Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

स्मिता ठाकरे : रिसेप्शनिस्ट ते ठाकरेंची सून, असा आहे प्रवास

Webdunia
शुक्रवार, 27 ऑगस्ट 2021 (23:41 IST)
नामदेव काटकर
"1999 साली शिवसेनेची सत्ता गेली आणि त्यानंतर शिवसेना पक्षात अंतर्गत दोन गट दिसू लागले. एक गट राज ठाकरेंना बाळासाहेबांचा उत्तराधिकारी मानत असे आणि दुसरा उद्धव ठाकरेंना.
 
मात्र, या दोघांव्यतिरिक्त आणखी एक व्यक्ती शिवसेनेची धुरा हाती घेण्याच्या स्पर्धेत होती. ती व्यक्ती म्हणजे स्मिता ठाकरे."
 
लेखक वैभव पुरंदरे यांनी 'बाळ ठाकरे अँड द राईज ऑफ द शिवसेना' या पुस्तकात हे लिहिलं आहे.
 
पुढे उद्धव ठाकरे यांचं 'मातोश्री' आणि शिवसेनेत वजन वाढत गेलं. पर्यायानं स्मिता ठाकरे स्पर्धेतून बाहेर पडल्या. राज ठाकरे तर पुढे शिवसेनेतूनच बाहेर पडले आणि नवा पक्ष स्थापन केला.
 
पण एक गोष्ट इथं लक्ष वेधून घेते, ती म्हणजे, या घडामोडींच्या अगदी 10 वर्षांपूर्वीच ठाकरे कुटुंबात प्रवेश केलेल्या स्मिता ठाकरे यांना थेट बाळासाहेबांच्या उत्तराधिकारी म्हणून पाहिलं गेलं.
या प्रसंगी असो वा नंतर कित्येक प्रसंगी, 'स्मिता ठाकरे' हे नाव महाराष्ट्राच्या राजकारणात आणि भारताच्या चित्रपटसृष्टीत कायम आपलं वजन राखून राहिलं, चर्चेच्या केंद्रस्थानी राहिलं. आजही काही ना काही निमित्तानं स्मिता ठाकरेंची चर्चा होत राहतेच.
 
आपण या वृत्तलेखातून स्मिता ठाकरे यांच्या या प्रवासाचाच आढावा घेणार आहोत.
 
रिसेप्शनिस्ट ते मातोश्री
स्मिता ठाकरे या पूर्वाश्रमीच्या स्मिता चित्रे. शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र जयदेव ठाकरे यांच्याशी 1987 साली विवाहानंतर त्या 'मातोश्री'च्या सूनबाई झाल्या.
 
जयदेव ठाकरे यांचं हे दुसरं लग्न होतं. टेलिग्राफच्या या बातमीनुसार, स्मिता ठाकरे रिसेप्शनिस्ट म्हणून काम करत असत. काही कारणानिमित्त जयदेव ठाकरे यांच्याशी ओळख झाली आणि ती वाढून पुढे त्यांचं लग्न झालं.
1987 साली लग्न झालं असलं, तरी राजकीय वर्तुळात स्मिता ठाकरे यांचा वावर अजून दिसत नव्हता. असा वावर दिसायला शिवसेना-भाजप युतीचं सरकार यावं लागलं.
 
पत्रकार योगेश पवार याबाबत अधिक सांगतात. योगेश पवार हे 1995 साली इंडियन एक्स्प्रेससाठी ठाणे जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम करत होते.
 
ते सांगतात, "ठाण्यातील एका अत्याधुनिक जिमच्या उद्घाटनासाठी बाळासाहेब ठाकरेंसोबत स्मिता ठाकरेही आल्या होत्या. साधारण 1996 सालची ही गोष्ट असेल. स्मिता ठाकरे यांचा राजकीय वर्तुळातील वावर आम्हा पत्रकारांना तेव्हापासून दिसू लागला."
 
"नंतर नंतर स्मिता ठाकरे यांच्या शब्दाला शिवसेना-भाजप युती सरकारच्या काळात वजन वाढलं होतं," असंही योगेश पवार सांगतात.
 
