Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय अठरावा

Webdunia
श्री स्वामी चरित्र सारामृत अष्टदशोध्याय
॥ श्री गणेशाय नमः ॥ स्वामीसुताच्या गादीवर । कोण नेमावा अधिकारी । ऐसा प्रश्न सेवेकरी । करिताती समर्थांते ॥१॥ तेव्हा बोलले समर्थ । सेवेकरी असती सांप्रत । परी एकही मजला त्यांत । योग्य कोणी दिसेना ॥२॥ जेव्हा येईल आमुच्या मानसी । त्या समयी मोर पांखरासी । अधिकारी नेमू गादीसी । चिंता तुम्ही न करावी ॥३॥ मोर पांखरा मोर पांखरा । समर्थ म्हणती वेळोवेळा । रात्रंदिन तोची चाळा । मोठमोठ्याने ओरडती ॥४॥ आमुची पाऱ्याची वीट । जतन करावी नीट । वारंवार म्हणती समर्थ । काकूबाईलागोनी ॥५॥ लपवून ठेविले विटेसी । ती दिली पाहिजे आम्हांसी । याचा अर्थ कवणासी । स्पष्ट काही कळेना ॥६॥ असो स्वामीसुताचा भ्राता । कोकणांत राहत होता । स्वामीसुत मृत्यु पावता । वर्तमान कळले त्या ॥७॥ तो केवळ अज्ञान । दादा तयांचे अभिधान । त्याचे शरीरी असमाधान । कृश होत चालला ॥८॥ काकूबाईने तयासी । आणविले आपणापासी । एके दिवशी समर्थांसी । दादाप्रती दाखविले ॥९॥ बाळ चालले वाळोनी । यासी अमृतदृष्टीने पाहोनी । निरोगी करावे जी स्वामी । बाई विनवी समर्थांते ॥१०॥ समर्थ बोलले बाईसी । चार वेळा जेवू घाला यासी । आरोग्य होईल बाळासी । चिंता मानसी करु नको ॥११॥ त्याप्रमाणे बाई करिता । दादासी झाली आरोग्यता । समर्थांची कृपा होता । रोग कोठे राहील ॥१२॥ केजगांव मोगलाईत । तेथे नानासाहेब भक्त । त्यांनी बांधिला श्रींचा मठ । द्रव्य बहुत खर्चिले ॥१३॥ श्रींची आज्ञा घेऊनी सत्य । पादुका स्थापाव्या मठात । याकारणे अक्कलकोटी येत । दर्शन घेत समर्थांचे ॥१४॥ ते म्हणती काकूबाईंसी । पादुका स्थापन करायासी । तुम्ही पाठवा दादासी । समागमे आमुच्या ॥१५॥ बाई म्हणे तो अज्ञान । तशात शरीरी असमाधान । त्याची काळजी घेईल कोण । सत्य सांगा मजलागी ॥१६॥ परी आज्ञा देतील समर्थ । तरी पाठवीन मी सत्य । मग समर्थांजवळी येत । घेवोनिया दादासी ॥१७॥ समर्थे वृत्त ऐकोन । म्हणती द्यावे पाठवून । बाळ जरी आहे अज्ञ । तरी सांभाळू तयासी ॥१८॥ काकूबाई बहुत प्रकारे । समर्था सांगे मधुरोत्तरे । दादासी पाठविणे नाही बरे । वर्जावे आपण सर्वांते ॥१९॥ समर्थ तियेसी बोलले । त्यात तुमचे काय गेले । आम्हांसी दिसेल जे भले । तेच आम्ही करु की ॥२०॥ शेवटी मंडळी सांगाती । दादासी पाठविले केजेप्रती । पादुका स्थापन झाल्यावरती । दादा आला परतोनी ॥२१॥ पुढे सेवेकऱ्यांसांगाती । त्यासी मुंबईस पाठविती । ब्रह्मचाऱ्यांसी आज्ञा करिती । यासी स्थापा गादीवरी ॥२२॥ ब्रह्मचारीबुवांजवळी । दादासी नेत मंडळी । जी समर्थे आज्ञा केली । ती सांगितली तत्काळ ॥२३॥ दादासी करुनी गोसावी । मुंबईची गादी चालवावी । स्वामीसुताची यासी द्यावी । कफनी झोळी निशाण ॥२४॥ ब्रह्मचारी दादासी । उपदेशिती दिवस निशी । गोसावी होऊनी गादीसी । चालवावे आपण ॥२५॥ दादा जरी अज्ञान होता । तरी ऐशा गोष्टी करिता । नकार म्हणेची सर्वथा । न रुचे चित्ता त्याचिया ॥२६॥ यापरी ब्रह्मचाऱ्यांनी । पाहिली खटपट करोनि । शेवटी दादांसी मुंबईहूनी । अक्कलकोटा पाठविले ॥२७॥ दादास घेऊनी सत्वरी । श्रीसन्निध आले टाळकरी । तेव्हा दादा घेवोनी तंबुरी । भजन करीत आनंदे ॥२८॥ समर्थे ऐसा समयासी । आज्ञा केली भुजंगासी । घेऊनी माझ्या पादुकांसी । मस्तकी ठेव दादाच्या ॥