Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शिवसेना वर्धापन दिन : उद्धव ठाकरेंना पक्षाची पुनर्बांधणी करण्यात किती यश आलंय?

Webdunia
सोमवार, 19 जून 2023 (09:34 IST)
"आम्ही दादरला रानडे रोडला रहायचो. आजोबांनी बाळासाहेबांना विचारलं की संघटना काढायची आहे की नाही? आणि आजोबा पटकन बोलले 'शिवसेना' आणि 'जय महाराष्ट्र' म्हणत नारळ फोडण्यात आला. त्या नारळाच्या पाण्याच्या शिंतोडे माझ्या अंगावर होते. तुम्ही मला बाळासाहेबांचे विचार शिकवणार?"
 
उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला आपल्या भाषणात पुन्हा एकदा भाजप आणि शिंदे गटावर सडकून टीका केली.
 
यंदाचा वर्धापन दिन हा उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण शिवसेनेत बंड झाल्यानंतरचा हा पहिला वर्धापन दिन आहे.
 
19 जून 1966. याच दिवशी शिवसेनेची स्थापना झाली. म्हणजेच आज शिवसेनेचा वर्धापन दिन. पण शिवसेनेच्या इतिहासात आजतागायत कधीही दोन स्वतंत्र वर्धापन दिनाचे कार्यक्रम आयोजित झाले नव्हते.
 
यंदा प्रथमच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना अशा पक्षाच्या दोन गटांकडून वेगवेगळे वर्धापन दिन साजरे केले जाणार आहेत.
 
यानिमित्ताने रविवारी 18 जूनला मुंबईत ठाकरे गटाच्या राज्यव्यापी शिबीराचं आयोजन करण्यात आलं होतं. राज्यातील सर्व पदाधिकारी यासाठी उपस्थित होते. पण शिबीर सुरू होताच एक मोठी बातमी येऊन धडकली आणि कार्यकर्त्यांनाही धक्का बसला.
 
वरळी येथील NSCI सभागृहात हे शिबीर आयोजित करण्यात आलं होतं.
 
राज्यातील विविध भागातील शाखा प्रमुख, संपर्क प्रमुख, जिल्हा प्रमुख, उपनेते आणि इतर आमदार, खासदार या शिबारीसाठी पोहोचले होते.
 
एवढ्यात एका वृत्ताची चर्चा सुरू झाली. शिवसेनेच्या विधानपरिषदेच्या महिला आमदार मनिषा कायंदे नॉट रिचेबल आहेत. त्या शिबीरालाही हजेरी लावणार नाहीत.
 
पाहता पाहता नेत्यांपासून ते पदाधिकाऱ्यांपर्यंत ही बातमी पोहोचली. मुंबईतील दादर, माहीम आणि वरळी भागातील नेत्यांना याची कल्पना पूर्वीपासूनच होती. तर काहींनी सांगितलं गेल्या काही दिवसांपासून मनीषा कायंदे यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जातोय.
 
दुसऱ्या बाजूला खासदार संजय राऊत, विनायक राऊत यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला. आणि या बातमीनेच बंडानंतरच्या शिवसेनेच्या पहिल्या शिबीराला सुरुवात झाली.
 
कालपर्यंत ठाकरे गटाची बाजू मांडणाऱ्या, पक्षाच्या प्रवक्त्या म्हणून काम पाहणाऱ्या मनीषा कायंदे यांनी अचानक पक्ष सोडण्याचा निर्णय का घेतला? असाही प्रश्न सर्वांना पडला.
 
कायंदे यांचा विधानपरिषदेचा कार्यकाळ येत्या काही दिवसांत संपणार आहे. या कारणास्तव त्यांनी सत्ताधारी पक्षाकडे जायचं ठरवलं, अशा चर्चा रंगल्या. तर काहींनी अंदाज बांधला की महिला आघाडीत अपेक्षित संधी मिळत नसल्याने त्यांनी पक्ष सोडला.
 
परंतु या निमित्ताने पुन्हा एकदा हा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे की, आमदार ठाकरे गटातून बाहेर का पडत आहेत? बंडानंतर आपला पक्ष सावरण्यात किंवा पक्षाची पुनर्बांधणी करण्यात उद्धव ठाकरे यांना किती यश आलं?
 
उद्धव ठाकरे काय म्हणाले?
वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं.
 
उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून ते राज्यातील भाजप, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली.
 
