Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Cricket World Cup : फलंदाजाचा मृत्यू ते मुंगूस बॅट; क्रिकेट बॅटचा आजपर्यंतचा रंजक इतिहास

Webdunia
मंगळवार, 3 ऑक्टोबर 2023 (11:08 IST)
आशय येडगे
 
Cricket World Cup "दादा, मला स्प्रिंगवाली बॅट द्या, जी रिकी पॉन्टिंग वापरतो," साधारण पंधरा वर्षांपूर्वी भारतातल्या क्रिकेट बॅट विकणाऱ्यांना अशी विनंती करणारे अनेकजण भेटले असतील.
 
पाँटिंगच्या बॅटमध्ये अशी कुठली स्प्रिंग नव्हती. पण 2003 च्या वर्ल्ड कप फायनलमध्ये त्यानं भारतीय गोलंदाजांची अशी धुलाई केली की पाँटिंगच्या बॅटमध्ये स्प्रिंग असल्याची अफवा पसरली.
 
त्याआधी 1996 च्या वर्ल्डकपमध्ये श्रीलंकेच्या सनथ जयसूर्याची तुफान बॅटिंग बघून त्याच्या बॅटविषयीही अशीच चर्चा रंगली होती. सचिन किंवा धोनीची जड बॅट असो, मॅथ्यू हेडनची मुंगूस बॅट किंवा त्याआधी डेनिस लिलीची अल्युमिनियम बॅट.
 
क्रिकेटमध्ये केवळ खेळाडू, टीम्स, धावाच नाही, तर बॅटही फॅन्सच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय राहिला आहे. कारण रन्स काढण्यासाठी चांगले शॉट्‌स मारणं जितकं जरुरी असतं, तितकंच ते शॉट्स मारतात ती बॅट कशानं बनली आहे, हेही महत्त्वाचं असंत.
 
चित्रकाराला जसा त्याचा कुंचला प्रिय असतो, एखाद्या लेखकाला त्याची लेखणी प्रिय असते अगदी त्याचप्रमाणे फलंदाजी करणाऱ्या प्रत्येकाचं त्याच्या बॅटवर अगदी निस्सीम प्रेम असतं.
 
म्हणूनच लहान मुलांसाठीच्या प्लॅस्टिक बॅटपाससून ते रस्त्यावर मिळणाऱ्या शंभर-दीडशे रुपयांच्या लाकडी बॅट्स किंवा लखलखीत स्पोर्ट्स स्टोर्समधल्या महागड्या बॅट्सपर्यंत - खिशाला परवडेल, हातांना झेपेल आणि मनसोक्त धावा काढता येतील अशी बॅट प्रत्येक क्रिकेटप्रेमीला हवी असते.
 
पण क्रिकेट बॅटचा जन्म नेमका कसा झाला? पहिल्यांदा कुणीतरी क्रिकेट खेळायला मैदानात उतरलं असेल तेव्हा त्याच्या हातात कशी बॅट होती? क्रिकेट बॅटचा इतिहास काय आहे आणि काळानुसार तिच्यामध्ये कसे बदल होत गेले? ही त्याचीच गोष्ट आहे.
 
खेळाडूचा मृत्यू आणि बॅटचा पहिला उल्लेख
इतिहासात लिखित स्वरुपात पहिल्यांदा क्रिकेटच्या बॅटचा उल्लेख सतराव्या शतकात आढळतो.
 
इसवीसन 1624 मध्ये इंग्लंडच्या ससेक्स परगण्यात एका सामन्यादरम्यान जॅस्पर व्हिनॉल नामक फिल्डरला जीवघेणी जखम झाली तेव्हा त्या प्रकरणात क्रिकेट बॅटचा उल्लेख येतो.
 
आज क्रिकेटच्या नियम क्रमांक 37 नुसार क्षेत्ररक्षणात फलंदाजाने अडथळा निर्माण केल्यास तो बाद होतो. पण 1624 मध्ये हा नियम अस्तित्वात नव्हता. त्यामुळे फलंदाजानं एकच बॉलला दोनदा बॅटनं टोलवलं तरी चालत असे. हीच गोष्ट व्हिनॉलच्या मृत्यूचं कारण ठरली.
 