राजकीय वर्तुळातला वावर
बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी मीनाताई ठाकरे यांच्या निधनानंतरची ही घटना. मीनाताई ठाकरे यांचं निधन 1995 साली झालं.
 
मीनाताईंच्या निधनानंतर 'मातोश्री'वरील स्थितीबाबत पत्रकार धवल कुलकर्णी त्यांच्या 'द कझन्स ठाकरे' पुस्तकात शिवसेनेच्या एका नेत्याच्या हवाल्यानं विश्लेषण नोंदवतात.
 
"मीनाताईंच्या निधनानंतर ठाकरे कुटुंबात बऱ्याच गोष्टी गुंतागुंतीच्या झाल्या होत्या. मीनाताई गेल्यामुळे कुटंबात एकप्रकारचं रिकामेपण आलं होतं आणि ते भरून काढण्यासाठी उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि स्मिता ठाकरे प्रयत्न करत होते," असं 'द ठाकरे कझन्स'मध्ये म्हटलंय.
तसंच, यात पुढे नमूद करण्यात आलंय की, "याच 'किचन कॅबिनेट'मुळे पुढे राज ठाकरे, स्मिता ठाकरे विरुद्ध उद्धव ठाकरे आणि इतर अशा संघर्षाला सुरुवात झाली."
 
पण तरीही युती सरकारच्या काळात स्मिता ठाकरेंच्या शब्दाला वजन आलं होतं, असं वरिष्ठ पत्रकार संदीप सोनवलकर सांगतात.
 
ते म्हणतात, "स्मिता ठाकरे यांची राजकीय महत्त्वकांक्षा तेव्हा लपून राहिली नव्हती. त्यांचा शिवसेना पक्ष आणि एकूणच राजकारणातील वावर वाढल्याचं स्पष्टपणे दिसू लागलं होतं. शिवसैनिकांनाही हे कळलं होतं आणि एकूणच महाराष्ट्रालाही दिसत होतं की स्मिता ठाकरे यांचं राजकीय वजन वाढलं आहे."
 
उद्धव ठाकरेंमुळे शिवसेनेपासून दूर?
ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई सांगतात की, "स्मिता ठाकरे यांचा शिवसेनेतील वावर आणि वजन युती सरकारच्या काळात वाढलेलं दिसलं, तरी नंतर उद्धव ठाकरेंच्या हाती निर्णयप्रक्रिया येऊ लागली, 2003 ला तर उद्धव ठाकरेंकडे पक्षच जवळपास सोपवला गेला, त्यानंतर मात्र स्मिता ठाकरे बाजूला सरत गेल्या."
 
स्मिता ठाकरे यांना राज्यसभेचं सदस्यपद हवं होतं. त्यांनी आज तकला दिलेल्या मुलाखतीत तसं स्पष्ट म्हटलंय. मात्र, बाळासाहेबांना ते आश्वासन पूर्ण करता आलं नसल्यानं आपण काँग्रेसमध्ये जाण्याचा प्रयत्न करत असल्याचंही त्यांनी या मुलाखतीत सांगितलं होतं.
पत्रकार धवल कुलकर्णी सांगतात की, हा 2008-09 चा काळ आहे. ज्यावेळी स्मिता ठाकरेंना राज्यसभेत सदस्यपद हवं होतं, तेव्हा शिवसेनेची सूत्र उद्धव ठाकरेंच्या हाती एकवटून स्थिरावली होती. यावेळी उद्धव ठाकरेंनी शिवसेनेकडून राज्यसभेत ज्येष्ठ पत्रकार भारतकुमार राऊत यांना पाठवलं आणि स्मिता ठाकरेंच्या आशा मावळल्या.
 
राज्यसभेची आशा
त्यानंतर आज तकला दिलेल्या मुलाखतीत स्मिता ठाकरे म्हणाल्या होत्या, "महाराष्ट्रात आणि केंद्रात काँग्रेसचं सरकार असल्यानं काँग्रेसच्या जवळ मला जायचं आहे. सोनिया गांधींनी मला सांगितल्यास मी काँग्रेससाठी काम करण्यास तयार असेन."
 
