Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

समुद्रयान : समुद्राच्या पोटात 6 हजार मीटर खोल भारत पाठवणार यान, ही मोहीम काय आहे?

Webdunia
गुरूवार, 14 सप्टेंबर 2023 (16:47 IST)
-जान्हवी मुळे
महासागराच्या पोटातली रहस्य शोधण्यासाठी भारतानं समुद्रयान मोहीम आखली असून त्याअंतर्गत लवकरच एक पाणबुडी तीन भारतीयांना घेऊन खोल समुद्रात जाणार आहे. मत्स्य 6000 असं या पाणबुडीचं नाव आहे.
 
चंद्रयान, आदित्य L1 आणि गगनयान या भारताच्या अंतराळ मोहिमांसारखाच भारताचा हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे.
 
आजवर फारच थोड्या देशांना समुद्रात एवढ्य खोलवर माणसांना पाठवता आलं आहे. त्यामुळे समुद्रयान मोहीम यशस्वी ठरली तर भारत अमेरिका, रशिया, फ्रान्स, जपान आणि चीन या देशांच्या पंक्तीत जाऊन बसेल.
 
चेन्नईतल्या नॅशनल इन्स्टट्यूट ऑफ ओशन टेक्नॉलॉजी अर्थात NIOTनं या प्रकल्पाची आखणी केली असून या मोहिमेला इस्रोचाही हातभार लागला आहे.
 
समुद्रात सहा किलोमीटर खोलवर जाऊन अभ्यास करणं, तिथल्या जैवविवधेतची पाहणी करणं आणि तिथे असलेल्या साधनसंपत्तीचा भारताच्या विकासासाठी उपयोग करणं, असा साधारण या मोहिमेचा उद्देश आहे.
 
भारताचे केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्री किरेन रिजिजू यांनी 11 सप्टेंबर 2023 रोजी NIOT च्या चेन्नईतील मुख्यालयाला भेट दिल्यानंतर या मोहिमेसाठी भारत सज्ज असल्याचं सोशल मीडियावर म्हटलं आहे.
 
"समुद्रयान सागरी परिसंस्थेत व्यत्यय आणणार नाही. पण पंतप्रधान मोदींच्या ब्लू इकॉनॉमीच्या उद्दिष्टांना ही मोहिम बळ देईल."
 
थोडक्यात भारत एकाच वेळी ‘गगनयान’द्वारा अंतराळात आणि ‘समुद्रयान’द्वारा महासागरात मानवी मोहिमा पाठवण्यासाठी तयारी करतो आहे.
 
समुद्रयान काय आहे?
समुद्रयान प्रकल्प हा भारत सरकारच्या डीप ओशन मिशन या खोल महासागराच्या अभ्यासासाठीच्या मोहिमेचा एक महत्त्वाचा भाग आहे.
 
NIOT ही डीप ओशन मोहीम राबवत असून त्यावर एकूण 4,077 कोटी रुपयांचा खर्च होईल.
 
या मोहिमेअंतर्गत NIOTनं याआधी डिसेंबर 2022 मध्ये सागर निधी नावाचं जहाज मध्य हिंदी महासागरात पाठवलं होतं.
 
या जहाजावरील OMe 6000 AUV (ओशन मिनरल एक्सप्लोरर) या रोबॉटिक पाणबुडीनं 5,271 मीटर खोलवर जाऊन तिथे मँगनीज खनिजाचा शोध घेतला होता.
 
आता याच मोहिमेच्या पुढच्या टप्प्यात तिघा भारतीयांना घेऊन एक छोटी स्वयंचलित पाणबुडी म्हणजे सबमर्सिबल महासागरात खोलवर जाईल. या प्रकल्पाला समुद्रयान म्हणूनही ओळखलं जातं.
 
