Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अदानी समुहाच्या गुंतवणूकदारांचं एका दिवसात कोट्यवधींचं नुकसान कसं झालं?

Webdunia
गुरूवार, 17 जून 2021 (21:02 IST)
- विशाल शुक्ला
अदानी समुहामध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी सोमवारचा (14 जून) दिवस फारसा चांगला ठरला नाही. अदानी समुहाचे समभाग खरेदी करणाऱ्या तीन विदेशी कंपन्या किंवा फंड्स (फॉरेन पोर्टफोलिओ इनव्हेस्टमेंट) ची खाती गोठवण्यात आल्याचं वृत्त सुरुवातीला 'इकॉनॉमिक टाइम्स'मध्ये आलं.
 
त्यानंतर कंपनीच्या समभागांच्या किमतींमध्ये घसरणीली सुरुवात झाली. अदानी समुहाच्या सर्व 6 कंपन्यांच्या समभागांमध्ये 5 ते 25 टक्क्यांपर्यंतची घसरण झाली, तर अदानींच्या एकूण संपत्तीमध्ये सुमारे 55,692 कोटी रुपयांची घट झाली.
 
अदानी समुहामध्ये गुंतवणूक करणाऱ्या ज्या तीन कंपन्यांची खाती गोठवण्याची बातमी आली होती, त्या कंपन्या मॉरिशसमधील अल्बुला इनव्हेस्टमेंट फंड, क्रेस्टा फंड आणि एफएमएस इन्वेस्टमेंट फंड या होत्या. या तिन्ही कंपन्यांकडे अदानी समुहाच्या चार कंपन्यांचे 43,500 कोटी रुपयांपेक्षा अधिकचे समभाग आहेत.
 
मात्र, अदानी समुहानं या बातम्या फेटाळून लावल्या असून, या प्रकरणी NSDL ला तसा मेलदेखील केला आहे. NSDL चे उपाध्यक्ष राकेश मेहता यांनीदेखील, या तिन्ही कंपन्यांची खाती अॅक्टिव्ह असल्याचं सांगितलं. पण तोपर्यंत व्हायचं ते नुकसान होऊन गेलं होतं.
 
दिवसाचा व्यवहार थांबला त्यावेळी अखेरच्या काही काळात समभागांची परिस्थिती काहीशी सुधारली, पण झालेल्या नुकसानीच्या तुलनेत ती अत्यंत कमी होती.
 
एफपीआय नेमके काय असतात, अदानी समुहाच्या समभागांमध्ये एवढ्या वेगानं घसरण होण्यामागचं कारण आणि या प्रकरणी मॉरीशमधील कंपन्यांभोवती शंकेचं वर्तुळ नेमकं का आहे, हे आपण जाणून घेऊयात.
 
फॉरेन पोर्टफोलिओ इनव्हेस्टमेंट म्हणजे काय?
समजा भारतात एखादी कंपनी शेअर बाजारात लिस्टेड आहे, तर त्यामध्ये भारताबाहेरील कोणी व्यक्ती अथवा संस्था गुंतवणूक करत असेल तर त्याला 'फॉरेन इन्वेस्टमेंट पोर्टफोलिओ' म्हटलं जाईल, असं एस्कॉर्ट्स सिक्योरिटीजचे रिसर्च प्रमुख आसीफ इक्बाल यांनी सांगितलं.
 
त्यासाठी गुंतवणूकदारांना आधी सेबीच्या मार्फत नोंदणी करावी लागते. अशा प्रकारच्या गुंतवणुकीसाठी एकमेव नियम आहे, तो म्हणजे गुंतवणूकदार हे कंपनीच्या एकूण मूल्याच्या 10 टक्केपेक्षा अधिक गुंतवणूक करू शकत नाही. जर त्यांनी 10% पेक्षा जास्त गुंतवणूक केली तर त्याचा FDI म्हणजे फॉरेन डायरेक्ट इन्वेस्टमेंट (थेट परकीय गुंतवणूक) च्या वर्गात समावेश होतो.
 
