Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

तुम्ही UPI पेमेंट नियमित वापरता? जाणून घ्या घोटाळेबाज तुमच्यावर कशी नजर ठेवत आहेत

Webdunia
मंगळवार, 16 जुलै 2024 (17:36 IST)
मुंबईतील सतत वर्दळ असणाऱ्या रस्त्यावर मागील सात वर्षांपासून अरुण कुमार दररोज फळांचा गाडा चालवतात.उदरनिर्वाह करण्याचं हे काही सोपं साधन नाही.
ते सांगतात, "रस्त्याच्या कडेला हातगाडी किंवा ठेला लावून काम करणं हे एक आव्हान आहे. लुटमार होण्याची भीती असते. माझ्याकडे परवाना नाही. त्यामुळे प्रशासन कधीही ठेला तोडू शकतं."मागील चार वर्षांमध्ये त्यांच्या कामातील एक गोष्ट आधीपेक्षा सोपी झाली आहे.

अरुण कुमार यांचं म्हणणं आहे की, "कोव्हिडच्या संकटाआधी सर्व काही रोख रकमेद्वारे व्हायचं. मात्र आता प्रत्येकजण यूपीआयचा वापर करून पैसे देतात. क्यू आर कोड स्कॅन केला की काही सेंकदातच रक्कम खात्यात जमा होते."
 
ते सांगतात, "रोख रक्कम सांभाळा किंवा सुट्टे पैसे द्या या गोष्टीच आता राहिलेल्या नाहीत. त्यामुळे माझं काम आणि आयुष्य सोपं झालं आहे."
 
भारत बनला सर्वात मोठं 'रिअल टाइम पेमेंट' मार्केट
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि बँकिंग क्षेत्राच्या संयुक्त प्रयत्नांनी 2016 मध्ये यूपीआय म्हणजे युनिफाईड पेमेंट इंटरफेस (UPI) बाजारात आणण्यात आलं होतं.
 
अॅपच्या माध्यमातून काम करणारी ही पेमेंट सिस्टम आहे. या पेमेंट सिस्टमचा वापर करून वापरकर्ते लगेच पैसे पाठवू शकतो किंवा पैसे त्याच्या खात्यात पैसे येऊ शकतात. याचा वापर करून बिलं देखील भरता येतात.
 
यूपीआयचा वापर करताना बँक खात्याची माहिती किंवा इतर कोणतीही वैयक्तिक माहिती देण्याची आवश्यकता पडत नाही. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे ही सुविधा मोफत आहे.
 
यूपीआयची सुविधा देशात इतकी लोकप्रिय झाली आहे की भारत आता 'रिअल टाइम पेमेंट'चं सर्वांत मोठं मार्केट बनला आहे.
यावर्षी मे महिन्यात यूपीआयद्वारे तब्बल 14 अब्ज ट्रान्झॅक्शन नोंदवण्यात आले. मागील वर्षाच्या तुलनेत ते 9 अब्जांनी वाढले आहेत.
 
मात्र या सुविधेच्या लोकप्रियतेमुळे आणि वापरण्यातील सहज सुलभतेमुळे घोटाळेबाजांसाठी देखील हे खूपच सोयीचं झालं आहे.
 
शशांक शेखर दिल्लीतील फ्युचर क्राइम रिसर्च फाउंडेशनचे संस्थापक आहेत. ते म्हणतात, "डिजिटल पेमेंट खूपच सोयीचं असतं. मात्र यामध्ये काही त्रुटी देखील आहेत."
 
शेखर सांगतात की, "लोकांना फसवण्यासाठी घोटाळेबाज वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करतात. पेमेंट करण्यासाठी आवश्यक असणारा तुमचा यूपीआय पिन नंबर जाणून घेण्यासाठी ते वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवतात."
 
काही घोटाळेबाजांनी तर बनावट यूपीआय अॅप देखील तयार केलं आहे. खऱ्या बँकिंग अॅपची नक्कल करून ते तुमचे लॉग-इन आणि इतर महत्त्वाची माहिती चोरतात.
 
त्यांना वाटतं की, "ज्या वेगानं देशात डिजिटल सुविधा उपलब्ध झाल्या आहेत, दुर्दैवानं त्या वेगानं डिजिटल साक्षरता आणि इंटरनेटशी संबंधित सुरक्षेची माहिती लोकांपर्यंत पोहोचलेली नाही. डिजिटल सुरक्षेविषयी लोक त्या तुलनेत जागरुक झालेले नाहीत."
 
