भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्या उमेदवारीवरून गेल्या काही वर्षांत मोठी चर्चा पाहायला मिळाली. दरम्यान राज्यसभेच्या ५६ जागांसाठी येत्या २७ तारखेला होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी भाष्य केले आहे. राज्यसभेच्या ५६ पैकी सहा जागा या महाराष्ट्रातील आहेत. त्यापैकी तीन जागांवर विजय मिळवण्याइतपत संख्याबळ भाजपकडे आहे. त्यामुळे या तीन जागांवर कोणाची वर्णी लागणार, यासाठी भाजपमध्ये रस्सीखेच सुरु आहे.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना न देण्यात आलेल्या उमेदवारीवरून तेव्हा चर्चा झाली. त्यावेळी भाजपात असणारे एकनाथ खडसे, पंकजा मुंडे व विनोद तावडे त्यावरून नाराज असल्याच्याही बऱ्याच चर्चा रंगल्या होत्या. तेव्हापासून पंकजा मुंडेंना भाजपानं बाजूला सारलं असून त्यामुळे पंकजा मुंडे नाराज असल्याचे दावे केले जात होते. आता पुन्हा एकदा त्यांच्या राज्यसभा उमेदवारीची चर्चा सुरू झाली असून त्यावर पंकजा मुंडे यांनी स्वत: मोठं विधान केलं आहे. त्या बीडमध्ये एका जाहीर कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलत होत्या.
राज्यसभेची निवडणूक जाहीर होताच भाजपमधून पंकजा मुंडे यांच्या नावाची सर्वाधिक चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. लोकसभा लढायची की राज्यसभा हे ठरवण्याची वेळ आता निघून गेलीय, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले.
पंकजा मुंडे भाजपतर्फे आयोजित करण्यात आलेल्या 'लोक अभियान' या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. त्यांनी रविवारी बीड येथील नारायण गडावर जाऊन ठग नारायणाचे दर्शन घेतले. तेथून त्या पोंडूळ गावात गेल्या होत्या.
यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना पंकजा मुंडे यांनी म्हटले की, गेल्या पाच वर्षांमध्ये कोणतीही निवडणूक आली की माझ्या नावाची कायम चर्चा होते. तशी चर्चा होणे स्वाभाविक आहे. कारण लोकांना आणि प्रसारमाध्यममांनाही मला एखादी उमेदवारी मिळावी, असे वाटते. त्यामुळेच आता राज्यसभा निवडणुकीच्यानिमित्ताने माझे नाव चर्चेत आले आहे, असे पंकजा यांनी म्हटले.
यावर त्यांना तुम्हाला लोकसभा निवडणूक लढवायला आवडेल की राज्यसभेत जाणे पसंत कराल, असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना पंकजा यांनी म्हटले की, "लोकसभा की राज्यसभेवर जायचं हा चॉईस ठरवायला आता फार उशीर झाला आहे. मला कुठे जायला आवडेल, यापेक्षा लोकांना मला कुठे बघायचे आहे, हे महत्त्वाचे असल्याचे पंकजा मुंडे यांनी सांगितले.