Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

तालिबानः मराठ्यांना पानिपतमध्ये हरवणाऱ्या अब्दालीला अफगाणिस्तानात इतकं का मानतात?

Webdunia
मंगळवार, 17 ऑगस्ट 2021 (13:14 IST)
- दाऊद आजमी
तालिबानी नेत्यांच्या पत्रकार परिषदेतील एका चित्राने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. हे चित्र अहमद शाह अब्दाली-दुर्रानी यांचं असल्याचं सांगण्यात येत आहे.
 
पानिपतचं तिसरं युद्ध मराठा आणि अफगाण सैन्य यांच्यात झाल्याचं आपण इतिहासात शिकलो आहोत. 14 जानेवारी 1761 ला झालेल्या या युद्धात अफगाण सैन्याची सूत्रं सांभाळली ती अहमद शाह अब्दाली-दुर्रानी यानं.
 
हिंदुस्तानच्या अनेक पिढ्या या युद्धाच्या केवळ आठवणीने रोमांचित झाल्या आहेत. इतिहासाच्या अभ्यासकांनाही या युद्धानं वेड लावलं आहे.
 
भारतीयांसाठी खलनायक असलेल्या अहमद शाह अब्दालीला अफगाणिस्तानात मात्र 'बाबा-ए-कौम' किंवा 'राष्ट्रपिता' अशी उपाधी मिळालेली आहे.
 
अहमद शाह अब्दाली-दुर्रानी हा अफगाणिस्तानी लोकांसाठी हिरो का आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न बीबीसीनं केला.
 
सर्वांत महान अफगाण
 
ही 1747 मधली घटना आहे. सेनापती आणि कबिल्याचा सरदार असलेल्या अहमद शाह अब्दाली याची सर्वसहमतीनं अफगाणिस्तानचा शाह म्हणजेच राजा म्हणून निवड करण्यात आली. त्यावेळी त्याचं वय होतं केवळ 25 वर्षे
 
अफगाणिस्तानच्या पारंपरिक कबिल्यांची पंचायत असलेल्या जिरगाने त्याची शाह पदी नेमणूक केली होती. ही बैठक पश्तून म्हणजेच पठाणांचा गढ असलेल्या कंदाहारमध्ये झाली होती.
 
कंदाहार आता दक्षिण अफगाणिस्तानात येतं. अहमद शाह अब्दाली त्याची विनयशीलता आणि करिश्मा यासाठी प्रसिद्ध होता.
 
राज्याभिषेकावेळी साबिर शाह नावाच्या एका सुफी संताने अहमद शाह अब्दालीचे अंगभूत गुण आणि योग्यता ओळखून त्याला 'दुर-ए-दुर्रान' हा किताब बहाल केला होता. 'दुर-ए-दुर्रान' याचा अर्थ मोत्यांमधला सर्वोत्कृष्ट मोती. तेव्हापासून अहमद शाह अब्दाली आणि त्याच्या कबिल्याला दुर्रानी या नावाने ओळखले जाऊ लागलं.
 
अब्दाली हा पठाण आणि अफगाणिस्तानच्या लोकांचा अत्यंत महत्त्वाचा कबिला आहे. अहमद शाह याच सन्मानित घराण्यातून होता. त्याने त्याच्या शासनकाळात अपेक्षेहून उत्कृष्ट यश संपादित केलं. तो इतका यशस्वी ठरेल, अशी कल्पनाही कुणी केली नव्हती.
 
त्याने सर्व अफगाणी कबिल्यांमध्ये आपापसात असलेलं वैर दूर करून सर्वांची एकजूट केली आणि अफगाण राष्ट्राची पायाभरणी केली. तो सर्व युद्धे जिंकला. इतिहासकार याला दुर्रानी साम्राज्य म्हणतात.
 
अहमद शाह अब्दालीचं विशाल साम्राज्य पश्चिमेकडे इराणपासून ते पूर्वेकडे भारताच्या सीमेपर्यंत, उत्तरेकडे मध्य आशियाच्या अमू दरिया नदीच्या किनाऱ्यापासून दक्षिणेकडे हिंद महासागरापर्यंत पसरलं होतं. ढोबळमानाने हे साम्राज्य 20 लाख चौरस किमी इतकं विशाल होतं.
 
