Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मोखा चक्रीवादळामुळे महाराष्ट्रामध्ये मान्सून उशिरा येणार?

Webdunia
बुधवार, 17 मे 2023 (15:09 IST)
मानसी देशपांडे 
बंगालच्या उपसागरात तयार झालेले मोखा चक्रीवादळ रविवारी (14 मे) बांगलादेश आणि म्यानमारला धडकले. त्यानंतर आता ते कमकुवत झालं आहे. पण त्यामुळे ईशान्य भारतासह अनेक राज्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
 
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या या वादळामुळे म्यानमारचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. मोखा या चक्रीवादळाने बांगलादेशातही मोठे नुकसान केले आहे.
 
दुसरीकडे बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या या वादळामुळे महाराष्ट्रामध्ये पोहोचणाऱ्या मान्सूनमध्ये काही बदल होणार का, असा प्रश्नही विचारला जात आहे.
 
भारतातील केरळमधून मान्सूनची सुरुवात होते. भारतात साधारणपणे 1 जूनच्या आसपास मान्सूनचं आगमन होतं. कधी कधी ते एक-दोन दिवस आधी किंवा एक-दोन दिवस नंतरही आगमन होऊ शकतं.
 
केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यावर साधारण सात दिवसांत म्हणजे सात जूनपर्यंत तो महाराष्ट्रात येतो. यात काही तीन-चार दिवसांचा फरक पडू शकतो.
 
मात्र, त्यापूर्वीच राज्यातील अनेक भागात पाऊस सुरू झाला तरी तो मान्सूनपूर्व मानला जातो.
 
महाराष्ट्रातल्या मान्सूनवर परिणाम होणार?
महाराष्ट्रामध्ये सध्या कडक उन्हाचा सामना करावा लागत असून अनेक भागात तापमान 40 अंश सेल्सिअसच्या वर नोंदवले गेले आहे.
 
दुसरीकडे, भारतात मान्सून सुरू होण्यास अवघे 15 दिवस उरले असून बंगालच्या उपसागरात नुकतेच एक धोकादायक वादळ निर्माण झाले आहे.
 
मान्सून सुरू व्हायला अजून अवधी आहे आणि महाराष्ट्रामध्ये मान्सून पोहोचायला कालावधी बाकी आहे.
 
या वादळाचा मान्सूनवर परिणाम होईल की नाही हे जाणून घेण्यासाठी बीबीसीने भारतीय हवामान विभागाचे शास्त्रज्ञ राजेंद्र कुमार यांच्याशी संवाद साधला.
 
राजेंद्र कुमार सांगतात की, मान्सूनला भारतात पोहोचायला अजून वेळ आहे आणि बंगालच्या उपसागराव्यतिरिक्त इतर अनेक घटकांचा मान्सूनवर प्रभाव होतो.
 
ते म्हणाले, "हे बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले चक्रीवादळ आहे आणि मान्सूनचे भारतात आगमन व्हायचे आहे. बंगालचा उपसागर, अरबी समुद्र आणि हिंदी महासागरातील घटकांचा मान्सूनवर परिणाम होतो. फक्त बंगालच्या उपसागरातील हालचालींचा परिणाम होत नाही. त्यामुळे या चक्रीवादळाचा मान्सूनवर कोणताही परिणाम होण्याची शक्यता नाही."
 
वीओन न्यूजमधील एका वृत्तात आयएमडीचे प्रमुख महापात्रा यांच्या हवाल्याने म्हटले आहे की, चक्रीवादळ मोखा ही एक अल्पकालीन प्रणाली होती. मान्सूनला अजून दोन आठवडे बाकी आहेत. त्यामुळे त्याचा मान्सूनवर परिणाम होण्याची शक्यता नाही.
 
भारतात यंदा मान्सून कसा असेल?
हवामान खात्याने एप्रिलमध्येच पुढील मान्सूनचा अंदाज आधीच जारी केला आहे. त्यानुसार देशात येणारा मान्सून सामान्य राहण्याची शक्यता आहे. 'सामान्य मान्सून' म्हणजे देशात सरासरी पाऊस पडेल.
 
भारतात मान्सून जून महिन्यात सुरू होतो आणि सप्टेंबर महिन्यापर्यंत टिकतो. या चार महिन्यांतील पाऊस हा मान्सूनचा पाऊस मानला जातो.
 
हवामान खात्यानुसार, दीर्घकालीन सरासरीनुसार देशात पावसाची 96% शक्यता आहे. दीर्घकालीन सरासरी म्हणजे जून ते सप्टेंबर या कालावधीत पडणारा पाऊस.
 