ते पुढे सांगतात की, जानेवारी 2020 ते जून 2023 दरम्यान झालेल्या आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणांपैकी जवळपास 50% प्रकरणांमध्ये यूपीआय सिस्टमचा वापर करण्यात आला होता.
 
यासंदर्भातील सरकारी आकडेवारीनुसार, मागील आर्थिक वर्षात यूपीआयशी संबंधित फसवणुकीची 95,000 हून अधिक प्रकरणे समोर आली. त्याधीच्या वर्षात नोंदवण्यात आलेल्या प्रकरणांच्या तुलनेत यात 77,000 प्रकरणांची वाढ झाली होती.
 
फसवणूक झालेल्या 'शिवकली'ची कहाणी
शिवकली बिहारची रहिवाशी आहे. ती देखील यूपीआयच्या घोटाळ्याला बळी पडली आहे. तिला स्कूटी विकत घ्यायची होती. मात्र स्कूटीची किंमत तिच्या आवाक्याबाहेर होती.
 
अशापरिस्थितीत या वर्षाच्या सुरुवातीला शिवकलीनं फेसबुकवर एक पोस्ट पाहिली. स्कूटी विकण्याशी संबंधित एक 'फायदेशीर' ऑफर यात होती.
 
त्या पोस्टवर काही क्लिक केल्यानंतर तिचा स्कूटीच्या मालकाशी संवाद सुरू झाला. तो म्हणाला की, जर शिवकलीनं जवळपास 1,900 रुपये दिले तर तो गाडीची कागदपत्रे पाठवून देईल.
 
सर्वकाही सोपं वाटत होतं. त्यामुळे 'शिवकली'नं स्कूटी च्या मालकाला लगेट पैसे ट्रान्सफर केले.
 
हा व्यवहार करत असताना शिवकलीला हळूहळू एकूण जवळपास 16 हजार पाठवावे लागले. मात्र ती स्कूटी तिला कधी मिळालीच नाही.
अखेर शिवकलीच्या लक्षात आलं की तिची फसवणूक झाली आहे.
 
ती म्हणते, "मी शिकलेली आहे. त्यामुळे मला वाटायचं की माझी फसवणूक होणार नाही. मला वाटत होतं, जगात काय सुरू आहे याची मला माहिती आहे. मात्र अशी फसवणूक करणारे लोक खूप चतुर असतात. समोरच्या व्यक्तीला आपल्या बोलण्यात अडकवण्याचं आणि त्याद्वारे फसवणूक करण्याचं कौशल्य त्यांच्यामध्ये असते."
 
यूपीआय वापरकर्त्यांचं घोटाळेबाजांपासून संरक्षण करण्यासाठी आणि त्यासंदर्भातील पद्धतींवर भारत सरकार आणि रिझर्व्ह बॅंक काम करत आहेत.
 
मात्र सध्या फसवणूक झालेल्या व्यक्तीला नुकसान भरपाईसाठी बँकेशीच संपर्क करावा लागतो.
 
जबाबदारी कोणाची?
डॉ. दुर्गेश पांडेय आर्थिक गुन्ह्याशी संबंधित प्रकरणांचे तज्ज्ञ आहेत. ते म्हणतात, "या समस्येची मूळं खूप खोल आहेत. यात सर्वाधिक जबाबदारी बँका आणि दूरसंचार कंपन्यांची आहे. ते तपास करण्यात कुचराई करतात, टाळाटाळ करतात. त्यामुळेच घोटाळेबाज हाती लागत नाहीत."
 
"मात्र बँकांसमोर हे आव्हान असतं की त्यांना बँकिंग व्यवहार, बँकेचा व्यवसाय आणि तपास प्रक्रियेत एक संतुलन साधावं लागेल. जर बँका याबाबतीत खूपच कठोर झाल्या तर समाजातील एक मोठा भाग बँकिंग सुविधांपासून वंचित राहिल."
 
