Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

9/11 ला अमेरिकेत नेमकं काय घडलं?

Webdunia
सोमवार, 11 सप्टेंबर 2023 (08:29 IST)
पॅट्रिक जॅक्सन
What really happened in America on 9/11?आत्मघातकी हल्लेखोरांनी मंगळवार 11 सप्टेंबर 2001 रोजी अमेरिकेची प्रवासी विमानं ताब्यात घेतली आणि ती थेट न्यूयॉर्कच्या दोन गगनचुंबी टॉवरला धडकवली. या दुर्घटनेत हजारो लोकांचा जीव गेला.
 
हा हल्ला म्हणजे केवळ अमेरिकेच्या नागरिकांसाठीच नव्हे, तर संपूर्ण जगासाठी शतकातील सर्वात वेदनादायी आणि धक्कादायक अशी घटना ठरली.
 
लक्ष्य कोण होतं?
अमेरिकेच्या पूर्व भागात फिरणारी चार विमानं अपहरणकर्त्यांच्या छोट्या-छोट्या गटांनी ताब्यात घेतली. त्यानंतर त्यांनी न्यूयॉर्क आणि वॉशिंग्टनमधील प्रसिद्ध इमारती पाडण्यासाठी महाकाय अशा क्षेपणास्त्राचा वापर केला.
 
दोन विमानं न्यू यॉर्कमध्ये असलेल्या वर्ल्ड ट्रेड सेंटरमधील प्रसिद्ध ट्विन्स टॉवर्सवर जाऊन धडकली.
 
पहिलं विमान उत्तरेच्या दिशेला असलेल्या टॉवरवर 08:46 वाजता (13:46 GMT) धडकलं. तर दुसरं दक्षिणेकडील टॉवरवर 09:03 वाजता धडकलं.
 
त्यामुळं इमारतींना आग लागली, लोक वरच्या मजल्यांवर अडकले गेले आणि संपूर्ण शहरात धुराचे लोट पसरलेले पाहायला मिळाले. दोन तासांपेक्षाही कमी वेळामध्ये दोन्ही 110 मजल्यांचे टॉवर कोसळले, आणि सगळीकडं धुळीचे प्रचंड मोठे ढग दाटले गेले.
 
त्यानंतर 09:37 वाजता तिसऱ्या विमानानं अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसीच्या सीमेवरील अमेरिकेच्या लष्कराचं मुख्यालय असलेल्या पेंटागॉनच्या पश्चिम भागावर हल्ला करत ते उध्वस्त केलं.
 
चौथं विमान हे विमानातील प्रवाशांनी संघर्ष केल्यामुळं पेनिसिल्व्हेनियाच्या शेती असलेल्या भागात 10:03 वाजता कोसळलं. अपहरणकर्ते या विमानाद्वारे वॉशिंग्टन डीसीमधील कॅपिटल हिल इमारतीवर हल्ला करण्याच्या तयारी होते, असं सांगितलं जातं.
 
किती जणांचा मृत्यू झाला?
या हल्ल्यात एकूण 2,977 नागरिकांनी (19 अपहरणकर्ते वगळता) प्राण गमावले. त्यापैकी बहुतांश हे न्यू यॉर्कमधील रहिवासी होते.
 
चार विमानांमध्ये असलेले सर्व प्रवासी आणि क्रू मेंबर्स असे एकूण 246 जण मारले गेले.
ट्विन टॉवरमध्ये 2,606 नागरिकांचा तेव्हा आणि नंतर उपचारादरम्यान मृत्यू झाला.
पेंटॉगॉनमध्ये 125 जणांचा मृत्यू झाला
या हल्ल्याची शिकार ठरलेली सर्वात कमी वयाची चिमुकली ही दोन वर्षांची क्रिस्टीन ली हॅन्सन होती. अपहरण झालेल्या एका विमानात ती आई सू आणि वडील पीटर यांच्यासह प्रवास करत होती.
 
तर मृत्यू झालेले सर्वात वृद्ध व्यक्ती होते, 82 वर्षीय रॉबर्ट नॉर्टन. तेदेखील पत्नी जॅकलिनसह अपहरण झालेल्या एका विमानातून प्रवास करत होते. ते दोघं एका लग्नाला चालले होते.
 
विमानांनी सर्वात आधी धडक दिली तेव्हा या दोन टॉवरमध्ये अंदाजे 17,400 नागरिक होते. उत्तरेला असलेल्या टॉवरमध्ये धडक झाली त्याच्या वरच्या भागात असलेलं कोणीही वाचलं नाही. तर दक्षिणेकडील टॉवरच्या धडक झाली त्याच्या वरच्या भागतील 18 जण जीव वाचवण्यात यशस्वी ठरले होते.
 
मृतांमध्ये 77 देशांच्या नागरिकांचा समावेश होता. न्यूयॉर्कमधील आणीबाणीच्या काळात तातडीनं मदतकार्यासाठी धावणारे 441 कर्मचारी (फर्स्ट रिस्पाँडर्स) यात मृत पावले.
 
हजारो लोक जखमी झाले किंवा त्यांना नंतर इतर काही आजारांचा सामना करावा लागला. विषारी ढिगारा उपसण्याचं काम करणाऱ्या अग्निशमन विभागाच्या जवानांनाही अनेक अडचणींचा सामना करावा लागला.
 
हल्लेखोर कोण होते?
अल-कायदा नावाच्या मुस्लीम कट्टरतावादी संघटनेनं अफगाणिस्तानातून या हल्ल्याचा कट रचला होता.
 
