Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अजित पवार : 2014 ते 2022, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 8 वर्षांत 5 वेळा भाजपसोबत जाणार होता

Webdunia
बुधवार, 5 जुलै 2023 (20:22 IST)
उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस नेते अजित पवार यांनी अखेर आपलं मौन सोडलं आहे.वांद्रे येथील MET सहभागृहात झालेल्या भाषणात अजित पवार गटातील आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीत आपल्या बाजूने आलेल्या आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संबोधित करताना शरद पवार यांच्या राजकीय वाटचालीविरुद्ध टीका केली.
 
शरद पवार यांच्याविरोधात बंड करून अजित पवार राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतरचं त्यांचं हे पहिलंच भाषण होतं.
 
2019 साली झालेल्या पहाटेच्या शपथविधीपासून सार्वजनिक ठिकाणी फारसं न बोलणाऱ्या, माध्यमांना टाळणाऱ्या अजित पवार यांनी या भाषणात मात्र अनेक मोठे गौप्यस्फोट केले.
 
2019 सालच्या पहाटेच्या निमित्ताने भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस जवळ आल्याचं आपल्या सर्वांना माहिती आहे.
 
पण 2019च नव्हे तर नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजप निवडणूक लढवत असतानापासून अर्थात 2014 ते 2022 पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस तब्बल 5 वेळा भाजपसोबत जाणार होता, असा गौप्यस्फोट अजित पवार यांनी केला आहे.
 
अजित पवार यांनी आपल्या भाषणात सांगितलेले 2014, 2017, 2019 आणि 2022 चे पाच किस्से आपण सविस्तरपणे जाणून घेऊ.
 
लोकसभा निवडणूक 2014 : युती करून निवडणूक लढवण्याची ऑफर
अजित पवार आपल्या भाषणात सांगितलं की लोकसभा 2014ला भाजपची सत्ता अद्याप आलेली नव्हती, तेव्हा भाजप नेत्यांसोबत राष्ट्रवादी काँग्रेसची चर्चा सुरू होती.
 
भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने प्रत्येकी 16 जागा लढवायच्या. राज्यातील सर्वच्या सर्व 48 जागा आपण निवडून आणायच्या, अशी ती चर्चा होती.
 
पण, नंतर भाजपने आम्हाला हे जमणार नाही, असं सांगितलं. कारण, अनेकांवर काही आरोप होते. नितीन गडकरींची युतीची इच्छा होती. पण इतर नेतेमंडळीची इच्छा नसल्यामुळे ते बारगळलं.
 
विधानसभा निवडणूक 2014 : भाजपला बाहेरून पाठिंबा
2014 साली भाजपची केंद्रात सत्ता आली. त्यानंतर राज्यातही भाजपची सत्ता आली. त्यावेळी पक्षात जो समन्वय असायला हवा होता, तो राहिला नाही.
 
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 41 जागा निवडून आल्या. त्यावेळी निकाल येत होते, आम्ही सगळे सिल्व्हर ओकमध्ये बसलेलो होतो.
 
प्रफुल्ल पटेल आणि शरद पवार यांच्यात त्यावेळी काहीतरी चर्चा झाली. प्रफुल्ल पटेल बाहेर जाऊन म्हणाले की आम्ही भाजपला बाहेरून पाठिंबा देत आहोत.
 
त्यावेळी हा नेत्यांचा निर्णय आहे म्हणून आम्ही गप्प बसलो. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. त्यावेळी त्यांच्या शपथविधीला जा, असं सगळ्या आमदारांना सांगण्यात आलं. त्याप्रमाणे आम्ही शपथविधी कार्यक्रमालाही गेलो होतो.
 
पण, नंतर त्या मंत्रिमंडळात आम्हाला सहभागी व्हायचं नव्हतं, तर आम्हाला का पाठवलं? विनाकारण आम्हाला शपथविधीला पाठवण्यामागचं कारण काय होतं, हे समजत नाही, असं अजित पवार यांनी म्हटलं.
 
2017 : भाजपसोबत सरकारमध्ये जाण्याबाबत चर्चा
अजित पवार म्हणतात, 2017 सालीही राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप जवळ आले होते. त्यावेळी काही वेगळं करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसकडून झाला होता.
 
त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावर नेत्यांमध्ये चर्चा झाली होती.
 
राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, अजित पवार, जयंत पाटील आणि छगन भुजबळ उपस्थित होते.
 
भाजपकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार आणि विनोद तावडे आदी नेते होते. कोणती खाती, कोणत्या जिल्ह्यांचे पालकमंत्रिपदं हेही त्यावेळी ठरलं. त्यानंतर निरोप आला. सुनिल तटकरे यांना दिल्लीला बोलावण्यात आलं.
 
दिल्लीत भाजपच्या वरीष्ठांसोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली. भाजपच्या वरिष्ठांनी त्यावेळी सांगितलं की 25 वर्षांपासून आमचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला आम्ही सोडणार नाही.
 
भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस असं सरकार राहील, असं त्यांनी सांगितलं. पण आपल्या वरिष्ठांना ते मंजूर नव्हतं.
 
शिवसेना जातीयवादी आहे, शिवसेना आम्हाला चालत नाही, असं म्हणून तो विषयही बारगळला. शिवसेनेला सोडणार नाही, असं भाजपने सांगितल्यामुळे वरिष्ठ नेते परत आले, असं अजित पवार यांनी सांगितलं.
 