उद्धव ठाकरे म्हणाले, "हल्ली बरेचदा असं होतं तुमचा उत्साह बघितला की भारावल्यासारखं होतं. शिवसेनाप्रमुखांनी तुमच्या सारखे लढवय्ये मला दिले हे माझं किती जन्माचं भाग्य आहे. जिवाला जीव देणारे सोबती मला लाभले. कागदावर माझ्याकडे काहीच नाही ना चिन्ह ना नाव. तुम्ही रक्ताचं पाणी केलं ते लाचार मिंधे पलिकडे गेले तरी देखील तुम्ही सोबत आहात."
 
" उद्या (19 जून) आपला वर्धापनदिन आणि परवा (20 जून) जागतिक गद्दार दिन. लोक म्हणतात जे गेले त्यांना जाऊ द्या सुखात सोबत असणारे रिश्ते आणि दु:खात सोबत असतात ते फरिश्ते."
 
"आपल्या घरात येऊन फोडाफोडी करताहेत. सत्तेची मस्ती आहे तुमचा फुगा फोडायला आम्हाला वेळ लागणार नाही. जा मणिपूरमध्ये जाऊन या. अमित शहांनी जाऊन काय केले? मोदी अमेरिकेत जातायत मग मणिपूरला का जात नाही. युक्रेन युध्द थांबवलं ही भाकड कथा. मोदींनी जाऊन दाखवावं मणिपूरला,"
 
23 जूनला पाटणा येथे राष्ट्रीय पातळीवरील विरोधी पक्षातील नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचंही उद्धव ठाकरे यांनी यावेळी जाहीर केलं
 
ते म्हणाले, "मी 23 तारखेला पाटण्याला जातोय. पूर्वी भाजपचे लोक यायचे आता भाजप सोडून सगळे येताहेत. भाजपेत्तर एकत्र येणार आहे ती देशप्रेमींची एकजूट होणार आहे."
 
तर देवेंद्र फडणवीस यांना खोचक टोला त्यांनी लगावला. "काल परवा फडणवीसांनी प्रश्न विचारला पूर्वी एक जाहीरात यायची सहन होत नाही आणि सांगताही येत नाही."
 
केंद्रीताल मोदी सरकारवर टीका करताना ते म्हणाले," हिटलर पण असाच माजला होता. याची सुरुवात कशी झाली. अगोदर मिडियावर नियंत्रण ठेवण्यास सुरुवात केली. विरोधकांचा छळ सुरु केला, सत्य दडपून टाकलं. आम्ही म्हणू तेच सत्य तेव्हा हिटलर माजला."
 
" आम्ही मोदींचा चेहरा लावला तुम्ही बाळासाहेबांचा चेहरा लावला. कर्नाटकात तर मोदींचाच चेहरा लावला होता ते होणार नाही म्हणून बजरंगबलीचे नाव घेतलं. मी आव्हान देतो तुम्ही मोदींचा चेहरा घेऊन निवडणुकीत या, मी माझ्या वडिलांचा चेहरा घेऊन येतो,"
 
ते पुढे सांगतात, "मी मुख्यमंत्री बनल्यावर अनेकांना वाटलं हा उडणार पण मी सगळ्यांना झोपवून दिले तो तुमच्या ताकदीवर पुन्हा उभा आहे. प्रशासन तेच होतं मला आज जो मान मिळतोय कुटुंबातील सदस्य लोकांना वाटतो. हा मान तुम्हाला मिळणार नाही."
 
"आज यांचे दिल्लीत मुजरे मारणे सुरु आहे. असा लेचापेचा मिंधा महाराष्ट्र हा बाळासाहेबांचा विचार कधीच नव्हता. शिवसेनेची स्थापना झाली ते बघण्याचे माझे भाग्य, "
 
असे अनेक मुद्दे उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात मांडले.
 
उद्धव ठाकरे यांना पक्ष सावरण्यात किती यश आलं?
शिवसेनेतील 'ऐतिहासिक' बंडाला येत्या दोन दिवसांत एक वर्ष पूर्ण होईल.
 
गेल्या वर्षी 21 जून रोजी शिवसेनेतून एक एक करत 40 आमदार बाहेर पडले. त्यांनी नंतर पक्षावरच दावा केला.
 
हे बंड नसून उठाव होता अशी त्यांची भूमिका आहे. पण या फुटीनंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर मोठं आव्हान उभं राहिलं.
 
