Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कर्नाटक निवडणूक निकालाचा महाराष्ट्र आणि लोकसभा निवडणुकीवर काय परिणाम होईल?

Webdunia
शनिवार, 13 मे 2023 (21:50 IST)
कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मैदानात काँग्रेस पक्षाने बाजी मारली आहे. एकूण 224 मतदारसंघ असलेल्या कर्नाटक विधानसभेत काँग्रेसला एकहाती सत्ता मिळवण्यात यश मिळालं..
निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरील ताज्या माहितीनुसार, काँग्रेस पक्षाला आतापर्यंत 134 ठिकाणी विजय मिळाला आहे. तर 2 ठिकाणी काँग्रेस उमेदवार आघाडीवर आहेत.
 
दुसरीकडे, सत्ताधारी भाजपच्या वाट्याला आतापर्यंत 64 जागा आल्या आहेत. तर केवळ एका ठिकाणी भाजप उमेदवार आघाडीवर आहे.
 
काँग्रेसच्या दृष्टिकोनातून हा प्रचंड मोठा विजय म्हणता येईल. या निवडणुकीत मिळालेल्या विजयाने काँग्रेसमध्ये नक्कीच चैतन्य निर्माण होईल, असं मत तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहा वर्षांपूर्वी काँग्रेस मुक्त भारतचा नारा दिला होता. पुढील काही वर्षे काँग्रेस देशभरात कमकुवत झाल्याचं पाहायला मिळालं.
पण, गेल्या काही वर्षांत काँग्रेसने पुन्हा मुसंडी मारली असून अनेक मोठ्या राज्यांमध्ये त्यांनी सत्ता हस्तगत केली आहे.
 
आता आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच काँग्रेसने भाजपच्या ताब्यातील आणखी एक मोठं राज्य आपल्या ताब्यात घेण्यात यश मिळवलं.
 
काँग्रेसच्या या विजयाचा परिणाम आगामी काळात इतर राज्ये तसेच लोकसभा निवडणुकांमध्येही कशा प्रकारे दिसून येऊ शकतो, याविषयी आता चर्चा सुरू झाली आहे.
आता आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच काँग्रेसने भाजपच्या ताब्यातील आणखी एक मोठं राज्य आपल्या ताब्यात घेण्यात यश मिळवलं.
 
काँग्रेसच्या या विजयाचा परिणाम आगामी काळात इतर राज्ये तसेच लोकसभा निवडणुकांमध्येही कशा प्रकारे दिसून येऊ शकतो, याविषयी आता चर्चा सुरू झाली आहे.
 
निवडणुकीतील स्थिती काय?
224 विधानसभा मतदारसंघ असलेल्या कर्नाटकात काँग्रेस पक्षाने एकहाती बहुमत मिळवलं आहे.
 
निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरील आकडेवारीनुसार, काँग्रेसला कर्नाटकात 134 जागांवर विजय मिळाला.
 
तर भाजपने 64, जनता दल सेक्युलर पक्षाने 19 जागा जिंकल्या आहेत. याशिवाय, इतर पक्षांना 4 जागांवर विजय मिळाला आहे.
 
गेल्यावेळी म्हणजेच 2018 मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसला 80 जागा मिळाल्या होत्या. या निवडणुकीत भाजपने 104 तर जनता दल पक्षाने 37 जागा मिळवल्या होत्या.
 
निवडणुकीत भाजप मोठा पक्ष ठरला तरीही निकालानंतर त्यांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठीच्या राजकीय डावपेचात काँग्रेसने एच. डी. देवेगौडा यांना मुख्यमंत्रिपदासाठी पाठिंबा दिला होता.
 
मात्र, त्यानंतर एका वर्षातच झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर भाजपने मुख्यमंत्रिपद आपल्याकडे खेचून घेतलं.
 
त्याच्या चार वर्षांनंतर आता भाजपला सत्तेवर पाणी सोडावं लागलं आहे.
 
विशेष म्हणजे गेल्या वेळी सीमेवर राहिलेल्या भाजपला यंदा सपशेल पराभव पत्करावा लागला आहे.
 
'काँग्रेसचं मनोबल वाढेल'
2014 साली केंद्रात नरेंद्र मोदी यांचं सरकार स्थापन झाल्यापासून देशातील काँग्रेसची स्थिती प्रचंड नाजूक बनली आहे.
 
काँग्रेसने सुरुवातीला केंद्रातील सत्ता गमावली, त्यानंतर अनेक राज्यांमध्ये त्यांना सत्तेपासून दूर जावं लागलं. काही राज्यांमध्ये तर काँग्रेस पक्ष दुसऱ्या-तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला आहे.
 
