Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता, गोलंदाजांनी पराभवाच्या जबड्यातून विजयश्री खेचून आणली

Webdunia
शनिवार, 29 जून 2024 (23:49 IST)
भारताने अखेर टी20 विश्वचषक स्वतःच्या नावे केला आहे. अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत रोहित शर्माच्या टीम इंडियाने दुसरा टी20 विश्वचषक भारताला मिळवून दिलाय.शेवटच्या बॉलनंतर समालोचन करणाऱ्या इरफान पठाणपासून मैदानावर फिरणाऱ्या रोहित शर्मापर्यंत प्रत्येक भारतीय क्रिकेट चाहत्याच्या डोळ्यात आश्रू होते. आयपीएलमध्ये ट्रोल झालेल्या हार्दिक पंड्यासाठी हा विजय त्याच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा विजय होता आणि जागतिक गोलंदाजांच्या क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेल्या जसप्रीत बुमराहसाठी हा विश्वविजय तेवढाच महत्त्वाचा होता.
 
...आणि इथे मॅच फिरली!
पंधराव्या ओव्हर मध्ये अक्षर पटेलने २४ धावा दिल्यानंतर दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी ३० बॉल मध्ये ३० धावा हव्या होत्या. ओव्हर संपल्यानंतर अक्षर पटेलने वर्ल्डकप फायनलमध्ये भारतीय गोलंदाजाची सगळ्यात महागडी ओव्हर स्वतःच्या नावे केली. हताश झालेल्या कर्णधार रोहित शर्माने जगातला अव्वल गोलंदाज असणाऱ्या जसप्रीत बुमराहच्या हातात बॉल दिला आणि दक्षिण आफ्रिकेकडे झुकलेला वर्ल्डकप भारताकडे परत येताना दिसू लागला.
 
सोळाव्या ओव्हरमध्ये बुमराहने फक्त चार धावा खर्च केल्या आणि मोक्याच्या क्षणी कच खाणाऱ्या दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज गडबडबले. 5 षटकार खेचल्या हेनरीकी क्लासेनला हार्दिक पंड्याने उजव्या यष्टीच्या बाहेर टाकलेला चेंडू छेडायचा मोह झाला आणि सतराव्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर क्लासेन आउट झाला. सतराव्या ओव्हरमध्ये पंड्याने फक्त चार धावा केल्या आणि मैदानात उभ्या असलेल्या डेव्हिड मिलर आणि मार्को यान्सन यांच्यावरचा दबाव वाढला आता प्रश्न होता बुमराह शेवटची ओव्हर कधी टाकतो?
 
रोहित शर्माने शेवटची जोखीम घ्यायची ठरवली आणि अठरावी ओव्हर जसप्रीत बुमराहला दिली. जसप्रीतने त्याच्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवला आणि साखळी फेरीत दक्षिण आफ्रिकेला फलंदाजीच्या जोरावर सामना जिंकवून दिलेल्या मार्को यान्सनचा त्रिफळा उडाला. अठराव्या ओव्हरमध्ये बुमराहने फक्त दोन धावा दिल्या आणि शेवटच्या दोन ओव्हरमध्ये दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी २० धावांची गरज होती.
 
या स्पर्धेत भारताकडून सर्वाधिक विकेट घेतलेला अर्शदीप सिंगने एकोणिसाव्या ओव्हरसाठी बॉल हातात घेतला आणि गोलंदाजीला सुरुवात केली. त्याच्या समोर होता भारताविरुद्ध कसोटी सामन्यात धावा केलेला केशव महाराज, अर्शदीपने अतिशय शिस्तबद्ध मारा करत एकोणिसाव्या ओव्हरमध्ये फक्त चार धावा दिल्या आणि शेवटच्या ओव्हरमध्ये दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी १६ धावा हव्या होत्या
शेवटची ओव्हर टाकण्याची जबाबदारी आयपीएलमध्ये ट्रोल झालेल्या हार्दिक पंड्यावर येऊन पडली आणि हार्दिकने पहिल्याच चेंडूवर दक्षिण आफ्रिकेची शेवटची आस असणाऱ्या डेव्हिड मिलरला आउट केलं. सोळा धावा हव्या असल्याने डेव्हिड मिलरने लॉन्ग ऑफला चेंडू फटकावला आणि सूर्यकुमार यादवने सीमारेषेवर त्याच्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा झेल घेतला. कानात नवज्योत सिंग सिद्धू म्हणत होता की "हार की जबडे में हात डालके भारत ने जीत खिंच कर लाई है."
 
हार्दिक पंड्याच्या दुसऱ्या बॉलवर कागिसो रबाडाच्या बॅटची कड घेऊन बॉल सीमारेषेकडे गेला आणि आफ्रिकेला चौकार मिळाला. आता शेवटच्या चार बॉलमध्ये १२ धावांची गरज होती आणि हार्दिकने पुन्हा एकदा डॉट बॉल टाकला आणि चोकर्सचा शिक्का बसलेल्या आफ्रिकेला पराभवाच्या जवळ ढकललं. ३ बॉलमध्ये १२ धावांची गरज असताना हार्दिक पंड्याने मिड विकेटला एक धाव दिली आणि शेवटच्या २ बॉलमध्ये दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी १० धावा हव्या होत्या. समोर होता केशव महाराज आणि गोलंदाजी करत होता भारताचा उपकर्णधार हार्दिक पंड्या.
 
