Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कोकणातल्या 'या' शाळेत पुस्तकंच नव्हे, तर कोंबड्या, बदकं, म्हशी आणि शेळ्याही आहेत...

Webdunia
रविवार, 29 जानेवारी 2023 (14:31 IST)
“शिक्षण म्हणजे मुलांना देणं नाही, तर मुलांमध्ये जे आहे ते बाहेर काढणं. शिक्षण द्यायचं नाहीये मुलांना, शिक्षण निर्माण करायचं आहे.”राजन इंदुलकर शिक्षणाचा नेमका अर्थ समजावून सांगतात. त्यांच्या श्रमिक सहयोग संघटनेची ‘प्रयोगभूमी’ ही शाळा म्हणजे याच विचारांचं प्रात्यक्षिक आहे.
पण कोकणातील चिपळूणच्या डोंगरराजीत वसलेली ही प्रयोगभूमी म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान देणारी शाळा नाही. तर इथे आदिवासी भागातली मुलं-मुली जगण्याचं शिक्षण घेतायत.
 
प्रयोगभूमीद्वारा राजन इंदुलकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शिक्षणातून, लोकसहभागातून ग्रामविकासाचं मॉडेलच या आदिवासी भागात उभं केलं आहे.
 
आदिवासींना शिक्षणाशी जोडणारी ‘प्रयोगभूमी’
साताऱ्यातल्या कोयनानगरला चिपळूणशी जोडणाऱ्या कुंभार्ली घाटातून खाली आलं की आपण थेट वसिष्ठी नदीच्या खोऱ्यात उतरतो. त्याच परिसरात कोळकेवाडी वसली आहे.
 
कोयना विद्युतप्रकल्पातून वळवलेल्या पाण्यावर इथे विद्युतनिर्मिती केली जाते. जंगल आणि पाण्याची समृद्धी असली, तरी हा सगळा भाग आजही दुर्गम आहे.
 
इथेच नदीच्या काठावर एका विस्तारलेल्या घरात प्रयोगभूमी निवासी शाळा भरते.
आसपासच्या दहा-बारा आदिवासी वाड्यांमधली मुलं इथे शिक्षण घेतात. तेही त्यांच्या मायबोलीतून म्हणजे कातोडी भाषेतून.
 
पुस्तकांच्या पलीकडे मुलं इथे जगायलाही शिकतायत. आपल्या आसपासचं जंगल कसं राखायचं, शेती कशी करायची, कोंबड्या, बदकं म्हशी, शेळ्यांचं संगोपन कसं करायचं याचंही ज्ञान मिळवतात.
 
शाळेचे संस्थापक आणि श्रमिक सहयोग संघटनेचे अध्यक्ष राजन इंदुलकर या शाळेमागची संकल्पना समजावून सांगतात.
 
“पंचवीस ते तीस मुलं एकत्र राहतील, एकत्र शिकतील, एकत्र जगतील अशी ही शाळेची संकल्पना आम्ही तयार केली.”
 
सेवादलापासून सुरू झाला प्रवास
अगदी 1980 च्या दशकापासूनच इंदुलकर चिपळूण परिसरात आदिवासी समुदायांसोबत काम करत आहेत.
 
साने गुरूजी आणि त्यांनी स्थापन केलेल्या राष्ट्र सेवादलाचा प्रभाव यामुळे इंदुलकर समाजकार्याकडे वळले.
 
“चिपळूण शहरात माझ्या लहानपणी राष्ट्र सेवा दलाचं खूप चांगलं वातावरण होतं. माझे आईवडीलही सेवादलातले असल्यामुळे सामाजिक बांधिलकीचे संस्कार माझ्यावर पूर्णपणे झाले.”
इंदुलकर आणि त्यांच्यासोबत काम करणाऱ्या सहकाऱ्यांनी सेवादलाकडून प्रेरणा घेऊन श्रमिक सहयोग संघटनेची स्थापना केली आणि वेगवेगळ्या मुद्द्यांवर काम करण्यास सुरूवात केली. 
 
“त्यावेळी आणि आजही पर्यावरण हा कोकणातला महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याशिवाय कूळ वहिवाटीच्या प्रश्नावर, जमिनीच्या हक्काच्या मुद्यावर आणि स्त्रियांच्या प्रश्नांवर आम्ही काम केलं.
 
