Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

तिशीनंतर इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आणि आता टी 20 कर्णधार, अशी आहे सूर्यकुमार यादवची कारकीर्द

तिशीनंतर इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आणि आता टी 20 कर्णधार  अशी आहे सूर्यकुमार यादवची कारकीर्द
Webdunia
शुक्रवार, 19 जुलै 2024 (08:52 IST)
सूर्यकुमार यादव.. भारतातल्या कोट्यवधी क्रिकेट रसिकांच्या मनात हे नाव कोरलं गेलंय.
29 जून 2024 ला झालेल्या टी20 विश्वचषकाचा अंतिम सामन्यात सीमारेषेवर सुरेख झेल घेऊन भारताचं विश्वविजयाचं स्वप्न पूर्ण करणाऱ्या सूर्यकुमार यादवचं नाव भारतीय क्रिकेटच्या इतिहासात अजरामर झालंय.
 
तीन वर्षांपूर्वी 14 मार्च 2021 रोजी वयाच्या 31व्या वर्षी भारताकडून खेळण्याची संधी मिळालेल्या, सूर्यकुमार यादवला आता श्रीलंका दौऱ्यात भारतीय संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त केलं गेलंय.
 
खरंतर टी20 विश्वचषकात भारताचा उपकर्णधार राहिलेल्या हार्दिक पंड्याला ऐवजी सूर्यकुमार यादवला कर्णधार बनवलं गेल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
 
यापूर्वी सूर्यकुमार यादवने 7 टी20 सामन्यांमध्ये भारताचं कर्णधारपद सांभाळलं असून या 7 सामन्यांमध्ये त्याने 5 विजय मिळवले आहेत.
यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा कर्णधार राहिलेल्या हार्दिकची उपकर्णधारपदावरूनही उचलबांगडी केली असून तरुण शुभमन गिलला ही जबाबदारी देण्यात आलेली आहे.
 
नुकत्याच झालेल्या झिम्बाब्वे दौऱ्यात चमकदार कामगिरी केलेल्या अभिषेक शर्माची श्रीलंका दौऱ्यासाठी निवड झालेली नसली तरी रियान परागला मात्र संघात कायम ठेवलं गेलंय.
श्रीलंका दौऱ्यासाठी निवडलेला भारतीय टी20 संघ : सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, रिंकू सिंग, रियान पराग, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग , खलील अहमद, मोहम्मद. सिराज.
 
तिशीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये येऊन बनला स्टार
सूर्यकुमारने फर्स्टक्लास क्रिकेटमध्ये पदार्पण केलं तो दिवस आहे 15 डिसेंबर 2010
सूर्यकुमारने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं तो दिवस आहे 14 मार्च 2021
डोमेस्टिक क्रिकेट ते आंतरराष्ट्रीय क्रिकेट या स्थित्यंतरासाठी सूर्यकुमारने 11 वर्षांहून अधिक काळ प्रतीक्षा केली. ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या वर्ल्डकप स्पर्धेत सूर्यकुमारची बॅट तळपते आहे. भारतीय संघाने वर्ल्डकपची सेमी फायनलपर्यंत आगेकूच करण्यात सूर्यकुमारचा सिंहाचा वाटा आहे. पण इथपर्यंतची वाटचाल खाचखळग्यांनी भरलेली होती. 360 म्हणजे मैदानात कुठेही फटके मारणाऱ्या सूर्यकुमारची एबी डीव्हिलियर्सची तुलना होते आहे.
 
