Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पुरामुळे होणारे मृत्यू आपण टाळू शकतो? त्यासाठी कोणती काळजी घ्यायला हवी?

Webdunia
पहिल्याच पावसात मुंबई-ठाण्यासह अनेक शहरांमध्ये पाणी तुंबलं. आता पुन्हा त्याच हेडलाइन्स आपल्याला दिसतील.
 
- पावसामुळे जनजीवन विस्कळीत
 
- प्रवाशांचे हाल
 
- अमूक-अमूक नदीवरचा पूल वाहून गेला
 
- पुरात गाडी वाहून गेली, वगैरे.
 
अर्थात अनेक ठिकाणी पुरामुळे मृत्यूसुद्धा होऊ शकतात.
 
हे पुरामुळे होणारे मृत्यू आपण कसे टाळू शकतो? जाणून घेऊ या...
 
गेल्या काही वर्षांमध्ये भारताने, महाराष्ट्राने सातत्याने पूर आणि पुरामुळे होणारं नुकसान पाहिलंय.
 
सरकारी आकडेवारीनुसार देशाच्या एकूण 329 दशलक्ष हेक्टर क्षेत्रफळापैकी 40 दशलक्ष हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र पूरप्रवण आहे. आणि दरवर्षी हे क्षेत्र वाढत चाललंय.

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या (NDMA) माहितीनुसार दरवर्षी सरासरी 75 लाख हेक्टर भागात पूर येतो, त्यात जवळपास 1600 जणांना प्राण गमवावे लागतात. पीकं, घरं आणि संपत्तीचं नुकसान सरासरी 1805 कोटी रुपयांच्या घरात होतं.
 
भारतात वर्षातला 70-80 टक्के पाऊस मान्सूनमुळे, साधारण जून ते सप्टेंबर महिन्यात होतो. यादरम्यान कुठे अतिवृष्टी होते तर कुठे नद्यांच्या बदलत्या रूपांमुळे पूरस्थिती ओढवते. म्हणजे काय?
 
तर कुठे आजूबाजूचा गाळ नदीपात्रात वाहत जातो, कुठे काठांची झीज झालेली असते तर कुठे नद्यांना वाटेत कचरा किंवा बांधकामासारखे अडथळे असतात. यामुळे नद्यांचं पाणी पात्राबाहेर येऊ लागतं आणि आजूबाजूच्या परिसरात पूर येतो.
 
आणखी एक गोष्ट म्हणजे हवामान बदल. ‘आता पूर्वीसारखा पाऊस पडत नाही,’ असं सगळे हमखास म्हणताना दिसतात.
 
म्हणजे नेमकं काय? तर पूर्वीच्या तुलनेत आता कमी वेळेत पाऊस कोसळून चालला जातो. म्हणजे ते पावसाचं पाणी जरा थांबून कुठे जमिनीत झिरपण्यापेक्षा ते इतक्या जोराने येतं की वाहूनच जातं. त्यामुळेही पूर येत असल्याचं सांगितलं जातं.
 
मग अशा नद्यांवरचे पूल वाहून जाताना आणि त्यात अनेक वाहनं, घरं, पिकंही वाहून जाताना दिसतात. पण मृत्यू नेमके कसे होतात?
पुरामुळे मृत्यू कसे होतात?
पुरामुळे होणारे मृत्यू कधीकधी अपघाताने तर बऱ्याचदा स्वतः पत्करलेल्या जोखमीमुळे होतात.
 
‘टाईम’ मॅगझिनसाठी वेगवेगळ्या आपत्तींवर एक मालिका करणाऱ्या पत्रकार अमँडा रिप्ली सांगतात की, विकसित देशांमध्ये पुरातले बहुतेक मृत्यू बुडण्यामुळे होतात. त्या सांगतात की आपला मेंदू सहसा पाण्याशी निगडित धोक्याचा अचूक अंदाज लावू शकत नाही.
 
“15 सेंटीमीटर म्हणजे घोट्याच्या उंचीपर्यंतचं वाहतं पाणी तुम्हाला खाली पाडायला पुरेसं आहे. 15 सेंटीमीटर खोल पाणी एक गाडी थांबवू शकतं. जर पाणी 30 सेमी असेल, तर तुमची कार तरंगू शकते. 60 सेमी पाणी असेल तर तुम्ही वाहून जाऊ शकता. एवढं पाणी आपला जीव घेऊ शकतो, याचा आपण कदाचित विचारच करत नाही,” असं सांगतात.
 
अमँडा आणखी एक निरीक्षण नोंदवतात - की आपण कॅन्सर किंवा दहशतवादाला जितकं घाबरतो, त्यापेक्षा कमी आपण पुरासारख्या नैसर्गिक आपत्तींना घाबरतो, कारण आपल्यासाठी ते नेहमीचंच झालेलं असतं आणि आपल्याला वाटतं की आपण त्यावर नियंत्रण मिळवू शकतो. म्हणून आपण, खासकरून पुरुषमंडळी जास्त जोखीम पत्करतात, आणि अगदी पूर आलेल्या नदीवरूनही गाडी नेण्याचा प्रयत्न करतात.
 
मग असे मृत्यू टाळायचे कसे?
 
