Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जगभरात ‘या’ कारणामुळे वाढतोय एकाच मुलाचा ट्रेंड

Webdunia
शुक्रवार, 25 ऑगस्ट 2023 (19:44 IST)
अमेरिका आणि युरोपीय देशांमध्ये एकच मूल ठेवण्याचा ट्रेंड वाढतोय, पण भारतातही अशीच परिस्थिती आहे का?
 
तुला किती भाऊ-बहीण आहेत? असा प्रश्न तुम्ही कधी कुणाला विचारलाय का?
 
जर असा प्रश्न तुम्ही विचारला असेल तर अनेकांनी तुम्हाला सांगितलं असेल की, "हो मला दोन किंवा तीन-चार भावंडं आहेत किंवा आम्ही एवढे भाऊ बहीण आहोत."
 
"मी माझ्या आईवडिलांना एकटाच किंवा एकटीच आहे", असं सांगणारे लोक भारतात क्वचितच आढळून येतात. एवढंच काय तर आम्हाला केवळ एकच मूल आहे असं सांगणारे पालकही भारतात कमीच आहेत.
 
पण तुम्ही जर का अमेरिका किंवा युरोपीय देशात राहत असाल तर, तिकडे 'सिंगल चाईल्ड' ही संकल्पना अतिशय सामान्य आहे.
 
होय, अमेरिका आणि युरोपामध्ये एकाच मुलावर थांबणाऱ्या पालकांची संख्या सध्या वाढत आहे. या देशांमध्ये राहणारे बहुतांश विवाहित लोक एकाच मुलावर थांबण्याचा निर्णय घेताना दिसत आहेत.
 
कॅनडातील ओंटारियो येथे राहणाऱ्या 31 वर्षीय जेन डाल्टन यांना चार अपत्य हवी होती आणि त्यासाठी त्यांनी पूर्ण तयारीदेखील केलेली होती.
 
पण, 2018 मध्ये त्यांच्या मुलीच्या जन्मानंतर अवघ्या दोनच महिन्यांनी, जेन आणि त्यांच्या पतीने एकाच मुलीवर थांबायचं ठरवलं आणि त्यांनी 'वन चाईल्ड पॉलिसी' स्वीकारण्याचा निर्णय घेतला.
 
मात्र, असा निर्णय घेणाऱ्या जेन डाल्टन या काही एकमेव नाहीयेत.
 
युरोपात मुलं असणाऱ्या कुटुंबांपैकी 49% कुटुंबं अशी आहेत, ज्यामध्ये केवळ एकच मूल आहे. कॅनडामध्ये एक मूल धोरण स्वीकारणाऱ्या जोडप्यांचं प्रमाण सगळ्यांत जास्त आहे.
 
2001 मध्ये हे धोरण स्वीकारणाऱ्यांचं प्रमाण 37% होतं आणि 2021 मध्ये त्यात वाढणं होऊन तब्बल 45% कुटुंबांनी हेच धोरण स्वीकारल्याचं दिसून आलं.
 
अमेरिकेतील 18% महिलांनी 2015 मध्ये एक मूल धोरणाचा स्वीकार केला होता. मात्र इतिहासात डोकावून पाहिलं की असं दिसेल की, 1976 मध्ये अमेरिकेतल्या फक्त 10 टक्के महिलांना एकच मूल होतं.
 
एकच मूल जन्माला घालणाऱ्यांची नेमकी भूमिका काय आहे?
 
'वन अँड ओन्ली: द फ्रीडम ऑफ हॅविंग अॅन ओन्ली चाइल्ड' आणि 'द जॉय ऑफ बीइंग वन' अशी पुस्तकं लिहिणाऱ्या शोध पत्रकार लॉरेन सँडलर यांच्या मते, त्यांचं त्यांच्या बाळावर प्रचंड प्रेम होतं, मात्र यासोबतच त्यांचं करियर देखील त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचं होतं. म्हणूनच त्यांनी एकच मूल जन्माला घालण्याचा मार्ग निवडला.
 
एका अभ्यासानुसार, अमेरिकेत दोन मुलांचं संगोपन करण्याचा सरासरी खर्च सुमारे तीन लाख डॉलर्स आहे. यामध्ये महाविद्यालयीन शिक्षणासाठी लागणाऱ्या पैश्यांचा समावेश केला गेलेला नाही.
 