अहमद शाह अब्दाली-दुर्रानीने आपल्या लोकांना एक नवी ओळख आणि स्वतंत्र राष्ट्र दिलं. अब्दालीनेच स्थापन केलेल्या राष्ट्राला आज आपण अफगाणिस्तान या नावाने ओळखतो. त्या जुन्या अफगाणिस्तानची झळाळी कायम राहिली नसली तरी सीमा अजूनही जवळपास तशाच आहेत.
 
पश्तो भाषेतील प्रसिद्ध कवी अब्दुल बारी जहानी म्हणतात, "अहमद शाह बाबा सर्वात महान अफगाणी होते."
 
अब्दुल बारी जहानी अफगाणिस्तान सरकारमध्ये संस्कृती आणि माहिती मंत्री होते. त्यांनीच अफगाणिस्तानचं आजचं राष्ट्रगीतही लिहिलं आहे. "अफगाणिस्तानच्या 5 हजार वर्षांच्या इतिहासात आम्हाला अहमद शाह बाबासारखा शूर, प्रसिद्ध आणि लोकप्रिय शासक मिळाला नाही", असं बारी यांनी लिहून ठेवलं आहे.
 
परिणामकारक आणि निर्णायक घटना
अहमद शाह अब्दाली याने राजा झाल्यानंतर आणि त्याआधीही अनेक महत्त्वाची युद्धं लढली होती. मात्र, जानेवारी 1761 मध्ये दिल्लीजवळ पानिपतच्या मैदानात लढण्यात आलेलं युद्ध एक सेनापती आणि बादशाह म्हणून अहमद शाह अब्दालीच्या आयुष्यातील सर्वांत मोठं युद्ध होतं.
 
हा तो काळ होता जेव्हा एकीकडे अब्दाली आणि दुसरीकडे मराठा दोघेही साम्राज्य विस्ताराच्या महत्त्वाकांक्षेने पछाडले होते.
 
एकापाठोपाठ एक युद्ध जिंकल्याने मराठा साम्राज्याची महत्त्वाकांक्षा वाढली होती. मराठ्यांनी आपल्या साम्राज्याचा वेगाने विस्तार केला होता. त्यामुळे अहमद शाह अब्दालीला त्याच्या साम्राज्याला मराठ्यांपासून धोका असल्याचं वाटू लागलं होतं.
 
उत्तर भारतातील त्याकाळातील जे प्रांत अब्दालीच्या साम्राज्याचा भाग होते ते अब्दालीच्या नवीन अफगाण साम्राज्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे होते. त्यामुळेच पानिपतचं तिसरं युद्ध अब्दालीसाठी आत्मसुरक्षेच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाचं होतं, असं सामान्य अफगाणी नागरिकांचं मत आहे.
 
अब्दालीसाठी या युद्धाचा उद्देश आपल्या साम्राज्याला असलेला मोठा धोका दूर करणं हा होता. जेणेकरून तो त्याच्या साम्राज्यासह त्याच्या क्षेत्रीय सहकाऱ्यांचंही रक्षण करू शकेल.
 
या युद्धात अफगाण सैन्याचा विजय झाला असला तरी दोन्ही सैन्याचे हजारो सैनिक ठार झाले.
 
अफगाणिस्तानातील एका प्रांतात आजही या युद्धाला 'मराटाई वहाल' (मराठ्यांना परास्त करणं) म्हणून ओळखलं जातं. कंधार भागात पश्तो भाषेत ही आजही एक म्हण म्हणून प्रचलित आहे. एखाद्याच्या ताकदीला आव्हान देण्यासाठी किंवा व्यंगात्मक टीकेसाठी ही म्हण वापरतात.
 
पठाणांमध्ये आजही दैनंदिन बोलीभाषेत 'तू तर असं बोलत आहेस जणू तू मराठ्यांना पराभूत केलं', असं सर्रास म्हटलं जातं. किंवा मग 'तू कोणत्या मराठ्याला हरवलं आहेस?' अशी प्रश्नार्थक टीका करतात.
 
इतिहासाला न्याय दिला का?
भारतात पानिपतवर सिनेमा येऊन गेला आहे. काही जणांचं विशेषतः अफगाणिस्तानच्या नागरिकांचं म्हणणं आहे की 'पानिपत' सिनेमात अब्दालीची नकारात्मक प्रतिमा दाखवल्यामुळे त्याचा परिणाम भारत-अफगाणिस्तान संबंधांवरही पडू शकतो.
 
