Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मोतीबिंदू का होतो? मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर काय काळजी घ्याल?

Webdunia
रविवार, 11 फेब्रुवारी 2024 (07:42 IST)
मोतीबिंदूची शस्त्रक्रिया ही एक महत्त्वाची शस्त्रक्रिया असून त्यात थोडासाही हलगर्जीपणा झाल्यास त्याचे दुष्परिणाम गंभीर दुष्पपरिणाम भोगावे लागू शकतात, रुग्णांना आपला डोळाही गमवावा लागू शकतो.
 
या लेखात आपण मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेपूर्वी आणि नंतर कोणती काळजी घ्यावी, मोतीबिंदू कसा ओळखावा आणि त्याची लक्षणं काय असतात याबद्दल जाणून घेणार आहोत.
 
मोतीबिंदू म्हणजे काय आणि तो कसा होतो?
अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ ऑप्थाल्मोलॉजीच्या मते, आपल्या डोळ्यात नैसर्गिक लेन्स (भिंग) असते.
 
आपल्या डोळ्यातील सर्वात शेवटचं अस्तर असलेलं रेटिना हे प्रकाशाच्या बाबतीत अतिशय संवेदनशील असतं.
 
डोळ्यातील या नैसर्गिक लेन्स डोळ्यांमध्ये प्रवेश करणाऱ्या प्रकाश किरणांना परावर्तित करतात, ज्यामुळे आपण स्पष्टपणे पाहू शकतो. त्यामुळे या लेन्स स्वच्छ असणं गरजेचं आहे.
 
साधारणपणे उतारवयात मोतीबिंदू होण्याची शक्यता जास्त असते. वयाच्या चाळीशीनंतर डोळ्यातील सामान्य बदलांमुळे मोतीबिंदू होतो.
 
मोतीबिंदू झाल्यावर डोळ्याच्या लेन्समधील फायबर पांढरट होऊ लागतात. त्यामुळे रूग्णांना धुसर दिसू लागतं.
 
साधारणपणे वयाची साठी ओलांडलेल्या लोकांना हा त्रास होऊ लागतो आणि काही वर्षांनी दृष्टी अंधुक होते.
 
मोतीबिंदूच्या सुरुवातीच्या टप्प्यात काही विशेष समस्या जाणवत नाहीत. सुरुवातीला हा धूसरपणा लेन्सच्या फक्त एका छोट्या भागावर परिणाम करतो. मात्र हा धूसरपणा हळूहळू वाढत जातो आणि लेन्स मोठ्या प्रमाणावर प्रभावित होतात. ज्याचा दृष्टीवर परिणाम होतो.
 
रेटिनापर्यंत पोहोचणाऱ्या प्रकाशाचं प्रमाण कमी झाल्यास दृष्टी धूसर आणि कमजोर होते.
 
मोतीबिंदू एका डोळ्यातून दुसऱ्या डोळ्यात पसरत नाही. मात्र, अनेकांना दोन्ही डोळ्यांमध्येही मोतीबिंदू होतो.
 
मोतीबिंदू होण्याची अनेक कारणं आहेत, जसं की:
 
वयाशी संबंधित मोतीबिंदू: बहुतांशवेळा मोतीबिंदू वयोमानामुळे होतो.
 
जन्मजात मोतीबिंदू: काही नवजात बालकांना जन्मजात मोतीबिंदू असतो. त्यामुळे काही मुलांमध्ये एका विशिष्ट काळानंतर ही समस्या उद्भवू लागते. काही लोकांना जन्मजात मोतीबिंदू असला तरी त्यांच्या दृष्टीवर त्याचा परिणाम होत नाही, तर काहींच्या होतो, त्यामुळे तो काढून टाकण्याची गरज असते
 
दुय्यम मोतीबिंदू: दुय्यम मोतीबिंदू सामान्यतः शरीरातील इतर विकारांमुळे (उदा. मधुमेह) होतो. स्टेरॉइडच्या वापरामुळेदेखील दुय्यम मोतीबिंदू होऊ शकतो.
 
आघातामुळे होणारा मोतीबिंदू: एका किंवा दोन्ही डोळ्यांना दुखापत झाल्यास मोतीबिंदू होऊ शकतो. अपघातानंतर किंवा त्यानंतर अनेक वर्षांनीसुद्धा मोतीबिंदू होऊ शकतो.
 
