Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Gold Hallmarking : सोन्याचे दागिने, नाणी यांवर हॉलमार्क अनिवार्य; याचा तुम्हाला काय फायदा होणार?

Webdunia
बुधवार, 16 जून 2021 (16:08 IST)
ऋजुता लुकतुके
16 जूनपासून सोनारांना फक्त हॉलमार्क असलेलेच दागिने आणि इतर सोन्याच्या वस्तू विकता येणार आहेत. हॉलमार्किंग अनिवार्य झालंय.
 
हॉलमार्किंग म्हणजे काय? ग्राहकांना याचा काय फायदा होणार? तुमच्याकडे आधीपासून असलेल्या दागिन्यांचं काय होणार?
भारतात सोन्याला गुंतवणूक म्हणूनही महत्त्व आहे आणि सोन्याचे दागिने, इतर कलात्मक वस्तूंसाठी या धातूचं श्रृंगारिक मूल्यही मोठं आहे. पण आजपासून (16 जून) केंद्रसरकारने सोन्याचे दागिने आणि वस्तूंचं हॉलमार्किंग अनिवार्य केलंय. असं प्रमाणपत्रं असेल तरंच या वस्तू सोनार विकू शकेल. शिवाय सोनार आता 14, 18 आणि 22 कॅरेटचेच दागिने विकू शकणार आहेत.
हॉलमार्किंग ग्राहकांच्या भल्यासाठीच आहे. पण त्याचा नेमका फायदा काय? आता तुमच्याकडे असलेल्या वस्तूंवर हॉलमार्कचा शिक्का नसेल तर काय होईल या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया…
 
हॉलमार्किंग म्हणजे काय?
तुमच्याकडे असलेला एखादा सोन्याचा दागिना निरखून पाहा. मागच्या बाजूला नजरेला दिसणारही नाही अशा सूक्ष्म आकारात काही आकडे आणि अक्षरं कोरलेली दिसतील. तशी ती दिसली तर समजा तुमच्याकडचं सोनं हॉलमार्कवालं आहे.
 
यात पहिला असेल तो ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) चा लोगो, त्यानंतर दागिन्यात सोन्याचं प्रमाण किंवा शुद्धता नेमकी किती आहे तो आकडा आणि त्यानंतर सोन्याची शुद्धता ज्या केंद्रात तपासण्यात आलीय त्या केंद्राचा लोगो. सगळ्यात शेवटी सोनाराचा स्वत:चा लोगो.या चारही गोष्टी तुमच्याकडच्या दागिन्याच्या मागे कोरलेल्या असतील तर समजा सोनं हॉलमार्क प्रमाणित आहे. हॉलमार्क म्हणजे सोन्याच्या शुद्धतेचं प्रमाणपत्र. केंद्रसरकारने आता असं हॉलमार्क असलेलंच सोनं खरेदी-विक्री करता येईल असा नियम बनवलाय. केंद्रीय ग्राहक सेवामंत्री पियुष गोयल यांनी ट्विट करून या निर्णयाची माहिती दिली.
'ग्राहकांची सुरक्षा आणि समाधान याला प्राधान्य देत सोन्याच्या वस्तूंचं हॉलमार्किंग आम्ही अनिवार्य करत आहोत. सुरुवातीला देशातील 256 जिल्ह्यांमध्ये हा नियम लागू होत आहे. पुढे टप्प्या टप्प्याने देशभर हॉलमार्किंग अनिवार्य होईल.यामुळे ग्राहकांची फसवणूक टळेल'
 
सोन्याला उष्णता दिली की त्याला हवा तो आकार देता येऊ शकतो, दागिनेही असेच घडवले जातात. पण, सोनं हा धातू नाजूक असल्याने आकार देताना त्याची मजबुती जाते किंवा ते तुटू शकतं. म्हणूनच दागिने घडवताना त्यात थोडं तांबं मिसळलं जातं. खरंतर किती प्रमाणात तांबं मिसळायचं हे प्रमाणही ठरलेलं आहे. पण, अनेकदा लबाडी होते.
 
आणि म्हणूनच सोन्याची शुद्धता म्हणजे दागिन्यात किती प्रमाणात सोनं आहे हे तपासणं महत्त्वाचं ठरतं. सोन्यावरचा हॉलमार्कचा शिक्का आणि बरोबर मिळणारं प्रमाणपत्र तुम्हाला नेमकं हेच सांगतं. आतापर्यंत दागिन्यांचं हॉलमार्किंग हे अनिवार्य नव्हतं. कारण, सोन्याची शुद्धता तपासणारी पुरेशी केंद्र देशात नव्हती.
 