या सिनेमामुळे दोन्ही देशातील जनतेमध्ये एकमेकांप्रति नकारात्मक भावना निर्माण होईल.
 
पाकिस्तानने तर आपल्या एका क्षेपणास्त्राला अहमद शाह अब्दाली नाव दिलं आहे. त्यामुळे या सिनेमात अब्दालीची खलानायक अशी भूमिका दाखवल्यास पाकिस्तान याचा राजकीय फायदा उचलण्याचा प्रयत्न करेल.
 
बाबा-ए-अफगाण
आपल्या 25 वर्षांच्या शासन काळात अहमद शाह अब्दालीने आपला देश आणि तिथल्या नागरिकांच्या विकासात मोलाचं योगादन बजावलं आहे.
 
तो कायमच गडबडीत असायचा, असं त्याच्याविषयी सांगितलं जातं. मात्र, एखाद्या बेजबाबदार तरुणाप्रमाणे त्याने कधीच कुठलचं काम केलं नाही. उलट त्याने अत्यंत संयमानं आणि समंजसपणे राज्यकारभार चालवला.
 
तेव्हापासून आजतागायत अहमद शाह अब्दाली अफगाणिस्तानच्या नागरिकांमध्ये आत्मसन्मान आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना जागवत आला आहे.
 
प्रसिद्ध भारतीय इतिहासकार गंडा सिंह (1900-1987) यांनी 'अहमद शाह दुर्रानी - आधुनिक अफगाणिस्तान के निर्माता' या आपल्या पुस्तकात लिहिलं आहे, की अहमद शाह अब्दाली सुरुवातीपासून आयुष्याच्या अंतापर्यंत पूर्णपणे एक अफगाण होता. त्यानं आपलं संपूर्ण आयुष्य देशहिताला वाहून घेतलं होतं.
 
गंडा सिंह लिहितात, "अहमद शाह अब्दाली आजही सामान्य अफगाणी नागरिकांच्या मनात जिवंत आहे. मग तो तरुण असो किंवा वयोवृद्ध. प्रत्येक अफगाण या महान विजेत्याची आराधना करतो.
 
ते त्याला एक खरा आणि सहृदय व्यक्ती मानतात जो जन्मजात नेता होता. ज्याने संपूर्ण अफगाणिस्तानला स्वतंत्र करून एकजूट केलं आणि आपल्या देशाला स्वयंपूर्ण बनवलं. आणि म्हणूनच सामान्य अफगाणी अब्दालीला अहमद शाह बाबा, अहमद शाह महान म्हणतात."
 
एक फकीर आणि कवीदेखील
अफगाणिस्तानतील जनता अहमद शाह अब्दालीला एखाद्या संताप्रमाणे पूजते. त्यांना अब्दालीचा अभिमान आहे आणि संपूर्ण राष्ट्र त्याच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करतं.
 
अहमद शाह अब्दालीला दीन-ए-इस्लामचा सच्चा शिपाई मानलं जातं. केवळ अफगाणिस्तानच नव्हे तर पाकिस्तानातील पश्तून प्रांतातील लोकांचीही अब्दालीप्रती हीच भावना आहे. इतकंच नाही तर मध्य आणि दक्षिण आशियातील मुस्लिमांचा एक मोठा गटही अब्दालीकडे अत्यंत आदराने बघतो.
 
कंदाहारमध्ये त्याचा मकबरा आहे. कंदाहार हीच त्याच्या साम्राज्याची राजधानी होती. त्यामुळे तीर्थयात्रेकरूंसाठी कंदाहार एक महत्त्वाचं ठिकाण आहे. आजही संपूर्ण अफगाणिस्तानातून लोक अब्दालीच्या कबरीवर फातिहा पठण करण्यासाठी येतात.
 
तो केवळ तलवारीचा बाजीगर नव्हता. त्याची लेखणीवरही जबरदस्त पकड होती. तो उत्कृष्ट कवी होता.
 
केवळ कविताच नाही तर उत्तम लेखही लिहायचा. अहमद शाह अब्दाली याने पश्तो या आपल्या मातृभाषेव्यतिरिक्त दारी-फारसी आणि अरबी भाषेतही विपुल लेखन केलं आहे.
 
त्याची संपूर्ण साहित्यकृती पश्तो भाषेत संकलन करून ठेवण्यात आली आहे. आजही सर्वच वयोगटातील अफगाण त्याचं वाचन करतो. ते गुणगुणतो.
 