भारतामध्ये नैऋत्य मान्सून खूप महत्त्वाचा आहे, ज्यावर भारताची संपूर्ण शेती आधारित आहे.
 
खासगी हवामान संस्था स्कायमेटनेही मान्सूनचा अंदाज जारी केला असून, देशात पुढील मान्सून सामान्यपेक्षा कमकुवत असेल, असा अंदाज व्यक्त केला आहे.
 
स्कायमेटच्या अंदाजानुसार, मान्सूनमध्ये दीर्घकालीन सरासरीनुसार पावसाची 94 टक्के शक्यता आहे.
 
स्कायमेटच्या मते, गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात अपुरा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
 
चक्रीवादळांचा मान्सूनवर कसा परिणाम होतो?
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, कोचीन विद्यापीठाच्या एसटी रडार केंद्रातील संशोधकांनी दिलेल्या वृत्तानुसार, गेल्या काही वर्षांपासून अरबी समुद्रात आलेल्या वादळांमुळे भारतातील मान्सून विस्कळीत झाला आहे.
अहवालानुसार, मान्सून सुरू होण्यापूर्वी अरबी समुद्रात चक्रीवादळांच्या संख्येत वाढ झाली होती, तर बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळांची संख्या यावेळी कमी झाली.
 
एका नवीन अभ्यासानुसार, अरबी समुद्रातील वादळे आपल्या केंद्राकडे आर्द्रता खेचतात, परिणामी पश्चिम किनारपट्टीवर कमी पाऊस पडतो.
 
डाउन टू अर्थच्या अहवालानुसार , गेल्या वर्षी एप्रिल आणि मे महिन्यात काही मोठी वादळे आली होती, त्यापैकी काहींनी मान्सूनच्या आगमनात व्यत्यय आणला होता. अनेक वादळांमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे मान्सून लवकर दाखल झाला.
 
गेल्या वर्षी मे महिन्यात ‘असानी’ चक्रीवादळानंतर बंगालच्या उपसागरात मान्सूनची प्रगती थांबली होती, मात्र केरळमध्ये हवामान खात्याच्या अंदाजापेक्षा दोन दिवस आधीच मान्सून दाखल झाला.
 
गेल्या वर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीच्या महिन्यांत तुलनेने कमी पाऊस झाला होता.
 
2021 मध्ये मान्सून सुरू झाला तेव्हा दोन वादळे आली. मे महिन्याच्या दुस-या आणि तिसर्‍या आठवड्यात अरबी समुद्रात ‘तौक्ते’ चक्रीवादळ तयार झाले.
 
वादळ देशाच्या पश्चिम भागात धडकले, ज्यामुळे बंगालच्या उपसागराच्या आसपासच्या भागात मान्सूनच्या आगमनावर परिणाम झाला.
 
तर त्या वर्षी आलेले दुसरे चक्रीवादळ 'यास' होते. बंगालच्या उपसागरात मे महिन्यात त्याची निर्मिती झाली. मात्र, या वादळामुळे बिहार आणि काही भागात मान्सून लवकर दाखल झाला आणि काही भागात पूरस्थिती निर्माण झाली.
 
मान्सूनच्या आगमनावर चक्रीवादळाच्या परिस्थितीच्या परिणामाबद्दल बोलताना जुनागढ कृषी विद्यापीठाचे तांत्रिक अधिकारी धिमंत वघासिया म्हणतात, “जेव्हा चक्रीवादळ येते तेव्हा वातावरणातून ओलावा काढला जातो. जर वादळ जमिनीच्या जवळ आले तर मान्सून लवकर येऊ शकतो. परंतु जेव्हा चक्रीवादळ तयार होते आणि समुद्रात राहते, तेव्हा प्रणाली पुन्हा तयार होण्यास वेळ लागतो आणि मान्सून पुढे जाऊ शकतो."
Published By -Smita Joshi 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

Pan 2.0 project : PAN 2.0 लागू झाल्यानंतर जुने पॅन कार्ड अवैध होणार का?

LIVE: ठाणे : दोन दिवसांपासून बेपत्ता तरुण, झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडला

महाराष्ट्रात शपथविधी सोहळा या दिवशी होऊ शकतो

गोल्डी बरार आणि रोहित गोदाराने नाईट क्लबबाहेर झालेल्या दोन बॉम्बस्फोटांची जबाबदारी घेतली

ठाणे : दोन दिवसांपासून बेपत्ता तरुण, झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडला

पुढील लेख
Show comments