पुरामुळे होणारे मृत्यू टाळावे कसे?
दरवर्षी पावसाळा आल्यावर आपण याबद्दल चिंता व्यक्त करतो, पण एकदा काय ते पाणी ओसरलं आणि ऋतू बदलला की आपण सारंकाही विसरून कामाला लागतो. आणि इथेच अनेकदा चूक होत असते.
 
पुराचं व्यवस्थापन करण्यासाठी एक मोठ्या आराखड्याची गरज असते. जिथे दरवर्षी पाणी तुंबतंच जसं की मुंबई, किंवा जिथे दरवर्षी पूर येतोच जसं की आसाम, अशा भागांमध्ये पूर टाळण्याची योग्य व्यवस्था करण्याची गरज असते, असं तज्ज्ञ सांगतात.
 
उदाहरणार्थ, मुंबईतल्या नाल्या बंद होऊ नये म्हणून 2018मध्ये प्लास्टिक बंदी घालण्यात आली. आसामच्या दोन प्रमुख नद्या – ब्रह्मपुत्रा, बराक आणि त्यांच्या असंख्य उपनद्यांना दरवर्षी पूर येतो.
 
इथल्या 40 टक्के भागाला पुराचा कायम धोका असतो. अशा भागांमध्ये पूर व्यवस्थापनासाठीची कामं वर्षभर केली जातात, जसं की नदीपात्रांना दोन्हीकडून पक्क्या संरक्षण भिंती बांधणं, जिथे नद्या जास्त फुगतात त्या परिसरातल्या लोकांचं उंचावर पुनर्वसन करणं.
 
आता पुराचा अंदाजही पूर्वीपेक्षा जास्त अचूकपणे व्यक्त केला जातोय. त्यासोबतच आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पूर्वसूचना – जाणकार सांगतात की लोकांना येऊ घातलेल्या आपत्तींची आणि त्यांनी घ्यायच्या खबरदारीची योग्य, स्पष्ट आणि तंतोतंत माहिती मिळाली की त्यांचे जीव वाचण्यास मदत होऊ शकते.
 
म्हणजे पुराचा इशारा असेल तर लोकांना त्यांच्या जवळचं आश्रय स्थळ कुठे आहे, त्यांनी कोणती कागदपत्रं आणि आपत्कालीन सामुग्री सोबत ठेवावी, याची त्यांना माहिती दिल्यास त्यांचे जीव वाचू शकतात.
 
मग लोकांनी काय करावं? NDMAने या काही गोष्टी सुचवल्यात...
पूर येण्याच्या आधीच तुमच्या भागाला पुराचा किती धोका आहे, याची माहिती घ्यावी. त्यानुसार घराचं बांधकाम उंचावर करावं.
घरातली इलेक्ट्रिक उपकरणं उंचीवरच ठेवावीत
घरात गळती थांबवण्यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी
पूर येण्याची शक्यता असल्यास
 
रेडिओ-टीव्हीवरील माहितीकडे नजर ठेवा
घरातलं शक्य ते सामान वरच्या मजल्यांवर शिफ्ट करा
अचानक पूर आल्यास उंच ठिकाणी जा
नाले, ओढे, इतर प्रवाहांपासून सावध राहा, नाहीतरी वाहून जाण्याची शक्यता असते
घर सोडावं लागल्यास
 
घरचा मेन पावर सप्लाय, गॅस सप्लाय बंद करूनच निघा
वाहत्या पाण्यातून चालू नका, जिथे पाणी स्थिर आहे तिथून वाट काढा.
पुराच्या पाण्यातून गाडी चालवू नका. गाडी लवकर वाहून जाऊ शकते
आणि लक्षात घ्या, इतरांची मदत करण्यापूर्वी स्वतःला सुरक्षित करा. ही सोपी गोष्ट महत्त्वाची आहे, ती तुम्ही शेअर करून इतरांचेही प्राण वाचवू शकता.
 
पुरामुळे होणारे मृत्यू क्युबा या देशाने कसे कमी केले, याची ही गोष्ट दुनियेची तुम्ही नक्की ऐकू शकता.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Margashirsha Purnima 2024: मार्गशीर्ष पौर्णिमेला लक्ष्मी देवीची कृपा मिळविण्यासाठी कोणते उपाय करावेत?

Annapurna Jayanti 2024: अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघरात किती दिवे लावावेत?

वृश्चिक राशीत बुधाचा उदय या राशींसाठी खूप शुभ राहील

बाळासाठी भगवान दत्तात्रेयाच्या नावावरुन सुंदर नावे

दत्त जयंती विशेष रेसिपी : सुंठवडा

सर्व पहा

नवीन

Year Ender 2024 भारतीय कुस्तीसाठी 2024 वर्ष निराशाजनक, ऑलिम्पिकमध्ये विनेशचे हृदय तुटले

Year Ender 2024: पीएम मोदीं ते राहुल गांधी आणि योगीपर्यंत या नेत्यांची वक्तव्ये चर्चेत होती

Mumbai Boat Accident मुंबई बोट भीषण अपघाताचे दृष्य भयावह, 13 जणांचा मृत्यू

LIVE: भुजबळांनी ओबीसींवरील अन्यायाविरोधात रस्त्यावर उतरण्याची घोषणा केली

'घाईत निर्णय घेणार नाही, ओबीसी नेत्यांशी चर्चा केल्यानंतरच पाऊल उचलले जाईल म्हणाले छगन भुजबळ

पुढील लेख
Show comments