Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

CM सचिवालयाकडून Lockdown अन् निर्बंधांची संपूर्ण नियमावली जाहीर; जाणून घ्या काय सुरू अन् काय बंद

Webdunia
सोमवार, 5 एप्रिल 2021 (07:44 IST)
राज्यात कोरोनाचा वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाने काही कडक निर्बंध लावण्यावर अखेर निर्णय घेतला आहे. सोमवार 5 एप्रिल रात्री 8 पासून 30 एप्रिलपर्यंत याची अंमलबजावणी केली जाणार आहे. हे निर्बंध लावताना राज्याचे अर्थचक्राला धक्का न लावणे तसेच कामगार व श्रमिकांना त्रास न होण्याची काळजी घेण्यात आली आहे. तसेच लोकांची गर्दी होणारी ठिकाणे पूर्णपणे बंद करण्यावर भर देण्यात आला आहे.
 
शेतीविषयक कामे, सार्वजनिक व खासगी वाहतूक सुरळीतपणे सुरुच राहणार आहे. मात्र, खासगी कार्यालये, उपहारगृहे, चित्रपटगृहे, गर्दीची ठिकाणे बंद राहणार आहेत. आठवड्याच्या शेवटी म्हणजे शुक्रवारी रात्री 8 ते सोमवार सकाळी 7 पर्यंत असा दोन दिवसांचा कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला आहे. या निर्णयानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या निर्बंधांचे काटेकोर पालन करण्यात सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
कोणत्या गोष्टींवर निर्बंध अन् कोणत्या गोष्टी सुरु राहणार
शेतीविषयक कामे
शेती व शेतीविषयक कामे, अन्नधान्य व शेतमालाची वाहतूक नेहमीप्रमाणे सुरळीतपणे सुरु राहील.
मॉल्स, बाजारपेठा 30 एप्रिल पर्यंत बंद
किराणा, औषधी, भाजीपाला आदी जीवनावश्यक व आवश्यक वस्तू सोडून इतर सर्व प्रकारची दुकाने, मॉल्स, बाजारपेठा 30 एप्रिल पर्यंत बंद राहतील. अत्यावश्यक वस्तू व सेवांच्या दुकानातील दुकानदार व कर्मचाऱ्यांनी लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करुन घ्यावे. तसेच स्वत: व ग्राहकांकडून नियमांचे पालन होते किंवा नाही ते पहावे.
सर्व प्रकराची वाहतूक सुरु राहणार
सार्वजनिक व खासगी अशी दोन्ही प्रकारची वाहतूक निमितपणे सुरु राहणार आहे. रिक्षांमध्ये केवळ चालक आणि दोन प्रवाशांना परवानगी असले. तर टॅक्सिमध्ये चालक आणि निश्चित केलेल्या प्रवाशांपैकी 50 टक्के प्रवासी प्रवास करू शकतील. सार्वजनिक व खासगी बसमध्ये उभ्याने प्रवास करता येणार नाही. जेवढी आसन शमता आहे तेवढ्यांनाच प्रवास करण्यास मुभा राहील. प्रवाशांना प्रवासादरम्यान मास्क घालणे बंधनकारक राहील. बस चालक, वाहक व इतर कर्मचारी यांनी आपले लसीकरण पूर्ण करावे किंवा कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र जवळ बाळगावे. बाहेरगावी जाणाऱ्या रेल्वेमध्ये सर्वसाधारण डब्यात उभ्याने प्रवास करता येणार नाही. प्रवाशांनी मास्कचा वापर करावा, रेल्वे प्रशासनाने काळजी घ्यावी.
जलतरण तलाव, क्रीडा संकुले बंद
मनोरंजन व करमणुकीची स्थळे बंद राहतील, चित्रपटगृहे, मल्टिप्लेक्स, नाट्यगृहे, व्हिडीओ पार्लर, क्लब, जलतरण तलाव, क्रीडा संकुले, सभागृहे, वॉटर पार्क्स पूर्णपणे बंद राहतील.
खाद्य विक्रेत्यांसाठी पार्सल सेवा
रस्त्याच्या कडेला असणाऱ्या खाद्य विक्रेत्यांना सकाळी 7 ते रात्री 8 यावेळेत केवळ पार्सल सेवेसाठी व्यवसाय सुरु ठेवता येईल. पार्सलची वाट पाहणाऱ्या ग्राहकांना सुरक्षित अंतर व नियमांचे पालन करावे लागले. मात्र, नियमांचे उल्लंघन होताना दिसून आले तर स्थानिक प्रशासन ते पूर्णपणे बंद करतील.
उद्योग व उत्पादन क्षेत्र सुरु
उद्योग व उत्पादन क्षेत्र सुरु राहतील. मात्र या ठिकाणी आरोग्याचे नियम पाळले गेले पाहिजेत. याची काळजी व्यवस्थापनाने घ्यावी.
खासगी कार्यालये बंद