"पण शिक्षणाचा मुद्दा आम्हाला समजत नव्हता की आपण नेमकं काय करायचं?”
 
आसपासच्या परिसरातल्या सरकारी शाळांचा सर्व्हे केल्यावर शहर, गावं आणि दुर्गम भागातील शिक्षणामधली तफावत त्यांच्या लक्षात आली.
“आमच्याकडे गवळी-धनगर नावाचा समाज आहे, हा सगळा सह्याद्रीच्या माथ्यावर राहतो. आणि कातकरी नावाचा आदिवासी समाज आहे.
 
"कातकरी हे आदीम आदिवासी आहेत, ते नदीच्या किनारी किंवा गावाच्या शेजारी राहतात. हे दोन्ही समाज शिक्षणाच्या पूर्णपणे बाहेर होते. मग ते शाळेच्या बाहेर का होते, कारण शाळा त्यांच्यासारखी नाही.”
 
एकतर ही मुलं शाळेत पोहोचू शकत नव्हती आणि पोहोचलीच तरी भाषेचीही मुख्य अडचण होती. शाळेत प्रमाण मराठीत शिकवलं जातं, जे समजणं लहान मुलांसाठी कठीण जायचं.
 
इंदुलकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मग डोंगरशाळा सुरू केल्या आणि वाडीत जाऊन तिथे मुलांशी त्यांच्याच बोलीभाषेत संवाद साधण्यास, त्यांना शिकवण्यास सुरूवात केली.
 
1990 ते 2002च्या दरम्यानचा तो काळ होता.
मग 2004 साली कोळकेवाडीत निवासी शाळेची स्थापना केली. पण ही एक केवळ आश्रमशाळा नसेल, यावर त्यांनी भर दिला. शाळेचं नाव ठेवलं ‘प्रयोगभूमी’.
 
इंदुलकर सांगतात, “आम्ही जे काम करतो, तो सुद्धा एक प्रयोग आहे. नवनवे प्रयोग करून पाहणं, स्वतःतल्या कल्पना, स्वतःतल्या संकल्पना, स्वतःचा विचार बाहेर येणं, त्याला शिक्षण म्हणतात. त्यामुळे प्रयोगभूमी हे नाव आम्हाला अधिक चांगलं वाटलं.”  
 
आम्ही तिथे गेलो, तेव्हा याच प्रयोगांची झलक पाहायला मिळाली.
सगळी मुलं उत्साहानं आम्हाला आपापल्या वाफ्यांमध्ये उगवलेला भाजीपाला दाखवत होती.
 
त्यांनी स्वतः तयार केलेल्या मातीच्या खेळण्यांमध्ये चूल आहे, तसा गॅस, सिलिंडर आणि लायटरही आहे. कुणी मातीचा मोबाईलही तयार केलाय.

‘शोषणातून मुक्तीसाठी शिक्षण’
कोकणात आधीच जगणं खडतर आणि रोजगारासाठी स्थलांतरही नवं नाही.
 
मग ज्यांचे आईवडील नाहीत किंवा ज्यांचे पालक कामासाठी दूर कुठे जातात अशा मुलांना प्रयोगभूमीमुळे शिकणं शक्य झालं आहे, ते नवी स्वप्न पाहू लागले आहेत.
 
सातवीत शिकणारी साक्षी दीपाली दत्ताराम त्यातलीच एक आहे. प्रयोगभूमीच्या गाण्यांच्या कार्यक्रमात ती निवेदन करते.
 
साक्षी सांगते, “पप्पा पुण्याला असतात नी मम्मी घरी कामाला जाते. माझी चार भावंड आहेत तीपण शिकतात. मला पुढे खूप शिकावंसं वाटतंय. मला मोठं होऊन निवेदकच व्हावंसं वाटतंय.”
 
आठवीत शिकणाऱ्या मीनाक्षी संगीता विठ्ठला इंग्रजी आणि मराठी आवडतं आणि तिला पुढे शिक्षक व्हायचं आहे.
19 वर्षांत 117 आदिवासी मुलं प्रयोगभूमीतून दहावीपर्यंतचं शिक्षण घेऊन बाहेर पडली आहेत. व्यवसाय करत आहेत.
 
