विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांवर टीका केली असून महाराष्ट्र असा-तसा वाटला का? अशा शब्दांत सुनावलं आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
अजित पवार काय म्हणाले?
“कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडून गेल्या दोन दिवसांत जी काही विधानं आली आहेत, त्यांचा आम्ही निषेध आणि धिक्कार करतो. ते काय महाराष्ट्र मागायला निघाले आहेत का? त्यांना काय महाराष्ट्र असा तसा वाटला का? कारण नसताना सांगलीतील जत तालुक्यासंबंधी त्यांनी विधान केलं. आणि आता सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील गावांसदर्भात विधान केलं आहे,” असं अजित पवारांनी सांगितलं.
पुढे ते म्हणाले की “काही संबंध नसताना अशा प्रकारची वक्तव्यं करायची आणि लोकांचं लक्ष विचलित करण्याचा हा प्रयत्न आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी त्यांना कडक शब्दांत समज दिली पाहिजे. शेवटी कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि आपले उपमुख्यमंत्री भाजपाचे आहेत”.
“याआधी अशी विधानं होताना दिसत नव्हती. आता तर फक्त मुंबईच मागायची राहिली आहे. महाराष्ट्रातील जनता हे अजिबात सहन करणार नाही. त्यांनी अशी वक्तव्यं करण्याच्या भानगडीत पडू नये. केंद्र सरकारने यामध्ये हस्तक्षेप करावा. हे प्रकरण सुप्रीम कोर्टात न्यायप्रविष्ट आहे. तिथे आपापली भूमिका मांडल्यानंतर निर्णय होईल. पण असा सतत सांगली, सोलापूरचा उल्लेख कऱणं कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी थांबवलं पाहिजे,” असा इशाराच अजित पवारांनी दिला आहे.
Edited by: Ratnadeep Ranshoor