Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मनाचा संयम

Webdunia
शनिवार, 12 जून 2021 (12:17 IST)
एका नगरात एक विणकर राहत होता. अत्यंत शांत, विनम्र आणि प्रामाणिक माणूस अशी त्याची ख्याती होती. त्याला क्रोध म्हणून कधी येत नसे, तो नेहमी हसतमुख बसलेला दिसे. एकदा काही टवाळखोर  पोरांनी त्या विणकराची छेड काढायची ठरवली. त्याला पिसाळून सोडल्यावर तरी तो रागावतो की नाही हे त्यांना पहायचे होते. त्या टवाळ पोरांमध्ये एक बलाढ्य धनिकाघरचा लक्ष्मीपुत्र होता. तो पुढे झाला, तिथे ठेवलेली साडी हातात घेत त्याने प्रसन्न मुद्रेतील विणकरास विचारले की, 'ही साडी केव्हढयाला द्याल ?'
विणकर उत्तरला - 'अवघे दहा रुपये !'
 
त्याचं उत्तर ऐकताच त्याला डिवचण्याच्या हेतूने त्या घमेंडी मुलाने त्या साडीचे दोन तुकडे केले. त्यातला एक तुकडा हातात धरला आणि पुन्हा प्रश्न केला - 'माझ्याकडे तितके पैसे नाहीत, आता त्यातले निम्मे वस्त्र माझ्या हातात आहे. याची किंमत किती ?'
अगदी शांत भावात विणकर बोलला - 'फक्त पाच रुपये !'
 
त्या मुलाने त्याचेही पुन्हा दोन तुकडे केले. आणि पुन्हा प्रश्न केला की, 'आता याची किंमत किती ?'
प्रसन्न वदनी विणकर म्हणाला - 'अडीच रुपये !'
 
तो पोरगा त्या साडीचे तुकडयावर तुकडे करत गेला आणि त्या विणकराला त्यांची किंमत विचारत गेला. विणकर देखील त्याच्या प्रत्येक प्रश्नाला न चिडता शांत चित्ताने उत्तर देत गेला. 
तुकडे करून कंटाळलेला तो पोरगा अखेर म्हणाला - 'आता या साडीचे इतके तुकडे झालेत की याचा मला काही उपयोग नाही. सबब ही साडी मी घेत नाही.'
यावर विणकराने मंद स्मितहास्य केले. तो म्हणाला - 'बाळा हे तुकडे आता जसे तुझ्या कामाचे राहिले नाहीत तसेच ते माझ्या उपयोगाचे उरले नाहीत. पण असू देत. तू जाऊ शकतोस...'
त्या विणकराची ती कमालीची शांत वृत्ती, प्रसन्न चेहरा आणि क्षमाशीलता त्या मुलाच्या ध्यानात आली व तो ओशाळून गेला. 
 
तो खिशात हात घालत म्हणाला - 'महोदय, मी आपल्या साडीचे नुकसान केलेलं आहे. या साडीची किंमत मी अदा करतो. बोला याचे काय दाम होतात ?'
विणकर म्हणाला - 'अरे भल्या माणसा, तू तर माझी साडी घेतली नाहीस... मग मी तुझे पैसे कसे काय घेऊ शकतो ?'
आता त्या मुलाचा आपल्या पैशाचा अहंभाव जागृत झाला
मुलगा म्हणाला, 'महोदय तुम्ही नुसती रक्कम सांगा... मी ताबडतोब अदा करतो.. ह्या अशा साड्यांची असून असून किती किंमत असणार आहे ? तिची जी काही किंमत असेल ती मी सहज देईन, त्याने मला फरक पडणार नाही. कारण माझ्याकडे खूप पैसे आहेत. तुम्हाला मात्र एका साडीच्या नुकसानीने फरक पडू शकतो कारण तुम्ही गरीब आहात. शिवाय तुमचे नुकसान मी केलेलं असल्याने त्याचा तोटा भरून देण्याची जबाबदारीही माझीच आहे. तितकं तरी मला कळतं बरं का !'    
 