एरवी शाळेपर्यंत पोहोचू न शकणाऱ्या मुलांना प्रयोगभूमीनं आधार दिला आहे. पण वाडीवस्तीमध्येही त्यांची केंद्रं आज काम करतात आणि शाळा कॉलेजात जाणाऱ्या मुलांना शाळेबाहेरचं शिक्षण देतात. जगण्यासाठी सक्षम बनवतायत.
 
शिक्षणावरच भर कशासाठी, याविषयी इंदुलकर सांगतात, “ही जी मुलं आहेत ती वंचित समाजातली मुलं आहेत. त्यांचं शोषण होत आलंय. त्या शोषणातून बाहेर यायला पाहिजे.
 
“मुक्ती ही शोषणातून पहिली झाली तर आपण सामर्थ्यवान होतो. आपलं शोषण कुठे होतं, कशामुळे होतं, आपली फसगत कशामुळे होते? ही जी सावधता आहे, ती सावधता मुलांमध्ये यायला पाहिजे.” त्यासाठी आर्थिक व्यवहारांचं ज्ञानही मुलांना दिलं जातं.
शिक्षणाच्या या चळवळीनं आपलं आयुष्य कसं बदललं, याविषयी कुंभार्लीच्या घाग वाडीत राहणारा मंगेश आम्हाला सांगतो.
 
“आधी गावातले लोक आमच्याबरोबर सरळ वागायची  नाहीत. वाईट नजरेनेच पाहायची. कुठून आलेत, कुठले आहेत असंच लोक म्हणायची.
 
"आता आमचं शिक्षणामुळे थोडं ज्ञानही वाढलं आणि व्यवहार पटायला लागले. जे मी नाही शिकलो ते माझ्या मुलांना शिकवणार आहे.”
प्रयोगभूमी आणि श्रमिक सहयोग संघटनेनं उभे केलेले चंद्रकांत जाधव यांच्यासारखे काही तरूण आता स्वतः कार्यकर्ता म्हणून या परिसरात बदल घडवण्यासाठी काम करत आहेत.
 
वेठबिगारी थांबवणं असो वा जमिनीच्या हक्काचा मुद्दा किंवा मासेमारीच्या आदिवासी पद्धतींचं संरक्षण अशा मुद्द्यांवर हे तरूण काम करतायत. आदिवासींच्या रोजच्या जगण्याचे प्रश्नही मिटवण्यासाठी धडपडतायत.
 
ग्रामविकासाचं मॉडेल
चिपळूणमध्ये गेल्या चार दशकांत बराच बदल झाला आहे. इथे एमआयडीसी आहे, गावागावांत आणि अगदी आदिवासी वाड्यांमध्येही आता वीज, टीव्ही, मोबाईल पोहोचले आहेत.
पण विकासाच्या लाटेचा फायदा अजूनही सगळ्यांना सारखा होत नाही, याकडे इंदुलकर लक्ष वेधतात. ते महात्मा गांधींच्या विचारांची आठवण करून देतात,
 
“गांधीजींनी सांगितलं खेड्याकडे चला. मला असं वाटतं की शहराचे दरवाजे बंद व्हायला लागले आहेत. त्यामुळे खेड्यांना अधिक समृद्ध करणं, खेड्यातल्या ऊर्जा शोधून काढणं गरजेचं आहे.
 
"जगण्यासाठी प्रचंडं साधनं आहेत खेड्यांमध्ये ती कोणती आहेत त्याच्यावरही आम्ही विचार करतो आहोत, काम करतो आहोत.”
 
ते पुढे सांगतात, “निसर्गानं भारताला प्रचंड वैविध्य दिलं आहे. त्या वैविध्याचा उपयोग केला, तर भारत खऱ्या अर्थानं समृद्ध होईल असं गांधीजींनी म्हटलं आणि ते अत्यंत महत्त्वाचं आहे.”
Published By- Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

LIVE: विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीत मोठा घोटाळा, नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले

विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीत मोठा घोटाळा, नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले

धरणात बुडून आई आणि मुलीचा वेदनादायक मृत्यू

सांगली जिल्ह्यात कार कृष्णा नदीत पडून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने पराभव टाळला,लक्ष्यही उपांत्यपूर्व फेरीत

पुढील लेख
Show comments