Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा रेड अलर्ट आहे?

Webdunia
शुक्रवार, 26 जुलै 2024 (14:36 IST)
दोन दिवसांच्या जोरदार पावसानंतर आज पुण्यासह राज्यातील पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.सध्या फक्त पुण्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यात पावसाचं वातावरण पाहायला मिळत आहे. पुण्यासह कोकण, नाशिक भागातही पाऊस आहे.

किनारपट्टीच्या भागातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळं संपूर्ण राज्यात ढगाळ वातावरण असून पाऊस पडत असल्याचं पुणे हवामान विभागाचे कृष्णानंद होसाळीकर यांनी बीबीसीबरोबर बोलताना सांगितलं.
शुक्रवारी (26 जुलै) पुन्हा एकदा कोकणासह, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता असल्याचं ते म्हणाले. तर मराठवाड्यात हलका ते मध्यम पाऊस आणि विदर्भात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
आणखी दोन ते तीन दिवस राज्यात पाऊस सक्रिय राहील पण त्याचं प्रमाण कमी होणार असल्याचंही होसाळीकर यांनी सांगितलं आहे.
बुधवारी रात्री (24 जुलै) आणि गुरुवारी पुणे आणि आसपासच्या जिल्हांत जोरदार पाऊस झाला.भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसर आणि पुणे शहरातील शाळा 25 जुलै रोजी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी दिले होते.
 
खडकवासला धरणातून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा विसर्ग कमी करून सकाळी 7 वाजता 13 हजार 981 क्यूसेक करण्यात आला.त्यात पावसाच्या प्रमाणानुसार व पाण्याची आवक पाऊन बदल केला जाऊ शकतो, असं सांगण्यात आलं आहे.
 
मुळशी धरणातून सुरू असलेला 10 हजार 700 क्यूसेक विसर्ग स्थिर आहे. पाऊस वाढल्यास विसर्गात वाढ होऊ शकते, त्यामुळं परिसरातील नागरिकांनी खबरदारी बाळगावी असं सांगण्यात आलं आहे.
याशिवाय, पालघर, ठाणे, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर, रायगड हे जिल्हे तसंच सातारा आणि पुण्याच्या घाट भागात रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर, रत्नागिरी, नाशिक, कोल्हापूरमध्ये ऑरेंज अलर्ट आहे.

26 जुलै साठी देखील रायगड, रत्नागिरी आणि साताऱ्याच्या घाट भागात रेड अलर्ट आहे अशी माहिती
ठाणे, पालघर, मुंबई, सिंधुदुर्ग, पुणे आणि कोल्हापूरमध्ये ऑरेंज अलर्ट असेल असे हवामान विभागाने सांगितले.
या पावसामुळे जिल्ह्यातील विविध धरणांमधून विसर्ग सुरू करण्यात आला.
 
गुरुवारी पुणे शहरातील विविध भागांमध्ये पावसामुळे आणि खडकवासला धरणातून सुरू असलेल्या विसर्गामुळे पाणी शिरले.
 
मुळा मुठा नद्यांना त्यामुळे पूर आला आहे. इथला भिडे पूल पाण्याखाली गेलेला आहे. शहरात काही ठिकाणी वृक्ष कोसळण्याच्या घटना घडल्या.
 
पुढच्या काही तासांमध्ये असाच मुसळधार पाऊस सुरू राहणार असून नागरिकांनी बाहेर जाणे टाळावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं.
मुसळधार पावसामुळे शहरासह जिल्ह्यातील शाळांनाही सुट्टी जाहीर करण्यात आली होती.ताम्हिणी परिसरात डोंगरकडा कोसळल्याने एकजण मृत्युमुखी पडला आहे. तर पुणे शहरात विजेचा शॅाक बसल्याने तीन जणांचा मृत्यू झाला.
 
बचावकार्य युद्धपातळीवर सुरू
पुण्यातील विविध भागात पाणी साचले आहे. पावसाचा जोर न ओसरल्यामुळे या भागातील जनजीवन ठप्प झालं होतं.या परिस्थितीमुळे पुण्यात लष्कराकडून बचावकार्य करण्यात आलं. बचावकार्यात 400 जणांना वाचवण्यात आलं.मुळशी तालुक्यातील लवासा रोड इथं दरड कोसळली. त्यामुळे तिथे NDRFच्या टीमला बचाव कार्यासाठी पाठवण्यात आलं.
 