त्या सामन्यात व्हिनॉल फलंदाजाच्या जवळच उभा राहून क्षेत्ररक्षण करत होता. तो फलंदाजानं मारलेला बॉल कॅच घेण्याचा प्रयत्नात पुढे सरसावला आणि त्याच वेळी फलंदाजानं बॉल दुसऱ्यांदा मारण्याचा प्रयत्न केला. त्यात बॅट व्हिनॉलच्या डोक्यात लागली.
 
हॉकी स्टिकसारखी बॅट
क्रिकेट इतिहासकारांच्या नोंदींनुसार सरे कौंटी क्रिकेट क्लबच्या संग्रहातली ही बॅट कदाचित या खेळातली आजवर टिकून राहिलेली सर्वात जुनी क्रिकेट बॅट असावी.
 
या बॅटवर 1729 मध्ये ती तयार करण्यात आल्याचा उल्लेख आहे. पण ही बॅट आजच्या क्रिकेट बॅटपेक्षा हॉकी स्टिकसारखी दिसते. असं का असावं?
 
तर, त्या काळात क्रिकेटमध्ये अंडरआर्म गोलंदाजीच व्हायची आणि अगदी सरपटत येणारा चेंडू फटकावण्यासाठी बॅटचा आकार काहीसा हॉकी स्टिक सारखा होता.
 
1770 च्या सुमारास क्रिकेटच्या नियमांमध्ये एक बदल करण्यात आला. त्याहीवेळी गोलंदाजांना अंडरआर्म बॉलिंग करता यायची, पण ते करत असताना चेंडू काही काळ हवेत राहील. असा टाकायची परवानगी मिळाली.
 
त्यामुळे सुरुवातीला अगदीच सरपटत फलंदाजांकडे येणारा चेंडू आता थोडावेळ हवेत राहून येऊ लागला आणि हॉकी स्टिकसारखी दिसणारी बॅट हळू हळू आयताकार बनली.
 
स्वीप आणि इतर आडवे फटके मारण्याचे फलंदाजांचे तंत्रही बदललं आणि त्यांनी खेळपट्टीच्या समोर फटके मारायला सुरुवात केली.
 
आज ज्याला 'व्ही' म्हणून ओळखलं जातं, त्या खेळपट्टीच्या समोरच्या भागात चेंडू बॅटनं टोलवण्याची सुरुवात याच सुमारास झाली होती, तसं बॅटमध्येही बदल होत गेले.
 
त्याकाळात बनवल्या जाणाऱ्या बॅट या अतिशय जड होत्या कारण अंडरआर्म बॉलिंग करणाऱ्या गोलंदाजाचा वेग तसा मर्यादितच होता.
 
1820 ला बॉलिंगमध्ये क्रांती झाली आणि पहिल्यांदा राउंडआर्म बॉलिंग करण्याची परवानगी देण्यात आली आणि आज आपल्याला वर निमुळती आणि खालच्या बाजूला फुगलेली बॅट जशी दिसते तशा बॅट बनायला सुरुवात झाली.
 
स्टंप झाकून टाकणारी रुंद बॅट
इंग्लंडच्या मॅरिलिबॉन क्रिकेट क्लबनं म्हणजे MCC नं केलेले क्रिकेटचे नियम या खेळात प्रमाण मानले जातात. काळानुसार हे नियम तयार होत गेले.
 
क्रिकेटच्या सुरुवातीच्या दिवसांत बॅट कशी असावी, तिची लांबी, रुंदी किती असावी याबाबत आधी काही ठोस नियम बनवण्यात आले नव्हते.
 
पण सप्टेंबर 1771 मध्ये सरे कौंटीकडून खेळणाऱ्या थॉमस व्हाईट नावाचे फलंदाज तीन स्टंप्सच्या रुंदीएवढी बॅट घेऊन मैदानात उतरले. बॉलर्सला त्यामुळे स्टंपच दिसेनात. या ‘वाईड बॅट’वरून वाद निर्माण झाला.
 
त्यानंतर बॅटची रुंदी किती असावी याबाबतचा नियम 1774 पहिल्यांदा तयार करण्यात आला. यात काळानुसार काही बदल होत गेले.
 
1830 पर्यंत एकाच अखंड लाकडापासून बॅट बनवल्या जात होत्या मात्र क्रिकेटमधील चेंडूंचा वेग वाढत गेला आणि त्याचा परिणाम म्हणून बॅट तुटू लागल्या.त्यामुळे मग बॅटचा दांडा वेगळा बनवून बॅटमध्ये बसवण्यात येऊ लागला.
 