घसरणीमुळं नुकसान कुणाचं?
समभागांच्या घसरणीमुळं अदानी समुहाच्या एकूण संपत्तीमध्ये 55,692 कोटींची घट झाली आहे, तर अदानी समुहाच्या कंपन्यांचा विचार करता, अदानी एंटरप्राईजच्या समभागांच्या किंमती 1,601.45 वरून 1,201 रुपये झाल्या, अदानी पोर्ट्सच्या शेअरची 18.75% घसरण झाली, अदानी ग्रीन एनर्जी चे समभाग 5% ने घसरले. अदानी टोटल गॅस 5%, अदानी ट्रान्समिशन 5% आणि अदानी पॉवरच्या समभागांमध्ये 4.99% ची घसरण झाली.
 
या घसरणीचा सर्वाधिक फटका कुणाला बसला, यावर व्हॅल्यू रिसर्च ऑनलाइनचे CEO धीरेंद्र कुमार म्हणाले की, "यामुळं सर्वाधिक नुकसान हे ट्रेडर्सचं झालं आहे. अदानी यांचं स्वत:चं होल्डींग आहे, त्यामुळं त्यांना मोठं नुकसान झालं असं म्हणता येणार नाही. हे नुकसान कमी वेळासाठी गुंतवणूक करणाऱ्यांचं आहे, तसंच ही एक धोक्याची घंटादेखील आहे."
 
"अदानी यांनी संपत्ती नोशन वेल्थ आहे, त्यामुळं त्यांना फार मोठं नुकसान झालं असं म्हणता येणार नाही. तर जे कमी कालावधीसाठी सट्ट्यासारखे शेअर खरेदी करतात, त्यांचं नुकसान अधिक झालं आहे," असं मत आसीफ यांनी मांडलं.
 
उदाहरण म्हणून हे आणखी सोप्या भाषेत समजावून सांगायचं झाल्यास, समजा एखाद्या व्यक्तीने दीड वर्षांपूर्वी एक समभाग 100 रुपयांना खरेदी केला असेल आणि सोमवारपूर्वी त्याची किंमत वाढून 800 रुपये झालेली असेल, तर सोमवारी घसरणीनंतर समभागाची किंमत 600 झाली असली तरी तो व्यक्ती एकूण विचार करता फायद्यात असेल. तेच जर दुसऱ्या एखाद्यानं गेल्या सोमवारी 750 रुपयांना समभाग खरेदी केला असेल आणि आज त्याची किंमत 500 झाली असेल, तर त्याचं नुकसान झालं, हे निश्चित आहे.
 
एका बातमीनं एवढं मोठं नुकसानं कसं झालं?
"अदानींच्या शेअरच्या किंमती गेल्या एका वर्षात वेगानं वधारल्या आहेत. पण या कंपन्यांची पब्लिक शेअर होल्डींग म्हणजे लोकांनी खरेदी केलेल्या शेअरची संख्या अजूनही कमी आहे. या कंपन्या लहान होत्या, त्यावेळी कमी समभागांची खरेदी झाली तरी शेअर्सचे भाव वधारले जात होते. पण आज गुंतवणूक अधिक असूनही लोकांचा विश्वास तेवढा दिसत नाही, कारण मार्केटकॅप (बाजारमूल्य) अधिक असूनही समभाग हे दीर्घकाळ टिकणारे नाहीत,'' असं उत्तर याबाबत धीरेंद्र यांनी दिलं.
 
त्यांच्या मते, शेअर बाजारात दोन प्रकारचे गुंतवणूकदार असतात. एक असे जे अत्यंत अभ्यासपूर्वक, विचार करून पैसे लावतात, तर दुसरे हे समभागांच्या भावाचे चढउतार पाहून पैसे गुंतवत असतात. त्यामुळं कमी वेळात भाव वधारल्यानंतर जेव्हा घसरण सुरू झाली तेव्हा गुंतवणूकदारांमध्ये अफरातफर पसरली. त्यामुळं बाजार स्थिर होण्यासाठी लोकांचा विश्वास असणं गरजेचं असतं.
 