विधानसभा निवडणूक, 2019 : भाजपसोबत चर्चा, पण शिवसेनेसोबत महाविकास आघाडीत
2019 विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर परिस्थिती काय होती, सर्वांना माहीत आहे.
 
त्यावेळी, एका मोठ्या उद्योगपतीच्या घरी आपले वरिष्ठ नेते आणि भाजपचे वरिष्ठ नेते यांच्यात चर्चा झाली.
 
देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारही त्यामध्ये होते. सगळी चर्चा झाली. त्याच बंगल्यात पाच बैठका झाल्या.
अजित पवार म्हणाले, “याबाबत कुठेही बोलायचं नाही, असं मला आणि देवेंद्र यांना सांगण्यात आलं. त्याप्रमाणे मी कुठेही त्याबाबत बोललो नाही. पण अचानक तो निर्णय मागे घेऊन शिवसेनेबरोबर जायचं, असं मला सांगण्यात आलं.”
 
“2017 साली शिवसेना जातीयवादी ठरवून त्यांच्याबरोबर जाऊ नये असं म्हटलं होतं मग 2 वर्षात अचानक काय बदल झाला की त्यामुळे शिवसेनेबरोबर जाण्याचा निर्णय झाला? आणि ज्या भाजपबरोबर जाणार होतो तो भाजप जातीयवादी झाला, असा सवाल अजित पवार यांनी विचारला.
 
जून 2022 : एकनाथ शिंदेंच्या बंडावेळीही भाजपशी चर्चा
उद्धव ठाकरेंचं सरकार स्थापन झाल्यानंतर जून 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी वेगळी भूमिका घेतली.
 
तत्पूर्वी, याबाबत आम्ही वरिष्ठांना सांगायचो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही आम्ही सांगितलं की , तुमच्या पक्षात अस्वस्थता आहे, त्याकडे लक्ष द्या. परंतु घडायचं ते घडलं.
अजित पवार म्हणाले, “एकनाथ शिंदेंचं बंड झालं तेव्हा माझ्या कार्यालयात बैठक झाली. त्या बैठकीत विधानसभेच्या 53 पैकी 51 आमदारांनी तर विधानपरिषदेच्या सर्वच 9 जणांनी पत्र टाईप करून सह्या केल्या.
 
“सरकारमध्ये आपण गेलं पाहिजे, काम होणार नाहीत, अडचणी येतील, विकास होणार नाही, जनतेचे प्रश्न सुटणार नाहीत, तुम्ही निवडून जाऊन काय केलं, असं लोक आम्हाला विचारतील, असं आमदार म्हणत होते.
 
त्या सर्वांनी मिळून प्रफुल्ल पटेल, अजित पवार, जयंत पाटील अशी एक समिती तयार केली. त्यांनी आम्हाला भाजपच्या वरिष्ठांशी बोलण्यास सांगितलं.
भाजपच्या वरिष्ठांनी म्हटलं की अशी गोष्ट फोनवर बोलून चालत नाही, त्यामुळे आम्हाला इंदूरला येण्यास सांगितलं. पण नंतर मीडियाला कळेल म्हणून पुन्हा येऊ नका, असं त्यांनी सांगितलं.
 
आम्ही म्हणालो, सरकारमध्ये जायचं आहे तर कळलं तर कळलं. पण त्यांनी त्यास नकार दिला. आमची तिकिटे रद्द केली. तोपर्यंत एकनाथ शिंदेंचा शपथविधी झालेला नव्हता. हा विषयही नंतर मागे पडला.
 
त्यावेळी भाजपाबरोबर सरकारमध्ये जाण्याचा निर्णय आमदारांनी घेतला होता. मात्र तो रद्द केला गेला. माझी प्रतिमा उगाच वाईट केली जाते.
 
तेव्हाची सगळ्या आमदारांच्या सह्यांची कॉपी अजूनही माझ्याकडे आहे. पण मला लोकांसमोर नेहमी व्हीलन केलं जातं, माझी काय चूक आहे, असा सवाल अजित पवार यांनी केला आहे.
 



Published By- Priya Dixit 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

सूर्यनमस्काराने शरीर मजबूत होते, जाणून घ्या योग्य पद्धत

वर्षानुवर्षे आतड्यांमध्ये साचलेली घाण साफ होईल, सकाळी उठल्याबरोबर हे पाणी प्या

28 डिसेंबर रोजी कुंभ राशीत शुक्र आणि शनीचा संयोग 2025 मध्ये चमत्कार घडवेल, 5 राशी धनवान होतील

साप्ताहिक राशीफल 23 डिसेंबर ते 29 डिसेंबर 2024

Kanya Lal Kitab Rashifal 2025: लाल किताबनुसार कन्या राशी भविष्य 2025 आणि उपाय

सर्व पहा

नवीन

तुमचे सिम बंद झाले आहे… कॉल आला, OTP सांगितला आणि साडेचार लाख गमावले

महाराष्ट्रात प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत केंद्र सरकारने यावर्षी साडेसहा लाख घरांना मंजुरी दिली, मुख्यमंत्र्यांनी आभार मानले

LIVE: राजकीय कारणासाठी, द्वेष निर्माण करण्यासाठी परभणीला राहुल यांची भेट -देवेंद्र फडणवीस

राजकीय कारणासाठी, द्वेष निर्माण करण्यासाठी परभणीला राहुल यांची भेट -देवेंद्र फडणवीस

विनोद कांबळी यांची प्रकृती ढासळली, रुग्णालयात दाखल

पुढील लेख
Show comments