Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कोणती पाणीपुरी खाल्ल्यानं कॅन्सर होऊ शकतो? त्यावर उपाय काय?

Webdunia
शनिवार, 13 जुलै 2024 (16:18 IST)
पाणीपुरी म्हणजे जवळपास सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय. स्ट्रीट फूडमध्ये सगळ्यात जास्त पसंती कुठल्या पदार्थाला असेल तर ती पाणीपुरीला. अनेकांच्या हृदयात आणि पोटातही पाणीपुरीसाठी एक विशेष जागा आणि प्रेम असतं.
 
पाणीपुरीवाल्याच्या भोवती दिसणारी गर्दी पाहून, लोकांचं पाणीपुरीवर किती प्रेम आहे, हे तर दररोज आपण सगळे बघतो.
 
पाणीपुरीचं वेड इतकं आहे, की लॉकडाऊन काळात बाहेर पडता येत नसल्यानं अनेकजण घरी पाणीपुरी बनवायला शिकले. त्या काळात Google India च्या डेटानुसार, पाणीपुरीच्या रेसिपीच्या सर्चमध्ये 107 टक्के वाढ झाली होती.
 
आता या आवडीच्या पाणीपुरीमध्ये असे काही धोकादायक घटक सापडले ज्यामुळे कॅन्सर होऊ शकतो? हे तुम्हाला सांगितलं तर पचणार नाही. पण, कर्नाटकच्या अन्न सुरक्षा विभागाच्या सर्वेक्षणात पाणीपुरीबद्दल काही गोष्टी समोर आल्या आहेत.
 
कर्नाटक अन्न सुरक्षा विभागाला पाणीपुरीत नेमकं काय सापडलं? त्या घटकांचा आरोग्यावर कसा परिणाम होतो? याबद्दल फूड टेक्नॉलॉजिस्ट काय म्हणतात?
 
फक्त पाणीपुरीच नाही, तर इतर स्ट्रीट फूडमध्ये वापरले जाणारे कुठले घटक धोकादायक असतात? त्याचा आरोग्यावर काय परिणाम होतो? याच प्रश्नांची उत्तरं येथे पाहूया
 
कर्नाटक अन्न सुरक्षा विभागाला पाणीपुरीमध्ये कोणते धोकादायक घटक आढळले?
कर्नाटक सरकारच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, अन्न सुरक्षा विभागानं गेल्या पाच महिन्यात 4 हजार पदार्थांचे नमुने तपासले.
 
यामध्ये पाणीपुरीचे 260 नमुने होते. यापैकी 22 टक्के पाणीपुरीमध्ये कॅन्सरला आमंत्रण देणारे घटक सापडले आहेत.
 
यापैकी 41 नमुन्यांमध्ये कृत्रिम रंग आणि कॅन्सरला आमंत्रित करणारे घटक, तर 18 नमुने हे दूषित आढळून आले आहेत.
 
कर्नाटकच्या अन्न सुरक्षा विभागाचे आयुक्त के. श्रीनिवास यांनी इंडियन एक्सप्रेससोबत बोलताना म्हटलंय, की आम्हाला अनेक तक्रारी आल्या.
 
काही लोकांना स्ट्रीट फूड खाल्ल्यानंतर लोकांना जुलाब, उलट्या आणि आरोग्याच्या इतर तक्रारी जाणवत होत्या. त्यानंतर अन्न सुरक्षा विभागानं कृत्रिम रंग वापरणाऱ्या हॉटेल आणि हातगाड्यांवर कारवाई केली. यामध्ये पाणीपुरीमध्ये कृत्रिम रंगाचा वापर करण्यात आला.
 
तसेच याआधीसुद्धा कबाब आणि गोभी मंचुरीयन, श्वॉर्मामध्ये देखील हे कृत्रिम रंग वापरले होते जे आरोग्यासाठी धोकादायक आहेत. हे कृत्रिम रंग वापरण्यावर बंदी घातली होती. पण, आता जुलै महिन्यात पाणीपुरीमध्ये कॅन्सरला आमंत्रण देणारे धोकादायक घटक आणि मानवी आरोग्याला धोकादायक असणारे जीवाणू आढळून आले आहेत.
 
