Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

58 वर्षांपूर्वी म्हैस चोरल्याचा आरोप असणाऱ्या व्यक्तीला अशी झाली अटक

Webdunia
शुक्रवार, 15 सप्टेंबर 2023 (12:38 IST)
कर्नाटकातील बिदर येथे एका 78 वर्षीय व्यक्तीला एका म्हशीच्या चोरी प्रकरणात अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, हे प्रकरण 58 वर्षांपूर्वीचं असल्याने या प्रकरणाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
 
गणपती विठ्ठल वागोरे असं या ज्येष्ठ नागरिकाचं नाव असून त्यांच्यावर 1965 साली दोन म्हशी आणि एक रेडकू चोरल्याचा आरोप करण्यात आला आहे.
 
वागोरे यांना संबंधित प्रकरणात 58 वर्षांपूर्वी पहिल्यांदा अटक करण्यात आली होती. त्यावेळी त्यांच्याबरोबर दुसऱ्या एका आरोपीलाही अटक झाली होती.
 
अटकेनंतर काही दिवसांनी वागोरे यांना जामीन मिळाला. पण त्यानंतर ते फरार झाले. तर त्यांचा सहआरोपी 2006 साली मरण पावला.
 
गेल्या आठवड्यात वागोरे यांचा ठावठिकाणा आढळून आल्यानंतर त्यांना तत्काळ अटक करण्यात आली. पण त्यांचं वय विचारात घेता त्यांना जामिनावर मुक्त करण्यात आलं आहे.
 
खरं तर, म्हैस चोरीचं हे प्रकरण अनेक वर्षे थंड बस्त्यात गेलेलं होतं. पण गेल्या आठवड्यात बिदर पोलिसांनी जुन्या प्रलंबित प्रकरणांच्या फाईल्सचा निपटारा करण्याचं काम हाती घेतलं होतं.
 
या मोहिमेअंतर्गत, म्हैस चोरी प्रकरणाची 58 वर्षांपूर्वीची फाईल पुन्हा एकदा पोलिसांच्या समोर आली. या प्रकरणातील आरोपीला पकडण्याचा शेवटचा प्रयत्न म्हणून पोलिसांनी शोधाशोध सुरू केली.
 
1965 मध्ये बिदरमध्येच या म्हशींची चोरी झाली होती. या प्रकरणात गणपती विठ्ठल वागोरे आणि कृष्णा चंदर नामक दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली होती.
 
कोर्टात हजर केल्यानंतर दोघांनीही आपल्या गुन्ह्याची कबुलीही दिली होती. पुढे काही दिवसांनी दोघांची जामिनावर मुक्तता करण्यात आली होती.
 
तुरुंगातून बाहेर पडताच दोन्ही आरोपींनी पुढच्या नोटिशींना आणि अटक वॉरंटना प्रतिक्रिया देणं बंद केलं आणि ते गायब झाले.
 
यानंतर बिदर पोलिसांनी आजुबाजूच्या गावांमध्ये तपास पथकही पाठवलं. पण पोलीस त्यांना कधीच शोधू शकले नाहीत. अखेर, काही दिवसांनी या प्रकरणाची फाईल पोलिसांनी बंद केली होती.
 
मात्र, गेल्या आठवड्यातील घडामोडींनी हे प्रकरण पुन्हा पोलिसांसमोर आलं.
 
यासंदर्भात बीबीसी हिंदीला माहिती देताना बिदरचे पोलीस अधीक्षक चन्नबसवण्णा लंगोटी म्हणाले, “माझ्या सहकाऱ्यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. 1965 साली वागोरे याला धाराशिव जिल्ह्यातील उमरगा येथून अटक करण्यात आलेली होती. त्यामुळे उमरग्यातच त्यांची शोधाशोध सुरू करण्यात आली.”
 
ते पुढे सांगतात, “याच तपासादरम्यान एका महिलेने हे प्रकरण आठवत असल्याचं पोलिसांना सांगितलं. तसंच तिने वागोरे याच्याबाबतही माहिती पोलिसांना दिली.
 
“संबंधित व्यक्ती आता नांदेडच्या ठाकळगाव परिसरात राहतो, अशी टीपही त्या महिलेने पोलिसांना दिली. याच व्यक्तीच्या शोधात पोलीस गेली 50 वर्षे होते.”
 
पोलिसांच्या माहितीनुसार, “यानंतर त्यांनी ठाकळगावात आपलं पथक पाठवलं. त्याठिकाणी वागोरे हे एका मंदिरात राहत होते. वागोरे यांनी आपली ओळख पोलिसांसमोर उघड केली व आपणच तो आरोपी असल्याचं मान्य केलं. यादरम्यान वागोरे हे कोर्टात जाण्यासही घाबरत होते.”
 
अखेरीस, गणपती वागोरे यांना बिदरमध्ये आणण्यात आलं. त्यांना कोर्टात हजर करून अटकेची कारवाई करण्यात आली. नंतर वागोरे यांची परिस्थिती पाहून प्रशासनाकडूनच त्यांना वकील पुरवण्यात आला. शेवटी वयाचं कारण देत वागोरे यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात

ही एक पिशवी घराच्या मुख्य दारावर लावा, पैशाशी संबंधित समस्या दूर होतील

पेल्विक हेल्थचा मुलाच्या आरोग्यावर काय परिणाम होतो,निरोगी कसे ठेवायचे ते जाणून घ्या

Relationship : परस्पर समंजसपणाने नाते जपा

अकबर-बिरबलची कहाणी : लाटा मोजणे

पुढील लेख
Show comments