सूर्यकुमारप्रमाणे प्रतीक्षा केली होती ऑस्ट्रेलियाच्या माईक हसीने. एकापेक्षा एक मातब्बर खेळाडूंचा भरणा असल्यामुळे हसीला अंतिम अकरात घेणं दहा वर्षशक्य झालं नाही. हसीने तक्रार केली नाही, नाराजी-खंत व्यक्त केली नाही. तो धावा काढत राहिला. अखेर त्याला संधी मिळाली.
खेळाडूंसाठी तिशी ही कारकीर्दीची संध्याकाळ मानली जाते. हसीला त्याच काळात संधी मिळालं, त्याच्याकडे वेळ कमी होता. त्याने यासंधीचं सोनं केलं. हसीने टेस्ट, वनडे आणि ट्वेन्टी20 अशा तिन्ही प्रकारात स्वत:ला सिद्ध केलं. जगातल्या अव्वल फिनिशर्समध्ये त्याचं नाव घेतलं गेलं.क्रिकेटच्या सम्यक अभ्यासासाठी त्याला मिस्टर क्रिकेट अशी बिरुदावली मिळाली.
योगायोगाने सूर्यकुमारच्या बाबांनी वेळोवेळी त्याला हसीचंच उदाहरण द्यायचे. आज हसीच्या देशात सूर्यकुमार दशकभराची उणीव भरुन काढत छाप उमटवतो आहे.
हसीप्रमाणेच सूर्यकुमारला तिशीत संधी मिळाली. संधी मिळाल्यानंतर अवघ्या दीड वर्षात सूर्यकुमारने ट्वेन्टी-20 प्रकारात आयसीसी बॅटिंग क्रमवारीत अव्वलस्थानी झेप घेतली आहे.
 
क्षमता, कौशल्य, फिटनेस, दडपण हाताळण्याची कणखरता, अभ्यास या सगळ्या आघाड्यांवर सूर्यकुमारने स्वत:ला सिद्ध केलं. मुंबई संघाचा अविभाज्य भाग असलेला सूर्यकुमार आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्सकडून खेळला. त्यानंतर कोलकाता नाईट रायडर्सला त्याच्यामध्ये फिनिशर दिसला आणि त्यांनी त्याला ताफ्यात समाविष्ट केलं.
गौतम गंभीरने या गुणवत्तेला संधीही दिली. पण सूर्यकुमारला आणखी खेळायला मिळालं तर तो मोठा खेळाडू होऊ शकतो हे ताडलं मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा, मुंबई इंडियन्स संघव्यवस्थापन यांनी. 2018 मध्ये मुंबई इंडियन्सने लिलावात सूर्यकुमार यादवला आपल्याकडे वळवलं आणि सूर्यकुमारचं नशीब पालटलं.
 
सूर्यकुमार मुंबई इंडियन्सचा कणा झाला तरीही भारतीय संघाची दारं इतक्या सहजी त्याच्यासाठी किलकिली झाली नाहीत. आयपीएल स्पर्धेत धावांच्या राशी ओतत असतानाही सूर्यकुमारला वेटिंगवर ठेवण्यात आलं. अखेर 2021 मध्ये त्याला भारतीय कॅप देण्यात आली.
 
सूर्यकुमारचे बाबा भाभा अटॉमिक रिसर्च सेंटर इथे कार्यरत आहेत. आई गृहिणी, बहीण आणि सूर्यकुमार आणि त्याची पत्नी असे हे कुटुंब चेंबूरजवळच्या अणुशक्ती नगरमध्ये राहतात.
 
अभ्यासापेक्षा क्रिकेटमध्ये रस आहे हे सूर्यकुमारच्या घरच्यांच्या लक्षात आलं. परिसरातल्या टेनिस बॉल स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरीनंतर सूर्यकुमारने एमसीएच्या वयोगट स्पर्धांमध्ये खेळायला सुरुवात केली.
मजल दरमजल करत सूर्यकुमारने मुंबई संघात स्थान मिळवलं. खडूस क्रिकेट हे मुंबईचं गुणवैशिष्ट्य. कठीण परिस्थितीतही स्वत:च्या शैलीला मुरड न घालता खेळणारा खेळाडू अशी सूर्यकुमारची ओळख झाली.
 
धावांच्या राशी ओतल्याशिवाय भारतीय संघाची दारं खुली होणार नाहीत हे सूर्यकुमारच्या लक्षात आलं. तो खेळत राहिला, काही हंगामात त्याची कामगिरी वाखाणण्याजोगी होती तर काहींमध्ये सर्वसाधारण होती.
 
आयपीएल स्पर्धेत कधी फिनिशर, कधी मिडल ऑर्डर अशी त्याची भूमिका बदलत राहिली. समवयीन खेळाडूंना भारतासाठी खेळण्याची संधी मिळत असताना सूर्यकुमार नाऊमेद झाला नाही.
 
दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीत जागतिक ट्वेन्टी20 क्रमवारीत सूर्यकुमार अव्वल स्थानी आहे. ट्वेन्टी20 प्रकारात त्याच्या नावावर एक शतकही आहे. 2007नंतर भारताला वर्ल्डकप जिंकायचा असेल तर सूर्यकुमारकडून भारतीय संघाला मोठ्या अपेक्षा आहेत.
 
पक्का मुंबईकर
सूर्यकुमार मुंबईतच लहानाचा मोठा झाला. त्यामुळे तो पक्का मुंबईकर आहे. वडापाव, पावभाजी आणि रस्त्याच्या बाजूला गाडीवर मिळणारं चायनीज विशेषत: ट्रिपल शेझवान राईस हे पदार्थ त्याला प्रचंड आवडतात. 'ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन्स' या कार्यक्रमात गौरव कपूरशी बोलताना सूर्यकुमारने आपल्या खाण्याच्या आवडीविषयी सांगितलं होतं.
 
डाएट असल्यामुळे आता त्याला हे पदार्थ सहजी खाता येत नाहीत. पण चीट डे दिवशी त्याला हे पदार्थ खायला आवडतात. सूर्यकुमारला व्यवस्थित मराठी येतं. प्रेस कॉन्फरन्समध्ये मराठी पत्रकार त्याला मराठीत प्रश्न विचारतात आणि तोही अस्खलित मराठीत उत्तर देतो.
'स्काय' नाव कसं पडलं?
2014 हंगामापासून सूर्यकुमार आयपीएल स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळू लागला. त्यावेळी कोलकाता संघाचा कर्णधार गौतम गंभीर होता.
 
सरावादरम्यान गंभीरने स्काय म्हणून हाक मारली. सूर्यकुमारला आधी ते लक्षात आलं नाही. इंग्रजीत आद्याक्षरं जोडली तर स्काय असं नाव तयार होतं. गंभीरने त्याच्या हे लक्षात आणून दिलं.
 
सिद्धविनायकाचा भक्त आणि टॅटूप्रेमी
सूर्यकुमार यादव इन्स्टाग्रामवर सातत्याने मुंबईतल्या सिद्धीविनायक गणपतीचा फोटो शेअर करतो. मुंबईत असला की सूर्यकुमार देवळात जाऊन बाप्पाचं दर्शनही घेतो.
 
सूर्यकुमारच्या अंगावर असंख्य टॅटू आहेत. हे टॅटू अनोखे आहेत. एका हातावर सूर्यकुमारने आईबाबांचे चित्र गोंदवून घेतलं आहे. एका ठिकाणी पत्नी देविशाचं नाव लिहिलं आहे.
 
डाव्या खांद्यावर माओरी संस्कृतीचं प्रतीक असलेला टॅटू आहे. रिस्पेक्ट, प्राईड असाही एक टॅटू आहे. वन स्टेप, अॅट अ टाईम असं लिहिलेला टॅटूही आहे. सूर्यकुमार दौऱ्यावर असला की त्याचे दोन लाडके कुत्रे पाब्लो आणि ओरिओ यांना मिस करतो. फ्रेंच बुल डॉग प्रजातीचे हे कुत्रे आहेत.
 
सूर्यकुमारला गाड्यांचाही शौक आहे. यंदा मर्सिडीझ बेन्झ जीएलई कूप ही सव्वा दोन कोटींची गाडी खरेदी केली. त्याच्याकडे निसान जोंगा, रेंज रोव्हर वेलार, मिनी कूपर, ऑडी आर5 आहेत.
 
जेव्हा रोहितने शुभेच्छांमधून दिले पदार्पणाचे संकेत
आयपीएल हंगामादरम्यान सूर्यकुमारचा 30वा वाढदिवस होता. मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने शुभेच्छा देताना इंडिया कॅप फार दूर नाही असं म्हटलं होतं. रोहितचे शब्द खरे ठरले आणि काही महिन्यात सूर्यकुमारने भारतासाठी पदार्पण केलं.
 