२९॥ मोर्चेल आणूनि सत्वरी । धरा म्हणती त्यावरी । आज्ञेप्रमाणे सेवेकरी । करिताती तैसेचि ॥३०॥ उपरती झाली त्याच्या चित्ता । हृदयी प्रगटला ज्ञानसविता । अज्ञान गेले लयाते ॥३१॥ दादा भजनी रंगला । देहभानहि विसरला । स्वस्वरुपी लीन झाला । सर्व पळाला अहंभाव ॥३२॥ धन्य गुरुचे महिमान । पादुका स्पर्श करोन । जहाळे तत्काळ ब्रह्मज्ञान । काय धन्यता वर्णावी ॥३३॥ असो दादांची पाहून वृत्ती । काकूबाई दचकली चित्ती । म्हणे समर्थे दादांप्रती । वेट खचित लाविले ॥३४॥ ती म्हणे जी समर्था । आपण हे काय करता । दादांचिया शिरी ठेविता । पादुका काय म्हणोनी ॥३५॥ समर्थ बोलले तयेसी । जे बरे वाटेल आम्हांसी । तेचि करु या समयासी । व्यर्थ बडबड करु नको ॥३६॥ काकूबाई बोले वचन । एकासी गोसावी बनवोन । टाकिला आपण मारुन । इतुकेचि पुरे झाले ॥३७॥ ऐकोन ऐसा वचनाला । समर्थांसी क्रोध आला । घाला म्हणती बाईला । खोड्यामाजी सत्वर ॥३८॥ काकूबाईने आकांत । करुनि मांडिला अनर्थ । नाना अपशब्द बोलत । भाळ पिटीत स्वहस्ते ॥३९॥ परी समर्थे त्या समयी । लक्ष तिकडे दिले नाही । दादांसी बनविले गोसावी । कफनी झोळी अर्पिली ॥४०॥ दुसरे दिवशी दादांसी । समर्थ पाठविती भिक्षेसी । ते पाहूनी काकूबाईसी । दुःख केले अपार ॥४१॥ लोळे समर्थांच्या चरणांवरी । करुणा भाकी पदर पसरी । विनवीतसे नानापरी । शोक करी अपार ॥४२॥ समर्थांसी हसू आले । अधिकचि कौतुक मांडिले । दादांसी जवळ बोलाविले । काय सांगितले तयासी ॥४३॥ अनुसया तुझी माता । तिजपाशी भिक्षा माग आता । अवश्य म्हणोनी तत्त्वता । जननीजवळ पातला ॥४४॥ ऐसे बाईने पाहोनी । क्रोधाविष्ट अंतःकरणी । म्हणे तुझी ही करणी । लोकापवादा कारण ॥४५॥ भिक्षान्न आपण सेवावे । हे नव्हेची जाण बरवे । चाळे अवघे सोडावे । संसारी व्हावे सुखाने ॥४६॥ ऐकोनी मातेची उक्ती । दादा तिजप्रती बोलती । ऐहिक सुखे तुच्छ गमती । माते आजपासोनी ॥४७॥ पुत्राचे ऐकोन वदन । उदास झाले तिचे मन । असो दादा गोसावी होवोन । स्वामीभजनी रंगले ॥४८॥ काही दिवस झाल्यावरी । मग आले मुंबापुरी । स्वामीसुताच्या गादीवरी । बसोन संस्था चालविली ॥४९॥ ते दादाबुवा सांप्रती । मुंबई माजी वास्तव्य करिती । काकूबाई अक्कलकोटी । वसताती आनंदे ॥५०॥ कलियुगी दिवसेंदिवस । वाढेल स्वामी महिमा विशेष । ऐसे बोलले स्वामीदास । येथे विश्वास धरावा ॥५१॥ दोघा बंधूंचे ऐसे वृत्त । वर्णिले असे संकलित । केला नाही विस्तार येथ । सार मात्र घेतले ॥५२॥ जैसे श्रेष्ठ स्वामीसुत । तैसेची दादाबुवा सत्य । भूवरी जगदोद्धारार्थ । विष्णू शंकर अवतरले ॥५३॥ इति श्री स्वामीचरित्र सारामृत । नाना प्राकृत कथा संमत । सदा प्रेमळ परिसोत । अष्टदशोऽध्याय गोड हा ॥५४॥
 
॥ श्रीस्वामीचरणार्पणमस्तु ॥ श्रीमस्तु शुभंभवती ॥
ALSO READ: श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय एकोणीसवा

संबंधित माहिती

मंगलाष्टक मराठी संपूर्ण Marathi Mangalashtak

शुक्रवारी कोणत्या मंत्राचा जप करावा?

अक्षय्य तृतीयेला तयार होत आहेत सुकर्म योगासह हे 5 शुभ संयोग, या राशीचे जातक ठरतील भाग्यवान

श्री महालक्ष्मी कोल्हापूर

शुक्रवारची आरती.... जयदेव जयदेव जय विघ्नाधीशा ॥

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

पुढील लेख
Show comments