Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शरद पवार-नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट, नवाब मलिक म्हणाले...

Webdunia
शनिवार, 17 जुलै 2021 (18:40 IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आणि खासदार शरद पवार यांची भेट झाली. पंतप्रधान कार्यालयाने ट्वीटच्या माध्यमातून या भेटीची माहिती दिली आहे. दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी या भेटीचे कारण सांगितले.
 
राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे शिल्पकार असणारे पवार राष्ट्रीय पातळीवर विरोधकांची मोट बांधणार का अशा चर्चा गेले काही दिवस राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. याचवेळी पवार हे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार असणार अशाही शक्यता वर्तवल्या जात होत्या.
दरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये 47 मिनिटांची चर्चा झाली. कुठल्या मुद्द्यांवर चर्चा झाली हे आताच सांगता येणार नाही, अशी माहिती पवारांच्या निकटवर्तीयांनी दिली होती.
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी काल पवारांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली होती. तर शरद पवार यांनी शुक्रवारी संध्याकाळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली होती.
 
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी शरद पवार यांच्या नरेंद्र मोदी यांच्यासोबतच्या बैठकीबाबत स्पष्टीकरण दिलं.
 
शरद पवार आणि नरेंद्र मोदी भेटीवरून विविध अफवा पसरवल्या जात आहेत, त्यात काहीही तथ्य नाही, असं मलिक म्हणाले.ते पुढे म्हणाले, "दोन दिवसांपासून शरद पवार दिल्लीत आहेत. केंद्रीय मंत्री पूीयूष गोयल हे स्वतः शरद पवार यांना भेटण्यासाठी आले होते. ही एक सदिच्छा भेट होती.
 
एखादा नेता सर्वपक्षीय नेत्यांना भेटणं हे दिल्लीत नेहमीच होत असतं. शरद पवार ज्येष्ठ नेते असल्यामुळे पीयूष गोयल स्वतः त्यांना भेटायला आले होते. "
त्यानंतर, राजनाथ सिंह यांनी आयोजित केलेल्या बैठकीला शरद पवार उपस्थित होते.
 
या बैठकीला काँग्रेसचे नेते आणि माजी संरक्षण मंत्री ए. के. अँटोनीही उपस्थित होते. सीमेवरील परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी ही बैठक आयोजित केली होती. शरद पवार माजी संरक्षण मंत्री या नात्याने या बैठकीला उपस्थित राहिले होते.
 
त्यानंतर शरद पवारांनी पंतप्रधान कार्यालयाची वेळ मागितली होती. वेळ मिळाल्यानंतर त्यांनी मोदींची भेट घेतली.
 
बँकिंग विषयी समस्या मांडल्या
नवाब मलिक म्हणाले, या बैठकीत बँकेच्या नियमांसंदर्भात चर्चा झाली. रिझर्व्ह बँकेला खूप अधिकार देण्यात आले आहेत. नव्या नियमांमुळे सहकारी बँकांना मोठा फटका बसत आहे.
 
"सहकारी बँकेतून एखादा व्यक्ती कर्ज घेतो, त्यावेळी महाराष्ट्रातील कायद्यानुसार अडीच टक्के शेअर कॅपिटल त्यांना घ्यावा लागतो. पण कर्ज परत केल्यानंतर आपली शेअर कॅपिटलची रक्कम परत मिळावी अशी त्याची अपेक्षा असते. पण नव्या नियमांनुसार ती परत मिळू शकत नाही.
या पद्धतीमुळे एखादा उद्योजक सर्व शेअर खरेदी करून बँकेवर कब्जा करू शकतो. नव्या नियमांमुळे सहकारी बँकांच्या स्वायत्ततेवर गदा आली आहे. याविषयीचं निवेदन पवार यांनी पंतप्रधानांना दिलं. पंतप्रधान मोदींनी याविषयी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून योग्य निर्णय घेण्याचं आश्वासन दिलं आहे. "
 
कोव्हिड परिस्थितीसंदर्भात चर्चा
ते म्हणाले, "दोन्ही नेत्यांनी तसंच कोव्हिडच्या परिस्थितीवरही चर्चा केली. काल मोदींनी देशातील चार राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत याविषयी चर्चा केली होती."
 