1835 मध्ये बॅटची लांबी 38 इंच असावी असा नियम बनवण्यात आला.
 
बॅटचं वजन आणि ‘सुपर स्कूप’
1864 मध्ये ओव्हरआर्म बॉलिंगला सुरुवात झाली आणि चेंडूचा वेग वाढला. त्यामुळे बॅटचं वजन अतिशय कमी झालं आणि अधिक मजबूत बॅट बनायला सुरुवात झाली. 1870 मध्ये आलेल्या बॅट्स बऱ्याचशा आज क्रिकेटमध्ये वापरल्या जाणाऱ्या बॅट्ससारख्या दिसतात.
 
1930 येता येता बॅटमध्ये काही बदल होऊ लागले. त्याकाळी बहुतांश खेळाडू हे अजूनही हलक्या वजनाच्या बॅट वापरत असत.
 
बॅट हातात घेतल्यावर फलंदाजाला वैयक्तिक अनुभव आणि स्पर्श कसा जाणवतो यावर त्याच्या बॅटचं वजन किती असेल हे अवलंबून असायचं.
 
त्याकाळी एका दिवसात 110 ओव्हर्स टाकल्या जायच्या त्यामुळे 2.5 च्या धावगतीने धावा करून 300 रन्स काढले तरी खूपच चांगली बॅटिंग झाली असं समजलं जायचं. त्यामुळे फलंदाज चेंडू जोरात फटकावण्यापेक्षा त्याला दिशा देऊन खेळपट्टीवर टिकून राहण्यास प्राधान्य देत असत. साहजिकच बॅटच्या स्ट्रोकपेक्षा इतर गोष्टी जास्त महत्वाच्या होत्या.
 
मर्यादित ओव्हर्सचे सामने सुरू झाल्यावर 1960 मध्ये बॅटच्या डिजाईन मध्ये पुन्हा एकदा क्रांतिकारी बदल झाले.
 
1970 च्या दशकात, जॉन न्यूबेरी आणि ग्रे निकल्स यांनी बॅटच्या वजनाच्या वितरणामध्ये विविध प्रयोग करण्यास सुरुवात केली.
 
एकीकडे बॅटचा आकार बदलत होता आणि दुसरीकडे फलंदाजीच्या तंत्रातही बदल होत होते. पूर्वीचे खेळाडू चेंडूला दिशा दाखवायचा प्रयत्न करायचे मात्र आता चेंडूला ताकद लावून फटकावण्यासाठीचे प्रयत्न सुरु झाले होते.
 
ग्रे निकल्स यांनी पहिल्यांदा बॅटच्या मागच्या भागात एक पोकळी तयार करून, कडाभोवती जास्त लाकूड वापरलं आणि त्याचा परिणाम असा झाला की अंदाज चुकलेले फटकेदेखील दूरवर जाऊ लागले. ग्रे निकल्स यांनी बनवलेल्या या बॅटच्या प्रकाराला 'सुपर स्कुप' असं म्हणतात.
 
बॅटच्या मध्यावरून कडेला वजन गेल्यामुळे बॅटवरील 'स्वीट स्पॉट'चा आकार वाढला. स्वीट स्पॉट् म्हणजे बॅटवरील अशी जागा जिथे चेंडू लागल्यास चौकार किंवा षटकार जाण्याची शक्यता जास्त असते.
 
आधुनिक काळात बॅट बनवणाऱ्या अनेक कंपन्या आता वेगवेगळे प्रयोग करून अशा स्वीट स्पॉट्‌सची संख्या वाढवण्याचा प्रयत्न करत असतात.
 
डेनिस लिली, ॲल्यु‍मिनियम बॅट आणि बदलते नियम
बॅट बनवणाऱ्यांनी बॅटच्या स्वरूपामध्ये अनेक बदल केलेले असले, तरी चित्रविचित्र बॅट घेऊन मैदानात येणाऱ्या फलंदाजांमुळे क्रिकेटच्या इतिहासात अनेक वाद तयार झाले आहेत.
 