पण, कर्नाटक सरकारनं एक आदेश काढून असे कृत्रिम रंग खाद्यपदार्थांमध्ये वापरण्यावर बंदी घातली आहे. कर्नाटक अन्न सुरक्षा विभागानं तपासलेल्या नमुन्यांमध्ये Tartrazine, Sunset Yellow, Rhodamine B आणि Brilliant Blue हे घटक आढळून आले आहेत. या घटकांमुळे कर्करोग होऊ शकतो किंवा त्यामुळे किडन्या निकामी होण्याचा धोका असतो.
 
तसेच कर्नाटकचे आरोग्य मंत्री दिनेश गुंडू राव यांनी एक्स समाजमाध्यवावर एक पोस्ट शेअर करत म्हटलंय, कॉटन कँडी, मंचुरीयन आणि कबाब यामध्ये कृत्रिम रंग वापरण्यास बंदी घातली असताना आता पाणीपुरीमध्येही धोकादायक घटक सापडले आहेत.
 
राज्यातल्या काही भागातले पाणीपुरीचे नमुने चाचणीसाठी पाठवले असता त्यामध्ये कॅन्सरला आमंत्रण देणारे धोकादायक घटक सापडले आहेत. असे पदार्थ विकणाऱ्यांवर कारवाई तर करू पण लोकांनी सुद्धा बाहेर खाताना काळजी घेतली पाहिजे असा सल्लाही त्यांनी दिला.
 
पण, कर्नाटक अन्न सुरक्षा विभागाला आढळेला Rhodamine B काय असतं आणि त्याचा वापर कोणत्या पदार्थात केला जातो याबद्दल आम्ही अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
 
याबद्दल न्युट्रीशनिस्ट डॉ. रेणुका माईंदे यांनी बीबीसी मराठीला सांगतिलं, ‘’Rhodamine B हा एक रासायनिक लाल रंग असून त्याचा वापर औद्यागिक रंग म्हणून केला जातो. पण, हा रंग नैसर्गिक रंगापेक्षा स्वस्त असल्यानं कँडी, चिकन टिक्का, पनीर टिक्का, बुढ्ढीचे बाल यामध्ये वापरला जातो. अशा रंग असलेल्या पदार्थांचं सेवन केल्यास अलर्जी होऊ शकते, आतड्यावर परिणाम होऊ शकतो तसेच अस्थमा देखील होण्याचा धोका असतो.’’
 
डॉ. रेणुका गेल्या 30 वर्षांपासून आहारतज्ज्ञ म्हणून काम करतात. त्यांनी मुंबई, औरंगाबाद, बडोदा या शहरात काम केल्यानंतर आता नागपुरात त्या कार्यरत आहेत.
 
कर्नाटक अन्न सुरक्षा विभागाच्या या सर्वेक्षणानंतर कृत्रिम रंगांमधील हे घटक किती धोकादायक असतात? आणि आणखी असे कोणते पदार्थ आहेत ज्यामध्ये असे कृत्रिम रंग वापरले जातात? त्याचे आरोग्यावर काय परिणाम होतात? याबद्दल आम्ही आणखी काही तज्ज्ञांशी बोललो.
 
कृत्रिम रंगांसह आणखी कोणकोणते घटक आरोग्यासाठी धाकोदायक असतात याबाबत नागपूर विद्यापीठाच्या फूड टेक्नॉलॉजिस्ट कल्पना जाधव सविस्तरपणे समजावून सांगतात.
 
त्या बीबीसी माठीसोबत बोलताना म्हणाल्या, ‘’पदार्थ आकर्षित दिसण्यासाठी केसरसारखे नैसर्गिक रंग वापरायला हवे. पण,आता नैसर्गिक रंगांऐवजी कृत्रिम रंग वापरले जातात. रसमलाई, मिठाईसह अनेक पदार्थांमध्ये कृत्रिम रंग वापरले जातात. पण, यामधील घटक कार्सिनोजेनिक असून त्यामुळे कॅन्सर होण्याचा धोका असतो."
 
"फक्त पदार्थ आकर्षित दिसण्यासाठीच नाहीतर पदार्थाला चव यावी म्हणून अजिनोमोटोचा वापर केला जातो. यात मोनो सोडियम ग्लुटामेट असतं. ते प्रमाणात वापरलं तर आरोग्यासाठी सुरक्षित आहे. पण, त्याचा जास्त वापर केला तर ते धोकादायक ठरू शकतं. ते देखील कार्सिनोजेनिक असतं ज्यामुळे किडन्यांवर आणि आतड्यांवर दुष्परिणाम होऊ शकतात. तसेच कुठलाही पदार्थ जास्त दिवस टिकून राहण्यासाठी प्रिझरव्हेटीव्हचा वापर केला जातो. ते सुद्धा आरोग्यासाठी धोकादायक असतात.’’
 