सूर्यकुमारच्या वाटचालीत रोहितचा मोठा वाटा आहे. कोलकाताने रिलीज केल्यानंतर त्याला मुंबई इंडियन्सकडे वळवण्यात रोहितने निर्णायक भूमिका बजावली.
 
मी रणजी पदार्पण केलं तेव्हा रोहितच बॅटिंग करत होता. तेव्हापासून आतापर्यंत त्याची सदैव साथ मिळाली आहे. भारतीय संघासाठी निवड झाली नाही तेव्हाही रोहितचा पाठिंबा होता, असं सूर्यकुमारने सांगितलं.
 
देविशा आयुष्यात आली आणि...
सूर्यकुमार आणि देविशा यांचं लग्न 2017 मध्ये झालं. पण ते दोघे 2010 पासून एकमेकांच्या प्रेमात होते. कारकीर्दीला नवा आयाम देण्यात देविशाची भूमिका मोलाची असल्याचं सूर्यकुमार वारंवार सांगतो.
 
तू मुंबईसाठी खेळतोस, आयपीएल खेळतोस पण करिअर पुढे का जात नाहीये असा सवाल देविशाने केला. दोघांनी मिळून एक कृती आराखडा आखला.
न्यूट्रिशनिस्ट, बॅटिंग कोच यांचा सल्ला घेतला. लेट नाईट पार्टीजसारख्या गोष्टी कमी केल्या. ही सगळी मेहनत कामी आली असं सूर्यकुमार सांगतो.
 
पदार्पण केल्यानंतर देविशाने सांगितलं की तुझा क्रिकेटप्रवास आता खऱ्या अर्थाने सुरू झाला आहे. इथून तुला मोठी भरारी घ्यायची आहे. यासाठी तू 10 वर्ष अथक मेहनत घेतली आहेस.
 
सचिनला दुखापत आणि आयपीएल पदार्पण
तारीख-6 एप्रिल, 2012. ठिकाण-वानखेडेचं मैदान. मुकाबला- मुंबई इंडियन्स विरुद्ध पुणे वॉरियर्स. मुंबई इंडियन्सचा आधारस्तंभ असलेला सचिन तेंडुलकर खेळू शकणार नसल्याचं स्पष्ट झालं. त्याच्या जागी युवा सूर्यकुमार यादवला संधी देण्यात आली.
 
सचिनसारख्या दिग्गजाच्या जागी खेळण्याची संधी मिळणं दुर्मीळ असतं. गंमत म्हणजे सूर्यकुमार त्या मॅचमध्ये सहाव्या क्रमांकावर बॅटिंगला आला आणि त्याला भोपळाही फोडता आला नाही.
 
सचिनसारख्या महान खेळाडूच्या सहवासात वेळ व्यत्तीत करायला मिळणं खास असतं, असं सूर्यकुमार सांगतो. मुंबई इंडियन्ससाठी खेळताना ड्रेसिंगरुममध्ये गर्दी होती. त्यावेळी सचिननेच बाजूला बसायला जागा दिली आणि तेव्हापासूनच मी तिथेच बसतो अशी आठवण सूर्यकुमार सांगतो.
 
जोफ्रा आर्चरला सिक्स मारुन पदार्पण
जोफ्रा आर्चर हा जगातला सगळ्यांत वेगवान आणि भेदक बॉलर म्हणून ओळखला जातो. नवा बॉल हाताळणारा जोफ्रा भल्याभल्या बॅट्समनसाठी डोकेदुखी ठरतो.
 
सूर्यकुमारने पदार्पण केलं त्या लढतीत त्याला बॅटिंगसाठी यावंच लागलं नाही. दुसऱ्या मॅचमध्ये रोहित शर्मा आणि के.एल.राहुल ही सलामीची जोडी मैदानात उतरली. आर्चरने रोहित शर्माला बाद केलं. रोहितच्या जागी सूर्यकुमार खेळायला उतरला.
 