त्या मुलाचं पैशाची मिजास दाखवणारं वक्तव्य ऐकूनही विणकर शांत राहिला. काही क्षणात तो उत्तरला -  "हे बघ बाळा, तू हे नुकसान कधीच भरून देऊ शकणार नाहीस. तू नुसती कल्पना करून पहा की, एका शेतकऱ्याला मशागतीपासून ते कपाशीचं बीज रोवण्यापर्यंत कपाशी मोठी होईपर्यंत तिची काढणी होईपर्यंत किती श्रम घ्यावे लागले असतील. त्याने काढलेला कापूस व्यापाऱ्याने मेहनतीने विकला असेल. मग माझ्या शिष्याने अत्यंत कष्टपूर्वक त्यातून सुत कातले. मग मी त्याला रंग दिले, विणले, नवे रूप दिले . मग कुठे ही साडी तयार झाली. इतक्या लोकांची ही एव्हढी मोठी मेहनत आता वाया गेली आहे कारण कोणी हे वस्त्र परिधान केलं असतं, त्यातून अंग झाकलं असतं तर त्या कारागिरीचा खरा लाभ झाला असता. आता ते अशक्य आहे कारण तू तर त्याचे तुकडे तुकडे केले आहेत. हा तोटा तू भरून देऊ शकत नाहीस बाळा.' मंद स्वरात बोलणाऱ्या त्या विणकराच्या आवाजात क्रोध नव्हता की आक्रोशही नव्हता. दया आणि सौम्यतेने भारलेलं ते एक समुपदेशनच होतं जणू !
 
त्या मुलाला स्वतःची अत्यंत लाज वाटली. आपण या महात्म्याला विनाकारण त्रास दिला, त्याचे वस्त्र फाडले, अनाठायी त्याचे नुकसान केले. याचे त्याला वाईट वाटू लागले. पुढच्याच क्षणाला त्याने त्या विणकराच्या चरणांवर आपलं मस्तक टेकवलं आणि म्हणाला, 'हे महात्मा मला माफ करा. मी हे जाणीवपूर्वक केलं याची मला अधिक शरम वाटत्ये आहे. मी आपला अपराधी आहे. आपण मला दंड द्या वा क्षमा करा.'
पुढे होत विणकराने त्या मुलाच्या पाठीवरून हात फिरवला आणि म्हणाला, 'हे बघ मुला. तू दिलेले पैसे मी घेतले असते तर माझे काम भागले असते. पण त्यामुळे भविष्यात तुझ्या आयुष्याची अवस्था या साडीसारखीच झाली असती. ते खूप देखणं असूनही त्याचा कोणालाही तिळमात्र उपयोग झाला नसता. एक साडी वाया गेली तर मी त्याजागी दुसरे वस्त्र बनवेन. पण अहंकाराच्या दुर्गुणामुळे तुझे आयुष्य एकदा धुळीस मिळाले की ते पुन्हा नव्याने कसे उभं करणार ? तुझा पश्चात्ताप या साडीच्या किंमतीहून अधिक मौल्यवान आहे.'......
 
आपल्या सर्वांच्या आयुष्यात आता थोडंफार सुख आलंय, काहीशी समृद्धी आलीय, खिशात बऱ्यापैकी पैसा खूळखूळतोय, आपल्या घरीही आपण घरी पैसा अडका बाळगून आहोत. थोडंसं स्थैर्य आपल्या सर्वांच्या आयुष्यात आलेलं आहे. आपल्यातल्या काहींना त्याच्या 'ग' ची बाधा ही झालीय. ही बाधा कुणाच्या कुठल्या कृतीतून कधी नी कशी झळकेल हे आजकाल सांगता येत नाही. आजकाल जो तो कसल्या न कसल्या तोऱ्यात आहे. अनेकांना कसली न कसली मिजास आहे, घमेंड आहे, गर्व आहे, अहंकार आहे, वृथा स्वाभिमान आहे. त्यामुळे इगोची निर्मिती मोठया प्रमाणात होते आहे. अशा सर्व सज्जनांना शीतल, सौम्य शब्दात अन कोमल स्वरात समजावून सांगेल असा तो विणकर आताच्या जगात नाहीये. तुमच्यापैकी कुणाला तो दिसला तर माझ्यासकट अनेकांच्या पत्त्यावर त्याला पाठवून द्या किंवा त्याचा पत्ता सांगा म्हणजे त्यांना भेटून आपले पाय कशाचे आहेत हे प्रत्येकाला नक्की उमजेल. 
 
दृष्टांतातले विणकर म्हणजे संत कबीरदास आहेत.. हे वेगळे सांगणे नको...
 
- सोशल मीडिया

संबंधित माहिती

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

Career in Master of Applied Management : मास्टर ऑफ अप्लाइड मॅनेजमेंट मध्ये करिअर करा

अचानक ब्लड प्रेशर वाढल्यास हा योगाभ्यास करणे

चविष्ट आलू जलेबी

Bra Wearing Benefits रोज ब्रा घालण्याचे हे फायदे तुम्हाला माहीत आहेत का?

बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर बनून करिअर करा, पात्रता जाणून घ्या

पुढील लेख
Show comments