Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

प्रसूतीनंतर मासिक पाळी कधी येते?' बाळंतपणानंतर पडणारे काही प्रश्न आणि त्यांची उत्तरं

Webdunia
रविवार, 27 ऑगस्ट 2023 (17:41 IST)
एक महिन्यापूर्वी डिलिव्हरी झालेली एक पेशंट माझ्या समोर होती. अंगावर जुना, खूप ढगळा ड्रेस, तेलकट- न धुतलेले केस, घाम येत असूनही डोक्याला घट्ट बांधलेला रुमाल, तेलकट चेहरा असा तिचा ‘अवतार’ होता.
 
क्षणभर माझा डोळ्यावर विश्वास बसेना. एक चांगल्या कंपनीत अधिकारीपदावर असलेली ही मुलगी खरंच खूप चटपटीत आणि आकर्षक व्यक्तिमत्वाची होती.
 
मला आठवलं की, हीच पेशंट गरोदरपणात यायची तेव्हा किती नीटनेटकी, व्यवस्थित असायची...व्यवस्थित अंगावर बसणारे छान कपडे, आकर्षक केशभूषा आणि मुख्य म्हणजे चेहऱ्यावर सतत प्रसन्न भाव! हिचं अचानक असं का व्हावं?
 
या पेशंटच्या निराश मनस्थितीचं कारण अगदी नैसर्गिक होतं, ते म्हणजे प्रसूतीनंतरच्या हार्मोन्स मधील बदलामुळे येणारे औदासिन्य! हे खूप कॉमन आहे. पण बऱ्याच वेळा आजूबाजूच्या लोकांच्या लक्षात येत नाही.
 
अतिऔदासिन्यामुळे कधीकधी मानसोपचाराची अथवा समुपदेशनाची गरज भासू शकते. यात भर म्हणून डिलिव्हरी झाल्यानंतरच्या काळात बऱ्याच वेळा घरचे आणि बाहेरचे लोक या नव्या आईला इतक्या अखंड सूचना देत असतात की, तिची मनःस्थिती काय असेल याचा कोणी विचारच करत नाही.
 
बाळंतपणानंतर आधीच नव्याने आई बनलेल्या मुलींच्या मनात अनेक प्रश्न असतात, त्यातच वर्षानुवर्षे प्रचलित असलेल्या समजुतींमुळे शरीराबद्दल, बाळंतपणात घ्यायच्या काळजीबद्दल अनेक गैरसमज निर्माण होतात, गोंधळ उडतो.
 
आपण या लेखात असेच प्रश्न आणि बाळंतपणानंतर खरंच कोणत्या गोष्टींची काळजी घेण्याची आणि कोणत्या गोष्टींबद्दल फार टेन्शन न घेण्याची गरज आहे, हे जाणून घेणार आहोत.
 
1. बाळंतिणीच्या आहार-विहाराबद्दलचे समज
प्रसूतीनंतर आईची प्रतिकार शक्ती थोडी कमी असते. त्यामुळे थोडी काळजी घेणे, गर्दीत न जाणे, ताजे अन्न खाणे योग्य आहे पण अतिरेक करायची अजिबात गरज नाही.
 
खूप घरांमध्ये प्रसूती झालेल्या मुलींना नीट आहार दिला जात नाही. जेवणात व्यवस्थित पोळी अथवा भाकरी, भाजी, कोशिंबीर, फळे या सर्वांचा समावेश असायलाच पाहिजे.
 
अतिशय बेचव आणि नीरस जेवण प्रसूती झालेल्या स्त्रीला देऊन घरचे तिला अजूनच उदास करू शकतात.
 
आईने काही खाण्याचा आणि बाळाचे पोट बिघडण्याचा अथवा दुखण्याचा काही एक संबंध नाही. हे आम्ही सांगून सांगून थकलो तरी घरातील ज्येष्ठ या शास्त्रीय सत्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करतात.
 
दुसरं म्हणजे आहारामध्ये भरपूर भाज्या, फळे, दूध, थोडाफार सुकामेवा, आळीव व डिंकाचे लाडू हे असावं. पण जास्त साजूक तुपाचा मारा करू नये.
 
हल्लीच्या मुली गर्भावस्था व नंतरच्या काळात नीट काळजी घेऊन सुदृढ असतात त्यांना या अतिजास्त उष्माकांची गरज नसते.
 
चांगले फिल्टरचे पाणी असेल तर उगाच उकळलेले, कोमट पाणी तिने प्यावे म्हणून आग्रह अजिबात करू नये. उकळलेले पाणी चवीला चांगले नसल्यामुळे मग या मुली पाणीच कमी पितात त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात.
 
स्तनपान चालू असताना आईने भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे.
 