पाणीपुरीमध्ये कोणते धोकादायक घटक वापरले जातात?
हे झालं कॅंडी, चिकन टिक्का, कबाब यामध्ये वापरल्या जाणाऱ्या रंगाबद्दल. पण, पाणीपुरमध्ये असा कोणता रासायनिक घटक वापरला जातो ज्याचं सेवन केल्यानं कॅन्सरसारखा आजार होण्याची शक्यता असल्याचं कर्नाटक अन्न सुरक्षा विभागानं म्हटलंय.
 
याबद्दल डॉ. रेणुका माईंदे सांगतात, ‘’पाणीपुरीच्या पाण्याचा रंग हिरवा दिसतो. ते पुदीना आणि कोथिंबीर घालून हिरव्या रंगाचं पाणी तयार करणं अपेक्षित असतं. पण, कोथिंबीर आणि पुदीना याचा कमी वापर करून त्यात रासायनिक वापरासाठी तयार केलेला हिरवा रंग (पिवळा आणि केशरी रंग मिसळून हिरवा रंग तयार करतात त्याला Green Fast FCF म्हणतात) टाकला जातो. त्यामुळे अशी पाणीपुरी खाल्ल्यानं आरोग्यावर त्याचे वाईट परिणाम होतात. शिवाय पाणी हे उकळलेलं नसतं आणि त्या पाण्याचा स्त्रोत देखील माहिती नसतो. पाण्यात बर्फ टाकला की आणखी धोकादायक जीवाणूंची वाढ होते. त्यामुळे जुलाब, उलट्यांचा त्रास होऊ शकतो.’’
 
यावर उपाय काय आहेत?
पण, आपल्या देशात पाणीपुरीचे चाहते कमी नाहीत. रस्त्यावर दिसणाऱ्या-पाणीपुरीच्या हातगाड्यांवर गर्दी दिसतेच. मग आपल्याला पाणीपुरीही खायची आहे आणि त्याचा आरोग्यावर वाईट परिणामही होणार नाहीत यासाठी काही उपाय आहेत का? तर ,
 
काही हातगाडे असतात ज्यावर FSAAI चे प्रमाणपत्र लावलेलं असतं. म्हणजे या हातगाड्यांवर काही प्रमाणात तरी FSAAI ने घालून दिलेले नियम पाळले जातात.
 
त्यामुळे अशा हातगाड्यांवर खायला हरकत नाही. दुसरं म्हणजे कृत्रिम रंग असणारे पदार्थ खाण्यापेक्षा जे खाण्यायोग्य नैसर्गिक रंग आहेत त्याचा वापर पदार्थांमध्ये करायला हवा.
 
जसे की बीटरुट, पालक, कोथिंबीर, गाजर यापासून तयार केलेले रंग हे खाण्यासाठी आणि आरोग्यासाठी अगदी उत्तम असतात. पण, आरोग्यावर कुठलाही परिणाम होऊ नये असं वाटत असेल तर सगळ्यात उत्तम उपाय म्हणजे पाणीपुरी घरी बनवून खाल्लेली कधीही उत्तम आहे, असाही सल्ला डॉ. माईंदे देतात.
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Margashirsha Purnima 2024: मार्गशीर्ष पौर्णिमेला लक्ष्मी देवीची कृपा मिळविण्यासाठी कोणते उपाय करावेत?

Annapurna Jayanti 2024: अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघरात किती दिवे लावावेत?

वृश्चिक राशीत बुधाचा उदय या राशींसाठी खूप शुभ राहील

बाळासाठी भगवान दत्तात्रेयाच्या नावावरुन सुंदर नावे

दत्त जयंती विशेष रेसिपी : सुंठवडा

सर्व पहा

नवीन

Christmas special : या रेसिपी नक्की बनवा

पपईच्या बिया जास्त खाणे हानिकारक असू शकते,सेवनाची योग्य पद्धत जाणून घ्या

तेनालीराम कहाणी : कावळे मोजणे

मिक्स व्हेजिटेबल पराठा रेसिपी

World Pancreatic Cancer Day मृत्यूचे सातवे सर्वात सामान्य कारण, आज जागतिक स्वादुपिंडाचा कर्करोग दिवस

पुढील लेख
Show comments