डोळ्यांचे डॉक्टर मोतीबिंदूची तपासणी कशी करतात?
तुमचं वय 60 किंवा त्याहून अधिक असल्यास, दर एक-दोन वर्षांनी डोळ्यांची तपासणी करायला हवी, असं डॉक्टराचं सांगतात. डोळ्यांची तपासणी सोपी आणि वेदनारहित असते.
 
डॉक्टर तुमच्या डोळ्यात काही थेंब टाकतात, जेणेकरून डोळे नीट उघडू शकतील आणि त्यानंतर मोतीबिंदू आणि डोळ्यांशी संबंधित इतर समस्यांची पडताळणी करण्यासाठी डोळ्यांची तपासणी केली जाते.
 
मोतीबिंदूची लक्षणं कोणती?
धूसर दृष्टी
एखादी वस्तू अंधुक किंवा धूसर दिसणं.
रात्रीचं कमी दिसणे.
प्रकाशाचा सामना करणं कठीण जातं किंवा डोळे अधिक संवेदनशील होणं.
अतिशय चमकदार रंग फिकट आणि पिवळे दिसू लागणं.
यापैकी कोणतीही लक्षणं आढळल्यास ताबडतोब डोळ्यांच्या डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घ्यावी, असा सल्ला डॉक्टर देतात.
 
मोतीबिंदूची शस्त्रक्रिया कशी केली जाते?
डोळ्यांमधील नैसर्गिक लेन्स पारदर्शक असते, परंतु मोतीबिंदू झाल्याने ती अपारदर्शक किंवा ढगाळ बनते.
 
सुरत येथील नेत्रतज्ज्ञ महेंद्र चौहान त्यांच्या मते, बहुतेक मोतीबिंदू तीन प्रकारचे असतात:
 
एक, लेन्सच्या मध्यभागी मोतीबिंदू होतो.
 
दुसरा, लेन्सच्या मागच्या बाजूला देखील मोतीबिंदू होऊ शकतो.
 
तिसरा, डोळ्यांच्या बाह्य आवरणात (कॉर्टेक्स) मोतीबिंदू होऊ शकतो.
 
बीबीसीशी बोलताना डॉ. चौहान यांनी स्पष्ट केलं की, "मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेमध्ये बुब्बुळाच्या परिघाला छेद देऊन आतला मोतीबिंदू काढला जातो आणि आतमध्ये कृत्रिम लेन्स बसवली जाते. या कृत्रिम लेन्सला इंट्राओक्युलर लेन्स म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर, एका बॉलला छिद्र केलं जातं. एक सूक्ष्म हत्यार फिरवून मोतीबिंदूचा भुगा करतात व तो द्रवरुप करून शोषून घेतात. त्याच छोट्या छिद्रातून मग फोल्डेबल लेन्स आत टाकली जाते, जी पूर्वीच्या लेन्सची जागा घेते."
 
कृत्रिम लेन्सचे विविध प्रकार आहेत, असं ते सांगतात. उदा. तिरकस नंबराच्या लेन्स, दीर्घदृष्टीसाठीच्या लेन्स आणि बायफोकल लेन्स म्हणजेच ज्यातून दूरचं आणि जवळचंही दिसतं. त्याचप्रमाणे, तिरकसपणे, दूरचं आणि जवळचं पाहण्यासाठीच्या ट्रायफोकल लेन्सही असतात.
 
लेन्सचे अनेक प्रकार आहेत आणि रुग्णांच्या डोळ्यांच्या गरजेनुसार त्या बसवल्या जातात. त्याची किंमतही वेगवेगळी असते.
 
मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेपूर्वी कोणती खबरदारी घ्यावी?
हे तपशीलवार समजून घेण्यासाठी बीबीसीने अहमदाबादस्थित नेत्रतज्ज्ञ डॉ. परिमल देसाई यांच्याशी चर्चा केली. त्यांच्या आणि अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ ऑप्थाल्मोलॉजीच्या मते:
 
मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेपूर्वी रुग्णाचा मधुमेह आणि रक्तदाब सामान्य असणं गरजेचं आहे. त्यामुळे शस्त्रक्रियेपूर्वी रुग्णाचा रक्तदाब 180-200 च्या दरम्यान असावा.
रुग्णाने कोणत्याही प्रकारची अँटीबायोटीक्स घेणं टाळावं.
शस्त्रक्रियेपूर्वी, डॉक्टर डोळ्यातील सूक्ष्मजंतू नष्ट करण्यासाठी अँटीबायोटिक आय ड्रॉप्स देतात.
रुग्णाला उच्च रक्तदाबाचा त्रास असल्यास तो नियंत्रणात असणं देखील आवश्यक आहे.
मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेनंतर कोणती खबरदारी घ्यावी?
संसर्गाचा प्रसार टाळण्यासाठी स्वच्छता खूप महत्वाची आहे, असं डॉ. परिमल सांगतात.
 
