Dharma Sangrah

उद्धव ठाकरे यांच्या सरकारकडून लोकांच्या या आहेत 4 प्रमुख अपेक्षा

Webdunia
गुरूवार, 28 नोव्हेंबर 2019 (18:32 IST)
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेसारखे संपूर्ण वेगळ्या विचारधारांचे पक्ष सरकार स्थापन करत असल्याने एका बाजूला या सरकारच्या भवितव्याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे, तर दुसरीकडे सर्वसामान्य नागरिक नवीन सरकारकडून अनेक अपेक्षा व्यक्त करत आहेत.
 
बीबीसी मराठीने नवीन सरकारकडून नेमक्या काय अपेक्षा आहेत, हा प्रश्न विचारल्यानंतर शेकडो प्रतिक्रिया आल्या.
 
तिन्ही पक्षांनी प्रचारादरम्यान जी आश्वासनं दिली होती, त्याच्या आधारेच या अपेक्षा व्यक्त करण्यात आल्या असून यामधून चार प्रमुख अपेक्षा ठळकपणे दिसून येत आहेत.
 
1. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं आपल्या जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं. शिवसेनेनंही त्यांच्या वचननाम्यात आपण शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू असं म्हटलं होतं. त्यामुळे नवीन सरकारकडून अपेक्षा व्यक्त करताना अनेकांनी शेतकऱ्यांचं हित लक्षात घेऊन कर्जमाफी द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
 
नवीन सरकार शेतकरी बांधवांचे अवकाळी पावसामुळे व महापुर परिस्थितीमुळे झालेल्या पीकांच्या नुकसानाबद्दल भरपाई देईल,कर्जमाफी करतील, पिकांना हमीभाव देतील, अशी अपेक्षा लक्ष्मीकांत शिर्के यांनी व्यक्त केली आहे. गणेश व्यवहारे, सुदाम गंगावणे, संग्राम देशमुख आणि अन्य वाचकांनीही अशाच प्रतिक्रिया दिल्या आहेत.
 
2. स्थिर सरकार
महाविकास आघाडीनं सरकार स्थापनेची घोषणा केल्यानंतर या सरकारची संभावना तीन पायांची शर्यत अशी करण्यात आली होती. त्यामुळेच अनेक वाचकांनी 'स्थिर सरकार' हीच अपेक्षा व्यक्त केली आहे.
 
अशोक कवळे यांनी सरकार पाच वर्षे चालवावे आणि जनतेचं हित लक्षात घेऊन काम करावं, असं म्हटलं आहे. तर सचिन पंडित यांनीही आपापसातले वाद सोडून जनतेच्या हिताचा विचार करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. बाकी काही नाही, केवळ स्थिर सरकार, ही प्रतिक्रिया अनेक वाचकांनी दिली आहे.
 
3. बुलेट ट्रेन प्रकल्प रद्द करा
आमचं प्राधान्य हे शेतकऱ्यांना आहे, बुलेट ट्रेनला नाही असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं. याच विधानाची आठवण ठेवत अनेक वाचकांनी बुलेट ट्रेन प्रकल्प रद्द करण्याची अपेक्षाही व्यक्त केली आहे. धनंजय पांडे यांनी बुलेट ट्रेनसारख्या पांढऱा हत्ती पोसण्याची आवश्यकता नाही, अशा आशयाची प्रतिक्रिया व्यक्त केली. तेजस पाटणकर यांनीही आपल्या अपेक्षांच्या यादीमध्ये बुलेट ट्रेन रद्द करावी, असं म्हटलं आहे. सुधीर रणशूर यांनीही अशाच प्रकारची अपेक्षा व्यक्त केलीये.
 
4. दहा रुपयांत जेवण
शिवसेनेच्या जाहीरनाम्यातील ज्या आश्वासनांची चर्चा झाली, त्यातील एक म्हणजे दहा रुपयांत थाळी देऊ. त्यामुळे काही वाचकांनी गांभीर्यानं तर काही जणांनी थट्टेच्या सुरात दहा रुपयात जेवणाची थाळी द्या, अशा प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. विलास कांबळे, सुनील सावंत, विकास बडे,संदेश, मॅडी काकडे यांच्यासह अनेकांनी दहा रुपयात जेवणाची थाळी या अपेक्षेचा पुनरुच्चार केला आहे.
 
या शिवाय शिवसेनेनं आरे कॉलनीतील वृक्षतोडीला केलेला विरोध लक्षात घेऊन आरे कॉलनीत पुन्हा झाडे लावा अशी अपेक्षाही काही जणांनी व्यक्त केली आहे. सर्वांना परवडणारं शिक्षण मिळावं, आरोग्य सुविधा दिल्या जाव्यात तसंच तरुणांना रोजगार मिळावा, अशी अपेक्षाही सर्वसामान्यांकडून व्यक्त केली जात आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल २५ ते ३१ जानेवारी २०२६

गणपतीची आरती सुखकर्ता दुःखहर्ता Sukhkarta Dukhharta

हिवाळ्यात दररोज रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा हा चहा प्या; लिहून घ्या रेसिपी

हिवाळ्यात पनीर का खावे? आरोग्यासाठी काय फायदे आहे, जाणून घ्या

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

सर्व पहा

नवीन

आसाममधील ब्रह्मपुत्र नदीत बोट उलटली, चार मुलांसह सहा जण बेपत्ता

LIVE: महाराष्ट्रातील ६ जिल्ह्यांसाठी पावसाचा पिवळा इशारा जारी

मुंबई आणि नवी मुंबई विमानतळादरम्यान प्रवास करणे सोपे होईल; फडणवीस सरकारने मेट्रो लाईन ८ ला मान्यता दिली

मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप, काँग्रेस निवडणूक आयोगाकडे गेली

महाराष्ट्रातील शाळांमध्ये मराठी भाषा अनिवार्य; आदेशाचे पालन करत आहे का? शिक्षण विभागाने अहवाल मागवला

पुढील लेख
Show comments