आर्चरने लेगस्टंपवर टाकलेला उसळता चेंडू सूर्यकुमारने नटराज शैलीत फाईनलेगच्या दिशेने स्टेडियममध्ये भिरकावला. या फटक्याने अख्खं क्रिकेटविश्व अवाक झालं. सर्वसाधारपणे पदार्पण करणारा खेळाडू दडपणात असतो. सूर्यकुमारने कोणतंही नवखेपण न दाखवता तडफेने सिक्स लगावला.
 
मुंबईचा कर्णधार आणि राजीनामा
2014-15 हंगामासाठी झहीर खान आणि रोहित शर्मा उपलब्ध नसल्यामुळे सूर्यकुमारकडे कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली. सूर्यकुमारची बॅट कर्णधारपदाची जबाबदारी असतानाही तळपत राहिली. पण मुंबईची कामगिरी एकदमच खालावली.
 
मैदानावर आणि मैदानाबाहेर आक्षेपार्ह भाषेत बोलल्याची तक्रार सूर्यकुमारसंदर्भात करण्यात आली. संघटनेने त्याच्यासमोर राजीनाम्याचा प्रस्ताव ठेवला.
सूर्यकुमारने हंगाम सुरू असतानाच कर्णधारपदाचा राजीनामा दिला, त्यानंतर आदित्य तरेकडे मुंबईचं कर्णधारपद सोपवण्यात आलं. नंतरही एकदा सूर्यकुमार आणि सर्फराझ खान यांना आक्षेपार्ह भाषेसाठी समज देण्यात आली. दोघांनी आपली चूक मान्य केल्याने त्यांना शिक्षा करण्यात आली नाही.
 
जेव्हा कॅलिसने विचारलं, मला हा फटका मारायला शिकवशील का?
2016 मध्ये सूर्यकुमार यादव कोलकाता नाईट रायडर्स संघाचा भाग होता. सूर्यकुमारने केकेआरसाठी एका खेळीदरम्यान लॅपचा अफलातून फटका मारला. सार्वकालीन महान ऑलराऊंडर्समध्ये गणना होणारा जॅक कॅलिस केकेआरचा कोच होता.
 
त्याने सूर्यकुमारला मला हा फटका खेळायला शिकवशील का? असं विचारलं. कॅलिसच्या नावावर 10,000 पेक्षा रन्स आहेत. 200हून अधिक विकेट्स आहेत. त्याच्या भात्यात सगळे फटके आहेत. पण त्यालाही या फटक्याची भुरळ पडली.
 
सूर्यकुमारला 'झी सिनेमा' हे टोपणनाव कोणी दिलं?
मुंबई संघाचे परफॉर्मन्स अॅनालिस्ट सौरभ वाळकर यांनी सूर्यकुमारचा सर्वांगीण खेळ पाहून त्याला 'झी सिनेमा' असं नाव दिलं. नागराज गोलापुडी यांनी क्रिकइन्फो वेबसाईटशी घेतलेल्या मुलाखतीत सूर्यकुमारने या गंमतीशीर नावाबाबत सांगितलं. तुझ्या खेळात अॅक्शन, मस्ती, ड्रामा सगळं काही आहे. तू झी सिनेमा आहेस असं सौरभ त्याला म्हणाले.
 
Published By- Priya Dixit
 
 
 
 
 
 
 
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

22 डिसेंबर रोजी कालाष्टमी व्रत, या दिवशी 4 शुभ योग तयार होत आहेत, तिप्पट फळ मिळणार

जुन्या कपड्यांचा पोछा वापरल्याने दुर्दैव येते का?

चांगल्या झोपेसाठी या गोष्टी करा, तुमचे आरोग्यही चांगले राहील

Christmas special : या रेसिपी नक्की बनवा

रावणाचा भाऊ कुंभकरण खरोखरच इंजिनिअर होता का?

सर्व पहा

नवीन

विराट कोहली आणि अनुष्का देश सोडणार!

IND W vs WI W: भारताने निर्णायक सामन्यात 60 धावांनी विजय मिळवला

जसप्रीत बुमराहने ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर इतिहास रचला

रविचंद्रन अश्विनने अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली

या भारतीय खेळाडूने अचानक जाहीर केली निवृत्ती, 31व्या वर्षी घेतला मोठा निर्णय

पुढील लेख
Show comments