इंग्लंडमध्ये एक मूल सांभाळण्याचा खर्च तब्बल दोन लाख डॉलर्सच्या घरात जातो. ऑस्ट्रेलियाचा विचार केला तर असं दिसतं की तिथे एक मूल वाढवण्यासाठी सुमारे एक लाख सत्तर हजार डॉलर खर्च होतात.
 
कॅनडातील कॅलगरी येथे राहणाऱ्या 25 वर्षांच्या व्हिक्टोरिया फाहे यांना जगात घडत असलेल्या हवामान बदलाचीही चिंता आहे.
 
याबाबत बोलताना त्या म्हणतात की, "भविष्यकाळात माणसाचा संसाधनांसाठीचा संघर्ष टिपेला जाणार आहे आणि मला माझ्या मुलांना पाण्यासाठी भांडताना बघायचं नाहीये."
 
काही आर्थिक कारणांमुळं देखील जोडपी हा निर्णय घेताना दिसत आहेत. मूल झाल्यानंतर युरोपमधील महिलांच्या वेतनात सरासरी 3.6 टक्के घट झाल्याचं दिसून येतं.
 
अमेरिकेसारख्या देशात झालेल्या एका अभ्यासात हेदेखील आढळून आलंय की, एकही मूल नसणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना दिला जाणारा पगार आणि दोन तीन मुलांची आई असणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना दिला जाणारा पगार यामध्ये 13 टक्क्यांचा फरक दिसून येतो.
 
इंग्लंडच्या कॉर्नवॉलमध्ये राहणाऱ्या 33 वर्षांच्या लॉरा बेनेट म्हणतात की, एकच मूल असल्याने त्या अधिक चांगल्या जोडीदार बनू शकतात. तसंच एकच मूल असल्यामुळे त्यांना अगदी सहज त्यांच्या मित्र मैत्रिणींसोबत फिरायला जाता येतं आणि, जेंव्हा त्यांच्या जोडीदाराला त्यांच्या मित्रांसोबत फिरायला जायचं असतं, तेंव्हाही त्यांना कसलीच अडचण वाटत नाही.
 
सामाजिक दबाव
86 देशांमध्ये केल्या गेलेल्या एका अभ्यासात असं दिसून आलंय की, पहिल्यांदाच आई-वडील झालेली जोडपी, सुरुवातीचा एक वर्ष खूप आनंदात होती.
 
मात्र, दुसरं मूल जन्माला घातल्यानंतर त्यांचा आनंद अर्ध्यावर जातो आणि तिसऱ्या बाळानंतर तर त्यांच्या वैवाहिक आयुष्यात कसलाच आनंद उरत नाही.
 
'एका मुलावर थांबण्याचा' ट्रेंड जगभरात वाढत असला तरी एकापेक्षा जास्त मुलांना जन्माला घालण्यासाठी समाजाकडून मात्र दबाव टाकला जात असल्याचं दिसतं.
 
असल्याचं बहुतांश पालकांचं असं म्हणणं आहे की, कुटुंबातील सदस्यांपासून ते रस्त्यावर भेटलेल्या अनोळखी व्यक्तींपर्यंत प्रत्येक माणसाकडून, एकापेक्षा जास्त मुलं जन्माला घालण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकला जातो.
 
त्यामुळं ज्या जोडप्यांनी एकाच मुलावर थांबण्याचा निर्णय घेतलाय त्यांना समाजाला तर त्यांची भूमिका पटवून द्यावीच लागते पण अनेकवेळा स्वतःलाही ती भूमिका योग्य असल्याचं समजवावं लागतं.
 
भारतात नेमकी कशी परिस्थिती आहे?
देशाची राजधानी असणाऱ्या दिल्लीजवळ नोएडा नावाचं शहर आहे. या शहरात एका मीडिया कंपनीमध्ये काम करणाऱ्या सबिहा खान (नाव बदलले आहे) यांनी जाणीवपूर्वक एकच मूल जन्माला घालण्याचा निर्णय घेतला आहे.
 