"बाळासाहेबांनी म्हटलं होतं की राज्यसभेत पाठवू. पण त्यांनी पाठवलं नाही. का पाठवलं नाही त्याचं कारण माहीत नाही. मात्र, राज्यसभेच्या व्यासपीठावरून मी माझे मुद्दे नीट मांडू शकते, असं मला वाटतं," असं स्मिता ठाकरे म्हणाल्या होत्या.
 
त्यामुळे स्मिता ठाकरे यांच्या राजकीय महत्त्वकांक्षा कधीच लपून राहिल्या नाहीत. किंबहुना, त्यांनी जाहीरपणे त्या बोलूनही दाखवल्या.
 
मध्यंतरीच्या काळात माजी खासदार नीलेश राणे यांनी केलेल्या एका आरोपामुळे सुद्धा स्मिता ठाकरे यांचं नाव चर्चेत आलं होतं. ही टीका खरंतर प्रसिद्ध गायक सोनू निगम यांच्याशी संबंधित होती. पण टीकेचा संबंध स्मिता ठाकरे यांच्याशी जोडला गेला.
 
सोनू निगमसंबंधी वाद काय?
"बाळासाहेबांना सोनू निगमला ठार मारायचं होतं, अनेक वेळा त्याला ठार मारायचे प्रयत्न झाले, बाळासाहेबांच्या सांगण्यावरून सोनू निगमला मारण्यासाठी शिवसैनिक गेले होते. सोनू निगम आणि ठाकरे घराण्याचं काय नातं होतं हे मला सांगायला लावू नका," असा सनसनाटी आरोप माजी खासदार निलेश राणे यांनी केला होता.
त्यावेळी आम्ही सोनू निगम आणि ठाकरे कुटुंबीयांचा संबंध कसा आला, हे आम्ही जाणून घ्यायचा प्रयत्न केला.
 
याबद्दल ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांनी सांगितलं, "सोनू निगमच्या संदर्भात निलेश राणेंनी बाळासाहेब ठाकरेंवर काही आरोप केले आहेत. हा तो काळ होता जेव्हा सोनू निगम पार्श्वगायक म्हणून समोर आला होता आणि बाळासाहेबांची सून म्हणजेच जयदेव ठाकरे यांची पत्नी स्मिता ठाकरे यांनी चित्रपट निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलं होतं. दोघांनीही हसीना मान जायेगी आणि इतर एक दोन चित्रपटांसाठी एकत्र काम केलं होतं. चित्रपट क्षेत्रात असल्यानं दोघंही एकमेकांच्या संपर्कात आले, अशी त्यावेळी कुजबूज होती. पण अशा कुजबूजीला काही अर्थ नसतो. कारण त्यातून काही निष्पन्न होत नाही."
 
पत्रकार सुजाता आनंदन यांनी म्हटलं होतं, "बाळासाहेब ठाकरेंची सून स्मिता ठाकरे आणि गायक सोनू निगम यांच्यामध्ये चांगली मैत्री होती. यापलीकडे दोन्ही कुटुंबीयांमध्ये काही संबंध होते, असं मला वाटत नाही."
काही वर्षांपूर्वी 'जीना इसी का नाम है' या शोमध्ये एकदा सोनू निगम आले होते. तेव्हा हा शो सुरू असताना स्मिता ठाकरे यांनीही उपस्थिती नोंदवली होती. या शोचे होस्ट दिवंगत अभिनेते फारूक शेख होते.
 