लोकांचा कमी विश्वास असण्याचं कारणही धीरेंद्र यांना विचारण्यात आलं. त्यावर "कंपनीवर असलेलं कर्ज खूप जास्त आहे. त्यामुळं चढ-उतारामुळं जास्त नुकसान होतं. अनिल अंबानींच्या कंपन्यांची जी अवस्था झाली, त्यामागंही हेच कारण पाहायला मिळतं. कंपनीनं कर्ज घेतल्यास गुंतवणूकदारांचा विश्वास कायम राहत नाही, त्यामुळं याचे परिणाम पाहायला मिळतात," असं ते म्हणाले.
 
मॉरिशसच्या कंपन्यांमध्ये काही संशयास्पद आहे का?
 
याबाबत सर्वात म्हत्त्वाचं म्हणजे, NSDL नं मॉरीशसमधील या कंपन्यांची खाती गोठवली नसल्याचं स्पष्ट केलं आहे. NSDL ही अधिकार संस्था (अथॉरिटी) असल्यानं, यावर नक्कीच विश्वास ठेवला जाईल. पण यामुळं उपस्थित झालेला मुद्दा हा संवेदनशील आहे. मॉरीशसहून मनी रूटिंग किंवा शेल कंपनीद्वारे गुंतवणुकीचा मुद्दा असावा की नाही, हा चौकशीचा विषय आहे आणि चौकशी व्हावी की नाही, हे अधिकार संस्थांना ठरवायचं आहे, असं आसीफ यांनी म्हटलं.
 
याबाबत ते असंही म्हणाले, "यात संशयास्पद फक्त एकच बाब आहे, ती म्हणजे एका कंपनीनं तिचं जवळपास 95 टक्के भांडवल एकाच ठिकाणी गुंतवणूक केलं आहे. एक गुंतवणूकदार म्हणून तुम्ही असं कराल, की तुमचा पैसा वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवाल. याचा विचार तुम्हीही करू शकता. पण आता निर्णय ऑथॉरिटीला घ्यायचा आहे."
 
दुसरीकडं, "सेबीच्या नियमांनुसार सध्याच्या घडीला पैसा कुठून आला याची माहिती मिळवणं अत्यंत सोपं आहे. आधी पैशाचा स्त्रोत समजत नव्हता, पण आता डिक्लेरेशन गरजेचं आहे. ज्यांच्या खिशात नफा जाणार आहे, त्याबाबत ऑथॉरिटिजना माहिती असायला हवी. तसंच समभाग धारकांबाबतही माहिती असायला हवी. आता मॉरिशससारखे टॅक्स हेवन असावे की नाही, ही स्वतंत्र चर्चा आहे. आपलं संपूर्ण भांडवल एकाच ठिकाणी गुंतवणं हे अवैध नसलं तरी, ते समजुतदारपणाचंही वाटत नाही," असं मत सुधीर यांनी व्यक्त केलं.
 
'इकॉनॉमिक टाइम्स'च्या बातमीतही असाच दावा करण्यात आला होता की, बेनिफिशियल ओनरशिपची पुरेशी माहिती दिली नसल्यामुळं ही कारवाई करण्यात आली असावी. प्रिव्हेंशन ऑफ मनी लाँडरिंग अॅक्ट अंतर्गत ही माहिती देणं अनिवार्य असतं.
 
दरम्यान, या कंपन्यांकडे 2010 पासून अदानी एंटरप्राइजेसचे समभाग आहेत, तसंच त्यांच्याकडे इतर कंपन्यांचेही समभाग आहेत, अशी माहिती अदानी ग्रुपचे CFO जुगशिंदर सिंग यांनी एका टीव्ही वाहिनीशी बोलताना दिली.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

ठाण्यातील हाय प्रोफाइल सोसायटी मध्ये भीषण आग लागली

मुंबईत भीषण अपघातात दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू

माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी संजय राऊतच्या आरोपांना उत्तर दिले म्हणाले-

Pan 2.0 project : PAN 2.0 लागू झाल्यानंतर जुने पॅन कार्ड अवैध होणार का?

LIVE: ठाणे : दोन दिवसांपासून बेपत्ता तरुण, झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडला

पुढील लेख
Show comments