डॉ. पांडेय सांगतात की फसवणुकीच्या बहुतांश प्रकरणांमध्ये बँका पूर्णपणे दोषी नसतात.
ते पुढे सांगतात, "हा एक कठीण प्रश्न आहे. कारण ही समस्या बँकांशी निगडीत आहे, मात्र फसवणूक करणाऱ्यांना वैयक्तिक माहिती ग्राहकच देतात. अशा परिस्थितीत मला वाटतं की पीडित आणि बँक दोघांनाही झालेल्या नुकसानाचा भार उचलला पाहिजे."
या समस्या असतानासुद्धा ग्रामीण भागात यूपीआयला प्रोत्साहन दिलं जातं आहे. ग्रामीण भागात बँकिंग सेवा सर्वांसाठी सहजतेनं उपलब्ध नाहीत.
गावापासून ते वेगवेगळ्या देशांपर्यत पोहोचलेलं यूपीआय
राजस्थानात राहणाऱ्या पूनम उंटवाल मार्गदर्शन केंद्र चालवतात. या केंद्रात लोकांना इंटरनेट आणि डिजिटल बँकिंगच्या वापराबाबत माहिती दिली जाते.
त्या सांगतात, "आमच्यातील बहुतांश लोक फारसे शिकलेले नाहीत. आम्हाला स्मार्टफोनचा योग्य प्रकारे वापरही करता येत नाही. मी लोकांना सांगते की आता फोन फक्त लोकांशी बोलण्याचं माध्यम राहिलेलं नाही, तर स्मार्टफोनमुळे आता बँक देखील तुमच्या फोनमध्ये उपलब्ध आहे."पूनमला वाटतं की यूपीआयमुळे स्थानिक अर्थव्यवस्थेचा विकास होण्यास मदत होईल.

पूनम सांगतात, "माझ्यासारख्या अनेक महिलांचा लहानमोठा व्यवसाय आहे. हा व्यवसाय त्या आपल्या घरातूनच चालवतात. आता आम्ही यूपीआयद्वारे पैसे पाठवू शकतो किंवा मागवू शकतो. ज्या लोकांकडे स्मार्टफोन नाही, ते माझ्या केंद्रावर येतात आणि ट्रान्झॅक्शन पूर्ण करतात."

ग्रामीण भागात विस्तार करण्याबरोबरच यूपीआय सेवा आता परदेशात देखील पोहोचली आहे.
भूतान, मॉरिशस, नेपाळ, सिंगापूर, श्रीलंका आणि यूएई मधील किरकोळ विक्रेते यूपीआय द्वारे पेमेंट स्वीकारत आहेत.

यावर्षी यूपीआय पेमेंट स्वीकारणारा फ्रान्स हा युरोपातील पहिला देश बनला आहे. फ्रान्समध्ये यूपीआय सुविधेची सुरूवात प्रसिद्ध आयफेल टॉवरच्या तिकिटांच्या विक्रीद्वारे झाली.
आता पुन्हा मुंबईत परतूया. मुंबईत अरुण कुमार यांना या गोष्टीचा आनंद आहे की त्यांना रोख रक्कम हाताळायची वेळ येत नाही. मात्र त्याचबरोबर त्यांना चिंता देखील वाटते.
त्यांना या गोष्टीची चिंता वाटते की, जेव्हा चांगलं इंटरनेट कनेक्शन नसतं, तेव्हा ग्राहक चुकून किंवा मुद्दाम पैसे न देताच निघून जाऊ शकतात.
 
ते म्हणतात, "माझ्यासारख्या छोट्या विक्रेत्यांसाठी यूपीआयद्वारे पैशांची देवाणघेवाण करणं खूप सोपं झालं आहे. मात्र मला नेहमीच फसवणुकीची भीती वाटत असते. यूपीआयद्वारे फसवणूक होण्याचं प्रमाण वाढत असल्याच्या बातम्या मी ऐकतो. मला आशा आहे की अशा काही पद्धती विकसित केल्या जातील जेणेकरून माझ्यासारख्या छोट्या विक्रेत्यांचं नुकसान होणार नाही."
 
Published By- Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

LIVE: राज ठाकरेंच्या मनसेचे निवडणूक चिन्ह काढले जाणार, मान्यता रद्द होणार

आदित्य ठाकरेंची शिवसेना UBT विधीमंडळ पक्षनेतेपदी निवड, पाच वर्षे आमदारांना एकत्र ठेवण्याचे आव्हान

राज ठाकरेंच्या मनसेचे निवडणूक चिन्ह काढले जाणार, मान्यता रद्द होणार

IND Vs AUS: पर्थ कसोटीत भारताचा ऐतिहासिक विजय, ऑस्ट्रेलियाचा पराभव

Ipl mega auction : व्यंकटेश अय्यर आयपीएल इतिहासातील तिसरा सर्वात महागडा भारतीय बनला

पुढील लेख
Show comments