बिपरजॉय चक्रीवादळ गुरुवारी (15 जून) रात्री गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील जाखू बंदरावर धडकलं. गुजरातच्या किनारपट्टी भागात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडतोय. या चक्रीवादळामुळे अनेक भागातील वीज गेली आणि अनेक विद्युत खांब उन्मळून पडलेत. "कच्छमध्ये वाऱ्याचा वेग ताशी 108 किमी आहे," असं गुजरातचे मदतकार्य आयुक्त आलोक पांडे यांनी गुरुवारी (15 जून) रात्री उशिरा सांगितलं.
गुजरातमधील 940 गावांमध्ये विजेचे खांब पडल्याची माहिती मिळाल्याचंही त्यांनी सांगितलं.
प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, काल (15 जून) रात्री उशिरापर्यंत वादळात किमान 20 जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.
गुजरात सरकारने आज, शुक्रवारी (16 जून) शाळा आणि इतर शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. चक्रीवादळानंतर मुसळधार पाऊस सुरूच राहणार असल्याचा अंदाज आहे.
हवामान खात्याचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी बिपरजॉय वादळाची माहिती देताना सांगितलं की, "वादळ जमिनीवर आदळताच त्याची तीव्रताही कमी झाली आहे. ते आता 'अत्यंत तीव्र चक्रीवादळ'वरून 'गंभीर चक्रीवादळ'मध्ये रुपांतरित झालं आहे. वाऱ्याच्या वेगाबद्दल बोलायचे झाले तर आता त्याचा वेग ताशी 105 ते 115 किमी इतका नोंदवला गेला आहे. उद्या सकाळपर्यंत त्याची तीव्रता आणखी कमी होईल आणि ते चक्रीवादळाच्या श्रेणीत जाईल.
"16 जूनच्या संध्याकाळपर्यंत हे वादळ डिप्रेशनमध्ये बदलेल," असंही महापात्रांनी सांगितलं.
जोरदार वाऱ्यामुळे ओखा आणि जामनगरमध्ये कोळशाच्या साठ्याला आग लागली, आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर कोळशाचा साठा जळून राख झाला.
रेल्वेने एकतर 70 हून अधिक गाड्या रद्द किंवा वळवल्या आहेत.