तेव्हा सोनू निगम यांनी स्मिता यांच्याविषयी बोलताना म्हटलं होतं की, "स्मिता मला माझ्या कुटुंबासारख्या आहेत. 1997मध्ये आमची पहिल्यांदा भेट झाली होती. स्मिता यांच्या कुटुंबांला संपूर्ण देशभरात मान आहे, प्रतिष्ठा आहे. मलाही स्मिता यांच्याविषयी आदर आहे. आमच्या दोघांची मैत्री इतकी चांगली होती की, यांचं माझ्या कुटुंबाविषयीचं आणि माझं यांच्या मुलांविषयीचं प्रेम दिवसेंदिवस वाढत गेलं."
यानंतर स्मिता यांनी सांगितलं होतं की, "मी पहिल्यांदा सोनू यांना एका शोमध्ये बघितलं. आशा भोसले आणि सोनू हे दोघंही एकाच स्टेजवर होते. जेव्हा मी यांचा परफॉरमन्स बघितला तेव्हा मला आश्चर्य वाटलं की, इतक्या कमी वयात हा किती छान परफॉर्म करत आहे. नंतर हा एक चांगला माणूस आहे हे माहिती झालं. माझ्या आणि सोनूच्या मैत्रीत तुम्ही मला सोनुची बहीण म्हणू शकता, मित्र म्हणू शकता, जवळची सहकारी म्हणू शकता, आईसुद्धा म्हणू शकता."
 
"सोनूचा विचार करण्याचा अंदाज खूपच वेगळा आहे. तुम्ही विचारही करू शकणार नाही की, इतक्या कमी वयात सोनू असा विचार करू शकतो. मला असं वाटतं की तो देवाच्या खूप जवळ आहे आणि देवाचा त्याच्यावर आशीर्वाद आहे," स्मिता यांनी पुढे म्हटलं होतं.
 
हे झालं त्यांचं राजकीय आणि काहीसे कौटुंबिक प्रवासातील टप्पे. मात्र, स्मिता ठाकरे म्हटल्यावर जितक्या तातडीनं 'ठाकरे कुटुंबातील सून' अशी ओळख समोर येते, त्याच्या मागोमाग 'सिनेनिर्माती' ही ओळखही समोर येत.
 
सिनेमासृष्टीतल्या 'स्मिता ठाकरे'
1999 सालच्या 'हसिना मान जाये'पासून त्यांनी राहुल प्रॉडक्शनच्या बॅनरखाली सिनेनिर्मितीत पाऊल ठेवलं होतं.
 
पण त्यापूर्वी 1996ला राहुल प्रॉडक्शन्सने 'सपूत' सिनेमाचीही निर्मिती केली होती. मात्र, तेव्हा निर्मात्यांमध्ये नाव जयदेव ठाकरे यांचं होतं. मात्र, त्यानंतर पुढील सिनेमात राहुल प्रॉडक्शनच्या निर्मात्यांच्या नावांमध्ये स्मिता ठाकरे हे नाव दिसतं.
 
भारतीय सिनेमाचे अभ्यासक, ज्येष्ठ सिनेपत्रकार दिलीप ठाकूर 'सपूत' सिनेमाची 1996 सालची आठवण सांगतात की, जूहूमध्ये सपूत सिनेमाचं प्रीमियर होतं. त्यावेळी स्मिता ठाकरे, जयदेव ठाकरे हे निर्माते म्हणून तिथं होतेच. मात्र, बाळासाहेब ठाकरेही तिथे होते.
पुढे स्मिता ठाकरे यांचा सिनेसृष्टीतील वावर आणि वजन वाढत गेलं. त्यांच्या आडनावाचा त्यांना फायदा झाला आणि हे त्याही मान्य करतात.
 
एका मुलाखतीत त्यांना आडनावाच्या फायद्याबाबत विचारलं असता, त्यांनी सांगितलं होतं, "23 वर्षं मी ठाकरे कुटुंबासोबत जोडलीय. त्यामुळे ताकद मिळालीच आहे. ज्यांचे पॉवरफुल सरनेम असतात, त्यांना अशी तादक मिळतेच."
 
मात्र, त्यावेळी त्या पुढे असंही म्हणाल्या होत्या की, स्वत:मध्येही ताकद नसेल, तर मग आडनावामुळे मिळालेली ताकद कायम ठेवता येत नाही.
 