भर उन्हाळ्यातही बाळंतिणीला डोक्याला घट्ट रुमाल, अंगात स्वेटर, पायात मोजे याची काही गरज नसते. त्यामुळे घामोळे व अन्य बुरशीजन्य त्वचेचे आजार होण्याची शक्यता जास्त असते. तसेच खोलीच्या खिडक्या दारे उघडी ठेवून नैसर्गिक उजेड खोलीत यायला हवा.
 
2. प्रसूतीनंतर पाळी कधी येते? पाळी आली नाही तर...
"मॅडम प्रेग्नन्सी कशी असेल? माझं सहा महिन्याचं बाळ अजून अंगावर पीत आहे. पाळी सुरूच झाली नाहीये अजून माझी."
 
आमच्या क्लिनिकमध्ये दर काही दिवसांनी हा संवाद होतोच.
 
प्रसूतीनंतर पाळी सुरू होण्याचा काळ प्रत्येक स्त्रीनुसार बदलतो. काही स्त्रियांना लगेच पुढच्या महिन्यात पाळी सुरू होऊ शकते, तर काही जणींना वर्षभर पाळी येत नाही. पण या काळात प्रेग्नन्सी मात्र तरीही राहू शकते.
 
बाळ अंगावर दूध पीत असेल तर दिवस राहत नाहीत ही अशास्त्रीय समजूत आहे.
 
प्रसूतीनंतर काही काळ पाळी सुरू झाली तरी अनियमित असू शकते, तसेच रक्तस्त्रावाचे प्रमाण ही बरेच कमी असणे हेही नॉर्मल आहे.
 
 
प्रसूतीनंतर शरीर पूर्ववत होण्याचा काळ सहा आठवड्याचा असतो. लैंगिक संबंध दोन महिन्यानंतर ठेवता येऊ शकतात. पण प्रत्येक संबंधाच्या वेळी कंडोम वापरणे आवश्यक आहे आणि पाळी आली नाही तर प्रत्येक महिन्याला एक प्रेग्नन्सी टेस्ट घरच्या घरी करणे उत्तम. म्हणजे नको असलेली प्रेग्नन्सी रहिल्यामुळे होणारा मनस्ताप वाचू शकतो.
 
प्रसूतीनंतर स्तनपान चालू असताना घेता येणाऱ्या काही गर्भ निरोधक गोळ्याही उपलब्ध आहेत परंतु गोळ्यांमुळे अनियमित रक्तस्त्राव, वजन वाढणे असे दुष्परिणाम दिसू शकतात.
 
प्रसूतीनंतर कॉपर टी हे सर्वात उत्तम गर्भनिरोधक आहे. पाळीच्या पाचव्या दिवशी ही बसवली जाते आणि स्तनपानाच्या काळात कॉपर टी गर्भाशयात जास्त चांगली बसू शकते आणि त्यामुळे जास्त रक्तस्त्राव होण्याची संभाव्यता बरीच कमी होते.
 
3. प्रसूतीनंतर शरीरसंबंध कधी ठेवावेत?
पाळीतली अनियमितता किंवा चुकून झालेली गर्भधारणा या अनुषंगानेच पुढचा प्रश्न म्हणजे शरीरसंबंध कधीपासून ठेवावेत.
 
वर म्हटल्याप्रमाणेच सिझेरिअन असो अथवा नॉर्मल डिलिव्हरी, दोन महिन्यांनी पती – पत्नीचा शरीरसंबंध येण्यास हरकत नसते. अर्थात रात्रीची जागरणं, बाळाला पाजणे, त्याची देखभाल व शरीरातील हार्मोन्समधे होणारे बदल यांमुळे नव्या आईला लैंगिक संबंधाची इच्छा थोडी कमी असू शकते.
 
पतीने हेही समजून घेऊन तिला मानसिक व शारीरिक आधार द्यायला हवा. तसेच प्रसुतीनंतर दीड महिन्याने गर्भनिरोधकाविषयीचा सल्लासुद्धा घेणे आवश्यक आहे. अन्यथा पाळी आलेली नसली तरी परत दिवस जाऊ शकतात.
 
4. डिलिव्हरीनंतरही पोट किती दिसतंय, काय करायचं?
"अगं, अजून एक बाळ आतमध्येच आहे की काय? केवढं पोट दिसतंय तुझं! बघ बाई, सिझेरियन झाल्यामुळे असेल. आता असंच राहणार ते!"
 
जिची नॉर्मल डिलिव्हरी असेल तिला ‘पोट बांधलं नाही ना, म्हणून एवढं झालंय’ असं पटवलं जातं.
 
यातलं सत्य म्हणजे डिलिव्हरी किंवा सिझेरियन या दोन्हीचा पोट दिसण्याशी काहीच संबंध नाही. ज्या मुलींचा स्नायूंचा टोन आधीपासूनच चांगला असतो, व्यायामाचं शरीर असतं त्यांचं पोट नंतर कमी दिसतं. पण साधारणपणे सहा महिने ते एक वर्षाचा काळ पोट कमी व्हायला लागतोच.
 