अशा स्थितीत राजस्थान, छत्तीसगढ यांच्यासारख्या राज्यांमध्ये काँग्रेसला सत्ता हस्तगत करता आली.
गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात झालेल्या गुजरात विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसचा सुपडा साफ झाला होता. पण त्याच वेळी हिमाचल प्रदेशमध्ये मिळालेल्या विजयाने काँग्रेसला तारलं होतं.
 
यंदा कर्नाटकने काँग्रेसला विजयाची संजीवनी देण्याचं काम केलं आहे.
 
लोकमतचे सहयोगी संपादक आणि ज्येष्ठ पत्रकार सुनील चावके याबाबत म्हणतात, “कर्नाटकात काँग्रेसने नरेंद्र मोदी यांच्या भाजपला हरवण्याची किमया साधली आहे. मोदींच्या भाजपसमोर 135 पेक्षा जास्त जागांवर इतका मोठा विजय आजवर काँग्रेसला मिळवता आला नव्हता. पण ते त्यांनी कर्नाटकमध्ये शक्य करून दाखवलं.
 
याचाच अर्थ, एकजुटीने काम केलं तर काँग्रेसला भाजपविरोधात लढा देणं शक्य आहे, याचं उदाहरण कर्नाटकमध्ये दिसून आलं. या विजयाने काँग्रेसचा उत्साह नक्कीच वाढला असणार, असं ते म्हणतात.
 
“काँग्रेससाठी हे यश मनोबल वाढवणारं ठरेल,” असं मत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अभय देशपांडे यांनी याविषयी बोलताना केलं.
 
ते म्हणतात, आगामी काळात मध्य प्रदेश, छत्तीसगडसारख्या राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांना सामोरं जाण्यासाठी कर्नाटकच्या विजयाने काँग्रेसचं मनोबल वाढेल.
 
पराभूत मानसिकतेतून बाहेर येण्यासाठी कर्नाटक निवडणुकीतील विजय महत्त्वाचा ठरेल, असंही देशपांडे यांनी म्हटलं.
 
विधानसभा-लोकसभेचा पॅटर्न वेगळा
गेल्या वेळी झालेल्या लोकसभा निवडणुकीत कर्नाटकात भाजपला 28 पैकी 25 जागांवर विजय मिळाला. तर काँग्रेस आणि जनता दल आघाडीला एकूण 2 जागांवरच विजय मिळवता आला. तसंच 1 भाजप समर्थक अपक्ष उमेदवारही यामध्ये निवडून आला.
 
विशेष म्हणजे, लोकसभा निवडणूक पार पडली, त्यावेळी राज्यात जनता दल आणि काँग्रेस आघाडीचं सरकार होतं.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा लोकसभा निवडणुकीवर काही परिणाम होऊ शकतो का, या प्रश्नाचं उत्तर देताना अभय देशपांडे सांगतात, “कर्नाटकच्या विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीचा पॅटर्न नेहमीच वेगळा राहिलेला आहे.
 
2018 च्या निवडणुकीत भाजपला 36 टक्के मते मिळाली होती. तर एका वर्षाने झालेल्या लोकसभा निवडणुकीत 51 टक्के मते मिळाली. इतर निवडणुकांमध्येही अशीच स्थिती राहिलेली आहे.
 
गेल्या वेळी निवडणुकीनंतर जनता दल-काँग्रेसचं सरकार अस्तित्वात आल्यानंतर वर्षभर त्यांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं. आठ-दहा महिन्यातच त्यांच्याविरोधी मत तयार झालं, त्याचा परिणामही लोकसभेत दिसून आला होता.
 
यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसचं सरकार येणार हे स्पष्ट होतं, त्यामुळे हे पुढचा वर्षभर कशा प्रकारे कारभार करतात, यावरही काही गोष्टी अवलंबून असतील. काही प्रमाणात त्याचाही परिणाम लोकसभेवर दिसून शकेल. दुसरीकडे, भाजप या पराभवानंतर लोकसभेत कशा पद्धतीने उतरतं, ते पाहणंही महत्त्वाचं आहे, असं देशपांडे यांनी म्हटलं.
 
ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांच्या मते, "कर्नाटक विजयाने काँग्रेसचा आत्मविश्वास वाढणार आहे. या विजयामुळे आगामी निवडणुकांसाठी लागणारी रसद उभी करण्यात काँग्रेसला मदत मिळेल."
 
भाजपसाठी धोक्याची घंटा
दक्षिण दिग्विजयाचं स्वप्न पाहणाऱ्या भाजपसाठी कर्नाटकचा हा पराभव धोक्याची घंटा आहे, असं विश्लेषण लोकमते सहयोगी संपादक आणि ज्येष्ठ पत्रकार सुनील चावके यांनी केलं.
चावके यांच्या मते, “कर्नाटकमध्ये भाजपविरोधातील लोकांचा कल दिसून आला. हेच ट्रेंड पुढील वर्षापर्यंत कायम राहिल्यास आगामी लोकसभा निवडणुकीवर त्याचे परिणाम दिसू शकतात. त्याचा परिणाम कर्नाटकातील 25 जागांवरही दिसू शकतो.”
 
चावके पुढे म्हणतात, “उत्तरेतील राज्यांमध्ये विजय मिळवल्यानंतर भाजपची नजर दक्षिणेकडे आहे. दक्षिण दिग्विजयाचं प्रवेशद्वार म्हणून भाजप कर्नाटककडे पाहत असतो. पण यंदाचा हा पराभव त्यांच्यासाठी मोठा धक्का असेल. त्यांच्या दक्षिणस्वारीत यामुळे अडथळा निर्माण होणार आहे.
 
यामुळे, प्रत्येक वेळी हिंदू-मुस्लीम मुद्द्यावर निवडणूक लढवणं, पुरेसं नसल्याचा धडा भाजपला मिळाला असेल, असं सुनील चावके यांनी म्हटलं.
 
महाराष्ट्रावरील परिणाम काय?
ज्येष्ठ पत्रकार सुनील चावके यांच्या मते, कर्नाटक हे महाराष्ट्राचं शेजारचं राज्य असल्याने त्याचे काही ना काही परिणाम महाराष्ट्रात दिसू शकतात.
 
सध्या महाराष्ट्रात एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि भाजप यांची सत्ता आहे. महाराष्ट्रात 48 पैकी जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे, पण काँग्रेसने जोमाने लढत दिली तर त्यांच्या मनसुब्यावर पाणी फेरलं जाऊ शकतं. त्याची प्रचिती कसबा पोट-निवडणुकीतून आली होती. मात्र, त्यासाठी काँग्रेससह महाविकास आघाडीने एकदिलाने काम करण्याची गरज आहे, असं चावके यांनी म्हटलं.
 
ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई याबाबत म्हणतात, "महाराष्ट्रात पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला 36 जागांवर विजय मिळू शकतो, असं एका सर्व्हेमधून पुढे आलं होतं. कर्नाटकातील विजयामुळे आघाडीत जास्तीत जास्त जागा मिळवण्यासाठी काँग्रेस आता प्रयत्न करू शकतो.
 
त्यांच्या मते, "लोकसभा निवडणुकीव्यतिरिक्त विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसची बार्गेनिंग पॉवर यामुळे वाढली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने कर्नाटकात निवडणूक लढवली होती. पण तिथे ते काहीही करू शकले नाहीत. त्यामुळे महाराष्ट्रात काँग्रेसच्या शब्दाला आता वजन प्राप्त होणार आहे. शिवाय देशाच्या इतर भागातही इतर पक्ष आघाडी-युती करताना काँग्रेसला डावलू शकणार नाहीत. एकत्रित लढल्याचे परिणाम त्यांच्यासाठी फायद्याचे असू शकतात."
 
अभय देशपांडे यांच्या मते, "कर्नाटक निवडणुकीचा महाराष्ट्रावर काय परिणाम दिसेल, हे आता लगेच सांगता येणार नाही. कारण महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीला अद्याप दीड वर्षाचा कालावधी बाकी आहे.
 
दरम्यान, पुढच्या वर्षी लोकसभा निवडणूकही आहे. त्यामुळे कर्नाटक निवडणुकीपेक्षाही पुढील वर्षीच्या लोकसभा निवडणुकीचा महाराष्ट्र निवडणुकीवर परिणाम दिसण्याची जास्त शक्यता निर्माण होते.
 
आगामी काळात महाराष्ट्रात महापालिकांच्या निवडणुका होतील. त्यामध्ये मिळणारं यश-अपयश लक्षात घेऊन महाराष्ट्रातील निवडणुका लोकसभेसोबत घ्यायच्या किंवा नाही, याबाबतही निर्णय होऊ शकतो. त्यामुळे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवर कर्नाटकातील काँग्रेस विजयाचा परिणाम होईल किंवा नाही, हे अद्याप सांगता येणार नाही, असं अभय देशपांडे यांना वाटतं.
 


Published By- Priya Dixit 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

22 डिसेंबर रोजी कालाष्टमी व्रत, या दिवशी 4 शुभ योग तयार होत आहेत, तिप्पट फळ मिळणार

जुन्या कपड्यांचा पोछा वापरल्याने दुर्दैव येते का?

चांगल्या झोपेसाठी या गोष्टी करा, तुमचे आरोग्यही चांगले राहील

Christmas special : या रेसिपी नक्की बनवा

रावणाचा भाऊ कुंभकरण खरोखरच इंजिनिअर होता का?

पुढील लेख
Show comments