1979 मध्ये ऑस्ट्रेलियन गोलंदाज डेनिस लिली ब्रिस्बेनमध्ये वेस्ट इंडिजविरोधात एका कसोटी सामन्यात ॲल्यु‍मिनियमपासून बनवलेली बॅट घेऊन मैदानात उतरले. पहिल्यांदा कुणीही तक्रार केली नाही.
 
पण त्याचवर्षीच्या ॲशेस मालिकेत इंग्लंडविरोधात पुन्हा एकदा लिली धातूपासून बनलेली ही बॅट घेऊन फलंदाजीला उतरले
 
इंग्लंडचे कर्णधार माईक ब्रेअरली यांनी धातूच्या बॅटमुळे चेंडूचा आकार बदलत असल्याची वारंवार तक्रार केली.
 
ऑस्ट्रेलियाचे कर्णधार इयान चॅपल यांनीही लिली यांना ती बॅट वापरू नको असं सांगितलं मात्र लिली यांनी त्यांचं ऐकलंच नाही आणि उलट राग व्यक्त केला, असं त्यावेळची माध्यमं सांगतात.
 
या सगळ्या प्रकरणानंतर क्रिकेटची बॅट ही लाकडापासूनच बनवली जावी अशी सक्ती करण्यात आली.
 
पुढे 2005 साली ऑस्ट्रेलियाच्या रिकी पाँटिंगची बॅटही वादाचा मुद्दा ठरली. कुकाबुरा कंपनीनं तयार केलेल्या काहुना नावाच्या बॅटवर मागच्या बाजूला ग्राफाईट या धातूची स्ट्रिप लावली होती.
 
यावर आक्षेप घेतला गेला, तेव्हा आयसीसी आणि एमसीसीच्या समित्यांनी तपासणही केली. ग्राफाईट स्टिकरचा नेमका फायदा किती होतो याविषयी काही ठोस निष्कर्ष काढता आला नाही. पण 2006 साली या बॅटवर बंदी घालण्यात आली.
 
मॅथ्यू हेडनची मुंगूस बॅट
तुम्ही आयपीएल सुरुवातीपासून पाहत असाल तर तुम्हाला ऑस्ट्रेलियन फलंदाज मॅथ्यू हेडनची मुंगूस बॅट नक्की आठवेल. 2010मध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून खेळताना हेडन एक छोट्या पात्याची बॅट घेऊन मैदानात उतरला होता. त्या बॅटचं नाव होतं मुंगूस बॅट.
 
सुमारे सहा फुटांचा अवाढव्य देह असलेला हेडन आणि सामान्य बॅटपेक्षा अतिशय लहान दिसणारी मुंगूस बॅट पाहून आणि अनेकांना आता क्रिकेटचं रुपडंच बदलणार असं वाटू लागलं.
 
सामान्य बॅटच्या हॅन्डलपेक्षा मुंगूस बॅटचं हॅन्डल 43 टक्के लांब होतं आणि इतर बॅटच्या पात्यापेक्षा मुंगूस बॅटच्या पात्याची लांबी तीन पटींनी कमी होती. मोठमोठे फटके मारायला ही बॅट अतिशय उपयुक्त असल्याचं त्यावेळी अनेकांचं मत होतं.
 
हेडनने याच बॅटीचा वापर करून दिल्ली डेअरडेव्हील्सच्या विरोधात 43 चेंडूंमध्ये 93 धावा फटकावल्या आणि देशभर या मुंगुस बॅटची चर्चा सुरु झाली. आपल्या देशातल्या रस्त्यावरच्या दुकानातही काही काळ ही बॅट मिळू लागली.
 
2012 मध्ये हेडन आयपीएलमधून निवृत्त झाला आणि मुंगूसची क्रेझ कमी होत गेली. हेडनसोबत चेन्नई सुपरकिंग्समध्ये खेळणाऱ्या सुरेश रैनानेही या बॅटबद्दल सांगताना असं म्हटलं की ही बॅट आक्रमक बॅटिंग करायला उपयुक्त असली तरी बचावात्मक खेळताना मात्र ही बॅट काहीही कामाची नव्हती.
 
वेगवेगळ्या खेळाडूंच्या अशा विधानांमुळं या बॅटचा वापर कमी झाला आणि हळूहळू मुंगूस बॅटही बाजारातून गायब झाली.
 