पक्षाची पुनर्बांधणी करण्याचं आव्हान आणि कार्यकर्ते, पदाधिकारी आणि उर्वरित आमदार, खासदार यांना पक्षाशी एकनिष्ठ ठेवण्याचं आव्हान उद्धव ठाकरे यांच्यासमोर होतं.
 
यासाठी ठाकरे गटाने राज्यव्यापी मोहिमा सुरू केल्या. आदित्य ठाकरे यांनी राज्यभरात दौरे केले. निष्ठा यात्रा, शिवसंवाद यात्रा, प्रबोधन यात्रा अशा माध्यमातून पुन्हा एकदा शिवसैनिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न ठाकरे गटाकडून करण्यात आला.
 
तर महाविकास आघाडीच्या 'वज्रमूठ' सभेद्वारेही उद्धव ठाकरे यांनी लोकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला.
 
राज्यव्यापी शिबीरातील भाषणात उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय मुद्दे मांडले. प्रामुख्याने त्यांनी मोदी सरकार आणि राज्यातील शिंदे सरकार आणि त्यांचं राजकारण यावर आपली मतं व्यक्त केली.
 
उद्धव ठाकरे यांच्या या भाषणात राष्ट्रीय राजकारणातील मुद्यांचा समावेश अधिक होता.
 
लोकसभेची निवडणूक आधी होईल असं सध्या वातावरण आहे. या कारणामुळे उद्धव ठाकरे यांच्या भाषणात राष्ट्रीय मुद्दे अधिक होते, असं ज्येष्ठ पत्रकार संदीप प्रधान सांगतात.
 
"यामुळे कदाचित ते राष्ट्रीय मुद्यांवर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यावरही प्रकर्षाने बोलले. मोदींनाही म्हणूनच लक्ष्य केलं असावं," असं त्यांना वाटतं.
 
उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यावर कडाडून टीका केली.
 
संदीप प्रधान सांगतात, "पक्षांची पुनर्बांधणी करण्यात कितपत यश आलं किंवा लोकांनी किती स्वीकारलं हे निवडणुकीच्या निकालातच स्पष्ट होईल. तशी कोणती मोठी निवडणूक झालेली नाही. पण महाविकास आघाडी एकत्र लढली तर प्रबळ आहे किंवा तिन्ही पक्षांना याचा फायदा होतोय हे गेल्या काही निवडणुकांमधून दिसून आलंय."
 
"दुसऱ्या बाजूला भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यात जो अपेक्षित समन्वय, संवाद असायला हवा होता तो दिसत नाहीय."
 
भविष्यात या दोन पक्षांच्या नात्यात काय बदल होईल किंवा नेमकं काय होईल हे पहाणं महत्त्वाचं असेल.
 
तर ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक अभय देशपांडे सांगतात,"उद्धव ठाकरे यांच्या लढाऊ वृत्तीमुळे म्हणा किंवा फायटींग स्पिरीटमुळे म्हणा बंडानंतर पुन्हा मोठी पडझड झाली नाही. मोठी खिंडार त्यानंतर पडली नाही. पण तरीही आगामी निवडणुका आव्हानात्मक असणार आहेत. मुंबई महानगरपालिकेत समजा ठाकरेंच्या शिवसेनेची सत्ता कायम राहिली तर चित्र बदलू शकेल."
 
दुसऱ्या बाजूला शिंदे गट आणि भाजपचं सरकार आहे. सत्ताधारी पक्षाला जे अॅडवान्टेज मिळतं हा सुद्धा भाग त्यात आहे, असंही ते सांगतात.
 
"2014 च्या निवडणुकीनंतर नेत्यांनी घाऊक प्रमाणात पक्षांतर केलं, कारण मोदी लाट वाढल्याचं दिसलं. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादीतले लोक भाजपमध्ये गेले. आता तसं वातावरण नसलं तरी लोकांच्या मनात साशंकता अजून कायम आहे."
 
उद्धव ठाकरे ही लढाई लढत असले तरी समोर केंद्रातील भाजप सरकार आणि राज्यात शिंदेंचं सरकार यांच्यासोबतच्या संघर्षाबाबत साशंकता असावी असंही आपल्याला म्हणता येईल, असंही ते सांगतात.
 
मनिषा कायंदे यांची पक्षाला सोडचिठ्ठी, याचा अर्थ काय?
 
मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात वर्षभरापूर्वी 40 आमदारांनी पक्षात बंड केलं. शिवाय शिवसेना कशी आमचीच आहे हा दावा करत निवडणूक आयोगाकडून शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह सुद्धा मिळवलं.
 