ओसामा बिन लादेनच्या नेतृत्वातील अल-कायदा या संघटनेनं अमेरिका आणि त्यांचे सहकारी देश हे मुस्लीमांच्या संघर्षासाठी कारणीभूत असल्याचा आरोप केला होता.
 
19 जणांच्या चार तुकड्यांनी विमानांचं अपहरण केलं होतं. त्यात पाच जणांचे तीन तर चार जणांचा एक गट होता. (पेनिसिल्व्हानियामध्ये कोसळलेल्या विमानात चार अपहरणकर्ते होते).
 
या चारपैकी प्रत्येक गटामध्ये पायलटचं प्रशिक्षण घेतलेला असा किमान एक जण होता. त्यांनी अमेरिकेच्याच फ्लाइंग स्कूलमध्ये हे प्रशिक्षण घेतलेलं होतं.
 
बिन लादेनप्रमाणेच 15 अपहरणकर्ते हे सौदीचे होते. दोन युएईचे आणि एक इजिप्त तर एक लेबनानचा होता.
 
अमेरिकेनं कसं दिलं प्रत्युत्तर?
या हल्ल्यानंतर एका महिन्याच्या आत आंतरराष्ट्रीय सहकारी सैन्याच्या मदतीनं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश यांनी ओसामा बिन लादेनला शोधण्यासाठी आणि अल कायदाचा खात्मा करण्यासाठी अफगाणिस्तावर आक्रमण केलं.
 
मात्र, अमेरिकेच्या लष्कराला बिन लादेनला शोधण्यात आणि ठार करण्यात यश आलं ते 2011 मध्ये. अफगाणिस्तानच्या शेजारी असलेल्या पाकिस्तानात लादेनला अमेरिकेनं ठार केलं.
 
9/11 हल्ल्याचा कट रचण्याचा आरोप असलेला खालीद शेख मोहम्मद याला पाकिस्तानात 2003 मध्ये अटक करण्यात आली होती. तो तेव्हापासून ग्वाटानमो बे येथील कोठडीत अमेरिकेच्या ताब्यात असून, खटल्याच्या सुनावणीच्या प्रतीक्षेत आहे.
 
अल-कायदा अजूनही अस्तित्वात आहे. सब सहारन आफ्रिकामध्ये त्यांची शक्ती अधिक आहे, पण अजूनही अफगाणिस्तानातही त्यांचे सदस्य आहेत.
 
अमेरिकेचं लष्कर जवळपास 20 वर्षांनंतर यावर्षी अमेरिकेतून माघारी परतलं आहे. त्यानंतर मुस्लीम संघटना पुन्हा एकदा पाय पसरण्याची भीती आहे.
 
9/11 मुळं काय बदललं?
9/11 हल्ल्यानंतरच्या काही वर्षांत जगभरात विमानतळांवर सुरक्षेमध्ये प्रचंड वाढ करण्यात आली.
 
अमेरिकेमध्ये विमानतळं आणि विमानांची सुरक्षा वाढवण्यासाठी एक स्वतंत्र परिवहन सुरक्षा यंत्रणा तयार करण्यात आली.
 
ट्विन टॉवर कोसळले होते, त्या ठिकाणचा ढिगारा पूर्णपणे हटवण्यासाठी आठ महिन्यांपेक्षा अधिक कालावधी लागला. त्याठिकाणी आता संग्रहालय तयार करण्यात आलं असून, नव्या आकारातील इमारतीही पुन्हा उभ्या राहिल्या आहे.
 
या इमारती पूर्ण झाल्यानंतर त्याचा मधला भाग म्हणजे वर्ल्ड ट्रेड सेंटर किंवा फ्रीडम टॉवर (1,776फूट 541मीटर) आधीच्या उत्तरेला असलेल्या टॉवरपेक्षाही (1,368 फूट) अधिक उंच आहे.
 
पेंटॉगॉनमधील दुरुस्ती आणि नवं बांधकाम वर्षभरात पूर्ण झालं आणि ऑगस्ट 2002 मध्ये याठिकाणचे कर्मचारी पुन्हा कामावर परतले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

सूर्यनमस्काराने शरीर मजबूत होते, जाणून घ्या योग्य पद्धत

वर्षानुवर्षे आतड्यांमध्ये साचलेली घाण साफ होईल, सकाळी उठल्याबरोबर हे पाणी प्या

28 डिसेंबर रोजी कुंभ राशीत शुक्र आणि शनीचा संयोग 2025 मध्ये चमत्कार घडवेल, 5 राशी धनवान होतील

साप्ताहिक राशीफल 23 डिसेंबर ते 29 डिसेंबर 2024

Kanya Lal Kitab Rashifal 2025: लाल किताबनुसार कन्या राशी भविष्य 2025 आणि उपाय

सर्व पहा

नवीन

तुमचे सिम बंद झाले आहे… कॉल आला, OTP सांगितला आणि साडेचार लाख गमावले

महाराष्ट्रात प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत केंद्र सरकारने यावर्षी साडेसहा लाख घरांना मंजुरी दिली, मुख्यमंत्र्यांनी आभार मानले

LIVE: राजकीय कारणासाठी, द्वेष निर्माण करण्यासाठी परभणीला राहुल यांची भेट -देवेंद्र फडणवीस

राजकीय कारणासाठी, द्वेष निर्माण करण्यासाठी परभणीला राहुल यांची भेट -देवेंद्र फडणवीस

विनोद कांबळी यांची प्रकृती ढासळली, रुग्णालयात दाखल

पुढील लेख
Show comments