Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

‘तेलगी घोटाळा प्रकरणात शरद पवार साहेब तुम्ही माझा राजीनामा का घेतला?’-छगन भुजबळ

Webdunia
सोमवार, 28 ऑगस्ट 2023 (08:45 IST)
तेलगी घोटाळा प्रकरणावरून छगन भुजबळ यांनी 27 ऑगस्ट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी बीडमध्ये आयोजित केलेल्या सभेत भुजबळ बोलत होते.
 
यावेळी भुजबळ यांनी तेलगी घोटाळ्याचा उल्लेख करत माझा दोष नसताना राजीनामा का घेतला, असा थेट सवाल शरद पवारांना केला आहे.
 
याआधी बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सभा आयोजित करण्यात आली होती.
या सभेदरम्यान शरद पवार यांच्या गटानं मोठं शक्तिप्रदर्शन केलं होतं. त्याला प्रत्युत्तर म्हणून धनंजय मुंडेंनी आज बीडमध्ये अजित पवारांची सभा आयोजित केल्याचं बोललं जात आहे.
 
भुजबळ नेमकं काय म्हणाले?
यावेळी सभेला संबोधित करताना भुजबळ म्हणाले की, “तेलगी प्रकरणात मी त्याला अटक केलं. त्याच्यावर मोक्का लावायला सांगितला. कडक कारवाई केली. काही लोकांनी फक्त आरोप केले. साहेब तुम्ही बोलावलंत आणि सांगितलं की भुजबळ तुम्ही राजीनामा द्या.
 
“मी म्हटलं का? तर म्हणाले, ते झी टीव्हीचे सुभाष गोयल नाराज होतील. सुभाष गोयलचा पवारांना फोन आला की, भुजबळांचा राजीनामा घेऊ नका, त्यांची काही चूक नाही. पण साहेब तुम्ही माझा राजीनामा घेतला.
 
“साहेब, तुमच्यावरसुद्धा आरोप झाले होते. 1992-93-94 मध्ये. तुमचा राजीनामा कुणी मागितला नाही आणि तुम्हीही तो दिला नाही. पण छगन भुजबळचा राजीनामा तुम्ही का घेतला?
 
“मी राजीनामा दिल्यानंतर बऱ्याच गोष्टी घडल्या. एके दिवशी पोलीस आयुक्त आले आणि म्हणाले की समीर भुजबळला अटक होणार. ताबडतोब त्याला देशाच्या बाहेर काढा. आम्ही संध्याकाळी त्याला देशाच्या बाहेर पाठवलं. काय चाललं होतं नक्की?
 
“शेवटी आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो. सुप्रीम कोर्टानं सांगितलं की ही केस सीबीआयकडे द्या. सीबीआयनं एक शब्दसुद्धा आमच्याविरुद्ध त्या चार्जशीटमध्ये म्हटलेला नाही. त्यात माझं नावसुद्धा नाही. मग साहेब आमची काय चूक होती ते सांगा.”
 
भुजबळांच्या या आरोपांवर शरद पवार काय प्रत्युत्तर देतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्यांनी याविषयी वक्तव्य केलं तर ते या बातमीत अपडेट केलं जाईल. पण भुजबळांच्या आरोपांनंतर तेलगी घोटाळ्याची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. हा घोटाळा काय होता, ते जाणून घेऊया.
 
तेलगी घोटाळा काय आहे?
अब्दुल करीम तेलगी हा 32 हजार कोटी रुपयांच्या बनावट स्टँप घोटाळ्याचा सूत्रधार होता. 2017 मध्ये बंगळुरूमधल्या व्हिक्टोरिया रुग्णालयात दीर्घ आजारानंतर मृत्यू झाला. खोटे स्टँप छापून त्यांची विक्री केल्याप्रकरणी तो बंगळुरूच्या तुरुंगात शिक्षा भोगत होता.
तेलगीचा प्रवास कर्नाटकातून सुरू झाला आणि कर्नाटकातच संपला. पण त्याची कर्मभूमी होती नाशिक. तिथल्या सरकारी प्रेसला सुरूंग लावून त्याने अख्ख्या देशात खळबळ उडवून दिली होती.
 