शिंदेंच्या शिवसेनेत 40 हून अधिक आमदार आहेत. शिवाय, पक्षात पदाधिकारी, कार्यकर्ते, नेते, नगरसेवक यांचे पक्ष प्रवेश सुरू आहेत.
 
पण ठाकरे गटाच्या महिला आमदार, महिला आघाडीचा चेहरा असणाऱ्या आमदार डॉ. मनीषा कायंदे यांनी पक्षाला 'जय महाराष्ट्र' केला.
 
ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक अभय देशपांडे सांगतात, "आजही काही समन्वय किंवा संवादात अभाव दिसून येत आहे. तसंच आता शिंदे आणि भाजपचं कॉम्बीनेशन स्थिरावत आहे. राजकीय नेत्यांना भविष्यातील वातावरणाचा अंदाज आपल्याआधी येत असतो. यामुळे आमदार, पदाधिकारी, नगरसेवक आजही शिंदे गटात प्रवेश करताना दिसत आहेत."
 
"दुसरं कारण म्हणजे ठाकरेंचा पक्ष किती सावरेल याची साशंकता त्यांना असावी. किंवा सावरला तरी पुढे यात आपलं स्थान काय असेल याबाबत शंका असू शकते. तसंच मविआ एकत्र असली तरी प्रत्यक्षात कितपत हा प्रयोग काम करेल, त्यात किती संधी मिळतील याचाही विचार नेते करत असतात आणि त्यानुसार ते निर्णय घेतात," असंही ते सांगतात.
 
तर नेते मंडळी सोडून चालली असली तरी जमिनीवरील कार्यकर्ते आजही उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत असं दिसतं, असं मत ज्येष्ठ पत्रकार संदीप प्रधान मांडतात.
 
ते सांगतात, "पक्ष कोण सोडून जात आहे तर नेतेमंडळी ज्यांना सत्तेचा पुढे काही फायदा आहे. पण पदाधिकारी, कार्यकर्ते मात्र उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत असं दिसतं. त्यामुळे त्यांचा हाच विचार असावा की आहे त्या सर्व कार्यकर्त्यांसोबत पुढे जावं, पक्ष मोठा करावा."
 
"दुसरा मुद्दा म्हणजे नेत्यांची फळी. आत्ता आहेत ते नेते किंवा जे सोबत राहतील ते आणि पुढची नेत्यांची फळी आता आदित्य ठाकरे यांची असेल किंवा त्यांच्या भविष्याच्यादृष्टीने असेल असं मला वाटतं. कारण पुढे सुत्र आदित्य ठाकरे यांच्याकडेच जाणार आहेत. त्यादृष्टीने टीम उभी केली जाईल."
 
शिवसेनेचा इतिहास
19 जून 1966 रोजी शिवसेना पक्षाची स्थापना झाली. मराठी लोकांनी या 'संघटना' म्हणून उदयाला आलेल्या संस्थेचं सदस्यत्व मिळावं यासाठी धडपड सुरू केली. सुरुवातीच्या काळात राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्त्व देण्याची घोषणा करण्यात आली.
 
30 ऑक्टोबर 1966 रोजी शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा झाला. शिवाजी पार्कवर झालेल्या या मेळाव्याला मोठा प्रतिसाद मिळाला. प्रबोधनकार ठाकरे यांनी 'हा बाळ मी आज तुम्हाला दिला' असे उद्गार काढले.
 
1968 साली मुंबई पालिकेत प्रवेश मिळाला असला तरी सेनेचे पहिले महापौर खुर्चीत बसायला 1971 साल उजाडलं. दादरचे डॉ. हेमचंद्र गुप्ते शिवसेनेचे पहिले महापौर झाले. 1972 साली प्रमोद नवलकर विधानसभेत गेले. तर त्याच्या पुढच्या वर्षी सतीश प्रधान ठाण्याचे महापौर झाले. शिवसेनेने 1975 साली आणीबाणीला पाठिंबा जाहीर केला.
 
शिवसेनेच्या गुप्ते यांच्यानंतर अनेक महापौर मुंबईत झाले. त्यामध्ये सुधीर जोशी, मनोहर जोशी, वामनराव महाडीक, (काँग्रेसला पाठिंबा देऊन मुरली देवरा), छगन भुजबळ, दत्ता नलावडे, रमेश प्रभू, सी. एस. पडवळ, शरद आचार्य, दिवाकर रावते, मिलिंद वैद्य, विशाखा राऊत, नंदू साटम, हरेश्वर पाटील, महादेव देवळे, दत्ता दळवी, शुभा राऊळ, श्रद्धा जाधव, सुनील प्रभू, स्नेहल आंबेकर, विश्वनाथ महाडेश्वर, किशोरी पेडणेकर असे महापौर झाले आहेत.
 
