Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

तुर्कीत शक्तिशाली भूकंप, 500हून अधिक लोकांचा मृत्यू

Webdunia
सोमवार, 6 फेब्रुवारी 2023 (16:12 IST)
तुर्कीत सीरियाच्या सीमेनजीकच्या भागात सोमवारी पहाटे सव्वाचारच्या सुमारास शक्तिशाली भूकंप झाला. भूकंपात आतापर्यंत पाचशेहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. हा आकडा वेगाने वाढत आहे असंही त्यांनी सांगितलं. 3000हून अधिक नागरिक या भूकंपात जखमी झाल्याचंही त्यांनी सांगितलं.
दरम्यान सीरियात भूकंपामुळे 42 नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
 
रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 7.8 अशी नोंदली गेली. भूकंपाची तीव्रता लक्षात घेऊन राष्ट्राध्यक्ष अर्दोआन यांनी आणीबाणी जाहीर केली आहे. भूकंपात अडकलेल्या लोकांच्या सुटकेचं काम सुरु आहे.
 
भूकंपाची तीव्रता लक्षात घेऊन अमेरिकेने तुर्कीला मदतीची घोषणा केली आहे. "तुर्कीत अतिशय विनाशकारी असा भूकंप आला. अनेक नागरिकांचा यात मृत्यू झाला आहे. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहोत. तुर्की प्रशासनाच्या आम्ही संपर्कात आहोत. आम्हाला कोणत्या पद्धतीने आणि वेगवान पातळीवर कशी मदत पोहोचवता येईल याचं नियोजन सुरु आहे", असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी सांगितलं.
 
पहिल्या धक्क्यानंतर काही मिनिटांनी दुसरा धक्का जाणवला. यानंतरही अनेकदा धक्के बसत राहिल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे.
 
तुर्कीसह लेबनॉन, सीरिया, सायप्रस, इस्रायल या शेजारी देशांमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले.
 
भूकंपाची झळ बसलेल्या भागातील इमारतींचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची माहिती बीबीसी तुर्कीच्या प्रतिनिधींनी सांगितलं.
 
अमेरिकेच्या भूगर्भाची माहिती देणाऱ्या युएसजीएस संस्थेने दिलेल्या माहितीनुसार भूकंपाचा केंद्रबिंदू तुर्कीच्या सीरियाच्या सीमेनजीक गाजिएनटेपच्या जवळच्या कहमानमारश इथे होता.
 
एएफपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार पहाटे 4.17 वाजता तुर्कीत भूकंपाचा पहिला धक्का जाणवला. थोड्या वेळानंतर दुसरा धक्का जाणवला. तुर्कीची राजधानी अंकारासह अन्य ठिकाणीही भूकंपाचे धक्के जाणवले.
 
टर्की, भूकंप
तुर्कीतील 10 प्रमुख शहरांना भूकंपाची झळ बसली आहे. कहमानमारश, हैटी, गाजिएनटेप, ओस्मानिये, अदियामान, सनलिऊर्फा, मलेटिया, अदाना, दियारबाकिएर, किलिस या शहरांमध्ये भूकंपाने प्रचंड नुकसान झालं आहे.
 
मलेटिया शहराच्या गव्हर्नरांनी दिलेल्या माहितीनुसार त्या भागात भूकंपामुळे आतापर्यंत 23जणांचा मृत्यू झाला आहे. 42 नागरिक जखमी झाले आहेत. 140 इमारतींचं नुकसान झालं आहे.
उस्मानिये शहरात आतापर्यंत पाचजणांचा भूकंपामुळे मृत्यू झाला आहे. सनलिउर्फा या शहरात 17 तर दियारबाकिएर शहरात 6 लोकांचा मृत्यू झाला आहे.
 
दक्षिण पूर्व भागात 50 इमारती कोसळल्याचं वृत्त आहे.
 
अर्दोआन यांनी भूकंपासंदर्भात निवेदन जारी केलं आहे. "भूकंपाचा फटका बसलेल्या नागरिकांच्या वेदनेप्रति मी संवेदना व्यक्त करतो. नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहेत. गृह मंत्रालय सुटकेच्या मोहिमांवर लक्ष ठेऊन आहे", असं त्यांनी म्हटलं आहे.
भूकंपामुळे अनेक इमारती कोसळून लोक ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. एक शॉपिंग मॉल भुईसपाट झाल्याचं बीबीसी तुर्कीच्या प्रतिनिधीने सांगितलं.
 
गाझा पट्टीतही भूकंपाचे धक्के जाणवल्याचं बीबीसी प्रतिनिधीने सांगितलं. 45 सेकंद भूकंपाचे धक्के जाणवत होते असं या प्रतिनिधीने म्हटलं आहे.
 
भूकंपाची शक्यता असलेल्या संवेदनशील क्षेत्रात तुर्की मोडतं. गेल्या काही वर्षांपासून तुर्कीत नियमितपणे भूकंप येत आहेत. 2020 जानेवारीत एलाजिग इथे 6.8 रिश्टर स्केल क्षमतेचा भूकंप आला होता. या दुर्घटनेत 40 लोकांचा मृत्यू झाला होता.
 
2022 मध्ये एजियन सागरात आलेल्या भूकंपाची तीव्रता 7.0 एवढी होती. यामध्ये 114 लोकांचा मृत्यू झाला होता. हजारहून अधिक नागरिक जखमी झाले होते.
 
1999 साली दूजा इथे 7.4 क्षमतेचा भूकंप आला होता. 17 हजारहून अधिक नागरिकांनी यामध्ये जीव गमावला. हजारहून अधिक लोक इस्तंबूल शहरातच गेले.

Published By- Priya Dixit 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

सूर्यनमस्काराने शरीर मजबूत होते, जाणून घ्या योग्य पद्धत

वर्षानुवर्षे आतड्यांमध्ये साचलेली घाण साफ होईल, सकाळी उठल्याबरोबर हे पाणी प्या

28 डिसेंबर रोजी कुंभ राशीत शुक्र आणि शनीचा संयोग 2025 मध्ये चमत्कार घडवेल, 5 राशी धनवान होतील

साप्ताहिक राशीफल 23 डिसेंबर ते 29 डिसेंबर 2024

Kanya Lal Kitab Rashifal 2025: लाल किताबनुसार कन्या राशी भविष्य 2025 आणि उपाय

सर्व पहा

नवीन

विनोद कांबळी यांची प्रकृती ढासळली, रुग्णालयात दाखल

LIVE: छगन भुजबळांची नाराजी दूर झाली का?भुजबळ भाजपमध्ये प्रवेश करणार!

नितीन गडकरींचा नागपूर विमानतळाबाबत अधिकाऱ्यांना अल्टिमेटम

छगन भुजबळांची नाराजी दूर झाली का?भुजबळ भाजपमध्ये प्रवेश करणार!

Shooting: भारत ज्युनियर नेमबाजी विश्वचषकाचे आयोजन करेल

पुढील लेख
Show comments