खासगी कार्यालयांनी पूर्णपणे वर्क फ्रॉम होम करणे बंधनकारक राहील. केबळ बँका, स्टॉक मार्केट, विमा, औषधी, मेडिक्लेम, दूरसंचार, अशी वित्तीय सेवा देणारी तसेच स्थानिक आपत्ती व्यवस्थापन वीज, पाणी पुरवठा करणारी कार्यालये सुरु राहतील.
शासकीय कार्यालयात 50 टक्के उपस्थितीती
शासकीय कार्यालयात केवळ 50 टक्के उपस्थिती राहील जी थेट कोरोना संबंधित नाहीत. शासकीय कार्यालयात अभ्यागतांना प्रवेश नसणार आहे. आवश्यक असेल तर कार्यालय किंवा विभाग प्रमुखाचा प्रवेश पास बंधनकारक आहे. कार्यालयात बैठका ऑनलाइन पद्धतीने द्याव्यात.
ई कॉमर्स सेवा सुरु
ई कॉमर्स सेवा नियमितपणे सकाळी 7 ते रात्री 8 यावेळेत सुरु राहील. होम डिलिव्हरी देणाऱ्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण झालेले असणे आवश्यक आहे. अन्यथा त्या व्यक्तीस 1000 रुपये दंड आणि संबंधीत दुकान किंवा संस्थेस 10,000 रुपये दंड ठोठावण्यात येईल.
चित्रिकरण सुरु ठेवा पण…
चित्रीकरण सुरु ठेवता येईल परंतु गर्दीचा समावेश असलेले चित्रीकरण करता येणार नाही. तसेच सर्व कर्मचारी व चित्रीकरण स्थळावरील लोकांची RTPCR चाचणी प्रमाणपत्र बंधनकारक आहे. 10 एप्रिलपासून याची अंमलबजावणी होईल.
दिवसा जमावबंदी, रात्री संचारबंदी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात 144 कलम लागू केले जाईल. सकाळी 7 ते रात्री 8 जमाबंदी म्हणजे 5 पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई राहील. तर रात्री 8 ते सकाळी 7 यावेळेत कोणत्याही व्यक्तीला योग्य कारणाशिवाय बाहेर पडता येणार नाही. यामधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात येतील.
प्रार्थना स्थळे बंद
सर्वधर्मीयांची स्थळे, प्रार्थना स्थळे बाहेरुन येणारे भक्त व दर्शनासाठी बंद राहतील. मात्र, याठिकाणी काम करणारे कर्मचारी, पुजारी इत्यादींना दैनंदिन पूजा अर्चा करता येईल. या कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण करुन घ्यावे.
उपहारगृह, बार पूर्णपणे बंद
उपहारगृहे व बार पूर्णपणे बंद राहतील. पण उपहारगृह एखाद्या हॉटेलचा भाग असेल तर ते तेथे अभ्यागातासाठीच सुरु ठेवता येईल. बाहेरील व्यक्तीसाठी प्रवेश असणार नाही. मात्र टेक अवे किंवा पार्सलची सेवा सकाळी 7 ते रात्री 8 या कालावधीत सुरु राहील.
शाळा-महाविद्यालये बंद
शाळा-महाविद्यालये बंद राहतील. मात्र 10 वी व 12 वीच्या परीक्षांचा अपवाद असेल. सर्व खासगी क्लासेस बंद राहतील
सर्व कटिंग सलून, ब्युटी पार्लर बंद
सर्व कटिंग सलून, ब्युटी पार्लर, स्पा बंद राहतील. याठिकाणच्या कर्मचाऱ्यांची देखील लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करणे गरजेचे आहे.
बागा, चौपट्या रात्री 8 ते सकाळी 7 बंद
बागा, चौपाट्या, समुद्र किनारे इत्यादी सार्वजनिक ठिकाणे रात्री 8 ते सकाळी 7 वाजेपर्यंत बंद राहतील. दिवसा या सार्वजनिक ठिकाणी लोकं आरोग्य नियमांचे पालन करत नसताना दिसून आले तर स्थानिक प्रशासन ते ठिकाण बंद करु शकते.
वृत्तपत्रे छपाई आणि वितरण सुरु
वृत्तपत्रे छपाई आणि वितरण नेहमीप्रमाणे सुरु ठेवण्यात येईल. मात्र विक्रेत्यांनी लसीकरण करुन घ्यावे
तर सोसायटी मिनी कंटेन्मेंट
पाच पेक्षा जास्त रुग्ण एखाद्या सोसायटीत आढळल्यास ती इमारत मिनी कंटेन्मेंट म्हणून घोषित करण्यात येईल. तसा फलक लावणार, बाहेरच्या लोकांना प्रवेश बंदी.
आजारी कामागाराला काढता येणार नाही
बांधकामे सुरु असलेल्या ठिकाणी मजूर, कामगारांनी राहणे आवश्यक आहे. केवळ साहित्याची वाहतूक करण्यासाठी परवानगी देण्यात येईल. कोणत्याही कामगारास कोरोना झाला या कारणामुळे कामावरुन कमी करता येणार नाही. त्याला आजारी रजा द्यायची आहे. रजेच्या काळात पूर्ण पगार द्यावा लागेल.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments