Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना' ही योजना काय आहे? यात कोणत्या सवलती मिळणार?

Webdunia
सोमवार, 23 जानेवारी 2023 (12:29 IST)
एकनाथ शिंदे सरकारने मुंबईसह राज्यभरात 'बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना' ही योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रात 700 दवाखाने सुरू केले जाणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 19 जानेवारीला मुंबईत अशा 20 दवाखान्यांचं लोकार्पण करण्यात आलं. यापूर्वी ऑक्टोबर 2022 मध्ये मुंबईत एकूण 52 ठिकाणी ‘आपला दवाखाना’ अंतर्गत आरोग्य सेवा सुरू करण्यात आली आहे.
 
‘आपला दवाखाना’ ही योजना नेमकी काय आहे? ‘आपला दवाखाना’ अंतर्गत कोणत्या आरोग्य सुविधा मिळणार? आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या ‘मोहल्ला क्लिनीक’शी याची तुलना का होत आहे? या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. 
 
काय आहे ‘आपला दवाखाना’ योजना?
‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ ही मुंबई महानगरपालिका आणि शिंदे सरकारची नवीन आरोग्य योजना आहे. सध्यातरी ठाणे आणि मुंबई शहरात आपला दवाखाना अंतर्गत आरोग्य सुविधा दिल्या जात आहेत.
 
आगामी काळात राज्यभरात असे 700 दवाखाने सुरू करण्यात येतील असं आश्वासन शिंदे सरकारने दिलं आहे.
 
मुंबईसह राज्यभरातील महापालिका आणि सरकारी हॉस्पिटलमध्ये रुग्णांची प्रचंड गर्दी दिसून येते. अगदी ताप,सर्दी अशा आजारांसाठीही रुग्णांना उपचार आणि वैद्यकीय टेस्ट करण्यासाठी घरापासून दूर हॉस्पिटल गाठावे लागते.
 
यावर उपाय म्हणून दर 25 ते 30 हजार वस्तीनजीक ‘आपला दवाखाना’ असावा असं महापालिकेचं लक्ष्य आहे.  
 
मुंबईतील झोपडपट्टी परिसरात आणि राज्यातील गामीण तसंच दुर्गम भागांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना प्रत्येक छोट्या आजारासाठी हॉस्पिटलमध्ये यावं लागतं. यामुळे वैद्यकीय उपचाराला उशीर होतोच शिवाय प्रवासाचा खर्च होतो आणि अनेकदा तर राहण्याची गैरसोय सुद्धा होते.
दुसऱ्याबाजूला दैनंदिन रुग्णांमुळे हॉस्पिटलवरील ताण वाढतो ज्याचा थेट परिणाम अपघात विभाग, आयसीयू आणि प्रसूती विभागा अशा तात्काळ उपचार गरजेचा असलेल्या रुग्णांच्या उपचारावर होतो. खरंतर वस्त्यांमध्ये सरकारी दवाखाने सुरू करण्याची मागणी ही गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे.
 
गेल्यावर्षी मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पातच या योजनेला आर्थिक निधी मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर नोव्हेंबर 2022 मध्ये जवळपास 52 आपला दवाखाना केंद्रांचं उद्घाटनदेखील करण्यात आलं. आतापर्यंत मुंबईत एकूण 66 असे दवाखाने सुरू करण्यात आले आहेत.
 
मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, ‘सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत ‘बाळासाहेब ठाकरे-आपला दवाखाना’च्या माध्यमातून हजारो मुंबईकरांना विनामूल्य आरोग्य सुविधा पुरविण्यात येत आहेत. या आरोग्य सुविधा आपल्या जवळच्या आपला दवाखान्यात सकाळपासून रात्रीपर्यंत उपलब्ध करून देण्यात येत आहे.’
 
तसंच 31 मार्च 2023 पर्यंत म्हणजेच पुढील दोन महिन्यात मुंबईत 200 आपला दवाखाना सुरू करण्याची मुंबई महापालिकेची योजना आहे.
 
कोणत्या सवलती मिळणार?
या योजनेअंतर्गत नेमक्या कोणत्या आरोग्य सुविधा मिळणार आहेत ते पाहूया,
 
या योजनेअंतर्गत साधारणपणे 25 हजार ते 30 हजार लोकसंख्येसाठी 1 दवाखान सुरू करण्याचं प्रशासनाचं नियोजन आहे.
सकाळी 7 ते दुपारी 2 आणि दुपारी 3 ते रात्री 10  या वेळेत हे दवाखाने सुरू राहतील. 
आपला दवाखाना अंतर्गत 147 प्रकारच्या विविध वैद्यकीय चाचण्या विनामूल्य करून मिळतील अशी माहिती महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.
काही ठिकाणी पोर्टकेबिनमध्ये प्राथमिक उपचारासाठी दवाखाना सुरू केला जाणार आहे.
तसंच पॉलिक्लिनिकमध्ये वैद्यकीय तज्ज्ञांद्वारे विनामूल्य वैद्यकीय सल्ला आणि उपचार मिळेल असंही पालिकेचं म्हणणं आहे.
महानगरपालिकेच्या डायग्नोस्टिक सेंटरमध्ये सीटी स्कॅन, एमआरआय, एक्स रे, इत्यादी चाचण्या केल्या जातील.
या दवाखान्यात एक वैद्यकीय अधिकारी, एक परिचारिका, एक फार्मसीस्ट आणि एक मदतनीस अशा चौघांची कंत्राटीपद्धतीने नियुक्ती करण्यात येत आहे. या जागांच्या भरतीसाठी पालिकेकडून जाहिरात काढण्यात आली आहे.
कान नाक घसा तज्ज्ञ (ENT) नेत्रचिकिस्ता, स्त्री रोग तज्ज्ञ, वैद्यकीय तपासणी तज्ज्ञ, फिजिओथेरपिस्ट, त्वचारोग तज्ज्ञ, दंतशल्य चिकित्सा, बालरोग तज्ज्ञ अशा आरोग्य सुविधा पॉलिक्लिनिकच्या माध्यमातून देण्यात येणार आहेत.  

ग्रामीण भागात प्रामुख्याने एसटी स्थानकाजवळ 'आपला दवाखाना' सुरू करण्याचं सरकारचं नियोजन आहे.
महापालिकेच्या उपलब्ध दवाखान्यात दुसऱ्या सत्रात (दुपार नंतर) आणि इतर ठिकाणी मोकळ्या जागेत पोर्टाकेबिनमध्ये दवाखाने सुरू करण्यात येणार आहेत.
महत्त्वाचं म्हणजे आतापर्यंत सरकारी हॉस्पिटलच्या प्रक्रियेनुसार रुग्णांना केस पेपर आवश्यक आहे. त्यासाठी सरकारी आणि पालिका हॉस्पिटल्समध्ये मोठी रांग असते.
 
रुग्णांचा किंवा त्यांच्या नातेवाईकांचा बराचसा वेळ यात जातो. याला पर्याय म्हणून या दवाखान्यांमध्ये ही माहिती ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध असेल. त्यासाठी नागरिकांना आरोग्य कार्ड बनवता येईल.
 
सदर दवाखान्यांमधून टॅबच्या माध्यमातून रुग्णांची माहिती, आजाराचा तपशील, औषधांचा साठा आणि वितरण, निदान केलेली पद्धती याचा तपशील नोंदवण्यात येईल.
 
श्रेयावरून राजकीय वाद  
शिवसेनेच्या प्रवक्त्या मनिषा कायंदे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "आपला दवाखाना ही योजना काही एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेली नाही. उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या कार्यकाळात ती सुरू झाली आहे.
 
खर तर पालिकेत तसा प्रस्तावही आणला होता. पण आता सगळ्याचंच श्रेय शिंदे गटाला घ्यायचं आहे. त्यांना शिवसेनेच्या सगळ्याच कामांचं श्रेय घ्यायचं होतं तर त्यांनी राज ठाकरेप्रमाणे स्वतंत्र पक्ष का नाही काढला? "
 
त्या पुढे म्हणाल्या, "सामान्य गरीब जनतेच्या घरापर्यंत आरोग्य सुविधा आणण्यासाठी बाळासाहेब ठाकरेंनी सर्वप्रथम काम सुरू केलं होतं. रुग्णवाहिका असेल किंवा रक्तदान शिबिर असतील हे शिवसेना खूप आधीपासून करत आली आहे."

मुंबईत एकेकाळी स्थानिक पातळीवर नागरिकांना वैद्यकीय मदत पोहचवण्यासाठीही शिवसेना ओळखली जात होती. यामुळे शिवसेनेचा जनसंपर्क वाढण्यासही मदत झाली. शिवसेनेच्या शाखांच्या माध्यमातूनही स्थानिकांना वैद्यकीय मदत मिळत होती.
 
मनिषा कायंदे सांगतात, "शिवसेनेची प्रत्येकच गोष्ट हॅयजॅक करण्याचा प्रयत्न शिंदे गटाकडून होत आहे. शिवसेनेने पक्ष म्हणून एवढे वर्षं जे केलं त्याचं श्रेय शिंदे गट घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. लोकांना वैद्यकीय मदत मिळवण्यासाठीचे प्रयत्न शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केले. तेव्हापासूनच शिवसेना हे काम करत आहे. पण आता पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाकडून क्लिनिकचे श्रेय घेतलं जात आहे."
 
सरकारी दवाखान्यात मोफत उपचार घेणारे लोक सत्ताधारी पक्षाचे मतदार बनतील किंवा त्यांनाच मत देतील याची शक्यता आहे. शिवाय पक्षाची प्रतिमा सकारात्मक करण्यासाठी किंवा लोकांसाठी काम करणारी म्हणून प्रतिमा उभी करण्यासाठीही या योजनेची मदत सत्ताधाऱ्यांना होईल. विशेषत: एकनाथ शिंदे यांच्या सकारात्मक प्रतिमेसाठी त्यांना याचा राजकीय फायदा सुद्धा होऊ शकतो, असं जाणकार सांगतात.
आव्हानं काय आहेत?
गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई महानगरपालिका आणि राजकारण कव्हर करणारे ज्येष्ठ पत्रकार सचिन धनजी सांगतात, “स्थानिक प्रशासनाकडून अशापद्धतीने आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्यायला खरंतर उशीर झाला असं म्हणायला हवं. हे काम यापूर्वीच व्हायला हवं होतं. गेल्या कित्येक वर्षांपासून सराकरी आणि पालिका हॉस्पिटलचा भार वाढला आहे. विशेषत: झोपडपट्ट्या असलेल्या परिसरात अशा दवाखान्यांची खूप गरज आहे.”
 
मुंबईत आतापर्यंत 66 दवाखाने सुरू केले असून मार्चपर्यंत 200 दवाखाने सुरू करण्याचं लक्ष्य महानगरपालिकेचं आहे. परंतु प्रशासनासमोर काही आव्हानंदेखील आहेत.
 
प्रत्येक वस्तीजवळ जागा मिळवण्यासाठी पालिकेला काम करावं लागेल. तसंच जिथे पालिकेकडे जमीन नाही तिथे इतर सरकारी आस्थापनांशी समन्वय साधून जमीन ताब्यात घेण्याची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. पण या आरोग्य सुविधांची स्थानिकांना खूप गरज आहे. प्राथमिक उपचार आणि आजाराचं वेळेत निदान होणं गरजेचं असतं.
 
‘आपला दवाखाना’साठी प्रशासनाने कंत्राटी कर्मचारी घेण्याचं ठरवलं आहे. धनजी सांगतात, “अनेकदा कंत्राटी पद्धतीवर कार्मचारी घेतल्यास त्यात सातत्य राखलं जात नाही. प्रशासनाकडून दिरंगाई होते आणि कर्मचारी अपुरे पडतात. त्यामुळे या कामात सातत्य राखणं गरजेचं आहे. तसंच औषधांचा साठा सध्या दिसत असला तरी तो कायम राखणं आणि औषधांचा पुरवठा वेळेत होत राहणं गरजेचं आहे,”
 
सरकारी आणि स्थानिक प्रशासनाच्या आरोग्य सुविधांची विश्वासार्हता अनेकदा कमी असल्याचं दिसून येतं. त्यामुळे या दवाखान्यांची विश्वासार्हता निर्माण होईल याचीही काळजी घ्यायला हवी असं ते सुचवतात.
आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे-फडणवीस सरकारकडून या योजनेचा जलदगतीने विस्तार केला जात आहे अशी टीका केली जात आहे.
 
मोठ्या स्तरावर झोपडपट्टी,चाळी या भागात दवाखाने उभे राहिल्यास आणि स्थानिकांना दैनंदिन आरोग्य सेवा मिळाल्यास मतदारांना ते आकर्षित करू शकतात, असंही जाणकार सांगतात.
 
ज्येष्ठ पत्रकार संजीव शिवडेकर म्हणाले, “सरकारने नुकतेच हे दवाखाने सुरू केले आहेत. त्यामुळे आताच काही निष्कर्ष काढणे योग्य नाही. सरकारी योजनां किती प्रभावीपणे सुरू आहेत याकडे आपण लक्ष द्यायलाच हवं पण या योजनेबाबत काही दिवसांनंतरच आपण बोलू शकतो.
 
अशा दवाखान्यांची गरज राज्यात सगळीकडे आहे हे आपल्याला माहिती आहे. आता किती प्रभावीपणे सरकार ही योजना चालवतं आणि ती किती यशस्वी होते हे येणाऱ्या काही दिवसांत स्पष्ट होईल.”
 
Published By- Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Birthday Wishes For Mother In Law In Marathi सासूला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत

HMPV Virus: तो कसा पसरतो, लक्षणे आणि खबरदारी, ह्यूमन मेटापन्यूमोव्हायरस बद्दल तपशीलवार माहिती वाचा

HMPV व्हायरस काय आहे? ज्यामुळे लोक त्याला बळी पडत आहेत, जाणून घ्या

Makar Sankranti 2025: मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही या वस्तूंचे दान करू नये?

१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ पर्यंतचे मराठी सणवार

सर्व पहा

नवीन

कल्याणमध्ये ट्रकने आई-मुलाला चिरडले,ट्रक चालकाला अटक

कर्ज परत करण्यासाठी बँकेतून दबाव टाकल्यामुळे तरुणाची गळफास लावून आत्महत्या

अकोल्यात मॉर्निग वॉकला गेलेल्या महिलेची धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या

ठाण्यात रोडरोलरने 25 वर्षीय मजुराचा चिरडून मृत्यू,गुन्हा दाखल

Russia–Ukraine War: युक्रेनियन लष्कराचा दावा, साराटोव्ह, रशियामध्ये ड्रोन हल्ला

पुढील लेख
Show comments