पण, 2017 पासून केंद्रसरकारने अशा केंद्रांची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न केले आणि आता देशांत सोन्याची शुद्धता तपासून सोनं प्रमाणित करणारी 945 केंद्र आहेत. वर्षभरात 14 कोटी सोन्याच्या वस्तू प्रमाणित करण्याची क्षमता आता भारताकडे असल्याचा दावा केंद्रसरकारने केला आहे आणि ही सुविधा उपलब्ध झाल्यावरच हॉलमार्किंग अनिवार्य करण्यात आलंय.
पण, दागिन्यांचं हॉलमार्किंग केल्याने ग्राहकांचा काय आणि कसा फायदा होणार आहे?
 
हॉलमार्कचा फायदा काय?
देशात आज घडीला 4 लाखांच्यावर सोनार आपल्या पेढ्या चालवतायत. पण, यातल्या फक्त 35,879 सोनारांकडेच BISचं प्रमाणपत्र आहे. म्हणजे ग्राहकांची फसवणूक झाली तर ते दाद मागणार तरी कशी? कारण, तुम्हाला मिळणारी पावतीच मूळी कच्ची आहे. पण, हॉलमार्किंग अनिवार्य झाल्यावर हे चित्र बदलेल.
महत्त्वाचं म्हणजे सोन्यात सोनारांकडून होणारी भेसळ थांबेल आणि ग्राहकांची फसवणूक होणार नाही
सोनार आता 14, 18 आणि 22 कॅरेटचेच दागिने विकू शकतील. 20, 23 आणि 24 कॅरेटच्या दागिन्यांचं हॉलमार्किंगही होऊ शकणार आहे.
सध्या देशातल्या 256 जिल्ह्यांमध्येच हॉलमार्किंग अनिवार्य असल्याचा नियम लागू आहे. पण, हॉलमार्किंग केंद्रांची संख्या वाढली की, टप्प्या टप्प्याने देशभर हा नियम लागू होईल.
महाराष्ट्रात सध्या 122 एसेइंग अँड हॉलमार्किंग केंद्र आहेत. तर पश्चिम भारतात एकूण 199 त्यामुळे भारतात मुंबई, ठाणे, नवी मुंबई, जळगाव, पुणे, सातारा, नागपूर अशा जवळ जवळ सर्वच महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये हॉलमार्किंग अनिवार्य होणार आहे.
 
सध्या सोन्याची घड्याळं, फाऊंटन पेन आणि कुंदन, पोलकी, जडाव यासारख्या काही विशिष्ट दागिन्यांना हॉलमार्किंगमधून सूट देण्यात आली आहे.
ग्राहकांकडून जुने हॉलमार्क नसलेले दागिने विकत घेण्याची परवानगी सोनारांना आहे.
सोनारांनी हॉलमार्क नसलेले दागिने विकल्याचं स्पष्ट झालं तर त्यांच्यावर दागिन्याच्या किमतीच्या पाचपट दंड किंवा एक वर्षांपर्यंतचा कारावास होऊ शकतो.
 
दागिन्यांच्या हॉलमार्किंगसाठी नोंदणी करायची असल्यास ती ऑनलाईन होऊ शकते.
तुमच्याकडे आता असलेले दागिनेही तुम्ही जवळच्या केंद्रात जाऊन प्रमाणित करून घेऊ शकता. आणि हॉलमार्कशिवाय ते विकूही शकता. तेव्हा हॉलमार्क नसेल तर घाबरून जाण्याची गरज नाही. पण, इथून पुढे मात्र दागिने किंवा इतर सोन्याच्या वस्तू खरेदी करताना हॉलमार्क नक्की तपासा.
 

संबंधित माहिती

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

खेळता- खेळता बेवारस कारमध्ये दोन मुलांचा मृत्यू

जय महाराष्ट्र!

नैनितालच्या जंगलामध्ये लागली भीषण आग

Maharashtra Din 2024 महाराष्ट्र दिनाचे महत्त्व

Labour day : कामगार नव्हे तो तर किमयागार आहे

पुढील लेख
Show comments