यात जर बाळंतिणीवर तुपाचा आणि इतर खूप जास्त कॅलरी असलेल्या वस्तूंचा मारा करण्यात आला आणि वजन डिलिव्हरीच्या वेळेइतकचं राहिलं तर मग पोट दिसणारच.
 
अजून एक म्हणजे पोट बांधल्याने ते आत जात नाही, तर त्यामुळे पेशंटची चालण्याची पद्धत त्याने सुधारते.
 
गर्भावस्था व प्रसूती या दोन स्थितींमधून गेलेल्या स्त्रीचं शरीर हे बदलणारंच! तो निसर्ग नियमच आहे व तो स्त्रीने आणि तिच्या नवऱ्याने स्वीकारायलाच हवा.
 
कधीकधी नवरा सुद्धा "डॉक्टर, हिचं पोट बघा केवढं आहे! कधी कमी होईल?" असे प्रश्न त्या मुलीसमोर विचारून तिला अजूनच खजील करतो.
 
इतका त्रास सहन करून एक सुंदर बाळ आपल्या पोटात वाढवून ते जन्माला घालणाऱ्या बायकोवर तिच्या बदललेल्या शरीरासकट प्रेमच करायला हवं, नाही का?
 
5. स्ट्रेच मार्क्स कमी होतात का?
 
पोटावर व मांड्यांवर पडणारे स्ट्रेच मार्क्स हा मुलींसाठी अजून एक चिंतेचा विषय असतो. ते कमी होतात की कायम तसेच राहणार हा प्रश्न अनेकींना पडतो.
 
स्ट्रेच मार्क्स कमी व्हावेत म्हणून गर्भारपणातच काही क्रीम्स पोटावर व मांड्यांवर लावता येतात. त्यामुळे या व्रणांचे प्रमाण कमी होते. प्रसूतीनंतरच्या सहा महिन्यात हे व्रण फिकट होऊन खूप कमी वाटायला लागतात.
 
काही जणींना पूर्ण शरीरावर काळसरपणा, डाग आलेले असतात. उदाहरणार्थ- मान, काखा, पोट. पण सहा महिन्यात हे प्रमाण आपोआप कमी होतं. त्याची काळजी करायची गरज नसते.
 
प्रसूतीनंतर या गोष्टी नक्की करा
बाळंतिणीने पहिल्या दिवसापासून स्तनांना योग्य तो आधार द्यायला हवा. त्यासाठी ‘फीडिंग ब्रेसिअर’ची मदत घेता येऊ शकते. स्तन एकदा वाढलेल्या वजनाने ओघळले तर नंतर काही उपाय करता येत नाही.
प्रसूतीनंतर मसाज करायला काही हरकत नसते पण धुरी देणे अयोग्य आहे. त्याने आई आणि बाळ, दोघांनाही श्वसनाचा त्रास होऊ शकतो.
दीड महिन्यानंतर प्रत्येक स्त्रीने चालण्याचा व्यायाम सुरु करावा. 30 ते 45 मिनिटे रोज चालण्याने शरीर पूर्ववत होण्यास मदत होते. प्रसूतीनंतरही सुरवातीचा दहा दिवसांचा काळ संपला की स्त्रियांनी स्वतःकडेही जरा लक्ष देण्यास हरकत नाही. व्यवस्थित कपडे, केस नीट असतील तर तिचाच स्वतःचा आत्मविश्वास वाढेल, जास्त प्रसन्न वाटेल.
सर्वांत महत्त्वाचे म्हणजे बाळाच्या व स्वतःच्या बाबतीत तब्येतीच्या शंका फक्त डॉक्टरांनाच विचाराव्यात.
मातृत्व हा आनंददायी अनुभव आहे. पण अशास्त्रीय समजुती, स्वतःच्या शरीराबद्दल निर्माण होणारं औदासिन्य, काही गैरसमज, चुकीच्या सवयी यांमुळे हा आनंद तणावात रुपांतरित होऊ शकतो. त्यामुळेच काही मुलभूत गोष्टींबद्दल योग्य माहिती घेतली, आई आनंदी, तणावमुक्त राहू शकते.
 
बाळाच्याही आरोग्यासाठी आई खूश असणं चांगलंच आहे, नाही का!
 




Published By- Priya Dixit 
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

Tuesday Born Baby Girl Names मंगळवारी जन्मलेल्या मुलींसाठी शुभ नावे

Tuesday Born Baby Boy Names मंगळवारी जन्मलेल्या मुलांसाठी शुभ नावे

हिवाळा विशेष : चिकन सूप बनवण्याची सोप्पी पद्धत

वाट पाहणारं दार

वयानुसार दररोज किती मिनिटे चालावे?

पुढील लेख