. दोन-तीन दिवसांत मी पोहोचेन.”
 
अंजूनं माध्यमांना विनंती केली की, माझ्या कुटुंबाला त्रास देऊ नका.
 
अंजूचे पती अरविंद यांनी बीबीसीचे सहयोगी पत्रकार मोहर सिंह मीणा यांच्याशी बोलताना सांगितलं की, “अंजून 21 जलै रोजी जयपूरला जात असल्याचं सांगून घर सोडलं. त्यानंतर आमचं व्हॉट्सअपवर बोलणं होत होतं. 23 जुलैला संध्याकाळी मुलाची तब्येत खराब झाली. तेव्हा अंजूला विचारलं परत कधी येणार आहेस. तेव्हा अंजू म्हणाली की, मी आता पाकिस्तानात आहे आणि लवकरच परत येईन.
 
“अंजूनं पाकिस्तानात जात असल्याबाबत कुणालाही सांगितलं नाही. तिनं आधीच पासपोर्ट बनवलं होतं, हे आम्हाला आधीपासून माहित होतं.
 
“माझं वय 40 असून अंजूचं वय 35 आहे. आम्ही दोघेही उत्तर प्रदेशातील असून, गेल्या काही वर्षांपासून भिवाडीमध्ये राहतोय. 2007 साली आमचं लग्न झालं आणि आम्हाला दोन मुलं आहेत. मोठी मुलगी 15 वर्षांची, तर मुलगा छोटा आहे. दोघेही शाळेत जातात.”
 
अंजू आणि अरविंद दोघेही भिवाडीत वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम करतात.
 
लग्न करण्यासाठी इस्लाम स्वीकारणार नाही - अंजू
नसरुल्लाहसोबत लग्न करण्यासाठी इस्लाम स्वीकारणार नाही, असं अंजूने म्हटलं आहे.
 
अंजूने बीबीसीशी बातचित केली. त्यावेळी ती म्हणाली की, "इस्लाम स्वीकारण्यासाठी कुठलाच दबाव माझ्यावर नाहीय. लग्नासाठी धर्म बदलण्याच्या बाजूनं मी स्वत:ही नाहीय."
 
बीबीसीने अंजूला नसरुल्लाहसोबत मैत्री आणि पाकिस्तानात साखरपुड्यासाठी पोहोचण्यावरूनही प्रश्न विचारले. या प्रश्नावर अंजू म्हणाली की, "2020 पासून मी नसरुल्लाहसोबत फेसबुकवरून बोलत होती. फेसबुकवरूनच आमचा संपर्क झाला. नसरुल्लाहला भेटण्यासाठी मी पाकिस्तानला आलीय. इथं येऊन मला चांगलं वाटतंय. इथे लोक खूप चांगले आहेत.
 
"इथे येण्याबाबतचं मी माझ्या पतीला सांगितलं नाहीय. सांगितलं असतं तर त्यांनी नकार दिला असता. मला माहित नव्हतं की, पाकिस्तानमध्ये प्रवेश करता येईल की नाही. मात्र, पाकिस्तानात पोहोचल्यानंतर पतीला सांगितलं की इकडे आलीय. मुलांशी मी सातत्यानं बोलतेय.
 
"साखरपुडा आणि लग्नाबाबत सांगायचं झाल्यास मी याबाबत माझ्या पतीला सांगितलं नाहीय. मी त्यांच्याशी जास्त बोलत नाही. मी त्यांना सांगितलंय की, परत येईन ते फक्त मुलांसाठी. माझा एक महिन्याचा व्हिसा आहे आणि दोन-चार दिवसात भारतात परतेन.
 
"सर्वकाही पाहूनच साखरपुडा करण्याचा निर्णय घेईन. जर सर्व नीट वाटलं तर परतण्याच्या एक दिवस आधी साखरपुडा करेन. साखरपुड्यानंतर भारतात परतेन आणि मग पुढील प्रक्रिया पूर्ण करेन. नसरुल्लाहसोबत माझं चांगलं नातं आहे. त्याचे घरचे लोक सुद्धा चांगले आहेत. इथले लोक प्रेमाने बोलतात. माझ्यावर कुठलाच दबाव नाहीय. या लोकांना माहितही नाहीय की, माझं लग्न झालंय आणि दोन मुलं आहेत."

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

22 डिसेंबर रोजी कालाष्टमी व्रत, या दिवशी 4 शुभ योग तयार होत आहेत, तिप्पट फळ मिळणार

जुन्या कपड्यांचा पोछा वापरल्याने दुर्दैव येते का?

चांगल्या झोपेसाठी या गोष्टी करा, तुमचे आरोग्यही चांगले राहील

Christmas special : या रेसिपी नक्की बनवा

रावणाचा भाऊ कुंभकरण खरोखरच इंजिनिअर होता का?

सर्व पहा

नवीन

आईच्या हाताला झाली दुखापत, मुंबई मध्ये संतप्त भावांनी कॅब चालकाची केली हत्या

महाराष्ट्रात EVM प्रकरण पुन्हा तापणार, राहुल गांधी-प्रियांका गांधी-केजरीवाल येणार एकत्र

LIVE: महाराष्ट्रात ईव्हीएमचा मुद्दा पुन्हा तापणार

मिनी मॅरेथॉन दरम्यान अचानक गोळीबार, एक जण जखमी

संसदेत धक्काबुक्कीत जखमी झालेल्या खासदारांची आज होणार चौकशी

पुढील लेख
Show comments