Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

संजय राऊत साहेबांनी थोडं शांततेचा पवित्रा घ्यावा - दिपाली सय्यद

Webdunia
रविवार, 17 जुलै 2022 (19:16 IST)
"संजय राऊत त्यांचं काम करत आहेत. ते बिनधास्त बोलतात. शिवसेनेसाठी ते बोलतात. पण राऊत साहेबांनी थोडं शांततेचा पवित्रा घ्यावा," असं शिवसेनेच्या नेत्या दिपाली सय्यद यांनी म्हटलंय.
 
त्या पुढे म्हणाल्या, "माझं कुटुंब मला जपायचं आहे. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे साद घालत आहेत. पण पलिकडून प्रतिसाद येत नाहीये. कुठे ना कुठे मानापमानमध्ये अडकलं आहे. शांततेचा पवित्रा घेतला तर पुन्हा एकदा शिवसेना एकत्र यावी एवढंच म्हणणं आहे."
 
"कुठेतरी काहीतरी अडतं आहे. ते मी सोडवण्याचा प्रयत्न करत आहे. मातोश्रीचे दरवाजे उघडे आहेत असं उद्धवसाहेबांनी सांगितलं आहे. आदित्यजींच्या बोलण्यातून हे दिसलं आहे," असंही दिपाली सय्यद म्हणाल्या.
 
"मी शिवसैनिक आहे. मला कोणालाही दुखवायला आवडत नाही. उत्तराला प्रत्युत्तर दिलं होतं. शिवसैनिक एकत्र येत असतील तर मी कुणाचेही आभार मानायला तयार आहे. सगळ्यांची माफी मागते जर माझ्याकडून काही चुकलं असेन तर. मला शिंदेसाहेबांनी शिवसेनेत आणलं. मानापनाची दरी सांधायला हवी. एकेक पाऊल पुढे यायला हवं. कार्यकर्ते होरपळले आहेत", असं त्या म्हणाल्या.
 
"घरवापसी व्हायला हवी. दोघेही आमच्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. घराचे विभाजन व्हायला नको. तुम्हाला लवकरच कळेल. मी अनेक ठिकाणी गेले आहे. मला जे जाणवलं ते म्हणजे थोडा अहंकार आहे.
 
हे सगळं तुटेल. दोन्ही गटाचे कार्यकर्ते, आमदार यांची इच्छा एकत्र येण्याचीच इच्छा आहे. मीही संजय राऊत यांच्याशी बोलेन.
 
दोन्ही गटांनी एकेक पाऊल पुढे टाकलं तर गोष्टी बदलू शकतात. उद्धवजी आमचे कुटुंबप्रमुख आहेत. आम्ही त्यांची लेकरं आहोत", असं सय्यद यांनी सांगितलं.
 
दरम्यान उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे समर्थक यांच्यापैकी कुणाची शिवसेना खरी हा प्रश्न ऐरणीवर आलेला असताना या दोन नेत्यांच्या संभाव्य भेटीमुळे नव्या शक्यता वर्तवल्या जात आहेत.
 
एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदारांच्या बंडामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. शिंदे समर्थकांच्या बंडामुळे शिवसेना पक्षाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं.
 
राज्यातील अनेक जिल्ह्यामधील शिवसेनेचे नगरसेवक आणि पदाधिकारी शिंदे गटात सामील होऊ लागले आहेत. आपलीच शिवसेना खरी असा दावा करणाऱ्या शिंदे गटाला मात्र उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने आव्हान दिले आहेत.
 
अशातच शिवसेनेच्या नेत्या आणि अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीचे संकेत दिले आहेत.
 
सय्यद यांनी ट्विट केलंय की, "येत्या दोन दिवसात आदरणीय उद्धवसाहेब आणि आदरणीय शिंदेसाहेब शिवसैनिकांच्या भावनांचा आदर करून पहिल्यांदा चर्चा करायला एकत्र येणार हे समजल्यावर खूप बरे वाटले.
 
"शिंदे साहेबांनी शिवसैनिकांची तळमळ समजली आणि उद्धवसाहेबांनी कुटुंबप्रमुखाची भूमिका मोठ्या मनाने निभावली हे स्पष्ट झालं आहे. या मध्यस्थीकरता भाजप नेत्यांनी मदत केली याबाबत धन्यवाद. चर्चेच्या ठिकाणाची प्रतीक्षा असेल."
 
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चर्चेसाठी एकत्र यावे यासाठी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी मदत केल्याचे सांगत दीपाली सय्यद यांनी भाजप नेत्यांचे आपल्या ट्विटमध्ये आभारही मानले आहेत.
 
याआधीच्या एका ट्वीटमध्ये सय्यद यांनी आदित्य ठाकरे मंत्रिमंडळात दिसावेत असं म्हटलं होतं. सय्यद यांनी लिहिलं, "लवकरच माननीय आदित्य साहेब मंत्रीमंडळात दिसावे, शिवसेनेच्या 50 आमदारांनी मातोश्रीवर दिसावे, आदरणीय उद्धव साहेब व आदरणीय शिंदेसाहेब एक व्हावे, शिवसेना हा गट नसुन हिंदुत्वाचा गड आहे, त्यावरचा भगवा नेहमी डौलाने फडकत राहील."
 
दीपाली सय्यद यांच्या या ट्विटवर भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांकडून अद्याप कोणत्याही प्रतिक्रिया आलेल्या नाहीत.
 
दिपाली सय्यद यांच्या वक्तव्यावर संजय राऊत एबीपी माझाला प्रतिक्रिया दिली. राऊत म्हणाले, "दिपाली सय्यद अभिनेत्री आहेत. आमच्या पक्षात त्या काम करतात. त्यांना या वक्तव्यांचे अधिकार कुणी दिले, मला माहित नाही. त्या शिवसेनेच्या नेत्या आहेत, पदाधिकारी-कार्यकर्त्या असतील. पण अशा प्रकारची विधानं फार काळजीपूर्वक करायची असतात. पक्षाचे अधिकृत प्रवक्ते अशी विधानं करू शकतात, नेते करू शकतात."

संबंधित माहिती

ठाण्यात इमारतीला धडकून ट्रक पालटून अपघात, एक ठार, 6 जखमी

Petrol-Diesel Price Today : पेट्रोल डिझेलच्या दरात बदल? आजचे दर जाणून घ्या

धक्कादायक! पुण्यात सावत्र बापाकडून 4 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, आरोपीला अटक

चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून कार उलटून भीषण अपघातात 4 जण जखमी

SCO vs AUS : ऑस्ट्रेलियाचा स्कॉटलंडवर पाच गडी राखून विजय, स्कॉटलंड स्पर्धेतून बाहेर

ईव्हीएम AI द्वारे हॅक होऊ शकतात इलॉन मस्कचा इशारा

क्रेडिट कार्डाच्या मदतीनं कोट्यवधी लुटणाऱ्या ठगाची कबुली; कसे लुटले आणि उधळले पैसे

पाकिस्तानच्या यूएन मिशनवर सायबर हल्ला

सुमित नागलची उत्कृष्ट कामगिरी,पेरुगिया चॅलेंजरच्या उपांत्य फेरीत

Father’s Day Wishes 2024:पितृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

पुढील लेख
Show comments