Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यात दरडी कोसळून आतापर्यंत ८३ जणांचा मृत्यू

83 killed so far in state
Webdunia
शुक्रवार, 23 जुलै 2021 (23:09 IST)
महाराष्ट्रात तुफान पावसाने हाहा:कार उडवला आहे. रायगड आणि सातारा जिल्ह्यात दरडी कोसळून आतापर्यंत ८३ जणांचा मृत्यू झाला आहे. दरडी कोसळून मृत्यू पावलेल्यांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
रायगड जिल्ह्यातील तळीये गावात दरड कोसळून भीषण दुर्घटना घडली. महाड तालुक्यातील तळीये गावात ३५ घरांवर दरड कोसळून कुटुंबच्या कुटुंब उद्ध्वस्त झाले. काल दुपारी ही दुर्घटना घडली. आतापर्यंत तळीये दुर्घटनेत ३८ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.
 
महाड तालुक्यातील तळीये हे डोंगर कपारीमध्ये वसलेलं गाव आहे. कालपासूनच्या मुसळधार पावसामुळे काल दुपारी चार वाजता तळीये गावावर दरड कोसळली. यात गावातील ३५ कुटुंब दरडीखाली आल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, संपूर्ण महाडमध्ये पावसाचं पाणी साचल्यानं एनडीआरएफच्या जवानांना घटनास्थळावर पोहोचण्यास अडचणी येत होत्या. तळीये गावात दरड कोसळल्याची दुर्घटना काल दुपारी चारच्या सुमारास घडली आहे. पण संपूर्ण तालुक्यात मुसळधार पावसामुळे जवळपास १० ते १२ फूट पाणी साचलं होतं. संपर्क पूर्णपणे तुटला होता. कुणाशीच संपर्क साधता येत नव्हता. तळीयेकडे येणारे सर्व मार्ग बंद होते. तिथं जाणाऱ्या मार्गांवर १० ते १२ फूट पाणी आणि घाटमार्गे जायचं म्हटलं तर अनेक ठिकाणी दरड कोसळली होती. त्यामुळे रस्तेमार्ग पूर्णपणे बंद झाले होते. अखेर दरड वगैरे बाजूला सारून अखेर एनडीआरएफची पथकं इथं दाखल झाली आहेत, अशी माहिती अदिती तटकरे यांनी दिली.
पोलादपूर तालुक्यातील केवनाळे, गोवेले सुतारवाडी येथे भूस्खलन झाले आहेत. यामध्ये दरडीखाली ११ जणांचा मृत्यू झाला, तर १३ जखमींवर उपचार सुरु आहेत.
आंबेघर येथे दरड कोसळून १२ जणांचा मृत्यू
साताऱ्यातील आंबेघर गावात दरड कोसळली आहे. या दुर्घटनेत १२ जणांचा मृत्यू झाला असून पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने मदतकार्य सुरू केलं आहे. गुरुवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली असून आंबेघर येथील काही घरे या मातीच्या ढिगाऱ्याखाली गेली आहेत. या घटनेची माहिती समजताच काही ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले आहेत. मात्र त्याठिकाणी तीन कुटुंबातील लोक रात्रीपासून बेपत्ता असल्याचे सद्यस्थितीत समोर येत आहे.
चिपळूणच्या पोसरे-बौद्धवाडीत दरड कोसळून १७ ठार
चिपळूणच्या पोसरे-बौद्धवाडीतही दरड कोसळल्यामुळे १७ जणांचा मृत्यू झाला आहे. पोसरे-बौद्धवाडीत घरांवर दरड कोसळून ही दुर्घटना घडली. त्याचबरोबर खेडमधल्या धामणंदमध्ये १७ घरांवर दरड कोसळली आहे. यात काही कुटुंब अडकले असण्याची शक्यता आहे. खेड तालुक्यातील बिरमई येथे दरड कोसळलून २ जण दगावले आहेत.
देवरुखवाडीत भूस्खलनात २ महिलांचा मृत्यू
सातारा जिल्ह्यात वाई तालुक्यातील देवरूखवाडी येथे माळीणसारखी दुर्दैवी घटना घडली. भूस्खलन झाल्याने ७ ते ८ घरे जमिनीत गाडली गेली होती. यामध्ये २७ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले तर जखमींना वाई येथील रुग्णालयात हलविण्यात आले होते. मात्र या दुर्घटनेत ४ जण बेपत्ता झाले होते. यामध्ये दोन महिलांचा समावेश होता. आज शोधकार्य करताना मातीच्या ढिगाऱ्याखालून २ महिलांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. यामध्ये ६० वर्षाची वृद्ध महिला आणि २५ वर्षाची महिला मातीच्या ढिगाऱ्याखाली रात्रीपासून अडकल्या होत्या. मातीचा ढीग अंगावर पडल्याने दोन्ही महिलांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
 
सिंधुदुर्गात दरड कोसळून महिलेचा मृत्यू, पती जखमी
कणकवली – दिगवळे येथे घरावर दरड कोसळून महिलेचा मृत्यू, संगीता जाधव वय ४२ महिलेचे नाव. महिलेचा पती आणि सासरा जखमी. पती प्रकाश जाधव यांची प्रकृती चिंताजनक. कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल. घराशेजारी पाच ते सहा फूट उंचीची दलदल. डोंगराचा भाग खचून दगड – माती आणि मोठ मोठे वृक्ष खाली आले आणि ही दुर्घटना घडली.
 
दरड कोसळून आतापर्यंत झालेल्या मृतांची आकडेवारी
तळीये, महाड : ३८
 
चिपळूण पोसरे-बौद्धवाडी : १७
आंबेघर, सातारा : १२
पोलादपूर, रायगड : ११
वाई, सातारा : २
खेड तालुक्यातील बिरमई : २
 
कणकवली – दिगवळे : १
 
अजित पवार यांचा राजनाथ सिंहांना फोन, लष्कराची मदत मागितली
रायगड, रत्नागिरी, सातारा, सांगली, कोल्हापूरसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी, महापूर, दरड कोसळून निर्माण झालेल्या आपत्कालिन परिस्थितीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा करुन त्यांना सद्यस्थितीची माहिती दिली. राज्यात अतिवृष्टी व दरड कोसळलेल्या भागात सैन्यदलांची मदत तात्काळ उपलब्ध करण्यात आली असून सैन्यदलांची अधिकची मदतही उपलब्ध करण्याचे आश्वासन संरक्षणमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले आहे.
 
मुख्यमंत्र्यांचा दिलासा
राज्यात सध्या ज्याप्रकारे पाऊस पडत आहे ती परिस्थिती पाहता आपल्याला अनेक गोष्टींची व्याख्याच बदलावी लागेल. अनेक ठिकाणी दरडी कोसळत आहेत, नद्या फुटून वाहत आहेत. अतिवृष्टी हा शब्दही थिटा पडेल इतका पाऊस होत आहे, असे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. गेल्या दोन दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या 5 जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे डोकेदुखी होते, जाणून घ्या उपाय

Natural Cool Water उन्हाळ्यात फ्रीज न वापरता थंड पाणी मिळवा, कसे ते जाणून घ्या

झोपेची समस्या दूर करण्यासाठी या योगासनांचा सराव करा

जातक कथा : दयाळू मासा

स्वप्नात हे पक्षी दिसणे खूप शुभ मानले जाते, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार लवकरच तुरुंगात जातील म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस

प्रेयसीच्या भावाने केली नववीच्या विद्यार्थ्याची गळा दाबून हत्या

LIVE: पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार लवकरच तुरंगात असतील म्हणाले फडणवीस

कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी टीआरएफ कमांडरला घेरले

Terror attack in Pahalgam शहीद पतीला पत्नीकडून भावनिक श्रद्धांजली

पुढील लेख
Show comments