बीबीसीसोबत बोलतांना त्यांनी सांगितलं की, "एकाच मुलावर थांबणं ही काळाची गरज आहे." त्यांच्या पतीचा आणि कुटुंबीयांचा त्यांच्या या निर्णयाला पाठिंबा असल्याचं त्या सांगतात.
 
त्या म्हणतात की, "आम्हाला माझ्या पोटी जन्माला आलेल्या बाळाचं अगदी व्यवस्थित संगोपन करायचं आहे. त्याला चांगल्या ठिकाणी शिक्षण घेता यावं, आम्हाला त्याच्याकडे पुरेसं लक्ष देता यावं अशी आमची इच्छा आहे."
 
त्यांचं स्वतःच कुटुंब जरी सबिहा यांच्या या निर्णयाला समर्थन देत असलं तरी त्यांच्या नातेवाईकांना एकापेक्षा जास्त मुलं असावी असं वाटतं.
 
मात्र सबिहा यांच मत असं आहे की जर त्यांना आणि त्यांच्या पतीला हा निर्णय पटलेला असेल, तर बाकी जगाला काय वाटतं याची चिंता करण्याची गरज नाहीये.
 
असं असूनही सबिहा यांना कधी कधी दुसऱ्या बाळाचा विचार डोक्यात येतोच हे त्यांनी मान्य केलं. पण, त्या त्यांच्या निर्णयावर ठाम आहेत. एवढंच काय तर त्या त्यांचा निर्णय कसा योग्य आहे हे पटवून देखील सांगतात.
 
त्या म्हणतात की, “मला वाटतं नोकरी करणाऱ्या पालकांनी याचा विचार करायला हवा. ही प्रत्येकाची वैयक्तिक बाब असली तरी ती आपल्या पिढीची गरज आहे.
 
आपण आपल्या बदललेल्या जीवनशैलाचा विचार करून हे एकच अपत्य जन्माला घालण्याचं धोरण स्वीकारलं पाहिजे."
 
मात्र सबीहा खान यांनी घेतलेला हा निर्णय भारतात किती लोक घेऊ शकतील?
बंगळुरू विद्यापीठातील नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडियामध्ये सहाय्यक प्राध्यापिका असणाऱ्या डॉ. अमृता नंदी यांना असं वाटत नाही की, भारतात लोक एकाच अपत्यावर थांबण्याचा निर्णय मोठ्या प्रमाणात घेत आहेत.
 
'मदरहुड अँड चॉईस: अनकॉमन मदर्स, चाइल्डफ्री वुमन' हे पुस्तक लिहिणाऱ्या डॉ. नंदी यांनी बीबीसीशी बोलतांना सांगितलं, “असे काही लोक आहेत जे हा निर्णय घेत आहेत पण त्यांची संख्या खूपच कमी आहे.
 
त्यात उच्चवर्गीय, सुशिक्षित व्यावसायिक लोकांचा समावेश आहे. मात्र यावरून असं म्हणता येणार नाही की भारतात एक मूल जन्माला घालणाऱ्या जोडप्यांची लाट आलीय."
 
त्या पुढे म्हणतात की, "दुसऱ्या आशियाई देशातील लोकांप्रमाणे भारतात फक्त मूल जन्माला घालण्याचा विचार केला जात नाही. याउलट भारतात एकापेक्षा अधिक मुलं असणं हे समृद्धीचं लक्षण मानलं जातं.
 
एकापेक्षा जास्त मुलं असतील तर त्या कुटुंबातील आई-वडील आणि भावंडांसाठी त्यांचं असणं हे भावनिक आणि आर्थिक बळ मानलं जातं."
 
त्या म्हणतात की आधीच भारतात 'हम दो हमारे दो' उपक्रमाला राबवताना अनेक अडचणींचा सामना करावा लागलेला आहे.
 
अशा परिस्थितीत जर एकच मूल जन्माला घालण्याचं धोरण राबवलं गेलं तर बहुतांश भारतीय नागरिक यामुळे दुखावले जाऊ शकतात.
 