या घोटाळ्यामुळे व्यवस्थेला लागलेली भ्रष्टाचाराची कीड लोकांसमोर आली आणि अनेक राजकारणी उघडे पडले. हे सारं घडवून आणणाऱ्या तेलगीचा प्रवास थक्क करणारा आहे.
 
बेळगाव स्टेशनवर फळं विकायचा
अब्दुल हा बेळगाव जिल्ह्यातल्या खानपूर स्टेशन रोडवर राहणाऱ्या रेल्वे पोलीस कर्मचाऱ्याचा मुलगा. वडिलांच्या निधनानंतर त्याच्यावर रेल्वे स्टेशनवर फळं विकण्याची वेळ आली.
 
बेळगावमध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर तो सौदी अरेबियात गेला. तिथून परत आल्यावर त्याने मुंबई गाठली. 90च्या दशकाच्या सुरुवातीला त्याच्या लक्षात आलं की देशात स्टँप पेपर म्हणजेच मुद्रांकाचा मोठा तुटवडा होता.
 
मुद्रांकांचं महत्त्व ओळखून त्याने नाशिक रोड इथल्या सरकारी छापखान्यापासून देशभरातल्या मुद्रांक वितरण प्रणालीचा अभ्यास केला. सिक्युरिटी प्रेसमधले काही कर्मचारी आणि काही रेल्वे पोलिसांशी संधान बांधून त्याने आधी खरे स्टँप पेपर चोरी करून ते विकायला सुरुवात केली.
 
स्टँप पेपरच्या चोरीपासून सुरुवात
चोरलेले मुद्रांक विकून मिळालेल्या पैशातून त्याने मदत करणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांना भेटवस्तू दिल्या. त्याचे संबंध एवढे घनिष्ठ झाले की त्याला घरबसल्या नाशिकहून वितरित होणाऱ्या मुद्रांकांची खडान् खडा माहिती मिळू लागली. तसंच बंदोबस्त आणि सुरक्षा यंत्रणेतल्या उणिवाही त्याला कळू लागल्या.
 
हळूहळू फळं विकणारा तेलगी कोट्यधीश झाला. मग त्याने सिक्युरिटी प्रेसमधल्या आणि पोलिसांतल्या मोठ्या अधिकाऱ्यांशी जवळीक वाढवली. तेव्हा त्याच्या लक्षात आलं की स्टँप पेपर चोरून विकण्यापेक्षाही स्टँप पेपर छापण्यात जास्त पैसा आहे.
 
तो स्टँप पेपर छापू लागला!
स्टँप पेपर चोरून विकल्यामुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या. रेल्वे पोलिसांकडे उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, बिहार, राजस्थान व इतर राज्यांतून स्टँप पेपर गहाळ झाल्याच्या तक्रारी येऊ लागल्या.
 
हे गुन्हे नाशिक शहर पोलिसांकडे वर्ग होऊ लागले. पण या तपासांतून तेलगी सहीसलामत सुटला. यानंतर एकाएकी स्टँप पेपर गहाळ होण्याच्या तक्रारी कमी झाल्या.
 
त्यानंतर तेलगीने थेट सिक्युरिटी प्रेसच्या मोठ्या अधिकाऱ्यांच्या संगनमताने भंगारात काढलेले मुद्रांक छपाई मशीन विकत घेतले आणि स्वतःच मुद्रांक छपाई सुरू केली.
 
गडगंज तेलगी
नव्वदच्या दशकाच्या उत्तरार्धात तेलगी गडगंज श्रीमंत झाला. त्याच्याकडे शंभर कोटींहून अधिक रुपयांची मालमत्ता असेल, असा तपास संस्थांचा अंदाज होता. त्याने एका रात्री 93 लाख रुपये उडवल्याची त्या काळी चर्चा होती.
 
