Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

वायू प्रदूषणापासून स्वतःला वाचवण्यासाठी कोणता मास्क वापरावा? वाचा

Webdunia
मंगळवार, 7 नोव्हेंबर 2023 (10:01 IST)
आशय येडगे
 वायू प्रदूषणामुळे मुंबई-दिल्लीसारख्या शहरांमध्ये राहणाऱ्या माणसांचा श्वास कोंडला जातोय. जगातल्या सगळ्यात जास्त प्रदूषित शहरांमध्ये दिल्ली पहिल्या क्रमांकावर आलीय.
 
महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागाने राज्यातल्या सतरा शहरांना वायू प्रदूषणाबाबत खबरदारी पाळण्याचे आदेशही दिले आहेत.
 
त्यानुसार नोव्हेंबर 2023 पासून राज्यात विविध शहरांमधील हवेची गुणवत्ता खराब झाल्यामुळं उपाययोजना करण्याचा सल्ला या आदेशात देण्यात आलेला आहे.
 
जगातल्या सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीमध्ये भारतातल्या तीन शहरांनी नंबर लावलाय. दिल्ली, मुंबई, कोलकाता.
 
दिल्लीची हवा इतकी खराब आहे की इथे सुरू असलेले वर्ल्ड कपचे सामने दुसरीकडे हलवावे लागतील की काय अशी चिंता आहे.
 
मुंबईतही हवा इतकी वाईट झाली की एरव्ही विमानातून दिसणारा सी-लिंक आता रस्त्यावरूनही दिसू शकत नाही
 
मुंबई, दिल्लीसारखी शहरं का गुदमरतायत?
वायू प्रदूषणाबद्दल बोलताना तुम्ही AQI, PM2.5, PM 10 असे शब्द ऐकले असतील. या बाराखडीचा अर्थ काय ते आधी समजून घेऊ.
 
एखाद्या ठिकाणची हवा प्रदूषित आहे की शुद्ध हे सांगण्यासाठी तिचा गुणवत्ता निर्देशांक म्हणजे Air Quality Index तपासला जातो. एखाद्या ठिकाणचा एक्यूआय जेवढा जास्त, तेवढीच तिथली हवा जास्त प्रदूषित.
 
एक्यूआयचे सहा टप्पे केलेत. जर हा आकडा 0 ते 50 इतका असेल तर हवा चांगली आहे असं म्हणता येईल.
 
एक्यूआय 51 ते 100 असेल तर हवेची गुणवत्ता 'समाधानकारक' असल्याचं मानलं जातं.
 
हा आकडा 100 ते 200 मध्ये असेल तर हवा मध्यम प्रदूषित मानली जाते, 200 ते 300 असेल तर खराब, 300 ते 400 असेल अत्यंत खराब आणि 400 ते 500 असेल तर गंभीर परिस्थिती असल्याचं सांगितलं जातं.
 
एखाद्या शहरात हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक 'खराब ते गंभीर' या श्रेणीत असेल तर संसर्ग झालेल्या लोकांमध्ये विकृती आणि मृत्यूचं प्रमाण वाढू शकतं अशी माहिती सरकारच्या या आदेशात देण्यात आलेली आहे.
 
सध्याचे आकडे पाहिले तर मुंबईतील परिस्थिती मध्यम प्रदूषित असून ती वेगाने खराब होत आहे आणि दिल्लीतली परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याचं दिसतंय.
 
एकूणच काय तर देशाची राजधानी आणि आर्थिक राजधानी असणाऱ्या शहरांमध्ये राहणारे लोक अत्यंत प्रदूषित वातावरणात राहत आहेत हे स्पष्ट झालंय.
 
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, विविध प्रदूषकांचं हवेतील प्रमाण एकत्र करून एकाच आकड्यात किंवा रंगात सांगण्यासाठी AQI वापरलं जातं.
 
aqi.in या वेबसाईटवर तुम्ही भारतातील सर्व शहरांचा रिअल टाइम एक्यूआय तपासू शकता.
 
हवेतले कोणते घटक प्रदूषण करतात?
हवेत PM2.5 आणि PM 10 अशी दोन प्रमुख प्रदूषकं असतात. या कणांच्या आकारावरून त्यांना नावं मिळाली.
 
अडीच मायक्रॉनपेक्षा कमी व्यास असणाऱ्या कणांना PM2.5 म्हणतात तर 2.5 ते 10 मायक्रॉन एवढा आकार असणाऱ्या प्रदूषकांना PM10 असं म्हणतात.
 
विशेष म्हणजे हे कण उघड्या डोळ्यांना दिसत नाहीत. त्यामुळे ते अगदी सहज तुमच्या नाकातून किंवा घशामधून तुमच्या शरीरात जातात.
 
त्यांच्यामुळे दमा, हृदयविकार, ब्राँकायटिस आणि श्वसनाचे इतर आजार होऊ शकतात.
 
यासोबतच नायट्रोजन डायऑक्साईड, ओझोन, कार्बन, सल्फर डायऑक्साईड हे घटक देखील वायू प्रदूषणात भर टाकत असतात.
 
मास्क वापरून प्रदूषणापासून रक्षण होतं का?
कोरोनाकाळात आपल्या प्रत्येकाच्या तोंडावर मास्क होते. कधी कापडी, कधी सर्जिकल तर कधी N-95. हे मास्क आता हवेच्या प्रदूषणापासून आपल्याला वाचवू शकतात का?
 
तज्ज्ञ म्हणतात की साधे कापडी किंवा सर्जिकल मास्क वायू प्रदूषणापासून तुमचं संरक्षण करू शकत नाहीत. एन-95 किंवा एन-99 हे मास्क वापरले पाहिजेत असं तज्ज्ञांचं मत आहे.
 
अर्थात N95 मास्क PM 2.5 आणि PM 10 पासून वाचवत असला तरी SO2, NO2 आणि Ozone सारख्या सल्फर डायऑक्साइड, नायट्रोजन डायऑक्साइड आणि ओझोन प्रदूषकांपासून ते संरक्षण देत नाहीत असंही अमेरिकेची नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनने म्हटलंय.
 
प्रदूषणापासून वाचण्यासाठी काही सोपे उपाय
हिवाळा आला की दिल्लीची हवा गुदमरते आणि दिल्ली सरकार गाड्यांना ऑड इव्हन धोरण लागू करतं. पण इतक्याने गोष्टी भागत नाहीत.
 
महाराष्ट्र सरकारने वायू प्रदूषणापासून वाचण्यासाठी काही मार्गदर्शक तत्वं जाहीर केली आहेत.
 
संथ आणि रहदारी असणारे रस्ते, प्रदूषणकारी उद्योग असणारे प्रदेश, बांधकाम पाडण्याची ठिकाणं, कोळशावर आधारित उद्योग अशा उच्च प्रदूषण असणाऱ्या ठिकाणी जाणं टाळलं पाहिजे.
हवेची गुणवत्ता वाईट असेल तर बाहेर जाणं टाळा.
सकाळी आणि संध्याकाळी घरांचे दरवाजे आणि खिडक्या बंद ठेवा.
लाकूड, कोळसा आणि इतर बायोमास जाळू नये. वीज, गॅस अशी स्वच्छ इंधनं वापरा. फटाके फोडणं टाळा.
सिगारेट, बिडीसारख्या तंबाखूजन्य पदार्थांचं सेवन टाळा.
बंद आवारात डासांच्या कॉईल आणि अगरबत्ती जाळणं टाळावं.
ज्यांना दम लागणं, चक्कर येणं, खोकला, छातीत दुखणं अशी लक्षणं दिसत असतील त्यांनी लगेच वैद्यकीय मदत घ्यावी.
लहान मुलं, गरोदर स्त्रिया आणि ज्येष्ठ नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी?
फुफ्फुसाचे तीव्र आजार, हृदय वाहिन्यांशी संबंधित समस्या इत्यादी आजार असलेल्या रुग्णांनी अधिक काळजी घेतली पाहिजे.
 
एक्यूआय पातळी खराब असेल तर कोणतंही कष्टाचं काम करू नये. डॉक्टरांनी दिलेल्या सूचनांचं पालन करावं.
 
शक्य असल्यास एन-95 किंवा एन-99 मास्क वापरावा. प्रदूषणात कमी वेळ बाहेर जाणार असाल तर हे मास्क तुम्हाला उपयोगी ठरू शकतात.
 
कागदी मास्क, रुमाल, स्कार्फ आणि कापड प्रभावी नाहीयेत. शक्य असेल तर एअर प्युरिफायरचा वापर करावा.
 
त्यासोबत दिलेल्या निर्देशांचं पालन करून प्युरिफायरचे फिल्टर आणि इतर भाग बदलले पाहिजेत. ओझोनचं उत्सर्जन करणारे एअर प्युरिफायर वापरणं टाळलं पाहिजे. कारण यामुळे घरगुती प्रदूषणात वाढ होते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कातरवेळ म्हणजे नेमकी कोणती? या दरम्यान काय करावे?

आयुष्य संकटांनी वेढलेले आहे, त्यामुळे सोमवारी करा हे सोपे उपाय

हे 5 रत्न करतील रातोरात श्रीमंत !

केळी सतत 30 दिवस खा, तुमच्या आरोग्यासाठी हे 3 आश्चर्यकारक फायदे होतील!

मुरमुरे अप्पे रेसिपी

पुढील लेख