भारतातील ब्रिटीश साम्राजाशी संबंध असणारे इतिहासकार आणि नेता माउंटस्टार्ट एलफिंस्टन (1779-1859) यांनी 1808 साली अफगाणिस्तानचा दौरा केला होता. हा संपूर्ण दौरा त्यांनी पुस्तकरुपात जतन करून ठेवला. या पुस्तकाचं नाव आहे - Account of The Kingdom of Cabul and It's Dependencies in Persia and India. यात एल्फिंस्टन लिहितात, "सामान्यपणे अहमद शाह अब्दाली याचा उल्लेख दया आणि नम्रतेचा दूत म्हणून होतो."
 
एलफिंस्टन हेदेखील लिहितात, "अब्दालीला कायमच संत बनायचं होतं. आध्यात्मिकतेकडे त्यांचा कल होता आणि ते जन्मजात लेखक होते."
 
मात्र, पानिपत सिनेमाचा ट्रेलर बघून अहमद शाह अब्दाली एक क्रूर, आक्रमक आणि कायम संतापलेला असायचा, असंच वाटतं.
 
ब्रिटीश भारतीय सैन्याचे एक अधिकारी आणि भाषातज्ज्ञ हेन्री जी रेव्हर्टी (1825-1906) यांनी अहमद शाह अब्दाली यांचं वर्णन पुढील शब्दात केलं आहे - ते एक अत्यंत सक्षम व्यक्ती होते. धर्म आणि साहित्याविषयीचं त्यांचं ज्ञान डॉक्टरेटच्या स्तराचं होतं.
 
आपल्या एका कवितेत अब्दाली लिहितो -
 
ऐ अहमद, अगर लोगों को अपनी इबादत पर ग़ुरूर है
 
तो तू ग़रीबों की मदद करके उनकी इबादत हासिल कर.
 
पानिपतच्या तिसऱ्या युद्धात मराठ्यांचा पराभव केल्यानंतर अहमद शाह अब्दालीने मनात आणलं असतं तर तो भारतातच राहू शकला असता आणि दिल्लीतून संपूर्ण हिंदुस्थानावर राज्य करू शकला असता.
 
मात्र, त्याला कंदाहारला परत जाऊन अफगाण साम्राज्याच्या सीमांचं रक्षण करणंच सयुक्तिक वाटलं. तो आपलं साम्राज्य अफगाण कबिले आणि त्यांची संस्कृती यांच्या हद्दीतच मर्यादित ठेवू इच्छित होता.
 
कदाचित याच कारणामुळे त्याने त्याच्या सर्वाधिक लोकप्रिय झालेल्या कवितांपैकी एकामध्ये लिहिलं होतं -
 
मैं दिल्ली के तख़्त को भूल जाता हूं,
 
जब मुझे अपनी ख़ूबसूरत अफ़ग़ान सरज़मीं की पहाड़ियां याद आती हैं

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

सूर्यनमस्काराने शरीर मजबूत होते, जाणून घ्या योग्य पद्धत

वर्षानुवर्षे आतड्यांमध्ये साचलेली घाण साफ होईल, सकाळी उठल्याबरोबर हे पाणी प्या

28 डिसेंबर रोजी कुंभ राशीत शुक्र आणि शनीचा संयोग 2025 मध्ये चमत्कार घडवेल, 5 राशी धनवान होतील

साप्ताहिक राशीफल 23 डिसेंबर ते 29 डिसेंबर 2024

Kanya Lal Kitab Rashifal 2025: लाल किताबनुसार कन्या राशी भविष्य 2025 आणि उपाय

सर्व पहा

नवीन

तुमचे सिम बंद झाले आहे… कॉल आला, OTP सांगितला आणि साडेचार लाख गमावले

महाराष्ट्रात प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत केंद्र सरकारने यावर्षी साडेसहा लाख घरांना मंजुरी दिली, मुख्यमंत्र्यांनी आभार मानले

LIVE: राजकीय कारणासाठी, द्वेष निर्माण करण्यासाठी परभणीला राहुल यांची भेट -देवेंद्र फडणवीस

राजकीय कारणासाठी, द्वेष निर्माण करण्यासाठी परभणीला राहुल यांची भेट -देवेंद्र फडणवीस

विनोद कांबळी यांची प्रकृती ढासळली, रुग्णालयात दाखल

पुढील लेख
Show comments