“ करम कर मेरे हाल परतू करीम । तेरा नाम रहिमान है और रहीम । तूंही दोनों आलमला सुलतान है । जहांमें नुमाया तेरी शान है । फना होनेवाला है सब कारोबारा । रडे नूर तेरा सदा आशकार । तूं आसिकका सदा मदतगार है ।”
राहून राहून उठतसे कळ । जीव कळवळला पडले विकळ । साईबाबांचा हा खेळ । झाली अटकळ सर्वांची ॥८१॥
बाबा वदती “पहा भाऊ । लागला बरें आतां गाऊं” । पिल्ले तयांस पुसती तो काऊ । अजून खाऊं येणार का ॥८२॥
तेव्हां बाबा वदती “तूं जाईं । स्वस्थ वाडयांत पडून राहीं । आतां काऊ फिरून नाहीं । येणार पाहीं टोंचावरया ॥८३॥
तोच नाहीं का येऊन गेला । तोच तो ज्यानें पाय दिधला । तोच तो काऊ टोंचून पळाला । नारू तळाला घातला” ॥८४॥
कैंचा काऊ आणि काउळा । होणार वृत्तान्त समक्ष घडविला । काक अब्दुल्लारूपें प्रकटला । केलें बोला अन्वर्थ ॥८५॥
बोल नव्हे तो ब्रम्हालेख । कर्मावरीही मारील मेख । अल्पावकाशेंच भाऊस देख । लागलें सुख वाटावया ॥८६॥