हार्दिकने बॉल हातात घेतला, धावपट्टीकडे धाव घेतली आणि एक वाईड बॉल टाकला. आता दोन बॉलमध्ये ९ धावांची गरज होती. हार्दिकने या बॉलवर कागिसो रबाडाला आउट केलं आणि भारताचा विजय निश्चित केला. २०१३ नंतर भारत पहिल्यांदाच वर्ल्ड कप जिंकणार होता, गेलेला वर्ल्डकप हार्दिक आणि जसप्रितने भारताच्या हातात आणून ठेवला होता आणि यात अतिशय कंजूस गोलंदाजी करणाऱ्या अर्शदीपचाही तेवढाच वाटा होता. कधीकाळी बलाढ्य फलंदाजीसाठी ओळखला जाणारा भारतीय संघ आणि भेदक गोलंदाजीचा जोरावर विश्वविजेता बनला होता.दक्षिण आफ्रिकेचं विश्वविजयाचं स्वप्न मात्र अधुरं राहिलं होतं.
तत्पूर्वी टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.
 
25 जून 1983, 24 सप्टेंबर 2007 आणि 2 एप्रिल 2011... भारतीय क्रिकेटच्या इतिहासात या तारखा महत्त्वाच्या आहेत कारण, याच तारखांना भारतीय क्रिकेटसंघाने कोट्यवधी क्रिकेट रसिकांचं विश्वविजेतेपदाचं स्वप्न पूर्ण केलं होतं.
 
आज म्हणजेच 29 जून 2024 ही तारीखही या ऐतिहासिक तारखांच्या यादीत जोडली जाईल की दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट इतिहासात या तारखेला एक सोनेरी पान लिहिलं जाईल हे आपल्याला काही तासांतच कळणार आहे.
 
टॉस जिंकल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा म्हणाला की, "आम्ही या मैदानावर एक सामना खेळलो आहोत आणि खेळपट्टी चांगली दिसत आहे त्यामुळे आम्ही पहिल्यांदा फलंदाजी करणार आहोत. आम्ही संघातील खेळाडूंना शांत राहण्यास सांगितलं आहे. दोन दर्जेदार संघांमध्ये एक चांगला क्रिकेटचा सामना होईल अशी आशा आहे. संघातील प्रत्येक खेळाडू एकत्र येऊन चांगला खेळ करेल ही अपेक्षा आहे. आम्ही संघात कोणताही बदल केलेला नाही."
 
दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करम म्हणाला की, "आम्हीही टॉस जिंकून फलंदाजीचाच निर्णय घेतला असता. आता भारताच्या सुरुवातीच्या विकेट घेऊन त्यांच्यावर दबाव टाकण्याचा आमचा प्रयत्न असेल. आम्हीही आमच्या संघात कोणताही बदल केलेला नाही."
 
आज (29 जून) बार्बाडोसच्या केन्सिंग्टन ओव्हल मैदानावर भारताचा क्रिकेट संघ मागच्या 12 महिन्यातला तिसरा अंतिम सामना खेळवला जात आहे.
 
अंतिम सामन्यातील दोन्ही संघ
भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह
 
दक्षिण आफ्रिकेचा संघ : क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), रीझा हेंड्रिक्स, एडन मार्कराम (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅन्सन, केशव महाराज, कागिसो रबाडा, ॲनरिक नॉर्टजे, तबरेझ शम्सी
 
जून 2023मध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात भारताला पराभव स्वीकारावा लागला, नोव्हेंबर 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाने एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताचा पराभव केला आणि आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारत पुन्हा एकदा विश्वचषक जिंकण्यासाठी मैदानात उतरला आहे.
 
दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेचा संघ कोणत्याही प्रकारातील विश्वचषकाचा पहिलाच अंतिम सामना खेळत आहे.
मागच्या तीन दशकांमध्ये दक्षिण आफ्रिकेला एकही विश्वचषक जिंकता आलेला नाही. ज्या प्रमाणे दक्षिण आफ्रिकेला आयसीसीच्या मोठ्या स्पर्धा जिंकण्याचा अनुभव नाही अगदी त्याचप्रमाणे दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार असलेल्या एडन मार्करमने कर्णधार म्हणून आयसीसी स्पर्धांमध्ये एकदाही पराभवाच तोंड बघितलेलं नाही.
 
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यांत याआधी काय घडलंय?
या दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत 26 टी-20 सामने झाले आहेत. यामध्ये भारतीय संघाने 14 सामने जिंकले असून दक्षिण आफ्रिकेने 11 सामने जिंकले आहेत.
 
डेव्हिड मिलरने भारताविरुद्ध 20 सामन्यात 431 धावा केल्या आहेत. रोहित शर्माने 17 सामन्यात 420 धावा केल्या होत्या आणि सूर्यकुमारने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 6 सामन्यात 343 धावा केल्या आहेत.

Published By- Priya Dixit 
 
 
 
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

22 डिसेंबर रोजी कालाष्टमी व्रत, या दिवशी 4 शुभ योग तयार होत आहेत, तिप्पट फळ मिळणार

जुन्या कपड्यांचा पोछा वापरल्याने दुर्दैव येते का?

चांगल्या झोपेसाठी या गोष्टी करा, तुमचे आरोग्यही चांगले राहील

Christmas special : या रेसिपी नक्की बनवा

रावणाचा भाऊ कुंभकरण खरोखरच इंजिनिअर होता का?

सर्व पहा

नवीन

IND vs AUS: कर्णधार रोहित सराव दरम्यान जखमी गुडघ्याला दुखापत

स्मृती मंधानाने या मालिकेत एकूण सहा विक्रम केले

भारतीय संघाच्या माजी खेळाडूच्या नावावर अटक वॉरंट जारी

विराट कोहली आणि अनुष्का देश सोडणार!

IND W vs WI W: भारताने निर्णायक सामन्यात 60 धावांनी विजय मिळवला

पुढील लेख
Show comments