क्रिकेटचं व्यावसायिकरण होऊ लागलं तसं प्लेन, लाकडी बॅटवर स्पॉन्सर्सचे स्टिकर्स लागू लागले आणि बॅटचा रंगही बदलत गेला.
 
बिग बॅश लीगमध्ये तर खेळाडू काळ्या रंगाच्या बॅटनंही खेळताना दिसले. वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलनं या स्पर्धेत वापरलेली सोनेरी बॅटही चर्चेचा विषय ठरली.
 
बॅट कोणत्या लाकडापासून बनवली जाते?
इसवीसन 1800च्या सुरुवातीपासूनच सॅलिक्स अल्बा आणि कॅरुलिया नावाच्या इंग्लिश लाकडांपासून बॅट बनवल्या जात होत्या. इंग्लीश विलो म्हणून ओळखलं जाणारं हे लाकूड अतिशय कठीण, वजनानं हलकं आणि क्रिकेट बॉलचा समर्थपणे सामना करू शकेल असं होतं.
 
बहुतांश फलंदाज आजही इंग्लिश विलो पासून बनलेल्या बॅटच वापरतात.
 
अर्थात क्रिकेटचा प्रसार इंग्लंडबाहेर झाला, तेव्हा त्या त्या देशातल्या लाकडांपासून बॅट बनू लागल्या. अर्थात बहुतेक ठिकाणी इंग्लंडमधून लाकूड आयात करूनही बॅट बनवल्या जात होत्या.
 
ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड सारख्या देशांनी इंग्लिश विलोची झाडं लावण्याचाही प्रयत्न केला पण तो फारसा यशस्वी झाला नाही.
 
भारत आणि पाकिस्तान या दोन क्रिकेटवर प्रेम करणाऱ्या देशांमध्ये काश्मीर विलो (सॅलिक्स फ्रॅजिलिस) नावाच्या लाकडापासून बॅट बनवल्या जातात.
 
इंग्लिश विलोच्या तुलनेत या बॅट वजनाने जड असल्या तरी खिशाला परवडणाऱ्या असल्यानं आजही भारतात स्थानिक पातळीवर काश्मीर विलो बॅट्सना पसंती दिसते.
 
अलीकडच्या काळात बांबू बॅट्सही चर्चेत आहेत. पण बांबू हे तांत्रिकदृष्ट्या गवत आहे, लाकूड नाही. त्यामुळे एमसीसीनं या बॅट्‌सनना परवानगी दिलेली नाही.
 
पर्यावरणाच्या दृष्टीनं आणि किंमतीच्या दृष्टीनं इंग्लीश विलो बॅट्सपेक्षा बांबू बॅट्स सोयीच्या मानल्या जातात. चीनसारख्या देशांत मुबलक प्रमाणात बांबू उपलब्ध आहे त्यामुळे खेळाच्या प्रसाराच्या दृष्टीनं या बॅट्सना परवानगी मिळावी असं काहींना वाटतं.
 
बॅटच्या बाबतीत काळ किती बदललाय हे एका उदाहरणावरून समजून घेता येईल. महान फलंदाज डॉन ब्रॅडमन यांनी सांगितलं होतं की त्यांनी हजार धावा काढल्या की ते त्यांची बॅट बदलत असत. त्याकाळात ही गोष्ट अगदीच सामान्य मानली जायची.
 
पुढे पुढे काळ इतका बदलला की दक्षिण आफ्रिकेच्या हर्षल गिब्जने एकाच मोसमात तब्बल 47 बॅट बदलल्याची माहिती गार्डियनला दिली होती.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

भारतीय क्रिकेटपटूचे पुण्यात आकस्मिक निधन, कारण ऐकून मित्रांना धक्का बसला

कर्करोग बरा करण्याचा उपाय सांगून सिद्धू अडकले , 850 कोटींचा केस दाखल

आयसीसी कसोटी क्रमवारीत बुमराह पहिल्या तर जैस्वाल दुसऱ्या क्रमांकावर, विराटनेही झेप घेतली

Syed Mushtaq Ali Trophy: T20 मध्ये गुजरातच्या उर्विलने मोडला पंतचा विक्रम,सर्वात जलद शतक झळकावले

PAK vs SL: पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या हिंसक निदर्शनांमुळे श्रीलंकेचा संघ परतला

पुढील लेख
Show comments