समुद्रयान मोहिमेविषयी प्राथमिक विचार 2019 पासूनच सुरू झाला होता. 2020 मध्ये त्यावर काम सुरू झालं आणि 2025-26 पर्यंत पाणबुडी प्रत्यक्षात खोलवर समुद्रात पाठवली जाणार आहे.
 
या पाणबुडीला माशासाठी वापरल्या संस्कृत शब्दावरून मत्स्य 6000 हे नाव देण्यात आलं आहे.
 
मत्स्य 6000 असं असेल
मत्स्य 6000 नाव अशासाठी कारण ही पाणबुडी समुद्रात सहा हजार मीटर (सहा किलोमीटर) खोलवर जाणार आहे.
 
सहा किलोमीटर खोलवर पाण्याचा दबाव सहाशेपट जास्त असतो. तो सहन करता यावा यासाठी टायटेनियमच्या मिश्रधातूचा वापर करून ही पाणबुडी उभारण्यात आली आहे.
 
2.1 मीटर व्यासाच्या या पाणबुडीत एक ऑपरेटर आणि आणखी दोघे अशी तीन माणसं एकावेळी बसू शकतात.
 
ही एक स्वयंचलित पाणबुडी असून ती पाण्याखाली 12 तास राहू शकेल.
 
पण आपात्कालीन स्थितीचा सामना करता यावा, यासाठी या पाणबुडीत 96 तासापर्यंत ऑक्सिजनचा पुरवठा होत राहील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.
 
भारतीय अंतराळ संस्था इस्रोच्या थिरुवनंतपूरममधील विक्रम साराभाई स्पेस सेंटरच्या सहाय्यानं ही पाणबुडी विकसित करण्यात आली आहे. वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये या पाणबुडीच्या तपासण्या सुरू आहेत.
 
समुद्रयान मोहीम का महत्त्वाची?
मत्स्य 6000 पाणबुडीवर संपर्कयंत्रणेसोबत वेगवेगळी शास्त्रीय उपकरणं लावलेली आहेत जी निरीक्षणं नोंदवू शकतात. तसंच पाणबुडीतल्या पथकाला महासागराच्या तळाचा थेट याची देही याची डोळा अभ्यास करता येईल.
 
समुद्रात निकेल, कोबाल्ट, मँगनीज, हायड्रोथर्मल सल्फाईड आणि दुर्लभ खनिजांचा शोध घेण्यात ही उपकरणं मदत करतील.
 
त्याशिवाय या भागातल्या सागरी प्रवाह आणि जैवविविधतेच्या अभ्यासाच्या दृष्टीनंही ही मोहीम महत्त्वाची मानली जाते आहे.
 
समुद्रयान मोहिमेद्वारा भारत आपली सागरी तंत्रज्ञानातली क्षमता सिद्ध करू शकेल. तसंच समुद्राविषयी लोकांच्या मनात जागरुकता निर्माण करण्यासाठीही या मोहिमेनं मदत होईल, अशी आशा केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्रालयानं व्यक्त केली आहे.
 
भारताच्या सागरी मोहिमांची सुरुवात 1980 च्या दशकात झाली. अरबी समुद्रात आणि हिंदी महासागरात खनिजाच्या साठ्यांचा शोध घेण्यासाठी भारतानं तेव्हा मोहिमा आखल्या होत्या.
 
पण आता पहिल्यांदाच समुद्रात एवढ्या खोलवर माणसांना प्रत्यक्ष पाठवून अभ्यास केला जाणार आहे.
 
मरिन बायॉलॉजिस्ट डॉ. अभिषेक साटम सांगतात, “आजवर भारतात समुद्राच्या अभ्यासासाठी जेवढ्या मोहिमा झाल्या आहेत, त्यात प्रामुख्यानं स्कूबा डायव्हिंगचा आधार घेतला गेला आहे. स्कूबा डायव्हिंग हे एकतर खार्चिक आहे. त्यामुळे अगदी ठराविक संस्थानाच ते परवडू शकतं.
 
“स्कूबा डायव्हिंग करताना ऑक्सिजन सिलिंडर घेऊन जेव्हा आपण एकदा पाण्याखाली जातो, तेव्हा तिथे साधारणपणे 45 मिनिटं ते एक तासच राहू शकतो. दिवसातून दोनदाच अशी डाईव्ह मारता येते, कारण माणूस पाण्याखाली जातो, तेव्हा त्याच्या शरिरात नायट्रोजनचं प्रमाण वाढतं आणि आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.”
 
थोडक्यात स्कूबा डायव्हिंग करताना अभ्यासासाठी कमी वेळ मिळतो आणि जास्त खोलवरही जाता येत नाही. त्यामुळे पाणबुडीच्या सहाय्यानं प्रत्यक्षात पाण्याखाली जाऊन अभ्यास करणं जास्त योग्य ठरतं.
 
समुद्राचा अभ्यास कशासाठी?
पृथ्वीचा 70 टक्क्यांहून अधिक भाग हा महासागरांनी व्यापला आहे. महासागरातल्या खोलवर असलेल्या जवळपास 80 टक्के भागापर्यंत अजूनही मनुष्याला पोहोचता आलं नाहीये.
 
त्यामुळे विज्ञानाला जितकी अंतराळाविषयी उत्सुकता आहे, तेवढंच कुतुहल समुद्राविषयीही वाटतं. पण वैज्ञानिक कुतुहलापलीकडे यात काही सामरिक कारणंही आहेत.
 
संयुक्त राष्ट्रांच्या कन्व्हेंशन ऑन द लॉ ऑफ सी नुसार कोणत्याही देशाच्या किनाऱ्यापासून 200 नॉटिकल मैल (230 मैल किंवा 370 किलोमीटर) अंतरावरचा भाग हा त्या देशाचं विशेष आर्थिक क्षेत्र (एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन किंवा EEZ) म्हणून ओळखला जातो.
 
या EEZ मध्ये येणाऱ्या महासागरावर, तिथल्या साधनसंपत्ती आणि जीवनावर त्या देशाचा अधिकार आहे असं मानलं जातं
 
भारताला साडेसात हजार किलोमीटरहून अधिक लांब समुद्रकिनारा लाभला आहे आणि भारताचं विशेष आर्थिक क्षेत्र 23 लाख 5,143 चौरस किलोमीटर एवढं आहे.
 
पण समुद्राच्या या बहुतांश भागाचा आजवर फारसा अभ्यास झालेला नाही.
 
अगदी बाँबे हाय सारख्या तेलविहीरी असोत वा सागरी अभ्यास मोहिमा, बहुतांश प्रकल्प हे काँटिनेंटल शेल्फ म्हणजे सागरमग्न खंडभूमीवरच आहेत.
 
काँटिनेंटल शेल्फ म्हणजे समुद्राच्या पाण्याखाली असलेला किनाऱ्यालगतचा तुलनेनं उथळ भाग. पण समुद्रयान मोहिम यापलीकडे जाऊन अभ्यास करणार आहे.
 
केवळ खनिजसंपत्तीसाठीच नाही तर जैवविविधतेच्या दृष्टीनं आणि हवामान बदलाचा सामना करण्यासाठीही समुद्र महत्त्वाचा आहे.
 
पृथ्वीवर कार्बन उत्सर्जनामुळे वाढलेल्या उष्णतेपैकी जवळपास 90 टक्के उष्णता महासागर शोषून घेतात.
 
अर्थात याचेही परिणाम जाणवू लागले आहेत. विशेषतः भारतासारख्या देशात, जिथे शेती आणि परिणामी अर्थव्यवस्था मान्सूनवर आणि मान्सून एकप्रकारे समुद्रावर अवलंबून आहे.
 
साहजिकच समुद्राचा अभ्यास करणं भारतासाठी महत्त्वाचं आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

पुढील लेख
Show comments