गुवाहाटी,मिझोरमच्या सीमेवर झालेल्या हिंसाचारात आसाम पोलिसांचे सहा अधिकारी शहीद झाले.आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी ही माहिती दिली.केंद्रीय गृहमंत्र्यांनी या संदर्भात मिझोरम आणि आसाम या दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी बोलून या वादाचा शांततेने तोडगा काढण्याची सूचना केली.
आसामच्या कछार जिल्ह्याच्या सीमा भागातून आणि मिझोरमच्या कोलासिब जिल्ह्यातील सीमाभागातून सरकारी वाहनांवर गोळीबार आणि हल्ले केल्याच्या बातम्या आहेत. या प्रकरणात दोन्ही राज्यांनी केंद्र सरकारचा हस्तक्षेप मागविला होता.
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी ट्विट केले आहे,“आसाम-मिझोरम सीमेवरील आमच्या राज्याच्या घटनात्मक सीमेचे रक्षण करताना आसाम पोलिसांचे 6 शूर जवानांनी आपले प्राण गमावल्याची माहिती मिळाली. मला फार वाईट वाटले. शोकग्रस्त कुटुंबांबद्दल माझ्या मनःपूर्वक संवेदना''
मिझोरम म्हणाले की, आसाम पोलिसांनी सीमा ओलांडल्यावर कोलासिबमधील पोलिस चौकीपर्यंत पोहोचल्यानंतर हिंसाचार सुरू झाला आणि दोन राज्यांच्या पोलिसांनी केलेल्या कराराचा भंग केला. मिझोरम असेही म्हणाले की, आसाम पोलिसांनी राष्ट्रीय महामार्गावरील वाहनांचे नुकसान केले आणि राज्य पोलिसांवर गोळीबार केला.
मिझोरमचे गृहमंत्री लालचमलियाना म्हणाले, 'मिझोरम सरकार आसाम सरकारच्या अन्यायकारक कृत्याचा तीव्र निषेध करते'
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शिलॉंगमध्ये ईशान्य राज्यांच्या सर्व मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर दोन दिवसानंतर हा हिंसाचार झाला.न्यूज एजन्सी एएनआयने सूत्रांच्या हवाल्याने असे सांगितले की,अमित शहा यांनी सोमवारी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना बोलावून सीमाप्रश्न सोडवण्यास सांगितले.