सिनेमासृष्टीतल्या मानाच्या समजल्या जाणाऱ्या इंडियन मोशन पिक्चर प्रोड्युसर्स असोसिएशन (IMPPA) च्या 2001 ते 2003 या काळात त्या अध्यक्ष होत्या. जी. पी. सिप्पी, बिमल रॉय यांसारखे दिग्गज एकेकाळी या संघटनेचे अध्यक्ष होते.
 
पत्रकार योगेश पवार सांगतात की, सिनेमांच्या पार्टी असो किंवा सिनेमाशी संबंधित एखादा कार्यक्रम असो, स्मिता ठाकरे आयोजनात असतील तर मोठमोठे कलाकार हजेरी लावत. यात वावगं वाटण्यासारखं काही नव्हतं. कारण त्या 'स्मिता ठाकरे' होत्या.
 
सिनेमा आणि मालिकांमध्येही त्यांनी काही उल्लेखनीय निर्मिती केल्या. जसं की, हसिना मान जायेगी (1999), हम जो कह ना पाये (2005), सँडविच (2006) आणि सोसायटी काम से गई (2011) सारखे सिनेमांची निर्मिती स्मिता ठाकरे यांनी केली.
 
काही हिंदी आणि मराठी मालिकांचीही स्मिता ठाकरे यांनी निर्मिती केली.
पत्रकार योगेश पवार स्मिता ठाकरे यांच्या सिनेकारकीर्दीचं विश्लेषण करताना सांगतात की, "स्मिता ठाकरे या सिनेसृष्टीत पाऊल ठेवण्याचा काळ महत्त्वाचा आहे. हा 1995 नंतरचा काळ आहे. तोवर शिवसेनेची चित्रपट शाखा होतीच. मात्र, हिंदी सिनेसृष्टीत शिवसेनेची ताकद स्मिता ठाकरेंनी वाढवली. दोन्हीकडून गरज होती असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही."
 
स्मिता ठाकरे आता सिनेमा किंवा राजकीय वर्तुळात सक्रिय दिसत नसल्या, तरी त्या गेल्या अनेक वर्षांपासून 'मुक्ती फाऊंडेशन' चालवतात.
 
शिक्षणासह विविध क्षेत्रात या फाऊंडेशनद्वारे काम केलं जातं. मात्र, प्रामुख्यानं ड्रग्जच्या आहारी गेलेल्यांसाठी, तसंच एड्सबाबत जनजागृती याबाबत मुक्ती फाऊंडेशनद्वारे काम केलं जातं.
 
इथं शेवटी नमदू करायला हवं की, स्मिता ठाकरे यांना दोन मुलं - राहुल आणि ऐश्वर्य. यातील राहुल ठाकरे यांच्या नावानंच स्मिता ठाकरे यांनी राहुल प्रॉडक्शन सुरू केलं होतं. राहुल ठाकरे यांनीही सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं आहे.
 
2011 साली प्रदर्शित झालेल्या 'राडा रॉक्स' सिनेमाचं दिग्दर्शन राहुल ठाकरे यांनीच केलं होतं.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Margashirsha Purnima 2024: मार्गशीर्ष पौर्णिमेला लक्ष्मी देवीची कृपा मिळविण्यासाठी कोणते उपाय करावेत?

Annapurna Jayanti 2024: अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघरात किती दिवे लावावेत?

वृश्चिक राशीत बुधाचा उदय या राशींसाठी खूप शुभ राहील

बाळासाठी भगवान दत्तात्रेयाच्या नावावरुन सुंदर नावे

दत्त जयंती विशेष रेसिपी : सुंठवडा

सर्व पहा

नवीन

जॉर्जियामधील रेस्टॉरंटमध्ये 12 भारतीय मृत आढळले

LIVE: फडणवीस मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने मुनगंटीवारही संतप्त

परभणी हिंसाचार आणि सरपंच हत्या प्रकरणावर चर्चा करण्यास फडणवीस सहमत

ठाण्यात कलयुगी बापाने आपल्या मुलीवर बलात्कार केला

अदानीविरोधात याचिका दाखल करणाऱ्या व्यक्तीला मुंबई उच्च न्यायालयाकडून दंड

पुढील लेख
Show comments