दोन अपत्यांची इच्छा
पॉप्युलेशन फाउंडेशन ऑफ इंडियाच्या कार्यकारी संचालक पूनम मुत्तरेजा ही गोष्ट अधिक सविस्तरपणे समजावून सांगताना असं म्हणतात की, “नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे (NFHS) 2019-2021 च्या आकडेवारीनुसार, 15 ते 49 वयोगटातील महिला आणि पुरुष दोघांनाही सरासरी 2.1 अपत्य हवी आहेत. यावरून हे स्पष्ट होतं की भारतातल्या लोकांना दोन अपत्य हवीच आहेत."
 
NFHS-5 च्या अहवालातील आकडेवारीचा संदर्भ देत मुत्तरेजा म्हणतात की, 35 वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या ज्या जोडप्यांना एकच मूल आहे, त्यांना आणखीन एक मूल जन्माला घालण्याची इच्छा नाहीये. कमी वयाच्या विवाहित जोडप्यांना मात्र एकापेक्षा अधिक अपत्ये हवी आहेत.
 
डॉ. मुत्तरेजा यांचं असं म्हणणं आहे की भारतातल्या समृद्ध कुटुंबांमध्ये काही प्रमाणात 'एक मूल' ठेवण्याचा प्रयत्न केला गेला असला तरी असा काही ट्रेंड आहे, असं म्हणता येणार नाही. किंवा भारतातली आकडेवारी हे सिद्ध करत नाही.
 
मात्र, डॉ. मुत्तरेजा सांगतात की, येत्या काही दिवसांत भारतातही एक अपत्यावर थांबण्याचा ट्रेंड वाढू शकतो, कारण त्यांच्या मते, आंतरराष्ट्रीय पातळीवर लोकप्रिय असणाऱ्या पद्धती भारतात काही काळानंतर येतात आणि बरेचसे लोक ती पद्धत स्वीकारतात.
 
मात्र भारतात 'एक अपत्या'बाबतचं धोरण कितपत परिणामकारक ठरेल याबाबत पूनम मुत्तरेजा या साशंक आहेत. त्या या धोरणाचं अजिबात समर्थन करत नसल्याचं सांगतात.
 
चीन आणि जपान यांसारख्या देशांचं उदाहरण देताना त्या म्हणतात की "या देशांनी एक अपत्य धोरण स्वीकारल्यामुळे आता सध्या तिथे काम करणाऱ्यासाठी आणि ज्येष्ठ व्यक्तींची काळजी घेण्यासाठी लोक उपलब्ध नाहीयेत."
 
भारतात आणखीन एक मुद्दा महत्त्वाचा आहे आणि तो म्हणजे, जर बहुतांश लोकांनी एकच मूल जन्माला घालण्याचं ठरवलं तर काही वर्षांनी भारतात अस्तित्वात असलेली संयुक्त कुटुंबव्यवस्था संपुष्टात येऊ शकते. मुलांना त्यांच्या काका-काकी, मामा-मामी आणि भावंडांपासून वंचित रहावं लागू शकतं.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

New Year 2025 Gift नवीन वर्षात गर्लफ्रेंडला या वस्तू गिफ्ट द्या

व्हिटॅमिन ए च्या कमतरतेमुळे होऊ शकतात हे 6 गंभीर आजार! या गोष्टी खायला सुरुवात करा

NABARD Recruitment 2024 नाबार्डमध्ये विशेषज्ञ पदांसाठी रिक्त जागा, शेवटच्या तारखेपासून पात्रतेपर्यंत इतर तपशील जाणून घ्या

Year Ender 2024: भारतीय अर्थव्यवस्थेसाठी कसे होते 2024 हे वर्ष ?

Vrishchik Lal Kitab Rashifal 2025: लाल किताबनुसार वृश्चिक राशी भविष्य 2025 आणि उपाय

सर्व पहा

नवीन

मुंबईतील हिरे व्यापाऱ्याची करोडोंची फसवणूक

फडणवीसांच्या मंत्र्याने या राज्याला मिनी पाकिस्तान म्हणत राहुल गांधींवर निशाणा साधला

संतोष देशमुख खून प्रकरणात मोठा खुलासा, आरोपीने हत्येपूर्वी या ज्येष्ठ नेत्याला 16 वेळा फोन केले

LIVE: आरएसएस स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपचा मार्ग मोकळा करणार

आरएसएस स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपचा मार्ग मोकळा करणार, बैठका सुरु

पुढील लेख
Show comments