शिवसेनेनं सुरुवातीच्या काळात काँग्रेसशी अनेक निवडणुकांत मैत्री ठेवली होती. 1980 साली काँग्रेसला मदत केल्याबद्दल शिवसेनेला विधान परिषदेवर दोन जागा देण्यात आल्या.
 
1984 साली शिवसेनेने भाजपबरोबर युती केली. परंतु भाजप पुलोदमध्ये सहभागी झाल्यानंतर ही युती तुटली. तेव्हा कमळाबाई आम्हाला सोडून गेल्या अशी प्रतिक्रिया बाळासाहेब ठाकरे यांनी दिली होती.
 
1995 साली शिवसेना आणि भाजपा युतीची पहिल्यांदाच महाराष्ट्रात सत्ता आली. शिवसेनेचे मनोहर जोशी या पक्षाचे आणि या युतीचे पहिले मुख्यमंत्री झाले. मनोहर जोशी यांच्यानंतर अल्पकाळासाठी नारायण राणे मुख्यमंत्री झाले.
 
1989 साली भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये पुन्हा युती झाली ती 25 वर्षं टिकली. 2014 साली भाजप आणि शिवसेनेने विधानसभेच्या निवडणुका वेगवेगळ्या लढल्या. त्यानंतर ते पुन्हा एकत्र आले. 2019 साली शिवसेना आणि भाजप यांची युती निवडणुकीनंतर तुटली.
 
2014 साली भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस या युतीचे तिसरे मुख्यमंत्री झाले. मात्र 2019 साली शिवसेना आणि भाजपा युती तुटल्यामुळे उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री झाले.
 
निवडणुकीच्या राजकारणात प्रवेश न करता कोणतंही पद घेणार नाही अशी भूमिका घेणाऱ्या ठाकरे घराण्यातील दोन नेते विधिमंडळात आहेत. आदित्य ठाकरे वरळी मतदारसंघातून निवडून आलेत तर उद्धव ठाकरे विधानपरिषदेत निवडले गेले.
 
शिवसेनेत अनेक नेत्यांनी आपली कारकिर्द खर्च केली असली तरी अनेक नेत्यांनी शिवसेनेला 'जय महाराष्ट्र'! ही केला आहे. त्यात छगन भुजबळ, नारायण राणे, राज ठाकरे, हेमचंद्र गुप्ते, गणेश नाईक, राम जेठमलानी, चंद्रिका केनिया यांच्यासारख्या अनेक नेत्यांनी शिवसेनेतून बाहेर पडून वेगळा मार्ग धरला.
 
2003 साली महाबळेश्वरमध्ये झालेल्या अधिवेशनात शिवसेनेचे कार्यकारी प्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांची निवड करण्यात आली. त्यानंतर पुढच्याच वर्षी नारायण राणे यांनी तर 2005 साली राज ठाकरे यांनी पक्ष सोडला. त्यानंतर होत गेलेल्या मुंबई पालिका निवडणुकांमधून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब होत गेलं.
 
17 नोव्हेंबर 2012 रोजी शिवसेनप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाल्यांनंतर उद्धव यांच्याकडे सर्व सूत्रे आली.
 
शिवसेनापक्षप्रमुख म्हणून तसंच सामनाचे संपादक म्हणून त्यांनी कामास सुरूवात केली. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले होते तेव्हा संपादकपदाची सूत्र रश्मी ठाकरे यांच्याकडे गेली.
 
 






Published By- Priya Dixit 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी संजय राऊतच्या आरोपांना उत्तर दिले म्हणाले-

Pan 2.0 project : PAN 2.0 लागू झाल्यानंतर जुने पॅन कार्ड अवैध होणार का?

LIVE: ठाणे : दोन दिवसांपासून बेपत्ता तरुण, झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडला

महाराष्ट्रात शपथविधी सोहळा या दिवशी होऊ शकतो

गोल्डी बरार आणि रोहित गोदाराने नाईट क्लबबाहेर झालेल्या दोन बॉम्बस्फोटांची जबाबदारी घेतली

पुढील लेख
Show comments