"मुख्यमंत्री ठाकरे यांनी कोव्हिडसंदर्भात धार्मिक ठिकाणे आणि गर्दीच्या कार्यक्रमांविषयी एक राष्ट्रीय धोरण बनवण्याची मागणी केली होती. कारण वेगळ्या राज्यांतील वेगळ्या नियमांमुळे अडचणी होत आहेत. याकडेही शरद पवारांनी लक्ष वेधलं. तसंच लसपुरवठा सुरळीतपणे करण्याची मागणीही पवार यांनी मोदींकडे केली आहे."
 
"बैठकीनंतर अनेकजण गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट दिल्लीत झाली, या चर्चेत काहीही तथ्य नाही."
 
"मोदींसोबतची झालेली भेट ही फक्त बँकिंगमधील समस्यांसंदर्भात होती, याची काँग्रेस नेत्यांनाही कल्पना आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासोबतही याविषयी आधीच बोलणं झालं होतं. ही बैठक एकाएकी अचानक झाली, असं काहीही नाही.
 
बँकिंग समस्यांचा विषय गंभीर आहे. त्याचप्रमाणे कोव्हिडही गंभीर विषय आहे. या दोन्ही विषयांवर केंद्रीय पातळीवरून मार्ग निघेल, अशी अपेक्षा आहे."
 
तिसऱ्या आघाडीवरूनही पवार चर्चेत
महाविकास आघाडी आणि राज्यात विरोधी पक्ष असलेला भाजप यांच्यातील संबंध दुरावलेले आहेत. ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून तिढा निर्माण झाला आहे. केंद्राने मांडलेल्या कृषी कायद्यांसंदर्भातही मतभेद आहेत.
 
काही दिवसांपूर्वी राजकीय डावपेचकार प्रशांत किशोर यांनी दोनदा शरद पवार यांची भेट घेतली होती. 2024 निवडणुकांसाठी तिसरी आघाडी उभी राहणार का यासंदर्भातही चर्चेला उधाण आलं होतं.
नरेंद्र मोदी आणि पर्यायाने भाजपने मागच्या दोन निवडणुकांमध्ये बहुमत आपल्याकडे खेचलं आहे. देशभर त्यांचा असलेला दबदबा मोडून काढण्यासाठी प्रादेशिक आणि सर्वच पक्षांनी एकत्र येणं ही काळाजी गरज आहे, असं सगळ्याच विरोधी पक्षांना वाटतं.
 
त्यातच अशा आघाडीचं नेतृत्व करण्याची तयारी शरद पवारांनी कधी अप्रत्यक्ष तर कधी प्रत्यक्षपणे नेहमीच दाखवली आहे. पवारांचा अनुभव, त्यांचं नेतृत्व आणि कर्तृत्व तसंच राज्याबाहेरही असलेला राजकीय जनसंपर्क यांच्यामुळे अशी विरोधी पक्षांची मोट बांधण्यात ये यशस्वी होतील, असाही जाणकारांचा होरा होता.
 
त्यामुळे यावेळच्या बैठकीकडे सगळ्यांचं विशेष लक्ष होतं. पण, बैठकीपूर्वीच प्रशांत किशोर यांचं एनडीटीव्ही वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीतलं एक विधान माशी शिंकल्यासारखं होतं.
 
तिसरी किंवा चौथी आघाडी नरेंद्र मोदींना आव्हान देऊ शकेल असं मला वाटत नाही. माझं अशा कुठल्याही आघाडीबरोबर नातं नाही. इतिहास हेच सांगतो की, अशा प्रकारच्या आघाड्यांमध्ये सरकारला आव्हान देण्याची क्षमता नसते असं प्रशांत किशोर म्हणाले.
 
पवारांच्या निवासस्थानी झालेली बैठक राष्ट्र मंचाची असल्याचं स्पष्ट झालं होतं.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही दिल्लीत
विशेष म्हणजे शरद पवार यांच्या शुक्रवारी भाजपच्या बड्या नेत्यांच्या भेटीगाठी होत असताना माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीससुद्धा नवी दिल्लीतच होते.
यावेळी त्यांनी महाराष्ट्रातून केंद्रात मंत्री झालेल्या नारायण राणे, भारती, पवार, कपिल पाटील आणि भागवत कराड यांची भेट घेतली. फडणवीस यांनी शुक्रवारी रात्री उशिरा अमित शहा यांचीसुद्धा भेट घेतल्याचं वृत्त काही ठिकाणी छापून आलं. पण फडणवीस यांनी बीबीसीशी बोलताना मात्र शहा आणि त्यांची भेट झाली नसल्याचं म्हटलं आहे.

संबंधित माहिती

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

पुढील लेख
Show comments