त्याने नाशिकमधल्या तसंच उत्तर महाराष्ट्रातल्या राजकीय नेत्यांशी संबंध जुळवले. त्यांना निवडणुकांमध्ये मदत करण्याच्या मोबदल्यात तो प्रेसमधल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करू लागला.
 
1998 नंतर मुद्रांक चोरीचं प्रकरण CBIकडे देण्यात आलं. प्रेसमधील कर्मचाऱ्यांपासून ते प्रेस महाप्रबंधकांपर्यंत सर्वांची चौकशी करण्यात आली.
 
नाशिक रोड पोलीस स्टेशनमध्ये वारंवार नोंद होणाऱ्या या गुन्ह्यांची नोंद स्थानिक पत्रकारांना समजली. ही बातमी देणाऱ्या सकाळच्या विनोद बेदरकर यांनी बीबीसी मराठीशी बोलताना दावा केला की, मुद्रांक चोरी प्रकरणी तपास करणाऱ्या पोलिसांवर राजकीय दबाव होता.
 
अटक आणि परिणाम
2001 साली तेलगीला कर्नाटक पोलिसांनी अटक केली. पण 2003 साली जेव्हा विशेष तपासणी पथकाने त्याच्या मुंबईतल्या कुलाबा इथल्या घरी धाड टाकली, तेव्हा तो पोलिसांसोबत पार्टी करताना आढळला होता.
 
2007 साली त्याने गुन्हा कबूल केला. त्याला 30 वर्षांची शिक्षा आणि 202 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.
 
हा घोटाळा उघड झाल्यानंतर नाशिक सिक्युरिटी प्रेसची प्रचंड पीछेहाट झाली. नाशिकमध्ये प्रस्तावित असलेला कागद कारखाना रद्द करण्यात आला. 2009 पर्यंत महत्त्वाचे सरकारी मुद्रण नाशिक प्रेसमध्ये बंद होते.
 
प्रेसमध्ये सुरक्षेच्या अंगाने अनेक सुधारणा झाल्या. सुरक्षा व्यवस्था तत्कालीन DSO यंत्रणेकडून केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडे देण्यात आली.
 
मुद्रांक वॉटरमार्क सिक्युरिटी फीचरमध्ये बदल झाले. मुद्रांकांवर चलनी नोटांप्रमाणे क्रमांक येण्यास सुरुवात झाली. त्यामुळे मुद्रांक कधी छापले, कुठे व कसे वितरित झाले हे कळणं सोपं झालं.
 






Published By- Priya Dixit 
 
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Margashirsha Purnima 2024: मार्गशीर्ष पौर्णिमेला लक्ष्मी देवीची कृपा मिळविण्यासाठी कोणते उपाय करावेत?

Annapurna Jayanti 2024: अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघरात किती दिवे लावावेत?

वृश्चिक राशीत बुधाचा उदय या राशींसाठी खूप शुभ राहील

बाळासाठी भगवान दत्तात्रेयाच्या नावावरुन सुंदर नावे

दत्त जयंती विशेष रेसिपी : सुंठवडा

सर्व पहा

नवीन

आश्चर्यकारक! माणसाने गिळली जिवंत कोंबडी, जीव गुदमरुन मृत्यु

महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातून पाच वर्षाच्या मुलाचे अपहरण, गुन्हा दाखल

अमित शहांच्या वक्तव्यावर प्रकाश आंबेडकर संतापले, म्हणाले- भाजपची जुनी मानसिकता समोर आली

LIVE: मुंबईत सीबीआयची धाड,भ्रष्टाचार प्रकरणी दोन आयआरएससह 7 जणांना अटक

मुंबई बोट दुर्घटना: बचाव कार्यात हेलिकॉप्टर गुंतले, 77 प्रवाशांची सुटका, 2 ठार

पुढील लेख
Show comments