हवामान विभागाकडून या भागांसाठी अलर्ट
पश्चिम महाराष्ट्रातील विविध भागांना काल रेड अलर्ट घोषित करण्यात आला होता.तर शुक्रवारपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.कोल्हापूर आणि साताऱ्यामध्ये हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.त्याचबरोबर सिंधुदुर्ग, सांगली, नांदेड, लातूर, लापूर, उस्मानाबाद याठिकाणीही पावसाची शक्यता असल्याचं मुंबई हवामाना विभागाकडून सांगण्यात आलं आहे.
 
पुण्यातील पावसाची परिस्थिती
पुणे जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये बुधवारी आणि गुरुवारी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला.
हवामान विभागाने दिलेल्या आकडेवारी नुसार जुन्नर मध्ये 214 मिमी, लवासा मध्ये 418 मिमी तर लोणावण्यात 299.5 मिमी पाऊस झाला आहे. तर पुणे शहरातील वडगाव शेरी, चिंचवड एनडीए परिसरासह तळेगाव आणि आंबेगाव मध्ये 100 मिमी हून अधिक पावसाची नोंद करण्यात आली आहे.

पुणे महानगर पालिका हद्दीत बालेवाडी ब्रीज, मुळा नदी ब्रीज, संगम रोड ब्रीज, होळकर ब्रीज, संगमवाडी ब्रीज, महर्षी शिंदे ब्रीज, हडपसर- मुंढवा रोड ब्रीज, मातंग ब्रीज, येरवडा शांतीनगर येथील ब्रीज, निंबजनगर ब्रीज, मोई आणि चिकली रस्त्यावरील इंद्रायणी पुल पावसामुळे पाण्याखाली गेले.
 
खडकवासला धरणातून रात्रीपासून 35 हजार क्युसेक्सने विसर्ग सुरू करण्यात आला. धरण परिसरात 11 मिमी तर घाटमाथ्यावर 200 मिमी पेक्षा जास्त पाऊस पडला. त्यानुसार शहरातील भिडे पुल पाण्याखाली गेला असून सिंहगड रस्त्यावरील नदीकाठच्या द्वारका, एकता अशा सोसायट्यांमध्ये पाणी शिरले आहे. तर हिंगणे परिसरात साईनगर इथं डोंगर माथ्यावरुन मोठ्या प्रमाणावर पाणी आलं.ताम्हिणी जवळील आदरवाडी गाव परिसरात डोंगरकडा तुटल्याने एक जणाचा मृत्यू तर आणखी एकजण जखमी झाला.पुण्यातील सर्व पर्यटन स्थळांवर 48 तासांकरिता बंदी आदेश जारी करण्यात आले.

'शासकीय कार्यालयांना सुटी नाही'
जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी दिलेल्या माहितीनुसार शहारातील शासकीय कार्यालयांना सुटी दिली नाही.
पण काही आस्थापनांना आवश्यकतेनुसार सुटी देण्यात यावी. तसंच आवश्यकतेनुसार वर्क फ्रॉम होम करण्यात यावे असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
 
विजेचा शॉक लागून तिघांचा मृत्यू
पुणे शहरातील झेड ब्रीज परिसरातील अंडा भुर्जी स्टॅाल मध्ये काम करणारे तीन जण स्टॅाल बंद करुन सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी गेले होते. यावेळी विजेचा शॅाक लागल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. अभिषेक घाणेकर, आकाश माने आणि शिवा परिहार अशी तिघांची नावे आहेत.
 
अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार शहरात झाडपडीच्या 45 घटनांची नोंद करण्यात आली आहे. तर 2 घरपडीच्या घटनांची नोंद करण्यात आली आहे. शहराच्या विविध भागांमधील 6 सोसायट्यांमध्ये पाणी शिरले आहे.
पावसाच्या रेड अलर्टवर मुख्यमंत्री काय म्हणाले?
पुणे, मुंबईसह कोकणातील पावसाच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणांना अ‍ॅक्शन मोडमध्ये राहण्याच्या सूचना दिल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.
 
प्रशासनातील अधिकारी प्रत्यक्ष फिल्डवर उतरून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत असल्याचंही शिंदे यांनी सांगितलं.
 
मुख्यमंत्री म्हणाले की, "पुण्यात खडकवासला धरणात आणि धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. मावळमध्ये जवळपास 255 मिमी आणि मुळशीत जवळपास 170 मिमी पाऊस पडला. त्याचा दुहेरी फटका बसला. त्यामुळं पुण्यात जास्त पाणी साचलं."
 
जिल्हाधिकारी, पुणे आणि पिंपरीचे मनपा आयुक्त, पोलीस आयुक्त, एनडीआरएफ, एसडीआरएफ यांना सूचना दिल्या असल्याचंही शिंदे यांनी सांगितलं. त्यानुसार सर्व यंत्रणा काम करत असल्याचंही ते म्हणाले.
 
लष्करालाही सज्ज राहण्याच्या सूचना केल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली. आर्मी, नेव्ही, एअरफोर्सच्या तुकड्याही गरज भासल्यास सज्ज आहेत, असंही ते म्हणाले. तसंच कुणाला गरज भासल्यास एअरलिफ्ट करण्यासाठीही यंत्रणा सज्ज असल्याचं ते म्हणाले.

पूरपरिस्थिती असलेल्या ठिकाणच्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यांच्या निवासाची आणि खाण्याची, पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही केली असल्याचं त्यांनी सांगितलं. आम्ही सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. मुंबईत कंट्रोल रूममध्ये अजित दादा असून ते माहिती घेत आहेत, असंही त्यांनी सांगितलं.
 
मुंबईतील स्थितीबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, सध्या मुंबईत 222 पंप सुरू आहेत. अंधेरिचा सब वे पाण्यामुळं बंद आहे.कुर्ला घाटकोपरजवळ साचलेलं पाणी काढण्याचं काम सुरू आहे. इतर ठिकाणी रेल्वे व वाहतूक सुरळीत सुरू आहे. सर्व प्रशासन काम करत आहे.
 
मुंबईतही ऑरेंज अलर्ट आहे, त्यामुळं पुढचे तीन-चार तास सावध राहण्याची आवश्यकता आहे, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.नागरिकांनीही अत्यावश्यक काम असेल तरच बाहेर पडावं, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केली. तसंच रायगडमध्येही पूरपातळीवर लक्ष ठेवून आहोत. भूस्खलन होणाऱ्या भागातील लोकांच्या स्थलांतराचे आदेश दिले आहेत, असं त्यांनी सांगितलं.
 
पुण्यात पर्यटकांवर 48 तासांसाठी बंदी, बचावकार्यासाठी लष्कर बोलावलं - अजित पवार
पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात येऊन पूरपरिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु असल्याचं सांगितलं आहे.

पुण्यातील उपाययोजनांबाबत बोलताना अजित पवार म्हणाले की, "पुण्यातील पाणी ओसरायला सुरुवात झाली आहे. बचावकार्यासाठी लष्कराला बोलवण्यात आलं आहे. आम्ही सतत पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि इतर जिल्हाधिकाऱ्यांशी सातत्याने संपर्कात आहोत. अजूनही या जिल्ह्यांच्या वेगवेगळ्या भागांसाठी रेड आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहेत त्यामुळे आम्ही योग्य ती खबरदारी घेतोय."
Published By- Priya Dixit 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

फायनान्शिअल मॅनेजमेंट कोर्स मध्ये एमबीए करा

Vaginal Itching योनीला दररोज खाज येते? या 3 प्रभावी घरगुती उपायांनी आराम मिळवा

Beauty Advice : घरीच बनवा केमिकल फ्री ब्लश

शिंक येणे नेहमीच अशुभ नसते, जाणून घ्या कधी शुभ असते

Margashirsha Guruvar 2024 मार्गशीर्ष गुरुवार कधी पासून? किती गुरुवार, संपूर्ण माहिती जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

मोठी बातमी ! माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर जीवघेणा हल्ला

LIVE: शिंदे सरकारची नवी योजना करते महिला मतदारांना आकर्षित

शिंदे सरकारची नवी योजना करते महिला मतदारांना आकर्षित

मुंबईसह अनेक शहरांमध्ये चार दिवस ड्राय डे जाहीर

एनसीपी नेता छगन भुजबल यांचा बटेंगे तो कटेंगे घोषणेला विरोध

पुढील लेख
Show comments