मोतीबिंदू बहुतेकवेळा संसर्गामुळे होतो. ते टाळण्यासाठी काही सूचना पुढीप्रमाणे:
 
मधुमेह आणि रक्तदाब सामान्य पातळीवर ठेवावा.
रुग्णाने स्वतःची आणि आजूबाजूच्या परिसराची नेहमी स्वच्छता राखावी.
चेहऱ्याला साबण लावता कामा नये, साबण डोळ्यात जाणार नाही याची काळजी घ्यावी.
नखं कापलेली असावीत.
डोळ्यांना संसर्ग होऊ नये म्हणून नेहमी हातांची स्वच्छता राखावी.
शस्त्रक्रियेनंतर अंधत्व का येतं?
डॉ. महेंद्र चौहान बीबीसीशी बोलताना म्हणाले की, मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेनंतर संसर्ग हे अंधत्व येण्याचं मुख्य कारण आहे आणि घाणीमुळे संसर्ग होतो. डॉक्टरांकडून नवीन, निर्जंतुकीकृत सिरिंजचा वापर केला न जाण्याच्या साध्या चुकांमुळे डोळ्यांना संसर्ग होऊ शकतो.
 
अशा गोष्टींमुळे डोळ्यात बॅक्टेरिया किंवा बुरशीची वाढ होऊ शकते किंवा डोळ्यांमध्ये जळजळ होऊ शकते. अशा परिस्थितीत अंधत्व येतं, ज्याला एंडोफ्थाल्मिटिस म्हणतात.
 
रुग्णालयात कोणत्या मूलभूत सुविधा असाव्यात?
शस्त्रक्रियेनंतर डोळ्यांना संसर्ग होऊ नये म्हणून डॉक्टर रुग्णांना काही सल्ले देतात.
 
डॉ परिमल म्हणतात, “ज्या ठिकाणी तुम्ही शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला आहे तिथे काही मूलभूत सुविधा असाव्यात, जसं की हॉस्पिटलची स्वच्छता, प्रत्येक रुग्णाची तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी हातमोजे बदलणे, डॉक्टर वापरत असलेल्या प्रत्येक साधनाचं निर्जंतुकीकरण करणं, रुग्णालयात वापरली जाणारी डिस्पोजेबल्स चांगल्या दर्जाची असावीत."
 
ते पुढे म्हणतात, "बहुतेकवेळा रुग्णालयात एकाच दिवसात मोठ्या संख्येने शस्त्रक्रिया पार पाडण्याचा प्रयत्न केला जातो, ज्या मोतीबिंदूला कारणीभूत ठरतात. रुग्णालयं त्यांच्या ऑपरेशन थिएटरचं योग्य प्रकारे निर्जंतुकीकरण करत नाहीत आणि त्यांची उपकरणं देखील निकृष्ट दर्जाची असतात.”
 
Published By- Priya Dixit 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

संबंधित माहिती

Potato Price: बटाट्यामुळे बिघडणार घराचे बजेट, महाग होण्याची शक्यता

नाशिक लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज यांच्यावर ईव्हीएमला हार घातल्या प्रकरणी गुन्हा दाखल

263 कोटी टीडीएस घोटाळा प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने आणखी एक अटक केली

अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट,आप'चा भाजपवर मोठा आरोप

IPL 2024: कोलकाता नाईट रायडर्सचा (केकेआर) सामना सनरायझर्स हैदराबादशी होणार,हेड आणि नरेन यांच्यात रोमांचक लढत

झोपण्यापूर्वी दुधात या 2 गोष्टी मिसळा, सकाळी सहज साफ होईल पोट!

उन्हाळ्यात वॅक्सिंग केल्यानंतर पुरळ आणि खाज येण्याच्या समस्येपासून या उपायांमुळे आराम मिळतो

कुंजल क्रिया म्हणजे काय? त्याचे 10 सर्वोत्तम फायदे जाणून घ्या

Anniversary Wishes For Husband In Marathi पतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

सासूसोबत पटवून घेतात या 4 राशींच्या मुली

पुढील लेख